subhash inamdar

subhash inamdar

Sunday, September 16, 2012

सूरांनी जोडलेली नाती वाढावित...

डॉ. प्रभा अत्रे


आज माझ्या नात्यातले कोणी नाही..पण सूरांनी जोडलेल्या नात्यातल्या मंडळींनी माझा वाढदिवस असा करावा याचा अधिक आनंद आहे..हीच नाती अधिक वाढावित हिच इच्छा...किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका स्वरप्रभा डॉ. प्रभा अत्रे यांनी शनिवारी टिळक स्मारक मंदिरात आपल्या भाषणाच्या आरंभी सांगितलेल्या दोन शब्दांनी सारे रसिक तर भारावलेच पण सारे साधक कृतार्थ पावले..

संगीतामुळे गुणी आणि ज्ञानी माणसांचा सहवास मिळाला. शाश्वरताची जाणीव आणि पूर्णत्वाकडे जाणारा मार्ग कधी न संपणारा असतो, याचे भानही संगीतानेच दिले. हा सांगीतिक प्रवास रसिकांच्या प्रेमामुळेच यशस्वी झाल्याची भावना ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली.


"गानवर्धन' संस्थेतर्फे त्यांचा ८१व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अतिशय भावमधूर आणि स्वरांच्या चाहत्या रसिकांच्या साक्षिने त्यांना जेव्हा मंत्रोच्चाराच्या गजरात सुवासिनींनी ओवाळले तेव्हा तो सोहळा पाहणा-या रसिकांचे मनही गहिवरुन गेले..

तुमच्या गाण्याने सरस्वतीच्या वीणेवरही रोमांच उभे राहतात ...अशा पवित्र स्वरांना आणि त्या स्वरप्रतिभेचा गौरव होताना पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे आम्ही सारे धन्य झालो. स्वर हा किराणा घराण्याचा ईश्वर होता आणि या ईश्व्राची आराधना करून रसिकांना आनंद देण्याचे काम डॉ. प्रभा अत्रे यांनी केल्याचे विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी म्हटले. शिवशाहिरांनी त्यांना अशाच गात रहा असा आशिर्वाद दिला. तर उल्हास पवार यांनी त्यांच्या सुरेल मैफलीचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याच्या आठवणी सांगितल्या..

सुचेता भिडे-चाफेकर यांनी धवल अशा फुलांच्या आणि मोजक्या शब्दातून प्रभाताईंना शुभेच्छा दिल्या. तात्यासाहेब नातू फौउंडेशनच्या वतीने शारंग नातू यांनी २५ हजार रुपयांचा चेक देऊन प्रभाताईंचा सन्मान केला.

गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष कृ. ग. धर्माधिकारी यांनी आपल्या संस्थेच्यावतीने शिवशाहिरांच्या हस्ते त्यांच्या आत्तापर्य़च्या सुरेल प्रवासाची साक्ष असणा-या शब्दातून सन्मानपत्र अर्पण केले..

सत्कार समारंभानंतर ख्यातनाम गायक उल्हास कशाळकार यांनी आपल्या सुरेल स्वरातून डॉ. प्रभा अत्रे यांना स्वरांची फुलेच अर्पण केली..त्यांच्या जोरदार तानांनी आणि नादमय बंदिशीतून मल्हार रागाच्या आलापीतून विविध छटांचे दर्शन घडले. दीड तासाच्या या मैफलीची साथही तशी उत्तम साथिदारांनी कमालीची रंगवीली. तबला साथ केली ती पं. सुरेश तळवलकर यांनी तर हार्मानियमची संगत डॉ. अरविंद थत्ते यांची होती...

स्वरातून बहरलेल्या मैफलीतून नादब्रम्हाची ती सुरेलता अवघ्या मंदिरात अखेरपर्यत निनादत होती..



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


(यातील सारी छाय़ाचित्रे आहेत नव्यानेच छायाचित्रांच्या व्यवसायात आलेल्या नचिकेत सुरेश जोग यांची..)




