subhash inamdar

subhash inamdar

Monday, January 25, 2021

गा बाळांनो श्रीरामायण..!





कोरोना काळात बंद असलेली गांधर्व महाविद्यालयाचे  विष्णू विनायक स्वरमंदिराचा स्वरमंच दहा महिन्यानंतर उघडला आणि तोही ही वास्तु उभारण्यात ज्यांचा मोलाचा हात होता त्या कै. धोंडू उर्फ डी. जी.मराठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने. 

ते या महाविद्यालयात ४० वर्ष प्राचार्य होते.. मराठे यांच्याकडे संगीताचे धडे घेतलेले वसंतराव आणि सौ.विद्या पेंढरकर यांच्या कुटुंबियांच्या वतीने गीतरामायण गायनाचा कार्यक्रम गुरुवारी २१ जानेवारी २०२१ ला रंगला. विक्रम पेंढरकर यांचा मुलगा वर्धन पेंढरकर आणि भाचा अथर्व बुरसे यादोन युवा गायकांनी हे गदिमा रचित गीतरामायण    सादर केले..

स्वये श्रीरामप्रभु ऐकती पासून गा बाळांनो श्रीरामायण पर्यंत निवडक गीते त्यांनी इथे आपल्या भारदस्त आवाजातून पेलण्याचा प्रयन्त केला.. 

स्वयंवर झाले सीतेचे..जयगंगे जय भागीरथी..बोलले इतुके मज श्रीराम..दैवजात दुःखे भरता..सन्मित्र राघवाचा..भूवरी रावणवध झाला..ही त्यापैकी काही उल्लेखनीय गाणी..


कार्यक्रमात बोलताना या मुलांनी ही  अजरामर गाणी ऐकवण्याचा हा जो घाट मांडला..त्याला गा बाळांनो श्रीरामायण.. असा आशीर्वाद ह्या कार्यक्रमाच्या संकल्पना आणि मार्गदर्शिका विद्या पेंढरकर यांनी दिला..


डॉ. वैशाली जोशी यांचे निवेदन होते..कार्यक्रमाची रंगत आणणारे साथीचे कलावंत होते.. प्रमुख मार्गदर्शक हार्मोनियमची संगत करणारे विक्रम पेंढरकर..प्रसाद वैद्य..तबला. चारुशीला गोसावी.. व्हायोलिन. नरेंद्र काळे..तालवाद्ये. तसेच समूहस्वरात साथ केली ती मैत्रेयी पेंढरकर आणि वैशाली जोशी यांनी.


गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य  आणि जेष्ठ हार्मोनियम कलावंत प्रमोद मराठे यांनी आपल्या वडिलांच्या जन्मशताब्दी निमित्ताने  पेंढरकर कुटुंबियांना धन्यवाद दिले. ह्या संस्थेच्या बिकट वाटचालीत वडिलांनी विनायकबुवा पटवर्धन यांच्यानंतर ही संस्था चालू ठेवली याबद्दल त्यांचा अभिमानपूर्वक उल्लेख केला.



स्वतः विद्याताईंनी  ( सौ. विद्या पेंढरकर) सावळा ग रामचंद्र हे गीत आपल्या तरल आणि भावनांचा उत्कट आविष्कार करत गायले..ते गीत मनात कायमचे भरून राहील असेच होते.


प्रमोद मराठे यांचे जेष्ठ बंधू चंद्रशेखर मराठे यांच्या हस्ते कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांचा सन्मान केला गेला.


-सुभाष इनामदार, पुणे


subhashinamdar@gmail. com