subhash inamdar

subhash inamdar

Saturday, December 3, 2016

नाना अजूनही तसेच आहेत....निष्ठावान कलाप्रमी



पं. भालचंद्र देव 
हे नाव पुण्यातल्या व्हायोलिन प्रेमींसाठी नवीन नाही.. 
मला माझ्या लहानपणापासून आठवतात, नाना अजूनही तसेच आहेत. मध्यम उंच बांधा, लांबसडक बोटं, एका बाजूला वळवले केस, जुन्या पद्धतीची टेरीकॉटची पॅन्ट, साधाच पण नीटनेटका इस्त्री केलेला स्वच्छ शर्ट, आणि हातात त्यांची ती नेहमीची पट्टेरी  शबनम. साधारणअशाच ठरलेल्या वेशात मी त्यांना बरीच वर्षे पाहतोय. अगदीच त्यांचा स्वतःचा कार्यक्रम असेल तरच एखादा साधा सलवार कुर्ता दिसेल त्यांच्या अंगावर. तो सुद्धा जास्त काही शोभा न करता.
मला आठवते ती गोखले नगरची चाळ. दोन खोल्यांचं घर. मग बरेच वर्षांनी मागची एक खोली वाढवून त्या नावाला दोनाच्या तीन झाल्या एवढंच. पण त्या आधी दोनच खोल्या, पुढे आणि मागे छोटं अंगण. तिकडे आमच्या आजीची दुपारी मॉन्टेसरीची शाळा चालायची.साधारण तीस-बत्तीस वर्ष ही शाळा आमच्या शेजारच्या देशपांडेबाई आणि आमची आजी चालवित होत्या. 'देव बाईंची, देशपांडे बाईंची शाळा' अशी गोखले नगरची खूण झाली होती. आजीची ती चिल्ल्या पिल्ल्यांची शाळा, नानांची पी अँड टी (आताचं BSNL)ची नोकरी, भारतगायन समाजात चालणारी व्हायोलिनची शिकवणी आणि हे सांभाळून पुण्यात-पुण्याबाहेर अनेक कार्यक्रमांमध्ये वादन हे सगळं नाना-आजींचं सुरु होतं.
नाना व्हायोलिन घेऊन सारखे इकडे तिकडे का जातात? आजी रोज दुपारी एवढ्या लहान मुलांना घरात बसवून का शिकवते? नानांची शिकवणी, कार्यक्रम म्हणजे काय हे मला कळायचं नाही तेव्हा. या सगळ्यांच्या जोरावर त्या दोघांनी घर कसं चालवलं असेल याची कल्पनातेव्हा येणं कठीण होतं. आता येतेय...

'संतुलित आहार, संतुलित जीवन'

