subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, April 20, 2011

ब्लॉगर्सनी संपर्क साधावा


सांस्कृतिक पुणे या मराठीत सुरू केलेल्या ब्लॉगसाठी विविध ठिकाणी पुण्यात होणा-या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून त्यावर स्वतंत्र भाष्य करू शकणारे तरूण ब्लॉगर्सनी संपर्क साधावा. हा एक नवा उपक्रम इंटरनेटच्या माध्यमातून सुरु केला आह...े. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट आणि  विविध ललीत कलांचे कार्यक्रम सादर करणा-या संस्थाचेही आगामी कार्यक्रम या ब्लॉगवर दिले जातील. इथे कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही. भारतातले पुणे हे एक सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख स्थान मानले जाते. इथल्या रसिकांची कीर्ति सर्वदूर पसरली आहे. पुण्यात रोज अनेक कार्यक्रम होतात. त्यांच्यासाठी ही स्वतंत्र दखल घेणारी  साईट असावी एवढीच माझी इच्छा आहे... त्यासाठीच हे सारे... www.culturalpune.blogspot.com हा ब्लॉग सुरु केला आहे..तो आपल्या सर्वांचे सांस्कृतिक संकेतस्थळ असेल.. ते करणे हा माझा प्रयत्न आहे. खात्री आहे आपण सारे याला मदत कराल. धन्यवाद.   सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com www.subhashinamdar@gmail.com www.culturalpune.blogspot.com Mob: 09552596276 See More

http://www.youtube.com/results?search_query=culture%20of%20pune&search=Search&sa=X&oi=spell&resnum=0&spell=1

Thursday, April 14, 2011

दमां चा ८५ व वाढदिवस -नवे संकल्प

 



आज १४ अप्रैल द.मा . मिरासदार यांचा ८५ व वाढदिवस . त्याना शुभेच्छा देण्यासाठी घरी गेलो असताना नवे संकल्प मिरासदार सांगत होते . विनोदी साहित्य विषयी बोलणे निघाले . हा त्यातलाच कही भाग .....

-आज उत्तम विनोद दुर्मिळ झाला आहे .चिं. वि .जोशी, गडकरी , अत्रे , दत्तु बांदेकर असे उत्तम दर्जाचे विनोदी साहित्य दुर्मिळ झाले आहे .
विनोदी साहित्य लिहले जाते ..दिवाळी अंकातून हे लेखन होते पण ते वाचले तेर समाधान होत नाही .
उत्तम विनोदी लेखन करायला निरिक्षण शक्ति हवी. अवलोकन हवे आणि वाचन भरपूर असणे आवश्यक आहे .

अश्लीलतेकड़े विनोदी साहित्य झुकलेले दिसते .त्यातली चित्रही अश्लील असतात . आजचा तरुण वर्ग याकडे लगेच अक्रुष्ट होतो . हा विनोदाचा पराभव आहे असे माला वाटते .
चांगले विनोद निर्माण करता येत नाहीत असे त्याचा अर्थ होतो .
-अनेक उत्तम कथाकार . उदाहरण म्हणजे चिं. वि .जोशी , दी . बा . मोकाशी
उत्तम विनोदी कथा लिहायचे ..पण ते कथाकथन करू सकत नव्हते ..
कथाकाथनाला थोडेफार वक्तृत्व अंगी असले पाहिजे ..शब्दात नाट्य हवे ..
शाब्दिक अभिनय यायला हवा आहे .

-८४ संपून आज मी ८५ वर्षात पदार्पण केले . प्रकृति अद्याप चांगली आहे .
त्याचे श्रेय आई वडिलांना जाते .अजुन आवाज ठनठणित आहे .
माइक नसला तरी आवाज सर्वांपर्यंत पोचतो .
-एक उत्तम विनोदी नाटक लिहायचे आहे .
आणि मराठीत उत्तम विनोदी कादंबरी नाही ..
ती लिहावी असा संकल्प आहे .