Monday, August 27, 2012

`विभोर` या कविता संग्रहाचा `देखणा` समारंभ


हिशोब करता
आयुष्याचे
हाती उरतो
एक कवडसा...


असे म्हणत म्हणत मूळच्या पुण्याच्या पण पतीच्याबरोबर तीन खंडात ( त्रीखंडातही म्हणायला हरकत नाही) फिरस्तीपणाने जीनव जगलेल्या ...
पुण्याच्या अभिनव महाविद्यालयाची पदवी संपादन करुन आता केवळ शब्दांत इमले उभारणा-या...
उज्ज्वला अन्नछत्रे यांच्या `विभोर` या कविता संग्रहाचे कालच्या आणि आजच्या पिढीच्या आघाडीच्या कवीयत्री अरुणा ढेरे यांच्या हस्ते झोकात प्रकाशन तर झालेच..




मराठी भाषेपासून दूर जाउनही नवे शब्द..नवी चाहूल
देत मराठी कवींच्या मांदायळीत एक आश्वासक नाव घेऊन आपल्या याच संग्रहातल्या कांही कवीतांना घेऊन संगीतकार मिलिंद जोशी यांनी संगीतबध्द केलेल्या मराठी अल्बमचे साग्रसंगीत अगदी दणक्यात पं. प्रभाकर जोग यांच्या हस्ते याच समारंभात अनावरण केले गेले.

अगदी अरुणा ढेरेंच्या शब्दात सांगाय़चे म्हणजे `देखणा` समारंभ पुणेकरांच्या साक्षीने `विभोर`मय झाला होता.

नवखेपणाच्या खुणा त्यांच्या कवीतेते जवळजवळ नाहीत असा आश्वासक सूर लावून अरुणा ढेरेंनी त्यांच्या कवीतेतल्या विलक्षणपणाची स्तुती केली... ती करताना त्या सांगतात, ` त्यांच्या कवीतेतून कानांना आणि डोळ्यांना पंचेद्रियांची ताकद मिळते, जगण्यातले बारकाने शांतपणे कवीतेतून व्यक्त करण्याची उज्जला अन्नछत्रे यांची तडफड त्यांच्या कवीतेत जाणवते..जगण्यातले हरवलेपण या कवीतेत पकडणारी ही कवीता असल्याचे सांगून त्यांच्याकडून अधिक मागणी करावी अशी विलक्षण ताकद स्पष्ट होत असल्याचे त्या सांगतात. शब्दातला अनुभव संगीतकार मिलिंद जोशी यांनी तेवढ्याच ताकदीने पोचविल्याचा उल्लेख त्या आवर्जून करतात.

यानिमित्ताने या कवीता संग्रहाला प्रस्तावना लिहिणा-या डॉ. निलिमा गुंडी, पं. प्रभाकर जोग, उत्कर्षचे सुधाकर जोशी, सीडीचे निर्मीते फाऊंटन म्युझिक कंपनीचे संचालक कांतीभाई ओसवाल, रविंद्र साठे, रघुनंदन पणशीकर, आणि यामागचे महत्वाचे नाव म्हणजे अरुण अन्नछत्रे सा-यांनी समारंभाला रंगत आणली.




मिलिंद जोशी यांनी संगीत दिलेल्या चार गीतांची झलकही संगीताच्या ट्रॅकवर उपस्थितांना ऐकता आल्यामुळे कवीतेचा पोत आणि त्याला लाभलेले सुरेलपण अनुभवता आले. रुद्रतांडव अशा शंकराच्या विविध तालवाद्यातून निघालेले निनिद आणि त्याला सुयोग्य अशी दमदार , तडफदार शब्दांची जोड देऊन रघुनंदन पणशीकरांनी ते इतके सुंदर नटविले आहे की, त्या गाण्यासाठी का होईना ही सीडी विकत घ्यावीशी वाटेल...एकूणच संगीत देताना शब्दानां अधिक सुरेल करताना भारतीय वाद्यमेळीतून वातावरणाला आणि शब्दांना पोषक अशा सूरावटी तयार करुन त्या तेवढ्याच ताकदीच्या गायकांकडून गाऊन घेऊन हा अल्बम ऐकण्यासारखा सजविला आहे...


