subhash inamdar

subhash inamdar

Saturday, December 24, 2016

पं.प्रभाकर जोग यांचा ८५वा वाढदिवस



संगीतसाधक प्रभाकर जोग यांचे८५ वर्षांत पदार्पण
ज्येष्ठ संगीतकार, श्रेष्ठ व्हायोलीनवादक आणि उत्तम संगीतसंयोजक पं. प्रभाकर जोग यांचा आज ८५ वा वाढदिवस..त्यांच्यासारख्या उत्तम कलाकाराची ओळख ही त्यांच्या त्या काळातल्या आठवणीतून झाली पाहिजे..त्यांनी उत्तम आरोग्यपूर्ण अशी शतायुषी पुरी करावी अशीच सा-या संगीत चाहत्यांची सदिच्छा आहे..
सांस्कृतिक पुणेकडून त्यांना वाढदिवसाच्या केवळ शुभेच्छाच नाही तर त्यांच्या आयुष्यातल्या कारकीर्दीचा त्यांनीच घेतलेला आढावा पुन्हा इथे देताना, त्यांचे काम . त्यांची कुशलता आणि त्यांनी संगीतकलेची केलेली सेवा रसिक वाचकांसमोर देता आली तर पहावे हा उद्देश..त्यांच्याच शब्दात…..




सुधीर फडके यांनी ‘प्रतापगड’ चित्रपटाचे काम पुण्यामध्ये सुरू केले होते. व्हायोलिनसाठी प्रभाकर जोग यांना बोलवा, असे ललिताबाईंनी बाबूजींना सांगितले होते त्यानुसार १९५० मध्ये मी वादक म्हणून त्यांच्यासमवेत काम करण्यास सुरुवात केली. ‘सुवासिनी’ चित्रपटाच्यावेळी मी त्यांचा संगीत साहाय्यक झालो. त्यामुळे साहजिकच पुढे गीतरामायणाचे संगीत संयोजन करण्याची संधी मिळाली. माझ्या घरामध्ये गीतरामायणाच्या तालमी होत असत. वादकांना सूचना देण्यापासून ते ‘ऑर्केस्ट्रा कंडक्ट’ करण्यापर्यंतची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली होती. ती मी यशस्वीपणे पार पाडली. त्याचे प्रतििबब गीतरामायणातील गीतांच्या लोकप्रियतेमध्ये दिसून येते.


बाबूजींचा मी इतका विश्वास संपादन केला होता की, गीतरामायणातील ‘चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला’ हे गीत स्वरबद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली होती. या गीतासाठी अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा आवाज वापरला होता. ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा’ या बाबूजींच्या स्वरातील गीताची अस्ताई मी संगीतबद्ध केली होती. 

गीतरामायणामध्ये वादकांना शंभर रुपये मिळायचे, तर साहाय्यक असल्यामुळे मला सव्वाशे रुपये मानधन मिळायचे. वादकांचे चहापान करण्यासाठी पैसे खर्च व्हायचे. पण कामामध्ये मिळणाऱ्या आनंदापुढे या पैशांचे मोल वाटायचे नाही. आकाशवाणीवरून आठवडय़ाला एक याप्रमाणे प्रसारित होत असलेल्या गीतरामायणातील निम्मी गाणी होईपर्यंत माझ्याकडे घरामध्ये रेडिओदेखील नव्हता. नंतर मी रेडिओ विकत घेतला. एका अर्थाने ‘गीतरामायण’ हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे असे म्हणता येईल.

माझ्या आयुष्यातली आणखी एक गोष्ट त्याच दरम्यान घडली. रोहिणी भाटे यांच्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी कुसुम वाड ही गायिका येत असे. मी त्यांचा व्हायोलिनवादक होतो. आमचा परिचय झाला आणि त्याचे रूपांतर विवाहामध्ये झाले. कुसुम वाड नीला जोग झाली. 

