subhash inamdar

subhash inamdar

Sunday, September 16, 2012

सूरांनी जोडलेली नाती वाढावित...

डॉ. प्रभा अत्रे


आज माझ्या नात्यातले कोणी नाही..पण सूरांनी जोडलेल्या नात्यातल्या मंडळींनी माझा वाढदिवस असा करावा याचा अधिक आनंद आहे..हीच नाती अधिक वाढावित हिच इच्छा...किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका स्वरप्रभा डॉ. प्रभा अत्रे यांनी शनिवारी टिळक स्मारक मंदिरात आपल्या भाषणाच्या आरंभी सांगितलेल्या दोन शब्दांनी सारे रसिक तर भारावलेच पण सारे साधक कृतार्थ पावले..

संगीतामुळे गुणी आणि ज्ञानी माणसांचा सहवास मिळाला. शाश्वरताची जाणीव आणि पूर्णत्वाकडे जाणारा मार्ग कधी न संपणारा असतो, याचे भानही संगीतानेच दिले. हा सांगीतिक प्रवास रसिकांच्या प्रेमामुळेच यशस्वी झाल्याची भावना ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली.


"गानवर्धन' संस्थेतर्फे त्यांचा ८१व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अतिशय भावमधूर आणि स्वरांच्या चाहत्या रसिकांच्या साक्षिने त्यांना जेव्हा मंत्रोच्चाराच्या गजरात सुवासिनींनी ओवाळले तेव्हा तो सोहळा पाहणा-या रसिकांचे मनही गहिवरुन गेले..

तुमच्या गाण्याने सरस्वतीच्या वीणेवरही रोमांच उभे राहतात ...अशा पवित्र स्वरांना आणि त्या स्वरप्रतिभेचा गौरव होताना पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे आम्ही सारे धन्य झालो. स्वर हा किराणा घराण्याचा ईश्वर होता आणि या ईश्व्राची आराधना करून रसिकांना आनंद देण्याचे काम डॉ. प्रभा अत्रे यांनी केल्याचे विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी म्हटले. शिवशाहिरांनी त्यांना अशाच गात रहा असा आशिर्वाद दिला. तर उल्हास पवार यांनी त्यांच्या सुरेल मैफलीचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याच्या आठवणी सांगितल्या..

सुचेता भिडे-चाफेकर यांनी धवल अशा फुलांच्या आणि मोजक्या शब्दातून प्रभाताईंना शुभेच्छा दिल्या. तात्यासाहेब नातू फौउंडेशनच्या वतीने शारंग नातू यांनी २५ हजार रुपयांचा चेक देऊन प्रभाताईंचा सन्मान केला.

गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष कृ. ग. धर्माधिकारी यांनी आपल्या संस्थेच्यावतीने शिवशाहिरांच्या हस्ते त्यांच्या आत्तापर्य़च्या सुरेल प्रवासाची साक्ष असणा-या शब्दातून सन्मानपत्र अर्पण केले..

सत्कार समारंभानंतर ख्यातनाम गायक उल्हास कशाळकार यांनी आपल्या सुरेल स्वरातून डॉ. प्रभा अत्रे यांना स्वरांची फुलेच अर्पण केली..त्यांच्या जोरदार तानांनी आणि नादमय बंदिशीतून मल्हार रागाच्या आलापीतून विविध छटांचे दर्शन घडले. दीड तासाच्या या मैफलीची साथही तशी उत्तम साथिदारांनी कमालीची रंगवीली. तबला साथ केली ती पं. सुरेश तळवलकर यांनी तर हार्मानियमची संगत डॉ. अरविंद थत्ते यांची होती...

स्वरातून बहरलेल्या मैफलीतून नादब्रम्हाची ती सुरेलता अवघ्या मंदिरात अखेरपर्यत निनादत होती..



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


(यातील सारी छाय़ाचित्रे आहेत नव्यानेच छायाचित्रांच्या व्यवसायात आलेल्या नचिकेत सुरेश जोग यांची..)




1 comment:

  1. beautifully written with your kind permission and by mentioning your name as a writer of this article am posting this on her Facebook page so that many people through out world can read this kindly have a look Admin of page- Dr Prabha Atre A living legend of Indian classical music on Facebook

    ReplyDelete