रविंद्र साठे, रघुनंदन पणशीकर, अन्नछत्रे यांची सध्या रोमानियात बारावीत शिकत असलेली कन्याका चैतन्या हिने या सीडीत एक नवोदित गायिका म्हणून घेतलेला सहभाग हा अभिमानाचा भाग होता..तिनेही यातल्या दोन कवींतांना आपल्या आवाजात सादर केले.



स्वतः उज्ज्वला अन्नछत्रे यांनी या सीडीत आपल्या आवाजत कवीतेचे वाचन करुन त्यातली तरलता आणि शब्दमाधुर्य रसिकांपर्यत पोचविले आहे.




उज्ज्वला अन्न्छत्रे यांची कालची अवस्था त्यांच्याच शब्दात सांगायची म्हणेज..

स्निग्ध सावळ्या अंधारी मी
माझी मजला सापडते
माझ्याशी हो ओळख माझी
नाते मजसी मम जुळते...




अशी झाली होती...आपल्याच कवीता ऐकताना त्या मलाच समजावून सांगताहेत असा भास होत असल्याचे त्या सांगतात.
संगीतकाराने कवितेचा आवाज व्हायचे असते.. एका ओळीत संगीतकाराचे या सीडीतले स्थान समर्पक शब्दात मिलिंद जोशी यांनी मांडले.

आपल्या प्रस्तावनेत डॉ. गुंडी या कवितांचे आणि कवयीत्रीचे मर्म सांगतात. त्या लिहितात, कवयित्रीकडे कवीतालेखनासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता, रचनेला चैतन्याचा स्पर्श देणीरी उत्स्फूर्तता आणि कवितेला आशयाची डूब देणारी चिंतनशीलता असल्याची ग्वाही यातील प्रत्येक कवितांमधून मिळते. या कवितांमध्ये आई आणि मुलगी असा आधिच्या आणि नंतरच्या पिढ्य़ांशी असलेला स्त्रीत्वाचा अनुबंध व्यक्त करणा-या रचना आहेत. निसर्गचित्रांनीही हे विश्व संपन्न आहे. यातील निसर्गचित्रे तरल आणि भावविभोर आहेत...( स्वत कवयित्री उत्तम चित्रकार असल्यामुळे पुस्तकाचे कव्हर आणि आतली चित्रेही त्यांनीच रेखाटली आहेत.)

`विभोर`च्या निमित्ताने मराठी भाषेची नाळ कायम ठेवणा-या असंख्य कलावंतांना आणि साहित्यिकांना तसेच कवींना मनोमन सलाम करावासा वाटतो...इथे आम्ही इंग्रजाळलेपण जपत भाषेचे मूळ सौंदर्य विसरत चाललो आहोत..पण उज्ज्वला अन्नछत्रेंसारखे अनेकजण ती भाषा..तीचे आपले पण संस्कृती आणि तिचा लहेजा सांभाळतातहेत..वाढवित आहेत.....आम्हाला त्यांचा अभिमान आहे.



`विभोर`च्या समारंभात गायक रविंद्र साठे, संगीतकार मिलिंद जोशी, पडद्यामागचे सूत्रधार अरुण अन्नछत्रे, सौ. उज्ज्वला अन्नछत्रे, नव्याने गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केलेली चैतन्या अन्नछत्रे आणि गायक व संगीतकार रघुनंदन पणशीकर....




सुभाष इनामदार,पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596726

Monday, August 20, 2012

कीर्ति शिलेदार




बालगंधर्व रंगमंदिरी मंगळवारी एक खास समारंभ साजरा होत आहे..त्यानिमित्त...