नानांची दिनचर्या अगदी त्यांच्या वेषभूषे इतकीच साधी सरळ नीटनेटकी. अगदी सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं नेमानं. कधीही ते अगदी जड होईल इतकं जेवले नाही आणि अर्धपोटी राहायची वेळ कधी स्वतःवर येऊ दिली नाही. 'संतुलित आहार,संतुलित जीवन' हेच त्यांच्या निरोगी आणि पौष्टिक दिनचर्येचं रहस्य आहे असं वाटतं. कधी आजारी आहेत म्हणून पडून राहिले नाहीत का कधी एका जागी बसून राहिले नाहीत. नोकरीत होते तेव्हा त्यांच्या व्यस्त दिनमानामुळे वेळ मिळाला नाही तर, रात्री सगळेझोपल्यानंतर हेडफोन लाऊन गाण्यांची नोटेशन्स, तुकडे काढायचं काम करायचे. तेव्हा सुद्धा 'हे आत्ता गाणी का ऐकतायत' हा अगम्य प्रश्न मला पडायचाच, उत्तर काही वर्षांनी मिळालं.
पुण्याच्या 'भारत गायन समाज' या जुन्या आणि प्रसिद्ध संगीत विद्यालयामध्ये त्यांनी संगीत शिक्षकाचं काम केलं. व्हायोलिन जेवढं वाजवायला अवघड त्याहून जास्त ते शिकवायला अवघड आहे असं म्हणतात. यामुळेच फारसं कोणी व्हायोलिनच्या वाट्याला जात नाही.शिकायला जात नाही आणि शिकवायला त्याहून जात नाही. भारतीय शास्त्राप्रमाणे व्हायोलिन शिकवणारे हल्ली खूपच कमी आहेत. जे आहेत ते सगळे जुने लोकच. या अशा परिस्थितीमुळे या संगीत विद्यालयात व्हायोलिनचे शिक्षक टिकत नव्हते त्या परिस्थितीत नानांनीपाच-दहा नाही तर तब्बल सेहेचाळीस वर्षे या संस्थेत विद्यादानाचं काम केलं. संगीत संस्कार केले, अनेक विद्यार्थी घडवले तेही अगदी कमी मोबदल्यात. केवळ संगीताची आवड आणि कलेवरच्या प्रेमाखातर.
आता एखाद्या माणसाचा जसा स्वभाव असतो तोच स्वभाव त्याच्या प्रत्येक गोष्टीत व्यक्त होत असतो नाही का? नानांचं सुद्धा असंच. स्वभावानं प्रेमळ, पण शिस्त म्हणजे शिस्त! चुकीची गोष्ट स्वतः करणार नाहीत आणि कोणाची खपवूनही घेणार नाहीत. मग त्यासाठीकधी कोणाला कडवे बोल सूनवायला लागले तरी मग पुढचा मागचा विचार करणार नाहीत. कातडीबचावू, भिडस्त दृष्टिकोन कधी ठेवला नाही. जे काय आहे ते बोलून मोकळे! मनात काही नाही.
आता नानाच्या वादनाबद्दल मी काय बोलावं? माझी पत नाही तेवढी.पण नानांच्या वादनात त्यांचा स्वभावच झळकतो. शिस्तबद्ध वादन, पक्की लय, न हलणारा स्वर, ही त्यांच्या वादनाची मला जाणवलेली वैशिष्ट्य. मी आईच्या गर्भात असल्यापासून व्हायोलिन खूपजवळनं ऐकत आलोय. त्यामुळेच आईच्या ( सौ. चारूशीला गोसावी ) व्हायोलिन सुरांशी माझी तार जन्मापासूनच जुळलीये खरी. रेडिओवर किंवा अजून कुठे व्हायोलिनचे स्वर ऐकू आले की ते आईचे आहेत की नाही हे लगेच ओळखता येतं, जसं आईचं आपल्या मुलाबद्दलहोतं तसंच. पण अनेकदा असं होतं की आई आणि नाना यांच्या स्वरातला फरक लक्ष देऊनही कळत नाही. दोघांची जुगलबंदी ऐकताना तर एकच व्हायोलिन ऐकतो आहोत असं वाटतं. आठ ऐवजी चारच तारा ऐकू येतात. हेच नानांमधल्या गुरुचं यश आहे. स्वतःइतकंचतयारीचं शिष्येला तयार करणं यातच गुरुचं कसब असतं आणि ते नानांनी केलंय.


शिस्तीचे ऋण
आईकडून बरेच वेळेला मी त्यांच्या शिस्तीचं वर्णन ऐकलंय. तिच्या बोटांतून निघणारे स्वर हे नानांच्याच शिस्तीचं देणं असल्यामुळे तिने मला हे नेहमी अभिमानानंच सांगितलंय. तिनं लहानपणी मांडीवर 'बो'नी खाल्लेल्या फटाक्यांची आठवण तिला आजही आहे.आठवणीपेक्षा त्याचे ऋण अजूनही तिला आहेत असं म्हणावं लागेल. हेच ऋण फेडणं अशक्यच पण ती तिच्या परीनं त्याचा थोडासा प्रयत्न करत असते याचा मला खूप अभिमान वाटतो. सौ. चारूशीला गोसावी म्हणजे माझी आईही त्यामुळे आपल्या वादनातून रसिकांच्यापसंतीला उतरली आहे


नानांचे गुरु 'पं.गजाननबुवा जोशी' यांच्या स्मृतीनिमित्त आवर्जून कार्यक्रम करणं, गुरुपौणिमा नियमित साजरी करणं. नानांची एकसष्टी, एकाहत्तरी आणि आता सहस्त्र चंद्रदर्शन आणि त्यानिमित्त.हा कार्यक्रम  .
स्थिर हात, सलग सूर