‘लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का’ हे संगीतकार म्हणून मी स्वतंत्ररीत्या स्वरबद्ध केलेले पहिले गीत. पूर्वी आकाशवाणी नवीन गायक, कवी आणि संगीतकारांना संधी देत असे. त्यासाठी ऑडिशन घेतली जात असे. यामध्ये नीलाने सहभाग घेतला होता आणि मला तुमचेच गाणे पाहिजे, असा प्रेमळ स्त्रीहट्ट धरला. त्या वेळी माझ्याकडे स्वत:चे असे कोणतेच गाणे नव्हते. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ हे गाणे मी स्वरबद्ध केले आणि तिने ते गायले. हे गाणे एवढे लोकप्रिय झाले की तिची गायिका म्हणून ओळख झाली. मात्र एचएमव्ही कंपनीने या गीताची ध्वनिफीत (कॅसेट) करण्याचे ठरविले. मात्र त्यासाठी ‘ए’ श्रेणीचा कलाकार हवा ही त्यांची अट होती. नीला ‘बी’ श्रेणीची गायिका होती. त्यामुळे ते गाणे मालती पांडे यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध केले गेले. ध्वनिफीत करण्यासाठी त्याच्या जोडीला ‘कशी मी सांगू वडिलांपुढे, श्रावणातल्या घनमेघांचा रंग मला आवडे’ हे गदिमांचेच गीत घेण्यात आले होते. तर मंदाकिनी पांडे यांच्या स्वरांत ‘सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का’ आणि ‘सोनियाचा पाळणा रेशमाचा डोर’ ही संजीवनी मराठे यांची गीते स्वरबद्ध केली होती.


‘
लपविलास तू हिरवा चाफा’ या गीताची एक वेगळीच गोष्ट आहे. मुळात हे गाणे माडगूळकरांनी ‘लाखाची गोष्ट’ चित्रपटासाठी लिहिले होते. ते स्वरबद्ध करण्यासाठी बाबूजी यांच्यासमवेत मी बसलो असताना राजाभाऊ परांजपे तेथे आले आणि त्यांनी गदिमांना म्हटलं, ‘अण्णा हे गाणं नाही चालणार. गाणं छान आहे, पण मी चित्रपटातील ‘सिच्युएशन’ बदलतो आहे. त्यामध्ये हे गाणं बसत नाही.’’ राजाभाऊंनी नाकारलेला ‘लपविलेला चाफा’ मला उपयोगी पडला. ‘लाखाची गोष्ट’ चित्रपटामध्ये राहून गेलेले हे गाणे जयसिंग सावंत या माझ्या मित्राकडे होते. नीलाने हट्ट केल्यानंतर मला त्याची आठवण झाली. जयसिंग याच्याकडून मी ते गाणं आणलं आणि त्याला चाल लावली. नीलाने ते आकाशवाणीसाठी गायले. आणि या गाण्याने संगीतकार म्हणून माझी ओळख झाली.


‘
जावई माझा भला’ हा माझा संगीतकार म्हणून पहिला मराठी चित्रपट. या पहिल्याच चित्रपटासाठी ‘काय मागू मी देवापाशी अंगणी गंगा घरात काशी’ हे गीत आशा भोसले यांनी गायिले होते. मात्र त्या वेळी लता मंगेशकर, आशा भोसले, महंमद रफी आणि किशोरकुमार या पाश्र्वगायकांचा ‘एचएमव्ही’ कंपनीशी रॉयल्टीच्या मुद्दय़ावरून वाद झाला होता. आम्ही गायलेल्या गीताची ध्वनिफीत निघणार नाही, असा निर्मात्याबरोबर करार करून मगच ते चित्रपटासाठी पाश्र्वगायन करीत असत. या वादाचा फटका ‘जावई माझा भला’ चित्रपटाला बसला. चित्रपटातील गीते चांगली असूनही ध्वनिमुद्रिका नसल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचू शकली नाहीत.