संगीत सौभद्रचा प्रयोग विमलाबाई गरवारे हायस्कुलच्या संमेलनात त्यांनी प्रथम केला आणि मराठी रंगभूमिची पताका आपल्या खांद्यावर घेतल्याचे तेव्हा जाणविले..तो झेंडा घेऊन आज पन्नास वर्षे झाली...संगीत नाटकांची आणि स्वतःची कीर्ति एकांड्या शिलेदारासारखी मिरवत आजही त्या डौलाने मिरवत आहेत...

त्यांच्या उमेदीच्या काळातल्या भूमिकांनी संगीत रसिक वन्स मोअरची दाद देत...
दादा ते आले ना...हे वाक्य अशा काही थाटात उच्चारत की आठवण यावी ती बालगंधर्वांची .आठवण व्हावी आपली आई आणि मार्गदर्शक जयमालाबाईंची.....



जयराम आणि जयमाला शिलेदार या संगीत नाटकतल्या नामवंत कलावंतांच्या घरी दोन कन्या रत्ने जन्माला आली ती म्हणजे लता आणि कीर्ती.....त्या दोघींनी आपल्या कलासेवेचा वारसा केवळ जपलाच नव्हे तर वाढविला..सजविला आणि नटविलाही...



आज कीर्ती शिलेदार त्या कारकीर्दीच्या पन्नाशीच्या प्रवासात अखंड मिरवित आहेत. जयमाला शिलेदार यांच्या मार्गदर्शनासारखा दुसरा गुरु नाही हे त्या जाणतात..मानतात..म्हणूनच संगीत नाटकांची पताका आपल्या शिरावर घेऊन त्या आजही रसिकांच्या तृप्त जेह-यावर समाधान सहजपणे आणण्यात यशस्वी होत आहेत...



मायबाप प्रेक्षक हेच आपले सारे काही हे मानून ही संगीत सेवा करत अनेक शिष्यांना त्या तयार करीत आहेत..पण आज संगीत नाटकांचा वर्गच कमी होत आहे...इच्छा असूनही प्रयोग कमीत कमी कालावधीत सादर केले जात आहेत...आजूनही ती धग रसिकांच्या मनात आहे..तिचे जतन करत कीर्ती शिलेदार आणि त्यांची संगीत संस्था करीत आहे..




त्यांच्या यशामागे कष्टाची परंपरा आहे...गुरुंचे मार्गदर्शन आहे...रसिकांची पावती आहे आणि आई-वडिलांची पुण्याई आहे..
स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, शाकुंतल, एकच प्याला, विद्याहरण, स्वरसम्राज्ञी, सौभद्र किती नावे घ्यावीत तेवढया नाटकात त्यांच्या भूमिका आहेत...शिवाय नाट्यसंगीत ऐकणारा चाहता वर्गही निर्माण झाला आहे...
परंपरेची जोपासना यापुढेही उत्तम घडावी हिच नटेश्वरापाशी इच्छा..




सुभाष इनामदार ,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, August 17, 2012

एक रविवार एक चित्रकार- रवीमुकुल

' एक रविवार एक चित्रकार ' चा पहिला रविवार प्रसिद्ध चित्रकार रवीमुकुल यांच्या सोबत....


' अक्षर मानव ' च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'एक रविवार एक चित्रकार ' या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दर रविवारी एक नवा आणि नामवंत चित्रकार आपल्या शैलीबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधेल, काही प्रात्याक्षिके चित्रकार करून दाखवेल आणि विद्यार्थाकडूनही करून घेईल. हा उपक्रम सलग सात रविवार चालणार आहे.

या उपक्रमाला १९ ऑगस्टच्या रविवार पासून सुरुवात होत आहे.