नानांबरोबर तबला साथ करणं ही काही वेगळीच मजा असते. आता माझ्या सुदैवानं मी त्यांचा नातू आहे म्हणून मला ही संधी वारंवार मिळत असते. मग ती मिळाली की मी सोडत नाही. त्यांच्याबरोबर ख्याल वाजवताना मला जरी सूर, राग, ताना, बंदिश, चीज हे फारसंकाळात नसलं तरी सुद्धा मी त्यात रंगत जातो. मधल्या जागा आपोआप माझ्याकडून भरल्या जातात, मात्रा वाजत जातात आणि समेवर येत जातात. त्यांचा ताल इतका पक्का आहे की माझ्यासारखे तबलजी त्यांच्यासाठी ताल धरतात का ते तबलजीसाठी ख्याल धरतात हाप्रश्न आहे. सात, बारा, सोळा या मात्रा त्यांच्या डोक्यात इतक्या पक्क्या बसल्या आहेत की त्यांना तबला साथ फक्त ठेक्यासाठी गरजेची असते, मात्रांसाठी नाही! आत्ता वयाच्या एक्यांशीव्या वर्षी सुद्धा व्हायोलिनवर त्यांचा जो स्थिर हात, सलग सूर, आणि शुद्ध स्वरनिकासआहे तो तर दैवी देणगी, पं गजाननबुवांची कृपा, त्यांनी घेतलेली अपार मेहेनत आणि कलेबद्दल असणारी नितांत निष्ठा यांचा सुरेल मिलापच म्हणावा लागेल.