पण ‘स्वर आले दुरूनी.. जुळल्या सगळ्या त्या आठवणी’ आणि ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया’ अशा गीतांनी मला सुगम संगीतामध्ये मुशाफिरी करता आली याचा आनंद वाटतो. सुधीर फडके यांचा अमृतस्वर लाभलेली ही गीते लोकप्रिय झाली हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही. पण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी सांगीतिक कारकीर्द सुरू झाली त्या बाबूजींनी माझ्या संगीत दिग्दर्शनामध्ये ही गाणी आनंदाने गायिली. जे स्वत: परिपूर्ण संगीतकार-गायक अशा बाबूजींना मी गाण्याची चाल सांगायची म्हणजे माझ्यावर दडपण असायचे. पण बाबूजी हे स्वत:च ते दडपण दूर करायचे. ते अगदी एखाद्या विद्यार्थ्यांसारखं गाणं शिकायला बसायचे. एखादी वेगळी जागा घेतली तर चालेल का, असे ते मला विचारत. ‘तुम्ही सांगता तसे माझ्या गळ्यातून आलेच पाहिजे,’ असे सांगून ते सराव करायचे. यशाच्या शिखरावर असताना मेहनत आणि अचूकतेवर भर देणारा असा दुसरा संगीतकार-गायक मी पाहिलाच नाही.

‘
स्वर आले दुरूनी’ या गीताची जन्मकथा रोमांचकारी आहे. एकदा ध्वनिमुद्रण संपवून मी बसने घरी येत होतो. प्रवास सुरू असताना मनात काही वेगळेच चालले होते. एक सुरावट जन्म घेत होती. मग खिशातील पेन काढून बसच्या तिकिटाच्या मागे मी नोटेशन लिहिले. घरी आल्यानंतर संवादिनी घेऊन मी ते गायलो. चाल पक्की झाली. आता त्याला शब्द हवे होते. हे गाणे कोण लिहू शकेल असा विचार करताना माझ्या डोळ्यासमोर संगीतकार यशवंत देव यांचे नाव आले. या चालीला समर्पक शब्द संगीताची जाण असलेले देवसाहेबच देऊ शकतील अशी माझी पक्की खात्री झाली. देव हे त्या वेळी नागपूर आकाशवाणी केंद्रावर काम करीत होते. मी देवसाहेबांना दूरध्वनी केला आणि त्यावरच मी त्यांना नोटेशन ऐकविले. त्यांनी मला पत्राद्वारे नोटेशन पाठविण्यास सांगितले. त्यांचे उलट टपाली पत्र आले आणि शब्द होते ‘स्वर आले दुरूनी.. जुळल्या सगळ्या त्या आठवणी’. गाण्याचे शब्द खरोखरच दुरून आले होते. हे गीत गाण्याची मी बाबूजींना विनंती केली. त्यांनी या गीताचे सोने केले हे मी वेगळे सांगायला नको. त्याच्या जोडीला दुसरे गीत हवे म्हणून पुन्हा देवांनाच गळ घातली आणि त्यांनी ‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया’ हे गीत मला दिले. तेही बाबूजींनी अप्रतिम गायले आहे.

प्रपंच चालविताना पैसे लागतात. सुधीर फडके यांच्यासमवेत काम करताना पैसे मिळायचे. पण वाढत्या घरखर्चाची आवश्यकता ध्यानात घेता गरजा भागविण्यासाठी मिळणारे पैसे पुरायचे नाहीत. मग बाबूजी यांच्याशी चर्चा करूनच मी हिंदूी चित्रपटसृष्टीमध्ये वादक म्हणून दाखल झालो. 

