subhash inamdar

subhash inamdar

Monday, April 11, 2011

ता-यांचे बेट..एक अनुभव

 कथा ही अशी आहे...
मुंबईच्या धकाधकीपासून दूर कोकणातल्या एका सुंदर पण दुर्गम खेड्यामध्ये एक कुटुंब मोठ्या मजेत राहतं आहे.

श्रीधर सुर्वे हा ग्रामपंचायतीत सेवक आहे आणि बायको, दोन मुलं आणि आईसोबत तो आपल्या छोट्याशा घरात मोठ्या आनंदाने राहत आहे. मुलगा ओंकार’ हा व्रात्य, अभ्यास न करणारा तर मुलगी मीरा हुशार आणि समजूतदार, आणि सुखा समाधानात संसार करणारी पत्नी इंदू असे हे सुखी कुटुंब आहे. गावातल्या गणपतीवर त्याची श्रद्धा आहे, दोस्तीचे नाते आहे.
लेले साहेब हे ग्रामसुधार मोहिमेवर आलेले सरकारी अधिकारी. त्यांच्या कामासाठी श्रीधरला अलीकडे सारखे मुंबईला जावे लागते.अशाच एका वारीला तो कुटुंबियांना आपल्याबरोबर मुंबईला नेण्याचा प्रस्ताव ठेवतो. मंडळी हरखून जातात. ओंकार मुंबईतल्या मौजेच्या स्वप्नांमध्ये रमून जातो.    
पण मुंबईमध्ये ओंकारच्या पदरी निराशाच पडते कारण मुंबईच्या ह्या लखलखत्या जगातल्या बहुतेक गोष्टी त्याच्या वडिलांना न परवडणाऱ्या असतात.अशातच ओंकारला एक टोलेजंग इमारत दिसते,आजीच्या गोष्टीतल्या राजमहालाची आठवण करून देणारी. ते एक फाइव्ह स्टार हॉटेल आहे. ओंकारची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो वडलांना हॉटेलमध्ये जाण्याचा आग्रह धरतो. असह्य होऊन इंदू हात उगारते. मंडळी गावी परततात.
ओंकारच्या वर्तनावर नाराज झालेला श्रीधर तू वर्गात पहिला येउन दाखव, मी तुला फाईव्हस्टार मधे राहायला घेऊन जाइन अशी लेकाबरोबर पैज लावतो.
ओंकार पेटून उठतो आणि दिवस रात्र अभ्यास करू लागतो आणि प्रकरण मजेदार होऊन जाते. मुलाच्या वर्तनाने सुरवातीला आश्चर्यचकित झालेला श्रीधर नंतर ओंकारच्या ध्यासाने पुरता घाबरून जातो. खरोखरीच मुलगा पैज जिंकला तर? अस्वस्थ श्रीधर गणपतीला मुलाला परीक्षेत दुसरे आणण्याचे साकडेसुद्धा घालतो.
फक्त एका रात्रीसाठीसुध्दा झगमगणारे ते पाच तारे ह्या छोट्या कुटुंबाला परवडणारे नाहीत.
एक बाप मुलाला दिलेला शब्द पाळण्यासाठी अहोरात्र धडपडू करू लागतो, नाना मार्ग शोधू पाहतो आणि मजेदार प्रसंगाची मालिकाच आकार घेउ लागते.
दूर लखलखणाऱ्या मुंबई बेटाच्या स्वप्नानी आपल्या छोट्या विश्वात सुख मानणाऱ्या त्या कुटुंबात मोठी खळबळ माजते.