पहिल्या रविवारी प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल हे मुलांमध्ये मिसळून चित्रकलेबद्दल संवाद साधतील. मुलांनी घरून आणलेला डबा सुद्धा ते खातील. अतिशय खेळीमेळीच्या आणि मोकळ्या वातावरणात मुलांना चित्रकलेचा निखळ आनंद देणारा हा उपक्रम आहे. चारुहास पंडित, मेहबूब शेख, ल. म. कडू, देविदास पेशवे, अनिल उपळेकर, गिरीश सहस्त्रबुद्धे हे नामवंत चित्रकार अनुक्रमे २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर, ९ सप्टेंबर, १६ सप्टेंबर, २३ सप्टेंबर, ३० सप्टेंबर आणि ७ ऑक्टोबर या उपक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. आठव्या रविवारी मुलांची चित्रकलेची स्पर्धा घेतली जाईल आणि उत्कृष्ट चित्रकारांना पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

रविमुकुल यांच्याविषयी -


मुखपृष्ठांच्या कामाचं डॉक्युमेंटेशन हा प्रकार आपल्याकडे नाहीच. मी स्वतः त्यासाठी एक थोडासा प्रयत्न करतो आहे. स्लाइड्सच्या माध्यमातून मुखपृष्ठनिर्मितीची माहिती देणारा, त्यातील आव्हानं सांगणारा मुखपृष्ठाची गोष्ट, हा कार्यक्रम मी सादर करत असतो. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. शिवाय यावर आधारित एक पुस्तकही मी लिहीत आहे. माझ्या मते तरी मराठीत हा असा पहिलाच प्रयत्न असावा. मुखपृष्ठ काढणं हे एक आव्हान असतं आणि दर वेळी त्यात काही तरी नवीन शिकण्याची संधी मिळते असं मला वाटतं. मुखपृष्ठ काढण्याआधी पुस्तक वाचायलाच हवं ते वाचलं की आपल्या मनात त्याची एक प्रतिमा तयार होते. ज्यात आपले तसेच लेखकाचे अनुभव मिसळले जातात व यातून एक चांगलं मुखपृष्ठ तयार होतं. प्रत्येक मुखपृष्ठामागे एक गोष्ट असते. कुमार सप्तर्षी यांच्या ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकासाठी मुखपृष्ठ तयार करण्याचं काम जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा ते तयार करण्याआधी मी मुद्दाम येरवडा तुरुंगातील राजकीय कैद्यांच्या कोठड्या पहायला गेलो होतो. त्यामुळे मला नेमकं काय करायचं आहे याची जाणीव आली. अशाच वेगवेगळ्या प्रक्रियेतून हे मुखपृष्ठ तयार होत असतं. या कलेला अनुल्लेखाने मारणं थांबवायला हवं.

रविमुकुल हे नामवंत मुखपृष्ठकार, ग्रंथ सजावटकार, क्यालीग्राफर, छायाचित्रकार आहेत. आजपर्यंत त्यांनी जवळपास ३००० पुस्तकांची मुखपृष्ठे केलेली आहेत. 'मुखपृष्ठाची गोष्ट' हा दीड तासाचा कार्यक्रमही ते सदर करतात.



स्थळ : श्री शिवाजी मराठा संस्थेचे जिजामाता मुलींचे हायस्कूल , ४२५ शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरीच्या समोरची गल्ली, शिवाजी रस्त्याजवळ,
पुणे - ४११००२
दिनांक : रविवार, १९ ऑगस्ट २०१२
वेळ : सकाळी १० ते १


------

हेतू काय ?

या उपक्रमाला पुण्यातील शाळा, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील विविध शाळांमधील ९ ते १५ या वयोगटातील १०० विद्यार्थ्यांची निवड यासाठी करण्यात आली आहे.
दर रविवारी चित्रकार नवे असतील विद्यार्थी मात्र तेच असतील. मुलांमध्ये चित्रकला या विषयाची आस्था वाढावी, त्यांच्यातील चित्रकाराला चालना मिळावी, चित्रकलेची समाज वाढावी, चित्रकलेचा व्यावसायिक उपयोग त्यांना कळावा आणि चित्रकलेचा सलग संस्कार मुलांवर व्हावा, हा हेतू यामागे आहे.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात आलेले नाही.

-------

Tuesday, July 31, 2012

सन्मानाचा आनंद

संगीतकार आनंद मोडक यांनी स्वतः फेसबुकवर आपल्या पुरस्काराच्या निमित्ताने माहिती दिली आहे...त्यांच्या शब्दात काहीही बदल न करता ती माझ्या या ब्लॉगमधून देत आहे...संगीतकार आनंद मोडक यासाठी माझ्यावर रागविणार नाहीत याची खात्री आहे..