सुभाष इनामदार , पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
www.culturalpune.blogspot.com
www.subhashinamdar.blogspot.com

Tuesday, April 12, 2011

आगळी गुरूदक्षिणा

सुप्रसिध्द साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक  डॉ. न.म.जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम केले गेले होते. यात एक विषेश उपक्रम त्यांच्या विद्यार्थ्यांनी-चाहत्यांनी केला..ते म्हणजे....स्वाक्षरी संदेश...

काय आहे हा उपक्रम..
डॉ. न.म.जोशी यांच्यासारख्या लोकप्रिय साहित्यिकाची स्वाक्षरी घेण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमानंतर विद्यार्थी, रसिक चाहते गर्दी करीत असतात. मग कुणी वही पुढे करतात. तर कुणी एखादा चिठो-यासारख्या कागदावर सही घेतो. कुणी तर बस तिकिटाच्या मागेही स्वाक्षरी मागतो. देणारा स्वक्षरी देतो. घेणारा हौसेने घेतो. पण त्या स्वक्ष-या वा-यावर उडून जातात.
मग सुहास जोशी, प्रकाश जोशी, प्रकाश भोंडे, राहूल सोलापूरकर या विद्यार्थ्यांनी ठरवले की, जोशी सरांची स्वाक्षरी ही जीनवसंदेश देणारी स्वाक्षरी असली पाहिजे.
डॉ. न.म.जोशी सर म्हणजे बोधकथाकार ! कादंबरीकार , नाट्यलेखक ! त्यांच्या साहित्यातील अनेक सुविचार त्यांचेच विद्यार्थी डॉ. दिलीप गरूड यांनी संकलित केले.
आणि स्वाक्षरी-संदेश नावाची स्वाक्षरी पुस्तिकाच तयार केली गेली. मुखपृष्ठावर डॉ. जोशी यांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी. आत छोटी-छोटी सुंदर पाने. तळाशी डॉ. न.म.जोशी यांच्या साहित्यातला सुविचार !
स्वाक्षरी साठी इतर पान कोरे..तिथे  स्वाक्षरी घ्यावी...खाली छापलेला संदेशही तयार !
या शिवाय ही स्वाक्षरी पुस्तिका तयार करण्यामागची व्यापक कल्पना म्हणजे..
आपण लेखक, कवालंत, खेळाडू यांच्या स्वाक्ष-या घेतो. पण आपल्या घरातल्या रक्ताच्या नात्याच्या माणसांच्या स्वाक्ष-या तरी आपल्याजवळ कुठे असतात ?
आजी-आजोबांची स्वाक्षरी
काका-काकुंची स्वाक्षरी
मित्र-मैत्रीणींची स्वाक्षरी
परिचित-अपरिचितची स्वाक्षरी
सहप्रवाशांची-सहका-याची स्वाक्षरी
शिक्षक-मार्गदर्शकाची स्वाक्षरी
अशा स्वाक्ष-या लोकांनी गोळा कराव्यात. तो एक अमूल्य ठेवा असेल. तो एक ऐतिहासिक दस्तऐवज होईल. त्याला भावनिक ओलावा तर आहेच पण व्यावहारिक किंमतही आहे. कधी काळी सबळ पुरावा म्हणू हा हस्ताक्षत्राचा नमुना म्हणून या स्वाक्षरी-संदेश पुस्तिकेतील या स्वाक्षरीचा उपयोग होऊ शकेल.
अशी ही स्वाक्षरी-संदेश पुस्तिका !
त्या पुस्तिकेची किंमत आहे फक्त बारा रूपये.
डॉ. न.म.जोशी यांना ही आगळी-वेगळी गुरूदक्षिणा दिल्याबद्दल प्राख्यात समीक्षक डॉ. द.भि. कुलकर्णी यांनी डॉ.जोशी यांच्या अमृतमहोत्सवी सदस्यांचे भरभरून कोतूक केले आहे.

सुभाष इनामदार, पुणे
9552596276
and





Monday, April 11, 2011

ता-यांचे बेट..एक अनुभव

 कथा ही अशी आहे...
मुंबईच्या धकाधकीपासून दूर कोकणातल्या एका सुंदर पण दुर्गम खेड्यामध्ये एक कुटुंब मोठ्या मजेत राहतं आहे.