.....आता थोडे चित्रपटाविषयी
पंचतंत्रात जसा बोध देण्यासाठी किंवा कसे वागावे याचे धडे गिरविण्यासाठी कथेतून पात्रे बोलत रहातात. आणि त्यासा-यांचा शेवट एक उपदेश ठळकपणे पसरविला जातो. तसाच काहीसा प्रकार ह्या सत्त्याप्रयोगात ता-यांचे बेट मध्ये अनुभवायला मिळतो. मुंलांसाठी बाप म्हणून आजकालचे पालक किती खुजेपण अनुभवतात याचा प्रत्ययही या चित्रपटात प्रतिबिंबीत झाला आहे. आजीने नातीला सांगितलेल्या गोष्टीतूनच कोकणाच्या पार्श्वभूमिवर चित्रपट तुमच्याशी आणि त्या गणपती बाप्पाशी गुजगोष्टी करतो. सचोटिने जगणा-या श्रीधर सुर्वे दारूच्या आहारी जातो. मुलाला दिलेल्या शब्दाला पूर्ण करण्यासाठी  लबाडीने पैसे कमवत रहातो. हे सारे मात्र त्या गणपतीच्या साक्षीने..कदाचित गणपती हे एका मनाचे प्रतिक असावे..कष्टाचे..जिद्दीचे फळ नक्की मिळते..ते यश भक्ताच्या झोळीत तो गजानन.. नक्कीच घालतो.
किरण यज्ञोपवित यांच्या दिग्दर्शनातून हे ता-यांचे बेट चमकले आहे. सचिन खेडेकर यांच्यासारखा सामान्यवर्गातला सत्शील माणूस कथेचा भार तोलून धरतो. त्याच्या भूमिकेत तो सहजपणे विरघळून जाताना पहाणे हे आनंदाचे काम रसिकांना करावे लागेल. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मुळे सामान्यांचा असामान्य प्रतिनिधी इथेही ही कथा सचिन घडवितो. कोकणाच्या निसर्गाने... त्यातल्या वस्तुंनी.. वातावरणातून...हे बेट सतत खुणावत रहाते.
त्याला माया आणि प्रसंगी कठोर धार देणारी इंदू ...अर्थात अश्विनी गिरी..
बोटीचे जीवन...मुंबापुरीतली चकाकणारी दुनिया..
मिळेल त्यात समाधान मानणारे कुटुंब.. मुलाशी लावलेल्या पैजेतून हादरून जाते... मग पैशाची दुनिया...भावनेला दुरावते..
सारेच चित्रपटात घडत रहाते.
चित्रिकरणात कोकणाचे वैभवशाली चित्रीकरण तर दिसतेच पण दिसते ...आजही जपून ठेवलेल्या त्या अस्सल परंपरेचे सालंकृत दर्शन. गावात नसेल पेशाची श्रीमंती. पण आहे वारसांनी कमावलेली संमृध्द परंपरा.  चित्ररूपाने दृष्यातून ते कोकण डोकावत रहाते.. ता-यांचे बेट..म्हणतानाच कोकणचे आणि मुंबईचे सांस्कृतीक नातेही कुठे तुटत चालल्याचे स्पष्ट दिसते.
कोकणातली माणसे आता कोकणीच बोलत नाहीत..तर ती बोलतात पुणेरी मराठीत..क्वचित आजीच्या आणि बायकोच्या हेलात कोकणी सूरावट आढळते. पण माणूसकीची नाळ मात्र आजही तुटलेली नाही याची प्रचिती आणि तिही....आजच्या परिस्थितीची जाणीव या चित्रपटात ...नव्हे... विमा एजंट बनलेल्या किशोर कदम.. सुपारी घेणारा व्यापारी.. भजनाला ढोलकी वाजविणारा..परिस्थितीने गायही विकायची परिस्थिती येणारा...गावचे..घराचे वैभवी अवशेष विकणारा..शशांक शेंड्ये.. सारेच..
उलट मुंबापुरीत हापिसातला शिपाईदेखील फाईल पुढे रेटण्यासाठी घेत असलेली लाच..शेअरच्या पैशात भावनेला न थारा देणारा विनय आपटे. सारखा..व्यावसायिक...पंचतारांकित हॉटेलात चकाचक शोभिवंत मखमली मूर्ती..आणि इखाद्या इसमाची पैशाची पिशवी परत देण्याची भावनेतून माणूसपणाची..चांगूलपणाची जाणीव.. सारेच.
कोकणातले प्रेम गणपतीवर भारी..त्यातच चित्रपटातला नायक त्या गणपतीच्या मूर्तीशी मनातला संवाद करतो..आपली व्यथा त्याच्यासमोर प्रकट करतो..आणि आपल्या मुलाला दुसरा क्रमांक मिळावा यासाठी गणपतीलाच साकडे घालतो...
सारेच..द्ष्य..अदृष्यात व्यक्त होणारे, किरण यज्ञोपवित या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने हा संस्कार जपणारा..जुन्या परंपरेत काहीसा नवे रसायन गुंफून बनविवेला एक भाबडा पण प्रामाणिक आविष्कार घडविला आहे. इथे चित्राची फ्रेमही बोलते आणि माणसेही. वातावरणही...
ऑल्ट एंटरटेनमेंट आणि नीरज पांडे प्रस्तुत फ्रायडे फिल्मवर्क्स निर्मित हा चित्रपट म्हणजे या सुट्टीत मुलांसह पालकांनी आवर्जून पहावा असा आहे...त्यात तशी करमणूक नसली तरी तुम्ही सहजी या कथेत स्वतःली गुंफत जाता..आणि पुढे त्यातलेच एक तुम्ही बनत रहाता.
सचिन खेडेकर, अश्विनी गीरी यांच्या अभिनयातून साकारले गेलेले.. मध्यमवर्गीयांचे प्रतिनीधी बनून...चित्र तुम्हाला भावत रहाते... कधी बोचते..तर कधी दाद देण्यास भाग पाडते.
इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर या मुलांनी यात खरंच धमाल केली आहे... ते हसवतात तसे थोडे नाचवतातही.
विनय आपटे, शशांक शेंड्ये, किशोर कदम, शुंभांगी जोशी यांच्या भूमिका थोड्या हटके झाल्या आहेत. क्रेडिट गोज टू अर्थात किरण ..
मराठीत मालगुडी डेज सारखा चित्रातून संस्कृती आणि परंपरेचे बीज सांगणारा ता-यांचे बेट....मला तरी वाटते...अवश्य पहा...पण मुलांना घेऊन...


