subhash inamdar

subhash inamdar

Monday, April 11, 2011

ता-यांचे बेट..एक अनुभव

 कथा ही अशी आहे...
मुंबईच्या धकाधकीपासून दूर कोकणातल्या एका सुंदर पण दुर्गम खेड्यामध्ये एक कुटुंब मोठ्या मजेत राहतं आहे.

श्रीधर सुर्वे हा ग्रामपंचायतीत सेवक आहे आणि बायको, दोन मुलं आणि आईसोबत तो आपल्या छोट्याशा घरात मोठ्या आनंदाने राहत आहे. मुलगा ओंकार’ हा व्रात्य, अभ्यास न करणारा तर मुलगी मीरा हुशार आणि समजूतदार, आणि सुखा समाधानात संसार करणारी पत्नी इंदू असे हे सुखी कुटुंब आहे. गावातल्या गणपतीवर त्याची श्रद्धा आहे, दोस्तीचे नाते आहे.
लेले साहेब हे ग्रामसुधार मोहिमेवर आलेले सरकारी अधिकारी. त्यांच्या कामासाठी श्रीधरला अलीकडे सारखे मुंबईला जावे लागते.अशाच एका वारीला तो कुटुंबियांना आपल्याबरोबर मुंबईला नेण्याचा प्रस्ताव ठेवतो. मंडळी हरखून जातात. ओंकार मुंबईतल्या मौजेच्या स्वप्नांमध्ये रमून जातो.    
पण मुंबईमध्ये ओंकारच्या पदरी निराशाच पडते कारण मुंबईच्या ह्या लखलखत्या जगातल्या बहुतेक गोष्टी त्याच्या वडिलांना न परवडणाऱ्या असतात.अशातच ओंकारला एक टोलेजंग इमारत दिसते,आजीच्या गोष्टीतल्या राजमहालाची आठवण करून देणारी. ते एक फाइव्ह स्टार हॉटेल आहे. ओंकारची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो वडलांना हॉटेलमध्ये जाण्याचा आग्रह धरतो. असह्य होऊन इंदू हात उगारते. मंडळी गावी परततात.
ओंकारच्या वर्तनावर नाराज झालेला श्रीधर तू वर्गात पहिला येउन दाखव, मी तुला फाईव्हस्टार मधे राहायला घेऊन जाइन अशी लेकाबरोबर पैज लावतो.
ओंकार पेटून उठतो आणि दिवस रात्र अभ्यास करू लागतो आणि प्रकरण मजेदार होऊन जाते. मुलाच्या वर्तनाने सुरवातीला आश्चर्यचकित झालेला श्रीधर नंतर ओंकारच्या ध्यासाने पुरता घाबरून जातो. खरोखरीच मुलगा पैज जिंकला तर? अस्वस्थ श्रीधर गणपतीला मुलाला परीक्षेत दुसरे आणण्याचे साकडेसुद्धा घालतो.
फक्त एका रात्रीसाठीसुध्दा झगमगणारे ते पाच तारे ह्या छोट्या कुटुंबाला परवडणारे नाहीत.
एक बाप मुलाला दिलेला शब्द पाळण्यासाठी अहोरात्र धडपडू करू लागतो, नाना मार्ग शोधू पाहतो आणि मजेदार प्रसंगाची मालिकाच आकार घेउ लागते.
दूर लखलखणाऱ्या मुंबई बेटाच्या स्वप्नानी आपल्या छोट्या विश्वात सुख मानणाऱ्या त्या कुटुंबात मोठी खळबळ माजते.