श्रीधर सुर्वे हा ग्रामपंचायतीत सेवक आहे आणि बायको, दोन मुलं आणि आईसोबत तो आपल्या छोट्याशा घरात मोठ्या आनंदाने राहत आहे. मुलगा ओंकार’ हा व्रात्य, अभ्यास न करणारा तर मुलगी मीरा हुशार आणि समजूतदार, आणि सुखा समाधानात संसार करणारी पत्नी इंदू असे हे सुखी कुटुंब आहे. गावातल्या गणपतीवर त्याची श्रद्धा आहे, दोस्तीचे नाते आहे.
लेले साहेब हे ग्रामसुधार मोहिमेवर आलेले सरकारी अधिकारी. त्यांच्या कामासाठी श्रीधरला अलीकडे सारखे मुंबईला जावे लागते.अशाच एका वारीला तो कुटुंबियांना आपल्याबरोबर मुंबईला नेण्याचा प्रस्ताव ठेवतो. मंडळी हरखून जातात. ओंकार मुंबईतल्या मौजेच्या स्वप्नांमध्ये रमून जातो.    
पण मुंबईमध्ये ओंकारच्या पदरी निराशाच पडते कारण मुंबईच्या ह्या लखलखत्या जगातल्या बहुतेक गोष्टी त्याच्या वडिलांना न परवडणाऱ्या असतात.अशातच ओंकारला एक टोलेजंग इमारत दिसते,आजीच्या गोष्टीतल्या राजमहालाची आठवण करून देणारी. ते एक फाइव्ह स्टार हॉटेल आहे. ओंकारची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो वडलांना हॉटेलमध्ये जाण्याचा आग्रह धरतो. असह्य होऊन इंदू हात उगारते. मंडळी गावी परततात.
ओंकारच्या वर्तनावर नाराज झालेला श्रीधर तू वर्गात पहिला येउन दाखव, मी तुला फाईव्हस्टार मधे राहायला घेऊन जाइन अशी लेकाबरोबर पैज लावतो.
ओंकार पेटून उठतो आणि दिवस रात्र अभ्यास करू लागतो आणि प्रकरण मजेदार होऊन जाते. मुलाच्या वर्तनाने सुरवातीला आश्चर्यचकित झालेला श्रीधर नंतर ओंकारच्या ध्यासाने पुरता घाबरून जातो. खरोखरीच मुलगा पैज जिंकला तर? अस्वस्थ श्रीधर गणपतीला मुलाला परीक्षेत दुसरे आणण्याचे साकडेसुद्धा घालतो.
फक्त एका रात्रीसाठीसुध्दा झगमगणारे ते पाच तारे ह्या छोट्या कुटुंबाला परवडणारे नाहीत.
एक बाप मुलाला दिलेला शब्द पाळण्यासाठी अहोरात्र धडपडू करू लागतो, नाना मार्ग शोधू पाहतो आणि मजेदार प्रसंगाची मालिकाच आकार घेउ लागते.
दूर लखलखणाऱ्या मुंबई बेटाच्या स्वप्नानी आपल्या छोट्या विश्वात सुख मानणाऱ्या त्या कुटुंबात मोठी खळबळ माजते.