सुभाष इनामदार, पुणे

9552596276



वसंत नाट्यवैभव

टी.व्ही मालिका, सिनेमे, क्रिकेट आणि अधुनिक विचारांच्या हवेत जगणा-या नवीन पिढीची कानेटकरांच्या कलाकृतींशी क्वचितच भेट झाली असेल.. आणि टी व्ही संस्कृती रूजण्यापूर्वी ज्यांनी कानेटकरांची नाटके आवडीने बघीतली असतील,,अशा सा-यांना वसंत नाट्यवैभव.....ही दुर्मिळ पुर्नभेटच ..सुखद अनुभव देउन गेली.
सुप्रसिध्द लेखक. नाटककार. वसंत कानेटकर..त्यांच्या कारकीर्दीची मागोवा घेणारा कार्यक्रम पुणे, मुंबई आणि नाशिकात वसंत नाट्यवैभव.. स्वरानंद या पुण्याच्या संस्थेमार्फत नुकताच सादर झाला. कानेटकरांच्या काही नाटकातील प्रवेश, काही परिचित. स्वतः कानेटकर व काही मान्यवरांच्या मुलाखतींच्या ध्वनिचित्रफितीतून ..नाट्यगीतांचे सादरीकरण आणि हे सर्व जोडणारे निवेदन..अशा स्वरूपाचा हा प्रयोगच..सादर झाला. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.
प्रेमा तुझा रंग कसा, मत्स्यगंधा आणि अखेरचा सवाल या नाटकातील प्रवेश..दिलिप वेंगुर्लेकर, रविंद्र खरे, अमृता सातभाई, राधिका देशपांडे, नेहा परांजपे, लिना गोगटे या कलाकारांनी ताकदीने सादर केले
 आणि त्यातून रसिकांना कानेटकरांच्या लेखणीची ताकद पुरपुर अनुभवता आली. इथे ओशाळला मृत्यू, आणि अश्रुंची झाली फुले या नाटकातले प्रभाकर पणशीकरांनी रंगविलेला आविष्कार ध्वनिचित्रफितीतून पाहिला. कानेटकर..पणशीकर..आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ऋणानुबंध लक्षात घेता, रघुनंदन पणशीकर यांचे प्रत्यक्ष नाट्यगीत गायन आणि शौनक अभिषेकी यांचे ध्वनिचित्रफीतून सादर झालेले नाट्यगीत गायन..हा ही एक सुंदर सुरेल योग इथे जुळून आला.
कानेटकरांच्या एकाहून एक सरस नाट्यकलाकृती, टीव्ही मालिकेसाठी लेखन, संगीत नाटके या प्रचंड लेखनाची आढावा तीन तासात आणि एका कार्यक्रमातून घेणे हे अवघड काम स्वरानंदने कौशल्याने केले. उत्तम संकलन व सादरीकरण यातून कार्यक्रमाला नेटकेपणा प्राप्त झाला.
संजीव मेहेंदळे आणि समृध्दी पानसे यांनी नटी-सूत्रधाराच्या रूपातून सूत्रे सांभाळली. हा सारा नाट्य-संगीताचा प्रवास वाहता ठेवण्यात या दोघांचे मोलाचे सहकार्य लाभले. संहिता लेखन शैला मुंकुद यांचे तर दिग्दर्शन अजित सातभाई यांचे होते. सर्वांच्या प्रयत्नातून एक वेगळ्या पध्दतीचा कार्यक्रम धावता का होईना सादर झाला...यातून कानेटकरांच्या आचाट बुध्दीसामर्थ्याचे दर्शन घडले.. उद्याच्या पिढीला...वसंत कानेटकर..एक यशस्वी नाटककार आणि शब्दांचा खेळ करणारे अचाट व्यक्तिमत्वाचा प्रत्यय आला.. हे ही नसे थोडके.