आघाडीच्या सर्वच संगीतकारांच्या स्वररचनांमध्ये व्हायोलिनवादनासाठी मला निमंत्रण असायचे. मदन मोहन यांना माझे वादन आवडत असे. तर ‘मी केव्हा उपलब्ध आहे हे जाणून घेऊनच मग ध्वनिमुद्रण निश्चित करावे,’ असे भूपेन हजारिका आपले साहाय्यक अनिल मोहिले यांना सांगायचे. मी मुंबईमध्ये गेलो तो काळ ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांचा होता. अशा चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक आणि संगीतकार एस. एन. त्रिपाठी खूपच लोकप्रिय होते. त्यांच्याकडेही काम करण्याची संधी मिळाली. ते माझ्याशी छान गप्पा मारत असत. ‘इतना फास्ट नोटेशन लिखनेवाला म्युझिशियन हमने देखा नहीं,’ अशा शब्दांत माझे कौतुक झाले. त्यामुळे मदन मोहन, सज्जाद, एस. डी. बर्मन, रोशन, ओ. पी. नय्यर यांच्यापासून आर. डी. बर्मन, जयदेव, राजेश रोशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, रवींद्र जैन ते अगदी नव्या पिढीेचे म्हणता येतील असे अन्नू मलिक, नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद अशा सर्व संगीतकारांबरोबर मी काम केले आहे.

Wednesday, December 21, 2016

`आनंदरंग` पुरस्काराचा मानकरी विठ्ठल हुलावळे



नाट्यसृष्टीची गेली ४० वर्ष करणारे भरत नाट्य मंदिराचे पडद्यामागचे कलावंत विठ्ठल नामदेव हुलावळे यांना शुक्रवारी २३ डिसेंबरला दिवंगत अभिनेतेआनंद अभ्यकंर यांच्या नावाने दिला जाणारा आनंदरंग पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकलाकार नीना कुलकर्णी यांच्या हस्ते पुण्यात पत्रकार संघात एका कार्यक्रमात दिला जाणार आहे..त्यानिमित्ताने


कट्यार काळजात घुसली या नाटकाचे नेपथ्य़ नाट्यसंपदा सारख्या संस्थेचे होते..रंगमंचावर प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर केला गेला होता.. त्याबरहुकूम नेपथ्य़ पुण्यात भरत नाट्यमंदिरात तयार केले गेले..योग्य वेळी तो फिरता रंगमंच हालायलाच हवा..ते काम पदड्यामागे समर्थमणे सामंभाळणारे जे काही पदड्यामागचे कलाकार होते..त्यात विठ्ठल हुलावळे हे आघाडीवर होते...नाट्यतपस्वी बाबुराव विजापुरे यांच्या चाणाक्ष नजरेतून आणि य.मु वैद्य यांच्या मार्गदर्शनाने ती करामत आमचे त्यावेळचे सारेचजण चोख बजावत.,.
हा काळ सुमारे १९७७ असावा..त्यापूर्वी म्हणजे शांकुंतल आणि शारदा या नाटकाच्यावेळी पडद्यामागे हा विठ्ठल सतत झटत असायचा..उत्साह तसाच..उमेद आणि जिद्द या त्रिगुणी स्वभावाने भारलेला बॅकस्टेज कलाकार आणि भरत नाटय् मंदिर यांचे समीकरण १९७४च्या आधीपासून जमलेले..
खरे म्हणाल तर भरतचे नाटक  अगदी आजही विठ्ठलच्या हातभाराशिवाय पूर्ण होत नाही..ही अतिशयोक्तिची गोष्ट नाही..
अनेक लोकांची नावे माहिती असतात..पण तो कुठला, काय करतो, घरगूती परिस्थिती कशी यांची अनेक कलावंतांना वार्ताही नसते..त्यातलाच तो एक..विठ्ठल.. त्याला त्याच नावाने सारे लोक हाक मारित... पुढे पुढे दत्तोबा मिस्त्री, विठ्ठल हुलावळे ही त्यांची पूर्ण नावे कानावर आली..पण ती सतत वापरली जात नव्हती आजही नाहीत.