...रविराज गोसावी., पुणे
9850886769


Thursday, December 1, 2016

मानपत्र- पं. भालचंद्र दामोदर देव यांना

पं. भालचंद्र दामोदर देव उर्फ नाना. आपल्या कलासंपन्न आयुष्याच्या या टप्प्यावर वयाची ८१ वर्षे पूर्ण करून आपण ८२व्या वर्षात पदार्पण केले आहे. तुमच्या या कलासाधनेचा गौरव करून तुम्हाला पुढील काळात दीर्घायुष्य लाभावे यासाठी स्वरबहार, सांस्कृतिक पुणे आणि तमाम पुणेकर रसिकांच्या साक्षीने गानवर्धनचे संस्थापक, अध्यक्ष श्री. कृ.ग.धर्माधिकारी यांच्या हस्ते हे मानपत्र देताना खूप आनंद होत आहे.
आपला  जन्म मुंबईचा. साल १९३६. आपले वडील दामोदर चिंतामण देव हे ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक कै. पंडीत अनंत मनोहर जोशी उर्फ अंतूबुवा यांचे शिष्य. वडिलांना प. गजाननबुवा जोशी यांचे व्हायोलीन आवडायचे..आपल्या एका तरी मुलाने व्हायोलीन शिकावे अशी त्यांची इच्छा. यासाठी वडिलांनीच एक छोटे व्हायोलीन आणून त्यांनीच आपल्याला प्रारंभीचे स्वर-तालाचे ज्ञान दिले..
त्यावेळी आपले वय ९ वर्षाचे होते. वडील महापालिकेच्या शाळेत संगीत शिक्षक असल्याने कधी कधी वडील आपल्याला शाळेत व्हायोलीन वाजविण्यास सांगत.
पुण्यात गायक व हार्मानियम वादक पं. बबवराव कुलकर्णी यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जावू लागलात. त्यांच्याबरोबर साथही करु लागलात
काही काळ आपली मावसबहीण सौ. लीला इनामदार हिच्याकडून काही गाणी वाजविण्यास शिकलात.
डोंबिवलीस पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडे व्हायोलीन शिकण्याची नामी संधी आपणास प्राप्त झाली. मुंबईत कुठे बुवांचा कार्यक्रम असेल तर आपणच तंबो-याच्या साथीस असत. त्यामुळे मैफलीत बुवा कसे वाजवतात हे आपणास जवळून अनुभवायला मिळाले. १९५६ ते १९५८ या तीन वर्षांच्या काळात आपल्यावर बुवांच्या संगीताचे उत्तम संस्कार झाले.
पुण्यात प्रसिध्द तबला वादक सूर्यकांत उर्फ छोटू गोखले यांच्याकडून आपण तबलाही आत्मसात केलात.
रेडिओवर लागणारे वादन, गायन ऐकून स्वतःच त्यांना साथ करण्याचा रियाज करून व्हायोलीन वादनाचे स्वतःच धडे गिरविलेत. त्यातूनच आपली वाद्यावरची पकड मजवूत झाली.
आकाशवाणीवरील शास्त्रीय वादनाच्या कार्यक्रमाला आपणाला ५३ वर्षं पूर्ण  झाली . आपल्याला खुद्द पं. गजाननबुवा जोशी यांनी उत्तम व्हायोलिन वादनाबद्दल शाबासकी दिली .
टेलिफोन खात्यात तुम्ही ३६ वर्षे सेवा करून २० वर्षे सुवर्णपदकाचे मानकरीही ठरलात.
सरदार आबासाहेब मुजुमदार, हिराबाई बडोदेकर, दत्तोपंत देशपांडे, प्रा. अरविंद मंगरुळकर, प्रा. ग. ह. रानड़े अशा मान्यवरांकडून आपल्या वादनाला दाद मिळाली.
ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर पं. नागेश उर्फ राजाभाउ खळीकर ,सुप्रसिध्द संगीतकार , गायक गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, अरूण दाते, यशवंत देव , आनंद माडगूळकर, नकलाकार वि.र. गोडे यांच्या बरोबर साथ करण्याचा आपणाला योग आला. `स्वरानंद` संस्थेत अनेक वर्षे साथ कऱण्याची संधी आपणास मिळाली.
पुण्याच्या भारत गायन समाजात सलग ४६ वर्षे व्हायोलीन वादनाचे शिक्षण देण्याचे काम अतिशय निष्ठेने केल्याने संगीतकार नौशाद अली यांच्या हस्ते  `आदर्श शिक्षक` म्हणून आपला गौरव करण्यात आला.
आपली व्हायोलीन वादनाची कलापरंपरा कन्येला ..सौ. चारूशीला गोसावी यांना दिलीत..त्याही व्हायोलीन वादनात पारंगत असून रसिकांची वाहवा मिळवित आहेत.
आपला नातू रविराज गोसावी उत्तम तबलापटू आहे. नात सौ. मधुरा तळेगावकर यांच्यात स्वर-तालाचे संस्कार मुळातच आहेत.
आपली पत्नी सौ. नीला देव यांनाही गाण्याची आवड..पण संसारातली शिस्त, परंपरा आणि घरची जबाबदारी यामुळे त्यांना आपली आवड जोपासता आली नाही..पण आपणाला त्यांनी पुरेपुर साथ दिली.
सेवानिवृत्तीनंतर येणारे रिकामपण आपल्याला  व्हायोलीनने कधीच जाणवू दिले नाही. वयाच्या ८१ व्या वर्षीही आपण येणा-या साधकांना व्हायोलीन वादनाचे धडे देत आहात. मुंबईच्या  `रायकर व्हायोलीन अॅकॅडमी `कडून आपणाला `व्हायोलीन गुरू `ही उपाधाही दिली गेली.
जगण्यातली शिस्त आणि संगीतातला अचूकपणा  आपल्यात आजही आहे. म्हणूनच आजही आपण तेवढेच कार्य़रत असता.
आपल्या ला यापुढील आयुष्यातही असेच आयुरारोग्य लाभो. संगीत कलेची सेवा करण्याची अधिकाधिक संधी आपणास मिळो हीच नटेश्वरचरणी प्रार्थना .






 पुणे, शनिवार ३ डिसेंबर ,२०१६

Wednesday, November 30, 2016

भालचंद्र देव - सहस्त्रचंद्रदर्शना निमित्ताने मैफल



स्वरबहार आणि सांस्कृतिक पुणे च्या वतीने  ज्येष्ठ व्हायोलीनवादक पं. भालचंद्र देव
 यांच्या  सहस्त्रचंद्रदर्शना निमित्ताने
शनिवारी, ३ डिसेंबरला सायंकाळी साडेपाचला
नवी पेठेतल्या निवारा सभागृहात
सत्कार आणि संगीताची मैफल आयोजित केली आहे.

