subhash inamdar

subhash inamdar

Sunday, March 24, 2013

ज्येष्ठ संवादिनी साधक-अभ्यासक पं.जयराम पोतदार








गानवर्धन संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा आप्पासाहेब जळगावकर संवादिनी पुरस्कार संवादिनीवर गेली साठ वर्षे आपले प्रभूत्व सिध्द करणारे पं. जयराम पोतदार यांना ९ एप्रिल २०१३ ला समारंभपूर्वक दिला जाणार आहे. संवादिनीशी वयाच्या अकराव्या वर्षीच ओळख झालेला हा कलावंत वयाच्या ७२ व्याही वर्षी तेवढ्याच जिद्दीने स्वतःचे कसब वादनातून दाखवत आहे. संगीत नाटक हा त्यांचा आत्मा. हिंदी भाषेत मराठी संगीत रंगभूमीवरची नाटके व्हावीत यासाठी झटणारा हा सच्चा कलावंत. या निमित्ताने त्यांच्या कारकीर्दीवर थोडी नजर फिरवू या. 
 
प्रतिभाशाली संवादिनी, ऑर्गन वादक, चिंतनशील अभ्यासक म्हणून पं. जयराम पोतदार यांची पुणेकरांना एका वाक्यात ओळख करून देता येईल. सुमारे पंचवीस वर्षे दिल्लीत सांस्कृतिक विभागात जबाबदार अधिकारी आणि संगीताचा एक उपासक या नात्याने त्यांनी काम केले.गेली पाच वर्षे ते पुण्यात स्थायीक झाले आहेत. वय वाढले तरीही दगदग करत जिद्दीने साथ करत आणि संगीत नाटकात वेगळे काम करत ते पुण्याच्या संगीत क्षेत्रातही आपला दबदबा कायम टिकवून आहेत. गानवर्धनच्या या पुरस्काराने ते अधिक पुणेकर आणि मराठी रसिकांच्या परिचयाचे होतील याची खात्री आहे.

केवळ वादक आणि साथीदार न राहता त्यांनी संगीत नाटकांचा अभ्यास केला. त्याला स्वतःचा मापदंड लावून काळाप्रमाणे संहितेला कथानकाची जोड दिली..नटी-सूत्रधाराच्याकरवी नाटकाचे कथानक आणि त्यातली नाट्यगीते रंगमंचीय आविष्कारातून सादर केली...

वयाच्या अकाराव्या वर्षीच त्यांनी संवादिनी शिकायला सुरवात केली. वडील डॉ. पांडुरंग पोतदार यांच्या कीर्तनाला साथ महणून हे वाद्य हाती धरले ते पुढे पं. मनोहर बर्वे यांच्याकडून रितसर तालीम घेतली. पुढे अनेक वर्षे पं. वसंतराव देशपांडे यांचेही बहुमुल्य मार्गदर्शन त्यांना लाभले .१९७५ पासून आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कलाकार झाल्यामुळे त्यांना तिथे शास्त्रीय संगीतातल्या अनेक दिग्गजांबरोबर संगीत साथ कऱण्याची आणि एका अर्थाने त्यांच्याकडून काही शिकण्याची  संधी मिळाली. आकाशावाणीत या वाद्याला बंदी होती. ती दूर करण्यासाठी त्यांचा मोठा सहभाग होता. आजही हार्मोनियम ला स्वतंत्र सोलो वादनाचे दर्जा नसल्याची खंत ते व्यक्त करतात.
त्यांच्या या गुणांमुळेच संगीत नाटक अकादमीकडून त्यांना मराठी नाटय् संगीताचे विश्र्लेषणातमक व तुलनात्मक  अध्ययन करण्यासाठी फेलोशीप मिळाली. यातूनच ``वेध मराठी नाट्य संगीताचा`` हे पुस्तक निघाले. संगीतविषयक अनेक लेखनही त्यांनी केले आहे. त्यांचे व्यवस्थित संपादन करुन त्याचेही एक पुस्तक ते काढणाऱ आहेत.

अशा अभ्यासू कलाकारांने नवी दिल्लीत वसंतराव देशपांडे स्मृती प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे दिल्लीत आणि आता गेली काही वर्षे पुण्यात ते विविध उपक्रम करतात. शारदा, कट्यार, कान्होपात्रा, सौभद्र, विद्याहरण, सावित्री, शाकुंतल, संशयकल्लोळ अशी संगीत नाटके नटी-सूत्रधाराच्या स्वरुपातील कथानकासह लिहून त्या मराठीबरोबरच हिंदीतही त्याचे प्रयोग करतात. 

संगीत नाटकाचा प्रचार आणि प्रसार हेच आपले धेय्य मानून ते उत्तम जाण असलेले गायक ,गायिका तयार करण्याचे काम जिद्दीने करत आहेत.  संगीत नाटक आणि नाट्य संगीत हा आता त्यांचा जगण्याचा एक भाग बनला आहे. यासाठी अनेकविध कार्यक्रम परदेशातही करण्यात सहभाग घेतला आहे.

गानवर्धन संस्थेच्या वतीने `आप्पासाहेब जळगावकर` यांच्या नावाने दिला जाणारा `स्वर-लय-रत्न पुरस्कार` यंदा पं. जयराम पोतदार यांना  दिला जातोय याचा संगीत रसिकांना आनंद तर होणारच आहे....पण ज्या पुण्यात बालगंधर्वांनी इतिहास घडविला त्या पुण्यात ज्येष्ठ हार्मोनियम वादकाचा असा सन्मान प्राप्त होतो आहे याबद्दल पुणेकरांना ते परिचित होतील याचे अधिक महत्व माझ्या लेखी मोठे आहे.




-          सुभाष इनामदार,पुणे
-          subhashinamdar@gmail.com
-          9552596276






No comments:

Post a Comment