नेपथ्याची मांडामांड कशी करायची ते कोणते नेपथ्य तुम्हाला योग्य शोभेल यांची माहिती` विठ्ठल` शिवाय भरत मध्ये दुसरा फारसा कुणी जाणकार नसायचा..ही जाणकारी इतकी वाढत गेली की स्पर्धेच्या नाटकांपासून ते अगदी पुरूषोत्तम करंडकाच्या एकांकिका पर्य़ंत या पदड्यामागच्या कलावंताचे नाव सर्व कलाकारांच्या तोंडी झाले..आजही आहे...पुरुषोत्तम आणि स्पर्धेच्या नाटकात काम करणारे कलावंत हौशी त्यांची पुढे नाटकातली एंट्री कमी होत गेली..पण मोठमोठ्या हुद्यावर काम करणारे अनेक कलावंत आजही या कलावंतांना स्मरणात ठेऊन आहेत..हे विशेष.
विठ्ठलला कालवंत म्हणायचे यासाठी की तो केवळ पडद्यामागचा भाग सांभाळतो असे नाही तर कांही नाटकात तर तो छोट्या भूमिकाही करतो.. मला आठवते ती कट्यार मधला बद्रिप्रसाद..आणि इतरही..
तसा हा विठ्ठल मूळचा पिरंगूटजवळच्या गावचा...तिथे त्याची शेतीही आहे..नांगरणी,पेरणीसाठी तो आजही घरी जातो.

.त्याला पगार तो कीती..त्यात कसे भागायचे..म्हणून त्यांने महापालिकेतले माजी अधिकारी आणि पीडीएचे जुने कलावंत श्रीपाद आडकर यांच्या प्रभात रस्त्यावरच्या घरातली दोन चाफ्याची झाडे वार्षिक करार करून मिळविली..आणि आणि गेली २५ वर्षे  आज आडकर नसले तरी त्यांच्या मुलाच्या काळातही पहाटे ऊठून झाडावरीची फुले काढून भरतच्या समोर ती विकायचा जोड उद्योग त्याने सुरु ठेवली आहे.. त्याला काही काळ त्याच्या मुलानेही हातभार लावला..पण तोही आता आपल्या स्वतंत्र उद्योगाला लागला आहे.
पत्नीच्या अकाली निधनानंतर तसा तो एकाकी पडला..मुलीच्या लग्नानंतर मुलाचा आणि आपला प्रपंच तो उत्तम सांभाळतो..जावयांची साथही त्याला चांगली मिळाली..
पण स्वावलंबी स्वभाव. कष्टाची सवय आणि प्रामाणिक वृत्ती यामुळे आजही भरतच्या पगारावर त्यांची गुजराण सुरू आहे..
अनेक कलावंतांच्या तोंडात त्याचे नाव आजही असते..ते त्याच्या या उत्तम वर्तनाने. नाटकाचा सेट लावाय़ला आजही तो तेवढ्याच उत्साहाने पुढे असतो..भरत नाट्य मंदिराचे प्रयोग जिथे जिथे होतील तिथे हा विठ्ठल कायम कटेवर हात ठेऊन कामासाठी ऊभा दिसेल..

आपली खासगी नोकरी सांभाळून त्याने संस्थेच्या अनेक पदाधिका-यांचा विश्वास संपादन केला आहे..अनेकांच्या अडचणीला धावूनही गेला आहे.त्याची ही निष्ठा आणि कार्यतप्तरता पाहून नाटयपरिषद( मुंबई), सिंबयोसिस आणि बारामतीच्या नाट्यसंमेलनातही विठ्ठल नामदेव हुलावळे यांचा सत्कार केला गेला.
आज आनंद अभ्यंकरच्या नावाचा पुरस्कार मिळून तो अधिक समाधानी झाला आहे..