.....आता थोडे चित्रपटाविषयी
पंचतंत्रात जसा बोध देण्यासाठी किंवा कसे वागावे याचे धडे गिरविण्यासाठी कथेतून पात्रे बोलत रहातात. आणि त्यासा-यांचा शेवट एक उपदेश ठळकपणे पसरविला जातो. तसाच काहीसा प्रकार ह्या सत्त्याप्रयोगात ता-यांचे बेट मध्ये अनुभवायला मिळतो. मुंलांसाठी बाप म्हणून आजकालचे पालक किती खुजेपण अनुभवतात याचा प्रत्ययही या चित्रपटात प्रतिबिंबीत झाला आहे. आजीने नातीला सांगितलेल्या गोष्टीतूनच कोकणाच्या पार्श्वभूमिवर चित्रपट तुमच्याशी आणि त्या गणपती बाप्पाशी गुजगोष्टी करतो. सचोटिने जगणा-या श्रीधर सुर्वे दारूच्या आहारी जातो. मुलाला दिलेल्या शब्दाला पूर्ण करण्यासाठी  लबाडीने पैसे कमवत रहातो. हे सारे मात्र त्या गणपतीच्या साक्षीने..कदाचित गणपती हे एका मनाचे प्रतिक असावे..कष्टाचे..जिद्दीचे फळ नक्की मिळते..ते यश भक्ताच्या झोळीत तो गजानन.. नक्कीच घालतो.
किरण यज्ञोपवित यांच्या दिग्दर्शनातून हे ता-यांचे बेट चमकले आहे. सचिन खेडेकर यांच्यासारखा सामान्यवर्गातला सत्शील माणूस कथेचा भार तोलून धरतो. त्याच्या भूमिकेत तो सहजपणे विरघळून जाताना पहाणे हे आनंदाचे काम रसिकांना करावे लागेल. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मुळे सामान्यांचा असामान्य प्रतिनिधी इथेही ही कथा सचिन घडवितो. कोकणाच्या निसर्गाने... त्यातल्या वस्तुंनी.. वातावरणातून...हे बेट सतत खुणावत रहाते.
त्याला माया आणि प्रसंगी कठोर धार देणारी इंदू ...अर्थात अश्विनी गिरी..
बोटीचे जीवन...मुंबापुरीतली चकाकणारी दुनिया..
मिळेल त्यात समाधान मानणारे कुटुंब.. मुलाशी लावलेल्या पैजेतून हादरून जाते... मग पैशाची दुनिया...भावनेला दुरावते..
सारेच चित्रपटात घडत रहाते.
चित्रिकरणात कोकणाचे वैभवशाली चित्रीकरण तर दिसतेच पण दिसते ...आजही जपून ठेवलेल्या त्या अस्सल परंपरेचे सालंकृत दर्शन. गावात नसेल पेशाची श्रीमंती. पण आहे वारसांनी कमावलेली संमृध्द परंपरा.  चित्ररूपाने दृष्यातून ते कोकण डोकावत रहाते.. ता-यांचे बेट..म्हणतानाच कोकणचे आणि मुंबईचे सांस्कृतीक नातेही कुठे तुटत चालल्याचे स्पष्ट दिसते.
कोकणातली माणसे आता कोकणीच बोलत नाहीत..तर ती बोलतात पुणेरी मराठीत..क्वचित आजीच्या आणि बायकोच्या हेलात कोकणी सूरावट आढळते. पण माणूसकीची नाळ मात्र आजही तुटलेली नाही याची प्रचिती आणि तिही....आजच्या परिस्थितीची जाणीव या चित्रपटात ...नव्हे... विमा एजंट बनलेल्या किशोर कदम.. सुपारी घेणारा व्यापारी.. भजनाला ढोलकी वाजविणारा..परिस्थितीने गायही विकायची परिस्थिती येणारा...गावचे..घराचे वैभवी अवशेष विकणारा..शशांक शेंड्ये.. सारेच..
उलट मुंबापुरीत हापिसातला शिपाईदेखील फाईल पुढे रेटण्यासाठी घेत असलेली लाच..शेअरच्या पैशात भावनेला न थारा देणारा विनय आपटे. सारखा..व्यावसायिक...पंचतारांकित हॉटेलात चकाचक शोभिवंत मखमली मूर्ती..आणि इखाद्या इसमाची पैशाची पिशवी परत देण्याची भावनेतून माणूसपणाची..चांगूलपणाची जाणीव.. सारेच.
कोकणातले प्रेम गणपतीवर भारी..त्यातच चित्रपटातला नायक त्या गणपतीच्या मूर्तीशी मनातला संवाद करतो..आपली व्यथा त्याच्यासमोर प्रकट करतो..आणि आपल्या मुलाला दुसरा क्रमांक मिळावा यासाठी गणपतीलाच साकडे घालतो...
सारेच..द्ष्य..अदृष्यात व्यक्त होणारे, किरण यज्ञोपवित या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने हा संस्कार जपणारा..जुन्या परंपरेत काहीसा नवे रसायन गुंफून बनविवेला एक भाबडा पण प्रामाणिक आविष्कार घडविला आहे. इथे चित्राची फ्रेमही बोलते आणि माणसेही. वातावरणही...
ऑल्ट एंटरटेनमेंट आणि नीरज पांडे प्रस्तुत फ्रायडे फिल्मवर्क्स निर्मित हा चित्रपट म्हणजे या सुट्टीत मुलांसह पालकांनी आवर्जून पहावा असा आहे...त्यात तशी करमणूक नसली तरी तुम्ही सहजी या कथेत स्वतःली गुंफत जाता..आणि पुढे त्यातलेच एक तुम्ही बनत रहाता.
सचिन खेडेकर, अश्विनी गीरी यांच्या अभिनयातून साकारले गेलेले.. मध्यमवर्गीयांचे प्रतिनीधी बनून...चित्र तुम्हाला भावत रहाते... कधी बोचते..तर कधी दाद देण्यास भाग पाडते.
इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर या मुलांनी यात खरंच धमाल केली आहे... ते हसवतात तसे थोडे नाचवतातही.
विनय आपटे, शशांक शेंड्ये, किशोर कदम, शुंभांगी जोशी यांच्या भूमिका थोड्या हटके झाल्या आहेत. क्रेडिट गोज टू अर्थात किरण ..
मराठीत मालगुडी डेज सारखा चित्रातून संस्कृती आणि परंपरेचे बीज सांगणारा ता-यांचे बेट....मला तरी वाटते...अवश्य पहा...पण मुलांना घेऊन...


