शाहरूख खान चित्रपटात व्हायोलिनवर स्वर काढतो. त्याचे आकर्षण बाळगून अनेक विद्यार्थी व्हायोलिन शिकायला येतात. मात्र या वाद्यात स्वर शोधायचा असतो. त्यासाठी लागते ती कमालीची चिकाटी आणि जिद्द. थोडक्या वेळात येणारे हे वाद्य नाही. प्रथम अकर्षणाने आलेला विद्यार्थी पुढे वाद्याचे धडे गिरवायला येत नाही. शिकायला येणारे शार्गिद अर्धवट सोडून जातात. म्हणूनच सौ. चारूशीला गोसावी, अविनाश द्रवीड, सुरेश गुजर यांचे सारखे विद्यार्थी, शिष्य व्हायोलिनमध्ये पुढे चमकताना दिसतात. तीन हजारात तीन-चारच स्वतःचे नाव कमावतात याची खंत पं. भालचंद्र दामोदर देव यांनी व्यक्त केली.
पं. देव यांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने पुण्यात आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार समारंभात पं. देव यांनी मनमोकळी उत्तरे देत शब्द-सूरांची मैफल रंगवित नेली. पुण्याचे सांस्कृतिक पत्रकार सुभाष इनामदार यांनी पं. देव यांच्याशी बातचित केली. त्यांच्याकडून काही आठवणी रसिकांना ऐकता आल्या.
ज्येष्ठ रसिक, समिक्षक, कलावंत आणि व्यंगचित्रकार श्री. मंगेश तेंडूलकरांच्या हस्ते स्वरबहार संस्थेच्या वतीने शनिवारी ( १४ मे) पं. देव आणि त्यांच्या पत्नी सौ. निला भालचंद्र देव यांचा सत्कार केला गेला.
स्वरानंदचे प्रकाश भोंडे, ज्येष्ट व्हायोलिन वादक पं. फैय्याज हुसेन खॉं यांना देवांविषयीचे विषेश सांगितले..
पं. गजाननबुवा जोशी यांचेकडे पं. देव यांनी व्हायोलिनचे धडे गिरविले. त्यांचे सांगणे होते की, तु व्हायोलिनीस्ट होण्यासाठी अजून ५ वर्षे रिय़ाच कर. पण परिस्थितीमुळे आपल्याला टेलिफोन खात्यात नोकरी पत्करावी लागली. मात्र व्हायोलिन शिकण्याची जिद्द. तेच एकमेव व्यसन जडले. आयुष्यभर तेच केले. आज मी तृत्प आहे. माझ्या मेहनतीला फळ आले. माझ्या मुलीचा काल (शक्रवारी ) व्हायोलिन गाते तेव्हा...कार्यक्रम ऐकला आणि तिने कलेचे चिज केले असे वाटले., असे विचार पं. भालचंद्र देव यांनी सत्कारप्रसंगी मांडले.
शास्त्रीय संगीताची आवड असली तरी नोटेशन लिहण्याची सवय सुगमसंगीताकडे वळल्याने झाली. याचे श्रेय ते स्वरानंद या संस्थेला देतात. अरुण दाते, वि.र.गोडे, विसुभाऊ बापट, आनंद माडगूळकर, यशवंत देव, बबनराव नावडीकर, मालती पांडे अशा कित्येक कलावंतांना पं. देव यांनी व्हायोलिनची साथ केली. पण हिराबाई बडोदेकरांबरोबर केलेल्या साथीची आठवण त्यांच्या लेखी वेगळी होती. ती आठवण सांगताना हिराबाईंच्या लडीवाळ स्वरांची यादगार त्यांना सांगावाशी वाटली. नागेश खळीकर यांचेबरोबर भारत गायन समाजात १९६१ साली केलेल्या साथीची पसंती आणि त्यावेळी मिळालेल्या १५ रुपयांच्या बिदागीचा किस्साही पं. देव यांनी ऐकविला.
सत्काराला उत्तर देताना त्यांनी पुणे आकाशवाणी, आणि भारत गायन समाज या संस्थाना आवर्जून उल्लेख केला. आपल्या वादनाला यामुळे दिशा प्राप्त झाल्याचे ते सांगतात. आयुष्यातही गेली ४९ वर्षे सौ.ची साथ मोलाची मिळाल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.
व्यासपीठावर, कार्यक्रमात चमकतो तो गायक किवा संगीतकार. पण गाण्याला उठाव देणा-या साथीदारांची ओळख किती जणांना असते, असा प्रश्न उपस्थित करून श्री. मंगेश तेंडूलकरांनी अनेक चित्रपटात व्हायोलिन आणि सारंगी वादकांनी कमाल वादन करून गाण्याला उठाव दिला आहे.पण त्यांचे नाव माहित नसते. ते अज्ञात असणारे असंख्य कलावंत गाण्यात कलाकुसर करतात. जीव ओततात. यानिमित्ताने पं. देव यांचे नाव समोर आले. त्यांच्या कलेची स्वतंत्र ओळख झाली. त्यांच्या वादन कलेचा गौरव झाल. गाण्याला नटविणा-या अशा साथीच्या कलावंताचा सन्मान व्हायला हवा , असे सांगून तेंडूलकरांनी पं. देव यांचा सत्कार केला.
फैय्याज हुसेन खॉं यांनी व्हायोलिनमुळे आपल्याला भरभरून आनंद-प्रेम मिळाल्याचे सांगितले.
निवारा वृध्दाश्रमाच्या सभागृहात सत्कार कार्यक्रमाची सुरवात पं. देव यांची कन्या आणि शिष्या सौ. चारूशीला गोसावी यांनी व्हायोलिनवर सादर केलेल्या श्यामकल्याण रागाने झाली.
पं. देव यांनी आरंभी राग यमन आणि नंतर तीन नाट्यपदे व्हायोलिनवर रंगवून रसिकांना स्वरांची ओंजळ अर्पण केली.
शुक्रवारी ( १३ मे) व्हायोलिन गाते तेव्हा...हा हिदी-मराठी गीतांचा नजराणा व्हायोलिनच्या स्वरातून आविट गोडीत रसिकांना बहाल केला. गांधर्व महाविद्यालयात सादर झालेल्या कार्यक्रमाला भरभरून दाद मिळाली. वन्समोअरची शिफारीशही झाली. शब्देविणे स्वरातून बोलणारे व्हायोलिन एकेका गाण्यातून बहरत होते. सौ. चारूशीला गोसावी यांची वाद्यावरील हुकूमत आणि मेहनतीचा कस प्रत्येक रचनेतून सिध्द होत होता. संथ, उडत्या चालींच्या रचना सादर करून रसिकांना टाळ्या द्यायला भाग पाडले. सौ. विनया देसाई यांचे निवेदन आणि ताल व साथीच्या वाद्यांच्या सुरेल आविष्कारातून सारे श्रोते तृप्त झाल्याचे दिसत होते.
सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
No comments:
Post a Comment