subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, January 25, 2011

स्वरभास्कराचा अस्त!

मन अस्वस्थ झालं.  काय करू काही सुचेना.  बाइकवर टांग टाकली आणि थेट 'कलाश्री' गाठला.
अण्णांचं दर्शन घेतलं. त्यांच्या नावामागे 'कैलासवासी' लावण्याइतका मी अजून सावरलेलो नाही. सावरणारही नाही.

ती गर्दी, ते हुंदके, ते डोळ्यातून आपसूक ओघळणारे पाणी, पोलीसांची अमाप गर्दी,
मिडीयाच्या मोठ्ठी डिश .टपावर लावलेल्या गाड्या,  कलाकारांची झुंबड, रसिकांची हळहळ....
आणि बरेच काही.

सुन्न होऊन बराच वेळ इथे तिथे फिरत राहीलो.  त्या सगळ्या गर्दीत जत्रेत हरवलेल्या लहान मुलासारखा मनात अश्रुंचे कढ घेऊन फिरत होतो.
अण्णांना वैकुंठात नेले. तिथे त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात सुरू झाला.
 त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ बंदूकीच्या फैरी झाडल्या, मान्यवरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या
आणि हे सगळे संपल्यावरती त्यांना हळूहळू विद्यूत दाहीनी कडे घेऊन चालले.

माझ्या डोळ्यांसमोरून जेव्हा त्यांचं पार्थिव जाऊ लागलं त्यावेळेस मात्र माझा धीर सुटला
आणि मी ढसाढसा रडू लागलो.
ते थोडे पुढे गेल्यानंतर तसाच मागे वळलो.
मनात विचारांचे काहूर माजले होते.
आज मावळतीच्या सूर्याबरोबर स्वरभास्कर लोप पावला. सूर्य सूर्याला मिळाला.
चंद्राची आभा आता अजूनच धीरगंभीर अन् अधिक वलयांकीत भासेल.

अण्णा स्वप्नांतून त्यांच्या सुरांच्या चांदण्याची रात्ररात्रभर पखरण करतील.
मायेनं सांगतील, बाळांनो, स्वरांतील सच्चेपणा जपा, सच्चेपणानी जगा!
पं. सी. आर. व्यास त्यांच्या एका सत्कार समारंभात म्हणाले होते.

भीमसेनजींनी 'तोडी'तला पंचम असा काही लावला की मला 'अहम् ब्रम्हास्मि' चा प्रत्यय आला.

आज त्यांना निरोप देतांना, त्यांचं शेवटलं दर्शन घेत असते वेळी
मलासुद्धा अगदी तोच अनुभव आला.
स्वर ना कोमल होते ना तीव्र होते.
भीमण्णांनी यावेळेस 'पंचम'ही लावला नव्हता.
ते निघाले होते निरामय षड्जाच्या वाटेवर...

तुमचा,
केदार केसकर , पुणे

1 comment:

  1. पंडितजींची सारसबागेच्या गणपती समोर देवळात झालेली मैफिल अशीच चिरस्मरणात राहणारी. त्या दिवशी पंडितजी फक्त गणपतीशीच संगीत संवाद साधून तन्मयतेने गायले! श्रोते संगीत समाधीच्या अनुभवाने कृतार्थ झाले!

    ReplyDelete