सुभाष इनामदार, पुणे

9552596276



वसंत नाट्यवैभव

टी.व्ही मालिका, सिनेमे, क्रिकेट आणि अधुनिक विचारांच्या हवेत जगणा-या नवीन पिढीची कानेटकरांच्या कलाकृतींशी क्वचितच भेट झाली असेल.. आणि टी व्ही संस्कृती रूजण्यापूर्वी ज्यांनी कानेटकरांची नाटके आवडीने बघीतली असतील,,अशा सा-यांना वसंत नाट्यवैभव.....ही दुर्मिळ पुर्नभेटच ..सुखद अनुभव देउन गेली.
सुप्रसिध्द लेखक. नाटककार. वसंत कानेटकर..त्यांच्या कारकीर्दीची मागोवा घेणारा कार्यक्रम पुणे, मुंबई आणि नाशिकात वसंत नाट्यवैभव.. स्वरानंद या पुण्याच्या संस्थेमार्फत नुकताच सादर झाला. कानेटकरांच्या काही नाटकातील प्रवेश, काही परिचित. स्वतः कानेटकर व काही मान्यवरांच्या मुलाखतींच्या ध्वनिचित्रफितीतून ..नाट्यगीतांचे सादरीकरण आणि हे सर्व जोडणारे निवेदन..अशा स्वरूपाचा हा प्रयोगच..सादर झाला. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.
प्रेमा तुझा रंग कसा, मत्स्यगंधा आणि अखेरचा सवाल या नाटकातील प्रवेश..दिलिप वेंगुर्लेकर, रविंद्र खरे, अमृता सातभाई, राधिका देशपांडे, नेहा परांजपे, लिना गोगटे या कलाकारांनी ताकदीने सादर केले
 आणि त्यातून रसिकांना कानेटकरांच्या लेखणीची ताकद पुरपुर अनुभवता आली. इथे ओशाळला मृत्यू, आणि अश्रुंची झाली फुले या नाटकातले प्रभाकर पणशीकरांनी रंगविलेला आविष्कार ध्वनिचित्रफितीतून पाहिला. कानेटकर..पणशीकर..आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ऋणानुबंध लक्षात घेता, रघुनंदन पणशीकर यांचे प्रत्यक्ष नाट्यगीत गायन आणि शौनक अभिषेकी यांचे ध्वनिचित्रफीतून सादर झालेले नाट्यगीत गायन..हा ही एक सुंदर सुरेल योग इथे जुळून आला.
कानेटकरांच्या एकाहून एक सरस नाट्यकलाकृती, टीव्ही मालिकेसाठी लेखन, संगीत नाटके या प्रचंड लेखनाची आढावा तीन तासात आणि एका कार्यक्रमातून घेणे हे अवघड काम स्वरानंदने कौशल्याने केले. उत्तम संकलन व सादरीकरण यातून कार्यक्रमाला नेटकेपणा प्राप्त झाला.
संजीव मेहेंदळे आणि समृध्दी पानसे यांनी नटी-सूत्रधाराच्या रूपातून सूत्रे सांभाळली. हा सारा नाट्य-संगीताचा प्रवास वाहता ठेवण्यात या दोघांचे मोलाचे सहकार्य लाभले. संहिता लेखन शैला मुंकुद यांचे तर दिग्दर्शन अजित सातभाई यांचे होते. सर्वांच्या प्रयत्नातून एक वेगळ्या पध्दतीचा कार्यक्रम धावता का होईना सादर झाला...यातून कानेटकरांच्या आचाट बुध्दीसामर्थ्याचे दर्शन घडले.. उद्याच्या पिढीला...वसंत कानेटकर..एक यशस्वी नाटककार आणि शब्दांचा खेळ करणारे अचाट व्यक्तिमत्वाचा प्रत्यय आला.. हे ही नसे थोडके.

