subhash inamdar

subhash inamdar

Friday, July 27, 2012

आनंद तरंग

गेली अठरा वर्षे `ललकार` या ध्वनीक्षेपक कंपनीचे कै. नानासाहेब आपटे व कै. कमलाबाई आपटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे कुटुंबिय त्यांची स्मृती जपतात ती एखाद्या कलाकारांच्या मैफलीतून . पुण्यातल्या अनेक कार्यक्रमांना उत्तम ध्वनीक्षपकाची व्यवस्था पाहणारी ललकार ही संस्था होती आज तिचे अस्तित्व फक्त जपले जात आहे.....आपटे यांची मुले यांनी तो व्यवसाय पुढे कायम ठेवला नाही..ते अन्य ठिकाणी कार्यरत झाले. पण वडीलांच्या ललकारची तुतारी दरवर्षी ते अशा पध्दतीने ऐकवत असतात.




यावर्षी आनंदगंधर्व नावाने सुपरिचित असलेला बालगंधर्व या चित्रपटाने नाट्यसंगीतात स्वतःचा ठसा उमटविणारा तरुण गायक आनंद भाटे यांची सायंकालीन मैफल आपटे कुटुंबीयानी २१ जुलै ला भरत नाट्य मंदीरात आयोजित करुन हाच संगीताचा आनंद आपल्या नातेवाईकांत आणि रसिकांमध्ये पसरविला...

सुरवातीला आनंद भाटे यांनी पूरिया धनाश्री रागातली `पार करो अरज सूनो` आणि त्यानंतर `पायलिया झंकार` या रसिकप्रिय बंदिशीने रसिकांना आपल्या शास्त्रीय संगीताच्या तयारीने खुश केले.

सौभद्र नाटकातील `कोण तुजसम सांग..`हे पद सादर करुन स्वरराज छोटा गंधर्वांची आठवण करुन दिली. या बहारदार पदानंतर मानापमान मधील `खरा तो प्रेमा,` `सौभद्र` मधील `वद जाऊ कुणाला शरण` ही पदे गाऊन बालगंधर्वांची आठवण करुन दिली.

सुधीर फडके यांच्या जंयतीनिमित्ताने गीतरामायणमधील `दशरथा घे हे पायसदान` हे गीतही भाटे यांनी अतिशय भाऊकतेचे दर्शन देत सादर केले. आपटे कुटुंबीयांशी बाबूजींचे घरोब्याचे संबंध असल्याने आणि बाबुजींच्या जाण्याला दहा वर्ष होत असल्याने या गीताचे महत्व जाणून रसिकांनीही तेवढीच मनसोक्त दाद दिली.

आनंद भाटे यांनी आपले गुरु भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना वंदन करण्यासाठी `माझे माहेर पंढरी` ही भक्तिरचना आणि त्यानंतर संत तुलसीदास नाटकातली `राम रंगी रंगले` ही रचना भावपूर्ण रितीने सादर करुन रसिकांना भक्तिरसात न्हाऊन काढले.


संगीत `कान्होपात्रा` नाटकातील `जोहार मायबाप जोहार` या अभंगाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.कार्यक्रमाची सांगता त्यांनी `बालगंधर्व` चित्रपटातल्या कौशल इनामदार यांनी संगीतबध्द केलेल्या `चिन्मया सकल ह्दया` या भैरवीने केली.

संपूर्ण कार्यक्रमात तबला साथ भरत कामत यांनी तर राजीव परांजपे यांनी हार्मोनियम आणि ऑर्गनची साथ केली...माऊली टाकळकर यांनी टाळाचा नाद देत अभंगांला उत्तम दर्जा प्राप्त करुन दिला. संपूर्ण कायर्क्रमाचे निवेदन सौ. शुभदा अभ्यंकर यांनी केले..

एकूणच रसिकांच्या मनात आनंद भाटे यांच्या कार्यक्रमाला जाण्य़ाचा जेवढा ध्यास होता..तेवढा सारा या गायनाच्या एक उत्तम मैफलीतून लाभला...एक सूरांचा लडीवाळ हार गुंफत रसिक तृप्त मनाने घरी परतले..


-रवीन्द्र आपटे, पुणे

No comments:

Post a Comment