कविता टिकेकर,पुणे
Kavitatikekar@yahoo.com

Friday, April 8, 2011

कला रामनाथ- रसिकांची पसंती

कला रामनाथ आणि राहुल देशपांडे यांचा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ़ गांधीभवननी आयोजित केला आहे. संगीत रसिकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे १३ एप्रिल रोजी हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ९.३० वाजता होणार आहे...

त्या निमित्ताने कला रामनाथ यांची ही ओळख


संगीतरचनाकार मोझार्ट बरोबर ज्यांची तुलना केली जाते अशा कला रामनाथ या त्यांच्या तरल आणि संवेदनशील वादनाबद्दल प्रसिध्द आहेत.  कला रामनाथ यांना संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांच्या सात पिढ्या संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत.

 कलाजींचे पूर्वज केरळमधल्या त्रावणकोर दरबारात गायक होते. कलाजींच्या आधीच्या दोन पिढ्या गायनाबरोबर व्हायोलिन वादन ही करत. त्यामुळे लहानपणीच कलाजींना व्हायोलिन दिले गेले. वयाच्या अडीच वर्षापासून त्यांनी व्हायोलिन वादनाला सुरुवात केली. सुरुवातीचे धडे आजोबा विद्वान नारायण अय्यर यांनी दिले. त्यानंतर आत्या एन.राजम यांच्या तालमीत त्या तयार झाल्या. आजोबा आणि आत्या यांनी व्हायोलिन वादनाचे तंत्र उत्तम तयार करुन घेतले.