सुभाष इनामदार, पुणे





मित्रानो ,मला तुमच्याबरोबर माझ्या होणा-या सन्मानाचा आनंद वाटून घेताना खूप chhaan वाटतंय..अखिल भारतीयमराठी नाट्यपरिषद पिंपरीचिंचवड शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त
शनिवार दिनांक ११ ऑगस्ट २०१२ रोजी संध्याकाळी ५ वाजता रामकृष्ण मोरे नाट्य गृह ,चिंचवड ,पुणेयेथे संपन्न होणाऱ्या सोहळ्यात कै.बालगंधर्व स्मृती पुरस्कार माझ्या मराठी रंगभूमीवरील अमूल्य आणि अभ्यासू कार्याबद्दल मला प्रदान केला जातोय..



घाशीराम कोतवाल या नाटकापासून सुरु झालेल्या आधुनिक संगीत रंगभूमीच्या प्रवासात घाशीराम कोतवाल या नाटकात सहभागी झालेला रंगकर्मी इथपासून माझा प्रवास सुरु झाला तो महानिर्वाण ( लेखक-सतीश आळेकर ) या नाटकाचा संगीतकार म्हणून माझं पदार्पण झालं..

त्यानंतर बदकांचे गुपित ( लेखक - बा सी मर्ढेकर ) ,तीन पैश्याचा तमाशा ( लेखक- पु.ल.देशपांडे ) , मृगया ( लेखक- राजन मोहाडीकर ) , फिल्लम स्टुडिओ मुंबाय ( लेखक- राजन मोहाडीकर ) ,
पडघम ( लेखक- अरुण साधू ) , विठ्ठला ( लेखक- विजय तेंडूलकर )
तुमचे अमुचे गाणे ( लेखक- रत्नाकर मतकरी ) , अफलातून ( लेखक-विक्रम भागवत ) , संगीत म्युन्सिपालीटी ( लेखक- माधवराव जोशी ) अलीबाबाची हीच गुहा ( लेखक- दिलीप वि. चित्रे ) जळळी तुझी प्रीत ( लेखक - अभिराम भडकमकर ) , मदन भूल ( लेखक- प्रदीप ओक )
अशा १३ संगीतमय नाटका करीता मी शेकड्यांनी गाणी आणि पार्श्वसंगीत हि स्वरबद्ध केले.

तर शांतीदूत ( संहिता-वसंत बापट ) ,लीलावती ( संहिता -झेलम परांजपे ) , प्रीत गौरीगिरीशम ( लेखक- कृ. रा. अर्जुनवाडकर ), मेघदूत ( कुसुमाग्रजांच्या मराठी काव्यानुवादावर आधारित संहिता लेखक -
सदानंद डबीर ) या नृत्य नाट्याना संगीत दिलं... चंद्रकांत काळ्यांच्या शब्दवेध या संस्थेकरिता अमृतगाथा (१९८८), प्रीतरंग(१९९२) साजणवेळा(१९९७), शेवंतीच बन (२००२) आणि आख्यान तुकोबाराय ( २००४)
असे मराठी साहित्यातल्या विविध विशुद्ध कवितेच्या वाचिक अभिनयातून गद्द्यआणि गाण्याच्या रूपातील रंगमंचीय अविष्काराकरिता संगीतकार म्हणून योगदान दिले...



या सगळ्या कामाचे स्मरण " अमूल्य आणि अभ्यासू कार्याबद्दल " या उल्लेखामुळे मला झाले. अन्यथा एरवी हे माझ्या स्मरणात हि नसते...किंबहुना मी - स्वत: काही मिळवलेच नाही तर गमावणार काय- अशा विचार सरणीने येणारी प्रत्येक संधी पहिलीच समजून स्वत: ला नव्याने सिद्ध केले पाहिजे या एकमेव जिद्दीने त्या आव्हानाला सामोरा जातो...कधी फसलो हि असेन...पण त्यातून हि शिकण्याची वृत्तीच मला पुढे पुढे नव्या जोमानं काम करायला प्रेरणा देत असावीसे वाटते...शेवटच्या श्वासापर्यंत माझं हे विद्द्यार्थीपण अक्षय राहो अशा शुभेच्छा तुम्ही सर्वांनी मला द्याव्यात ही विनंती...