गानवर्धनचे स्स्थापक, अध्यक्ष श्री. कृ.ग.धर्माधिकारी यांच्या हस्ते
 पं. भालचंद्र दामोदर देव यांचा सत्कार केला जाणार आहे.
यात आनंद देशमुख, चित्तरंजन देव यांचा सहभाग असेल.
कार्यक्रमात सौ.मधुरा गोसावी-तळेगावकर,
सौ.चारुशीला गोसावी तसेच स्वतः पं. भालचंद्र दामोदर देव
यांच्या व्हायोलीन वादनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल.

तबला साथ रविराज गोसावी यांची असून  राजय गोसावी निवेदन करणार आहेत.

हा कार्यक्रम सर्व रसिकांना विनामूल्य खुला आहे.


आपला,
सुभाष इनामदार.
सांकृतिक पुणे करिता
http://culturalpune.blogspot.in/
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, June 9, 2016

संगीत धेय्य ठरविणा-या कलावंताला जोग ट्रस्टचा आधार


‘स्वरगंध प्रतिष्ठान’ या नावाने आज गुरुपुष्याच्या मुहूर्तावर संगीत क्षेत्रात आपली कारकीर्द घडविणा-या कलावंताला पं. प्रभाकर जोग यांनी  ट्रस्टची स्थापना करून आपले समाजासाठीचे योगदान दिले. प्रभात कंपनीच्या मालकांच्या बंगल्यानजीक असलेल्या सुरेश रानडे यांच्या घरी या ट्रस्टची अधिकृत घोषणा केली गेली.. यावेळी स्वतः प्रभाकर जोग आणि इतर ट्रस्टी मंडळींसह. स्वरांनदचे प्रा. प्रकाश भोंडे, शास्त्रीय गायिका शैला दातार आदी मान्यवर उपस्थित होते. शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतात (करिअर करू इच्छिणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना या ट्रस्टतर्फे यंदापासून वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात
येणार आहे.
त्यासाठी राज्यभरातून उचित विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. ट्रस्टमध्ये जोग यांच्यासह सुरेश रानडे, शिरीषकुमार उपाध्ये,  विनोद बापट (वकील) आणि रवींद्र आपटे या विश्वस्तांचा समावेश असणार आहे. हे सारे याप्रसंगी उपस्थित होते.

समाजाने अनेक वर्षे आपल्या कलेला उरीशिरी घेत प्रेम केलं. आता त्याची परतफेड करता यावी आणि संगीतात काही करू पाहणाऱ्या तरुणांना केवळ पैशाच्या अडचणींनी मागे परतावे लागू नये, म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे जोग यांनीघेतला आहे.. ‘अनेक गुणी कलाकारांना केवळ पैशाच्या समस्येमुळे आपली कला पुढे नेता येणे कठीण होते. अशा गुणी विद्यार्थ्यांच्या कलेला आर्थिक हातभार लावण्याचे काम हा ट्रस्ट करणार आहे.


.ते सांगतात‘‘आज मी ज्या टप्प्यावर पोचू शकलो, त्यामागे बबनराव नावडीकर यांनी मला केलेल्या मदतीचा मोठा वाटा आहे. आमच्या घरची आर्थिक परिस्थिती माझ्या तरुणपणी बेताचीच होती. मात्र, नावडीकरांनी मला आर्थिक मदतीचा हात दिला. त्यामुळे मला माझा संगीताभ्यास सुरू ठेवता आला. आज मीही नावडीकरांप्रमाणेच इतरांच्या मदतीला उभा राहू पाहत आहे. त्यातून नवे ‘प्रभाकर जोग’ भविष्यात उभे राहिल्यास मला आनंद होईल.’


वयाच्या १२व्या वर्षी पुण्यातील वाड्यांमधून सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करणारे जोग हे पुढे संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहायक झाले. गीतरामायणांमधील गाण्यांमध्ये प्रभाकर जोग यांचे व्हायोलिनचे सूर असत. त्यांनी गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना साथ दिली. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले. स्नेहल भाटकर यांच्याकडे जोग यांनी ‘गुरुदेवदत्त’ या १९५१ सालच्या चित्रपटात व्हायोलिन वादनाचे काम केले. जोग यांनी नोटेशन कलेत प्रावीण्य मिळवले. त्यांनी मराठी चित्रसृष्टीतील संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, पं. हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, राम कदम व वसंत प्रभू यांच्यासोबत काम केले. ‘जावई माझा भला’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असून, त्यांनी २२ चित्रपटांना संगीत दिले आहे.