subhash inamdar

subhash inamdar

Sunday, May 6, 2012

`बालगंधर्व` चित्रपटापेक्षा कादंबरीतूनच चांगले समजतात

बालगंधर्व चित्रपटावर काम केल्यानंतर लेखक अभिराम भडकमकर यांनी त्यांच्या आयुष्यावरील कहाणी आता '

`असा बालगंधर्व' पुस्तकाद्वारे कादंबरीतून आणली आहे.

कादंबरी वाचनीय आहे, त्यावेळचा काळ ती उभी करते. त्यावेळेस नाटककंपन्या कशा चालायच्या, नाटककार-नट संबंध कसे होते, हे वातावरण कादंबरीतून अनुभवायला मिळते. बालगंधर्व म्हणजे आपल्या अस्मितेचा व अभिमानाचा विषय. पण म्हणून त्यांचा केवळ उदोउदो न करता लेखकाने अतिशय चिकित्सकपणे त्यांची जीवन कहाणी आपल्याला अवगत करून दिली आहे. त्यासाठी द्विस्तरीय आकृतीबंध वापरला आहे.

एक सर तरुण मुलांना घेऊ न बालगंधर्वांवर कार्यक्रम बसवत असतात. ह्या मुलांना बालगंधर्वांविषयी अगदीच जुजबी माहिती असलेली बघून सर त्यांना बालगधर्वांची जीवनकहाणी सांगायला सुरुवात करतात आणि त्याचबरोबर ही तरुण मुले ह्या कहाणीच्या अनुषंगाने सरांबरोबर व आपापसात चर्चा करतात, इतरही काही चर्चा करतात, अशी ही कादंबरी पुढे जाते. ह्या चचेर्तून कधी गंधर्वांची जीवनकहाणी पुढे नेली आहे, कधी स्पॉन्सर मिळविण्यासाठीचे प्रयत्न दिले आहेत, पण चर्चेंचा मुख्य भर आहे तो गंधर्वांची कहाणी व तो काळ या दोन्हीकडे चिकित्सक नजरेतून बघण्याकडे.

उदा: बांधिलकी वगैरेबाबत गंधर्व विचार करत असतील का, त्यांनी एकूण २७ नाटके केली, त्यातील फारतर ७ ते १० उरली, बाकी विस्मरणात गेली. 'मानापमान' नाटकात तब्बल ५४ पदे होती त्यातील १२ आठवतात इतर नाही, नाटक म्हणजे जलसा करून टाकले, त्यावेळच्या लोकांनी नाट्यसंगीताला बंदिस्त करून टाकले, स्त्रीभूमिका करणारी कोवळी मुले म्हणजे कंपनीच्या मालकांची भुका शमवण्याची साधने, मनोविश्लेषण, विशेषत: गोहरबाईच्या बालगंधर्वांवरच्या भक्तीचे मनोविश्लेषण इत्यादी बरीच चर्चा आहे. मधूनच आजच्या काळावरही कॉमेंट आहे.

गंधर्वांची कहाणी सलग न देता मधे-मधे अशी चर्चा असल्याने वाचताना रसभंग, अडथळा वगैरे होतो का ह्या प्रश्नाचे उत्तर आहे, तो फारसा होत नाही. पण यात एक मुद्दा आहे. लेखक जे लिहितो, त्याच्या लिखाणाची ताकद व प्रत्येक वाचकाची समज ह्या दोन्हीनुसार वाचक स्वत: निष्कर्ष काढतो, त्याच्या मनात प्रश्न येतात किंवा यायला हवेत. इथे अगदी 'गायडेड टूर' नसली तरी लेखक वाचकांना वळण लावत आहे का, असा प्रश्न पडू शकतो. उलटपक्षी अशी चर्चा ही अनेक वाचकांसाठी फायद्याचा सौदा होऊ शकते. वाचकांनी गंधर्वांची कहाणी फक्त माहीत करून घेणे, त्यात गुंतून जाणे याऐवजी ते ह्या कहाणीकडे चिकित्सकपणे बघतात. बहुधा अभिराम भडकमकर यांचा तोच हेतू असावा. एकूणच चरित्राऐवजी कादंबरी व त्यात ही द्विस्तरीय रचना वापरणे हा लेखकाचा निर्णय अचूक व खूपच यशस्वी ठरलेला आहे.

कादंबरी वेगवान आहे. गंधर्वांच्या रंगभूमीवरील प्रवेशाच्या आधीपासून, अण्णासाहेब किलोर्स्करांनी मराठी नाटकांचे रूप बदलले, तिथून कादंबरीला सुरुवात होते. नाटक आधी कीर्तनासारखे होते, त्यातील सूत्रधार म्हणजे तर कथेकरी बुवाच होता. किलोर्स्करांनी संगीत शाकुंतल लिहून त्यात बदल केला, स्वत:ची किलोर्स्कर कंपनी सुरू केली. याच किलोर्स्कर कंपनीत गंधर्वांची सुरुवातीची जडणघडण झाली. वयाच्या सतराव्या वषीर् गंधर्व त्या कंपनीचे प्रमुख नट बनले. त्यांचे पहिले नाटक होते संगीत शाकुंतल. याच कंपनीच्या 'मानापमान'ने गंधर्वांना अफाट लोकप्रियता दिली. याच सुमारास पंडित नावाचा श्रीमंत तरुण गंधर्वांच्या मागे मागे राहायला लागला. पुढे गंधर्व पूर्णपणे ह्या पंडितच्या आहारी गेले. पंडितने आधी किलोर्स्कर कंपनी फोडली, गंधर्व नाटक मंडळी सुरू केली. पंडितने आणखी कटकारस्थाने करून या कंपनीचे इतर दोन भागीदार टेंबे व बोडसांनाही या कंपनीतून जायला लावले. कंपनीवर एकट्या गंधर्वांची मालकी आणि गंधर्व चालणार पंडितच्या सल्ल्याने. त्याने कंपनीचा पैसा व्यवसायात लावला. कंपनीच्या नावावर कर्ज घेतले. एका प्रकरणात त्याला अटक झाली. इथून त्याचा आणि कंपनीचा संबंध संपला. इतकेच काय तो बालगंधर्वांच्या आयुष्यातूनही निघून गेला. मात्र त्याने कंपनीवर करून ठेवलेले कर्ज होते सुमारे दोन लाखांचे. गंधर्वांनी ते स्वत:च्या हिंमतीवर फेडले.