.....आता थोडे चित्रपटाविषयी
पंचतंत्रात जसा बोध देण्यासाठी किंवा कसे वागावे याचे धडे गिरविण्यासाठी कथेतून पात्रे बोलत रहातात. आणि त्यासा-यांचा शेवट एक उपदेश ठळकपणे पसरविला जातो. तसाच काहीसा प्रकार ह्या सत्त्याप्रयोगात ता-यांचे बेट मध्ये अनुभवायला मिळतो. मुंलांसाठी बाप म्हणून आजकालचे पालक किती खुजेपण अनुभवतात याचा प्रत्ययही या चित्रपटात प्रतिबिंबीत झाला आहे. आजीने नातीला सांगितलेल्या गोष्टीतूनच कोकणाच्या पार्श्वभूमिवर चित्रपट तुमच्याशी आणि त्या गणपती बाप्पाशी गुजगोष्टी करतो. सचोटिने जगणा-या श्रीधर सुर्वे दारूच्या आहारी जातो. मुलाला दिलेल्या शब्दाला पूर्ण करण्यासाठी  लबाडीने पैसे कमवत रहातो. हे सारे मात्र त्या गणपतीच्या साक्षीने..कदाचित गणपती हे एका मनाचे प्रतिक असावे..कष्टाचे..जिद्दीचे फळ नक्की मिळते..ते यश भक्ताच्या झोळीत तो गजानन.. नक्कीच घालतो.
किरण यज्ञोपवित यांच्या दिग्दर्शनातून हे ता-यांचे बेट चमकले आहे. सचिन खेडेकर यांच्यासारखा सामान्यवर्गातला सत्शील माणूस कथेचा भार तोलून धरतो. त्याच्या भूमिकेत तो सहजपणे विरघळून जाताना पहाणे हे आनंदाचे काम रसिकांना करावे लागेल. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मुळे सामान्यांचा असामान्य प्रतिनिधी इथेही ही कथा सचिन घडवितो. कोकणाच्या निसर्गाने... त्यातल्या वस्तुंनी.. वातावरणातून...हे बेट सतत खुणावत रहाते.
त्याला माया आणि प्रसंगी कठोर धार देणारी इंदू ...अर्थात अश्विनी गिरी..
बोटीचे जीवन...मुंबापुरीतली चकाकणारी दुनिया..
मिळेल त्यात समाधान मानणारे कुटुंब.. मुलाशी लावलेल्या पैजेतून हादरून जाते... मग पैशाची दुनिया...भावनेला दुरावते..
सारेच चित्रपटात घडत रहाते.
चित्रिकरणात कोकणाचे वैभवशाली चित्रीकरण तर दिसतेच पण दिसते ...आजही जपून ठेवलेल्या त्या अस्सल परंपरेचे सालंकृत दर्शन. गावात नसेल पेशाची श्रीमंती. पण आहे वारसांनी कमावलेली संमृध्द परंपरा.  चित्ररूपाने दृष्यातून ते कोकण डोकावत रहाते.. ता-यांचे बेट..म्हणतानाच कोकणचे आणि मुंबईचे सांस्कृतीक नातेही कुठे तुटत चालल्याचे स्पष्ट दिसते.
कोकणातली माणसे आता कोकणीच बोलत नाहीत..तर ती बोलतात पुणेरी मराठीत..क्वचित आजीच्या आणि बायकोच्या हेलात कोकणी सूरावट आढळते. पण माणूसकीची नाळ मात्र आजही तुटलेली नाही याची प्रचिती आणि तिही....आजच्या परिस्थितीची जाणीव या चित्रपटात ...नव्हे... विमा एजंट बनलेल्या किशोर कदम.. सुपारी घेणारा व्यापारी.. भजनाला ढोलकी वाजविणारा..परिस्थितीने गायही विकायची परिस्थिती येणारा...गावचे..घराचे वैभवी अवशेष विकणारा..शशांक शेंड्ये.. सारेच..
उलट मुंबापुरीत हापिसातला शिपाईदेखील फाईल पुढे रेटण्यासाठी घेत असलेली लाच..शेअरच्या पैशात भावनेला न थारा देणारा विनय आपटे. सारखा..व्यावसायिक...पंचतारांकित हॉटेलात चकाचक शोभिवंत मखमली मूर्ती..आणि इखाद्या इसमाची पैशाची पिशवी परत देण्याची भावनेतून माणूसपणाची..चांगूलपणाची जाणीव.. सारेच.
कोकणातले प्रेम गणपतीवर भारी..त्यातच चित्रपटातला नायक त्या गणपतीच्या मूर्तीशी मनातला संवाद करतो..आपली व्यथा त्याच्यासमोर प्रकट करतो..आणि आपल्या मुलाला दुसरा क्रमांक मिळावा यासाठी गणपतीलाच साकडे घालतो...
सारेच..द्ष्य..अदृष्यात व्यक्त होणारे, किरण यज्ञोपवित या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने हा संस्कार जपणारा..जुन्या परंपरेत काहीसा नवे रसायन गुंफून बनविवेला एक भाबडा पण प्रामाणिक आविष्कार घडविला आहे. इथे चित्राची फ्रेमही बोलते आणि माणसेही. वातावरणही...
ऑल्ट एंटरटेनमेंट आणि नीरज पांडे प्रस्तुत फ्रायडे फिल्मवर्क्स निर्मित हा चित्रपट म्हणजे या सुट्टीत मुलांसह पालकांनी आवर्जून पहावा असा आहे...त्यात तशी करमणूक नसली तरी तुम्ही सहजी या कथेत स्वतःली गुंफत जाता..आणि पुढे त्यातलेच एक तुम्ही बनत रहाता.
सचिन खेडेकर, अश्विनी गीरी यांच्या अभिनयातून साकारले गेलेले.. मध्यमवर्गीयांचे प्रतिनीधी बनून...चित्र तुम्हाला भावत रहाते... कधी बोचते..तर कधी दाद देण्यास भाग पाडते.
इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर या मुलांनी यात खरंच धमाल केली आहे... ते हसवतात तसे थोडे नाचवतातही.
विनय आपटे, शशांक शेंड्ये, किशोर कदम, शुंभांगी जोशी यांच्या भूमिका थोड्या हटके झाल्या आहेत. क्रेडिट गोज टू अर्थात किरण ..
मराठीत मालगुडी डेज सारखा चित्रातून संस्कृती आणि परंपरेचे बीज सांगणारा ता-यांचे बेट....मला तरी वाटते...अवश्य पहा...पण मुलांना घेऊन...


सुभाष इनामदार, पुणे

9552596276



1 comment:

  1. या सिनेमाची कथा-पटकथा कोणी लिहीली आहे...???

    ReplyDelete