' बेटा अच्छे शागीर्द बनो, उस्ताद बनने की कोशिश न करो,' असा वडील अल्लारखाँ यांनी दिलेला गुरूमंत्र, अथक रियाज, बालपणातच पं. रविशंकर यांच्यासारख्या दिग्गजांकडून मिळालेले धडे आणि अथांग संगीतसागरातील एक साधक असल्याची प्रांजळ भावना...
मंत्रमुग्ध करणारा तबला-डग्गा नव्हता, तरी उस्ताद झाकीर हुसेन यांनी मैफल रंगवली. या खेपेस ठेका होता स्मरणरंजनाचा!
निमित्त होते पु. ल. देशपांडे बहुरूपी पुरस्कारप्रदान सोहळ्याचे. श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतफेर् झाकीरजींचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश लळित, उपाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, सुहासिनी पुजारी, दादासाहेब नाईकनवरे आदी या वेळी उपस्थित होते. पं. योगेश सम्सी यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान झाकीरजींचे स्मृतिताल रंगले.
बेटा अच्छे शागीर्द बनो. उस्ताद बनने की कोशिश न करो, हे अल्लारखाँ यांचे बोल अजूनही आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो आहे, असे सांगून झाकीर म्हणाले की, संगीताच्या क्षेत्रात अजूनही बरेच काही करायचे आहे. वडिलांचा हा गुरूमंत्रच कलेचा साधक म्हणून आयुष्य जगण्याची प्रेरणा देतो. उस्ताद म्हणून तुम्ही गौरवित असला, तरी उस्तादगिरी गाजविण्यासाठी कधीच तबल्यावर थाप मारली नाही.
मोठ्या कलाकरांच्या सहवासातून संगीत शिक्षणास सुरवात झाली. विद्याथिर्दशेत पं. रविशंकर यांचे मार्गदर्शन लाभले नि त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच कलेची वाटचाल सुरू आहे. संगीत ही एका कप्प्यात बंद राहणारी कला नसून, तिला सागराची उपमाही थोडकीच आहे. भारतीय संगीताची परंपरा पुढे नेणाऱ्या माझ्यासारख्या कलासाधकांनी तिचा अहंभाव न मानता आंतरराष्ट्रीय संगीतातील नव्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. उत्तम तालीम हा जसा संगीताचा आत्मा आहे. त्याचप्रमाणे चांगली साथसंगत कलाकाराला पैलू पाडते आणि मैफल खुलविते, असेही झाकीर म्हणाले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9276601.cms
No comments:
Post a Comment