कविता टिकेकर,पुणे
Kavitatikekar@yahoo.com

Friday, April 8, 2011

कला रामनाथ- रसिकांची पसंती

कला रामनाथ आणि राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ़ गांधीभवननी आयोजित केला आहे. संगीत रसिकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे १३ एप्रिल रोजी हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ९.३० वाजता होणार आहे...

त्या निमित्ताने कला रामनाथ यांची ही ओळख


संगीतरचनाकार मोझार्ट बरोबर ज्यांची तुलना केली जाते अशा कला रामनाथ या त्यांच्या तरल आणि संवेदनशील वादनाबद्दल प्रसिध्द आहेत.  कला रामनाथ यांना संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांच्या सात पिढ्या संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत.

 कलाजींचे पूर्वज केरळमधल्या त्रावणकोर दरबारात गायक होते. कलाजींच्या आधीच्या दोन पिढ्या गायनाबरोबर व्हायोलिन वादन ही करत. त्यामुळे लहानपणीच कलाजींना व्हायोलिन दिले गेले. वयाच्या अडीच वर्षापासून त्यांनी व्हायोलिन वादनाला सुरुवात केली. सुरुवातीचे धडे आजोबा विद्वान नारायण अय्यर यांनी दिले. त्यानंतर आत्या एन.राजम यांच्या तालमीत त्या तयार झाल्या. आजोबा आणि आत्या यांनी व्हायोलिन वादनाचे तंत्र उत्तम तयार करुन घेतले.

