subhash inamdar

subhash inamdar

Saturday, July 23, 2011

बॉलिवूड हे सांस्कृतिक परंपरेचे भक्ष्यस्थान

नृत्य, संगीत या क्षेत्रात वैयक्तिक योगदान देणारे कलावंत चित्रपटसृष्टीकडे धावत असून ते बॉलिवूडच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे अभिजात कलेची हानी होते आहे, असे मत पॉप गायक रेमो फर्नांडिस यांनी व्यक्त केले. मराठी चित्रपटाला संगीत देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

रेमो फर्नांडिस हे "मॉन्टे व्हर्ट इस्टेट्‌स'ने आयोजित केलेल्या संगीत रजनीसाठी पुण्यात आले आहेत. त्यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. बॉलिवूड, सध्याचे संगीत, परदेशातील संगीत क्षेत्र याबाबत त्यांनी आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले, 'पूर्वी पॉप, रॉक अल्बमचे प्रमाण जास्त होते; परंतु आता हे अल्बमसाठी कष्ट घेणारे गायक, संगीतकार पूर्णवेळ बॉलिवूडमध्ये दाखल झाले आहेत. प्रसिद्धी, पैसा हे त्यामागील कारण आहे. यामुळे दर्जेदार अल्बम बाजारात येणे बंद झाले आहे. भारतीय पॉपची प्रगती खुंटली आहे. कलाकारांनी चित्रपटसृष्टीत काम करायला हरकत नाही; परंतु आपली कला त्यांनी वेगळी जोपासली पाहिजे.''

'मला चाकोरीबाहेरचे संगीत द्यायला आवडते. त्यासाठी मी प्रयत्न करतो. मग त्याला भाषेचा अडसर येत नाही. अगदी मराठी असो वा हिंदी, विषय वेगळा असेल, तर त्या चित्रपटाला संगीत द्यायला आवडेल. प्रथम मला कॅसेट कंपन्यांनी नाकारले होते. परंतु, मी स्वत: कॅसेट ध्वनिमुद्रित करून स्कूटरवरून विकल्या आहेत. लोकांनी त्या ऐकल्यानंतर माझी ओळख निर्माण झाली. श्‍याम बेनेगल यांनी माझ्या संगीतरचना ऐकून मला त्यांच्या चित्रपटात संधी दिली होती,'' असे ते म्हणाले.

पुण्यातील फसलेल्या पहिल्या कार्यक्रमाची आठवणही त्यांनी या वेळी सांगितली. 'लहान असताना मला पुण्यात येण्याची संधी मिळाली. एका व्यक्तीने आमच्या बॅंडच्या संगीत रजनीचे आयोजन केले होते. परंतु, येथे आल्यानंतर तो गायब झाला. त्या वेळी पुरेसा पैसाही आमच्याकडे नव्हता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. आमची कानउघाडणी केल्यानंतर मग आम्हाला गोव्याला पाठविण्यात आले,'' असे ते म्हणाले.
http://www.esakal.com/esakal/20110724/5335040805023219889.htm



'संगीत क्षेत्रातही कलावंत हि-यांची परंपरा'

' राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' असे वर्णन केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दगडांच्या खाणीतील हिरेही निर्माण होतात. इतर सर्व कलाक्षेत्रांसोबतच संगीत क्षेत्रातही अशीच कलावंत हिऱ्यांची परंपरा आपल्याला लाभली आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो,' असे मत ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक राजदत्त यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुणे भारत गायन समाजातर्फे आयोजित (कै.) सौ. वसुंधरा पंडित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून राजदत्त बोलत होते. या वेळी त्यांच्या हस्ते संगीतकार अशोक पत्की यांना या वर्षीच्या कै. सौ. वसुंधरा पंडित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंचवीस हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कै. वसुंधरा पंडित ट्रस्टच्या विश्वस्त अरुणा गवाणकर, पुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष सुधाकर जोशी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

खरा कलावंत हा आपली कला कायम समृद्ध करायचा प्रयत्न करीत असतो. तेच त्याच्या जिवंतपणाचे लक्षण असते. आपल्याकडे चांगल्या कलावंतांची खूप मोठी परंपरा आहे. त्यातल्याच एका आदर्श कलाकाराचा आपण आज गौरव करीत आहोत. अशाच माध्यमातून चांगल्या कलाकारांची उदाहरणे नव्या पिढीसमोर येणे आवश्यक आहे, असेही राजदत्त यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना पत्की यांनी, 'अजून शिकण्याची आवड असल्याने मी स्वत:ला कधीच मोठे मानले नाही. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी एक गोड धक्का आहे,' असे सांगितले. पत्की यांनी संगीत दिलेल्या गाण्यांसोबतच त्यांच्या प्रकट मुलाखतीचेही या वेळी आयोजन करण्यात आले होते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9340288.cms

No comments:

Post a Comment