अशी अनेक अंधारात वावरणारी माणसे आहेत..जी उजेडात दिसणा-या कलावंतांच्यामागे सावलीसारखी उभी असतात..खरं तर असा असंख्य कलावंतांचा प्रातिनिधि म्हणूनच या विठ्ठल नामदेव हुलावळे यांना पुरस्कार प्रकाशात स्विकारताना
साठीच्या आसपास असलेल्या त्याला आपण सारे त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊ या.




- सुभाष इनामदार पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Saturday, December 17, 2016

चार कलावंतांना स्वरगंध प्रतिष्ठानची शिष्यवृत्ती प्रदान












तुझ्यात कला आहे..तू नोकरी करू नकोस. असे सांगून १९४७-४८च्या सुमारास मला गाय़क बबनराव नावडीकरांनी ५० रुपये महिना पदवी प्राप्त करण्यासाठी मदत केली..ते ऋण समजून मी माझ्या वतीने चार कलावंताची निवड करून त्यांना पुढच्या कलेच्या प्रगतीसाठी आज शिष्यवृत्ती देत आहे..
ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांनी स्वरगंध प्रतिष्ठानच्या कलावंतांनी पुण्यात एका छोट्या समारंभात शिष्यवृत्ती प्रदान केली.

शनिवारी १७ डिसेंबरला पुण्याच्या उपाध्ये व्हायोलीन अॅकॅडमीच्या सभागृहात दौलत विठ्ठल खंडझोडे ( सातारा), राखी वसंत राणेकर ( बालघाट-मध्यप्रदेश) यांना गायनासाठी तर दिविजा योगेश जोशी (पुणे) व प्रकाश सुखदेव चव्हाण (बडोदा) या दोघांना व्हायोलीनच्या पुढच्या शिक्षणासाठी एका वर्षासाठी सहा हजार रूपयांची शिष्यवृत्ती प्रभाकर जोग यांनीआपल्या स्वहस्ते देऊन त्यांना भविष्यासाठी आशीर्वाद दिला.

गेल्या जून मध्ये त्यानी स्वरंगंध प्रतिष्ठान हा ट्रस्ट स्थापन केला आणि त्यानंतर  कलावंतांकडून अर्ज मागवून त्यांची चाचणी घेऊन त्यांना सहा महिन्यात ही शिष्यवृत्ती देण्यात आली.  अमेय जोग, शिरीष आणि अतुल उपाध्ये आणि स्वतः जोग यांनी ह्या कलावंतांची निवड केली.

आर्थिक परिस्थितीमुळे कलावंताला आपली कला पुढे अभ्यासता येत नाही..किंवा पुढे त्यात पारंगत होताना अडचणी येतात..हे स्वतःच्या अनुभवातून आपण पाहिले..म्हणूनच त्यांना पुढे शिकता यावे यांसाठी माझ्यापरिने हा प्रयत्न केला असल्याचे प्रभाकर जोग म्हणाले.

चार कलावंतांच्या वतीने राखी राणेकर यांनी आपण नक्की यांतून आपली कला पुढे प्रगतीकडे नेवू अशी खात्री याप्रसंगी दिली.
समारंभात उपस्थितांचे स्वागत करून शिरीषकुमार उपाध्ये यांनी जोग यांच्या कामाचा झपाटा वयाच्या ८४ व्या वर्षी किती आहे ते सांगितले.

तर विश्वस्तांपैकी सुरेश रानडे यांनी निवडीमागची पार्श्वभूमि सांगितली. आणि संगीतकार व्हायचे मनाशी ठरवून तात्यांनी केवळ संगीताशी बांधिलकी कशी ठेवली याविषयीचे विचार व्यक्त केले. संगीतकार असतानाही सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून त्यांनी हा शिष्यवृत्तीचा मार्ग निवडला, असे रानडे सांगतात.

विनोद बापट वकीलांनी शिष्यवृत्ती मिळालेल्या कलाकारांची ओळख करून दिली.


स्वरगंध प्रतिष्ठानचे विश्वस्त रविंद्र आपटे यांनी शेवटी उसस्थित मान्यवरांचे आभार मानले.

- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276