Friday, July 27, 2012

`शिवरायांचे आठवावे रुप`

महाराष्ट्राच्या मातीचा गंध म्हणजे मावळा गडी. महाराष्ट्राच्या भूमिचा कर्ताकरविता म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. कोणत्याही भूमिकेतून त्यांचे जीवन दर्शन घडविले तरीही ते तेवढेच रोमहर्षक आणि मनात शौर्य निर्माण होते. असाच काहीसा एक आविष्कार नव्याने पुण्याच्या भरत नाट्य संशोधन मंदिर निर्मित `शिवरायांचे आठवावे रुप` यातून झाला आहे. हृषिकेश परांजपे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले काही प्रसंग रेखाटून त्याला पोवाडे आणि त्यांची स्फूर्तीगाथा सांगणारे लोकसंगीताचे प्रकार वापरून आपल्या लेखनातून शब्दरुपात मांडले आहेत.


इतिहासात नोंदल्या गेलेल्या प्रमुख घटनांपैकी कांहीचा ओझरता उल्लेख निवेदनात करुन आणि काही प्रसंगांची गाथा पोवाड्याच्या माध्यमातून दाखवून मोजक्या प्रसंगातून हे शिवराय इथे दिसू लागतात.

लोकसंगीतातून पुढे नेणारी ही एक वेगळी कथाकथन शैली असल्याचे मला वाटते..त्याला नाटक म्हणणे योग्य नाही. कधी प्रसंग प्रत्यक्ष सादर होतात..कधी निवेदन ऐकू येते..तर कधी मागच्या स्क्रीनवर विविध चित्रे दिसतात...कधी गोंधळी तर कधी शाहीर डफावर थाप मारून शिवाजीराजांची मर्दुमकी वर्णन करतात..

लेखकाने आधी सांगीतल्याप्रमाणे हा शिवाजीमहारांच्या कारकीर्दीचा इतिहास नाही...तर त्या घटनांच्या आधारे चितारलेले प्रसंग होत...खरयं..


भरतच्या या प्रसंगनाट्य दर्शनातून जे दिसते..ते फारसे परिणामकारक नाही..त्याची मालिका मधुनच लोकसंगीताच्या आणि इतर तांत्रिक कारणांनी खंडीत होते.. एक शिवाजीच्या भूमिकेतले दिपक रेगे आणि काही प्रमाणात मंजूषा जोशी हे कलावंत सोडले तर इतरजण पोशाखात दिसतात..पण त्यांच्या परिणाम दिसत नाही. जीजाऊंच्या भूमिकेत नटल्या आहेत लीना गोगटे ठिक पण त्यांचा आवाज, भाषा बोलण्याची पध्दत सारे काही कोकणस्थी..त्यात ठसका..मराठमोळेपणा नाही...त्यांच्या वावरण्यात आणि कधी कधी बोलण्यातही कृत्रिमता जाणवते.

दिग्दर्शक संजय डोळे यांनी हे सारे प्रसंग नाट्य उभे केले आहे..स्वतः एका प्रसंगात जिवा महाला बनून शिवाजीच्या वेशात पहताना अधिक बरे वाटते.
.
नेपथ्य, संगीत (अशोक काळे), वेशभूषा आणि मेकअप सा-यामुळे शिवराय आठवला सहज जातो..पण तो काही काळानंतर मनात रेंगाळत नाही..पुसटसा..अंधुकसा होत विरुन जातो..