पुढे बोलपटांच्या आगमनामुळे नाटके चालेनाशी झाली. गोहरजान ही गंधर्वांची निस्सीम चाहती-भक्त. ती त्यांच्या आयुष्यात आली, त्यावेळेस गंधर्वांचे वय ४९ तर गोहरचे २६ होते. तिचे येणे कोणालाच आवडले नाही. पत्नी दुरावली, गंधर्वांचा भाऊ कंपनीतून निघून गेला. गंधर्व गोहरच्या पूर्ण आहारी गेले. कंपनीवर आधीचेच कर्ज होते. यावेळेस मात्र गंधर्वांना आधीच्या कर्जावेळी न घेतलेली नादारी घ्यावी लागली. नंतरचा काळ हा खरोखर त्यांच्या विटंबनेचाच काळ होता. एक पाय अधू झालेला, शरीर सुटलेले. एका पायाने लंगडत रंगमंचावर यायचे, पाचशे रुपयांसाठी भजने गात फिरत. एकदा तर निकड आहे म्हणून तीनशे रुपयांसाठी मागे बसून गायकाला साथ केली. लोक म्हणत गोहर त्यांना राबवून घेत आहे. त्यांचे हाल बघून काही मान्यवरांनी त्यांच्या नावे ट्रस्ट स्थापन करून त्यांना तहहयात मदत व त्यानंतर त्यांचे स्मारक असा प्रस्ताव त्यांना दिला. ट्रस्टचा प्रस्ताव आल्यावर गोहरने प्रश्न केला, गंधर्वांनंतर माझे काय? ट्रस्टची रक्कम मला मिळायला हवी. तो प्रस्ताव मग तिथेच बारगळला. नंतर गोहरचे गंधर्वांच्या आधीच निधन झाले. कादंबरीवरून तरी असे दिसत नाही की गोहरने गंधर्वांचा पैसा लुटला. ती त्यांच्या आयुष्यात आली तेव्हा त्यांची आथिर्क स्थिती फारशी बरी नव्हतीच.

कादंबरी वाचून गंधर्वांविषयी कणव वाटते. गंधर्वांच्या कहाणीशिवाय कादंबरीतून काही विषय/मुद्दे मिळतात. केशवराव भोसले यांनी वयाच्या केवळ बाराव्या वर्षी 'शारदा' नाटकात शारदेचे काम केले. नाटकातील प्रमाण भाषा व त्यांची भाषा वेगळी होती असे दिसते. त्यामुळे इतक्या लहान वयात गाण्यासह काम करणे हा चमत्कारच वाटतो. त्यांच्याबद्दल कुतूहल जागृत होते. दुसरा मुद्दा मिळतो, 'एकच प्याला' नाटक शोकात्मऐवजी सुखांत करू नाहीतर चालणार नाही, असे काहींचे मत होते. गंधर्वांनी त्याला ठाम नकार दिला. शोकात्म असूनही हे नाटक खूप चालले. भरपूर पैसा मिळवून दिला. विचार येतो, तेव्हापासून किती शोकात्म नाटके रंगभूमीवर आणली गेली? त्यातली किती चालली? आज प्रेक्षकांची समज थोडी तरी वाढली असेल, मग आजही शोकात्म नाटके आणायला इतकी नाखुषी का?

कादंबरीत गंधर्वांच्या नकारात्मक बाबी आहेत, कठोर चिकित्सक चर्चा आहे, पण ते कलाकार असल्याने हे शक्य झाले आहे. पौराणिक, ऐतिहासिक व्यक्ती, संत, राजकीय नेते यांच्यावर मात्र अशी कादंबरी लिहिणे शक्य होणार नाही.

बहुतेकांनी 'बालगंधर्व' चित्रपट बघितलाच असेल. त्यामुळे कादंबरी वाचताना काही विक्षेप येतो का, ती कशासाठी वाचावी असा प्रश्न असेल, तर त्याचे उत्तर आहे- चित्रपट आधी बघितलेला असला तरी कादंबरी वाचताना काहीही अडथळा येत नाही व चित्रपट आधी बघितलेला असला तरी कादंबरी अवश्य वाचावी. कारण बालगंधर्व चित्रपटापेक्षा कादंबरीतूनच जास्त चांगले समजतात.

उदय कुलकर्णी
लेखक : अभिराम भडकमकर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे


http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13009573.cms

No comments:

Post a Comment