 त्यानंतर संगीतमार्तंड पं. जसराज यांच्याकडे त्यांनी पंधरा वर्षे मार्गदर्शन घेतले आणि त्यांच्यातला कलाकार खऱ्या अर्थाने फ़ुलू लागला. गायकी अंगाची संवेदनशीलता त्यांच्या वादनात आली. गायकी अंगाने वादन करण्यासाठी त्यांनी वादनाच्या तंत्रात योग्य ते बदल केले आणि ते गायकीच्या इतके जवळ नेऊन ठेवले की त्यांचे व्हायोलिन गाणारे व्हायोलिन म्हणून ओळखले जाऊ लागले. कलाजींच्या मते आजोबांनी अतिशय कडक शिस्तीत वादनाचे तंत्र आत्मसात करवून घेतले होते त्यामुळेच त्यांना वादनात प्रयोग करता आले.
पूर्वी रावणहट्टा नावाचे वाद्य भारतात प्रचलित होते. त्या वाद्याचा फ़िंगरबोर्ड २२ इंच लांब होता आणि हे बो च्या सहाय्याने वाजविले जायचे. त्यावर तीन ऑक्टेव्हज वाजवता येत. हे वाद्य व्हायोलिन चे जनक मानले जाते. सहाव्या शतकात अरब व्यापारासाठी भारतात आले.त्यांच्याबरोबर हे वाद्य पर्शिया मध्ये गेले. तिथे त्याचे रबाब मध्ये रुपांतर झाले. पुढे दहाव्या शतकात रबाब स्पेन मध्ये गेले आणि व्हायोल झाले. हे व्हायोल युरोपात व्हायोलिन झाले आणि सतराव्या शतकात भारतात परत आले.
हे परदेशी वाद्य असूनही भारतीय संगीतात उत्तम रुळले आहे. परदेशातल्या रसिकांना देखील व्हायोलिनवर भारतीय संगीत ऎकायला खूप आवडते. त्यांना भारतीय संगीतात व्हायोलिन इतके सुंदर कसे वाजते याचे नवल वाटते.त्याचप्रमाणे त्यांना व्हायोलिनची भारतीय बैठकही आवडते कारण यामध्ये मानेला त्रास होत नाही.
जगभरातल्या रसिकांना सांगितीक अनुभूती देता येणं ही एक दैवी देणगी आहे असे कलाजी मानतात.अतिशय सफ़ाईदार आणि तंत्रशुध्द पध्दतीने फ़िरणारा बो आणि बोटे, लयीच्या विविध प्रकारांवर असलेले प्रभुत्व, शुध्द आणि प्रभावी सूर यामुळे कलाजींचे वादन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. वैचारीक आणि तंत्रशुध्द वादनाला असलेली संवेदनशीलतेची बैठक हे त्यांच्या वादनाचे वैशिष्ठ मानावे लागेल. इतर घराण्यांकडे आणि विविध संगीतप्रकारांकडे बघण्याचा मोकळा दृष्टिकोन हा त्यांच्यातील अभिव्यक्तीला पूरक ठरला असे त्यांना वाटते.
भारतातल्या सगळ्या महत्वाच्या संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे. शंकरलाल महोत्सव (दिल्ली), तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सप्तक (अहमदाबाद), पं. मोतीराम आणि पं. मणिराम कॉन्फ़रन्स (हैदराबाद), स्पिरीट ऑफ़ युनिटी कॉन्सर्ट (दिल्ली), स्वामी हरीदास संगीत समारोह(मथुरा), बाबा हरवल्लभ संगीत समारोह (जालंधर), उस्ताद अमीरखान संगीत समारोह (भोपाळ), सवाई गंधर्व संगीत समारोह (पुणे), संकटमोचन संगीत समारोह (वाराणसी), गुणीदास संगीत संम्मेलन (मुंबई, दिल्ली, बंगलोर)
अनेक देशात त्यांनी आपली कला सादर केली आहे.
अमेरीका,कॅनडा, युके, जर्मनी, स्विट्झर्लंड, नेदरलॅंड्स, इटली, फ़्रान्स, बेल्जियम, ग्रीस, रशिया, साऊथ आफ़्रिका, सेशैल्स, मिडल ईस्ट, त्रिनिदाद, केनिया, टांझानिया, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, बांगलादेश, मॉरिशस आदि देशांचे दौरे केले आहेत.
कला रामनाथ यांची शैक्षणिक कारकीर्द ही उत्तम आहे. रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या त्या उत्तम श्रेणीच्या कलाकार आहेत. २००८ मध्ये त्यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात पं. जसराज पुरस्कार, सूररत्न आणि सूर मणी हे विशेष उल्लेखनीय.
कला रामनाथ यांना जगभरातल्या रसिकांची तसेच समीक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. त्यांनी परदेशातल्या अनेक महोत्सवांमध्ये तसेच जगभरातल्या अनेक संगीतज्ञांबरोबर मैफ़िली गाजविल्या आहेत. हॉलिवूड्च्या संगीतकारांबरोबर ही त्यांनी काम केले आहे..

पं.संजीव अभ्यंकर तसेच पूरबन चॅटर्जी यांच्याबरोबर जुगलबंदीचे कार्यक्रमही अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक सीडीज आणि कॅसेट्स रसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

गौरी शिकारपुर ,पुणे

 geetgauri@gmail.com