-सुभाष इनामदार,पुणे

आनंद तरंग

गेली अठरा वर्षे `ललकार` या ध्वनीक्षेपक कंपनीचे कै. नानासाहेब आपटे व कै. कमलाबाई आपटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे कुटुंबिय त्यांची स्मृती जपतात ती एखाद्या कलाकारांच्या मैफलीतून . पुण्यातल्या अनेक कार्यक्रमांना उत्तम ध्वनीक्षपकाची व्यवस्था पाहणारी ललकार ही संस्था होती आज तिचे अस्तित्व फक्त जपले जात आहे.....आपटे यांची मुले यांनी तो व्यवसाय पुढे कायम ठेवला नाही..ते अन्य ठिकाणी कार्यरत झाले. पण वडीलांच्या ललकारची तुतारी दरवर्षी ते अशा पध्दतीने ऐकवत असतात.




यावर्षी आनंदगंधर्व नावाने सुपरिचित असलेला बालगंधर्व या चित्रपटाने नाट्यसंगीतात स्वतःचा ठसा उमटविणारा तरुण गायक आनंद भाटे यांची सायंकालीन मैफल आपटे कुटुंबीयानी २१ जुलै ला भरत नाट्य मंदीरात आयोजित करुन हाच संगीताचा आनंद आपल्या नातेवाईकांत आणि रसिकांमध्ये पसरविला...

सुरवातीला आनंद भाटे यांनी पूरिया धनाश्री रागातली `पार करो अरज सूनो` आणि त्यानंतर `पायलिया झंकार` या रसिकप्रिय बंदिशीने रसिकांना आपल्या शास्त्रीय संगीताच्या तयारीने खुश केले.

सौभद्र नाटकातील `कोण तुजसम सांग..`हे पद सादर करुन स्वरराज छोटा गंधर्वांची आठवण करुन दिली. या बहारदार पदानंतर मानापमान मधील `खरा तो प्रेमा,` `सौभद्र` मधील `वद जाऊ कुणाला शरण` ही पदे गाऊन बालगंधर्वांची आठवण करुन दिली.

सुधीर फडके यांच्या जंयतीनिमित्ताने गीतरामायणमधील `दशरथा घे हे पायसदान` हे गीतही भाटे यांनी अतिशय भाऊकतेचे दर्शन देत सादर केले. आपटे कुटुंबीयांशी बाबूजींचे घरोब्याचे संबंध असल्याने आणि बाबुजींच्या जाण्याला दहा वर्ष होत असल्याने या गीताचे महत्व जाणून रसिकांनीही तेवढीच मनसोक्त दाद दिली.

आनंद भाटे यांनी आपले गुरु भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना वंदन करण्यासाठी `माझे माहेर पंढरी` ही भक्तिरचना आणि त्यानंतर संत तुलसीदास नाटकातली `राम रंगी रंगले` ही रचना भावपूर्ण रितीने सादर करुन रसिकांना भक्तिरसात न्हाऊन काढले.


संगीत `कान्होपात्रा` नाटकातील `जोहार मायबाप जोहार` या अभंगाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.कार्यक्रमाची सांगता त्यांनी `बालगंधर्व` चित्रपटातल्या कौशल इनामदार यांनी संगीतबध्द केलेल्या `चिन्मया सकल ह्दया` या भैरवीने केली.

संपूर्ण कार्यक्रमात तबला साथ भरत कामत यांनी तर राजीव परांजपे यांनी हार्मोनियम आणि ऑर्गनची साथ केली...माऊली टाकळकर यांनी टाळाचा नाद देत अभंगांला उत्तम दर्जा प्राप्त करुन दिला. संपूर्ण कायर्क्रमाचे निवेदन सौ. शुभदा अभ्यंकर यांनी केले..

एकूणच रसिकांच्या मनात आनंद भाटे यांच्या कार्यक्रमाला जाण्य़ाचा जेवढा ध्यास होता..तेवढा सारा या गायनाच्या एक उत्तम मैफलीतून लाभला...एक सूरांचा लडीवाळ हार गुंफत रसिक तृप्त मनाने घरी परतले..


-रवीन्द्र आपटे, पुणे