 त्यानंतर संगीतमार्तंड पं. जसराज यांच्याकडे त्यांनी पंधरा वर्षे मार्गदर्शन घेतले आणि त्यांच्यातला कलाकार खऱ्या अर्थाने फ़ुलू लागला. गायकी अंगाची संवेदनशीलता त्यांच्या वादनात आली. गायकी अंगाने वादन करण्यासाठी त्यांनी वादनाच्या तंत्रात योग्य ते बदल केले आणि ते गायकीच्या इतके जवळ नेऊन ठेवले की त्यांचे व्हायोलिन गाणारे व्हायोलिन म्हणून ओळखले जाऊ लागले. कलाजींच्या मते आजोबांनी अतिशय कडक शिस्तीत वादनाचे तंत्र आत्मसात करवून घेतले होते त्यामुळेच त्यांना वादनात प्रयोग करता आले.
पूर्वी रावणहट्टा नावाचे वाद्य भारतात प्रचलित होते. त्या वाद्याचा फ़िंगरबोर्ड २२ इंच लांब होता आणि हे बो च्या सहाय्याने वाजविले जायचे. त्यावर तीन ऑक्टेव्हज वाजवता येत. हे वाद्य व्हायोलिन चे जनक मानले जाते. सहाव्या शतकात अरब व्यापारासाठी भारतात आले.त्यांच्याबरोबर हे वाद्य पर्शिया मध्ये गेले. तिथे त्याचे रबाब मध्ये रुपांतर झाले. पुढे दहाव्या शतकात रबाब स्पेन मध्ये गेले आणि व्हायोल झाले. हे व्हायोल युरोपात व्हायोलिन झाले आणि सतराव्या शतकात भारतात परत आले.
हे परदेशी वाद्य असूनही भारतीय संगीतात उत्तम रुळले आहे. परदेशातल्या रसिकांना देखील व्हायोलिनवर भारतीय संगीत ऎकायला खूप आवडते. त्यांना भारतीय संगीतात व्हायोलिन इतके सुंदर कसे वाजते याचे नवल वाटते.त्याचप्रमाणे त्यांना व्हायोलिनची भारतीय बैठकही आवडते कारण यामध्ये मानेला त्रास होत नाही.
जगभरातल्या रसिकांना सांगितीक अनुभूती देता येणं ही एक दैवी देणगी आहे असे कलाजी मानतात.अतिशय सफ़ाईदार आणि तंत्रशुध्द पध्दतीने फ़िरणारा बो आणि बोटे, लयीच्या विविध प्रकारांवर असलेले प्रभुत्व, शुध्द आणि प्रभावी सूर यामुळे कलाजींचे वादन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. वैचारीक आणि तंत्रशुध्द वादनाला असलेली संवेदनशीलतेची बैठक हे त्यांच्या वादनाचे वैशिष्ठ मानावे लागेल. इतर घराण्यांकडे आणि विविध संगीतप्रकारांकडे बघण्याचा मोकळा दृष्टिकोन हा त्यांच्यातील अभिव्यक्तीला पूरक ठरला असे त्यांना वाटते.
भारतातल्या सगळ्या महत्वाच्या संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी आपली कला सादर केली आहे. शंकरलाल महोत्सव (दिल्ली), तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सप्तक (अहमदाबाद), पं. मोतीराम आणि पं. मणिराम कॉन्फ़रन्स (हैदराबाद), स्पिरीट ऑफ़ युनिटी कॉन्सर्ट (दिल्ली), स्वामी हरीदास संगीत समारोह(मथुरा), बाबा हरवल्लभ संगीत समारोह (जालंधर), उस्ताद अमीरखान संगीत समारोह (भोपाळ), सवाई गंधर्व संगीत समारोह (पुणे), संकटमोचन संगीत समारोह (वाराणसी), गुणीदास संगीत संम्मेलन (मुंबई, दिल्ली, बंगलोर)
अनेक देशात त्यांनी आपली कला सादर केली आहे.
अमेरीका,कॅनडा, युके, जर्मनी, स्विट्झर्लंड, नेदरलॅंड्स, इटली, फ़्रान्स, बेल्जियम, ग्रीस, रशिया, साऊथ आफ़्रिका, सेशैल्स, मिडल ईस्ट, त्रिनिदाद, केनिया, टांझानिया, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, बांगलादेश, मॉरिशस आदि देशांचे दौरे केले आहेत.
कला रामनाथ यांची शैक्षणिक कारकीर्द ही उत्तम आहे. रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या त्या उत्तम श्रेणीच्या कलाकार आहेत. २००८ मध्ये त्यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात पं. जसराज पुरस्कार, सूररत्न आणि सूर मणी हे विशेष उल्लेखनीय.
कला रामनाथ यांना जगभरातल्या रसिकांची तसेच समीक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. त्यांनी परदेशातल्या अनेक महोत्सवांमध्ये तसेच जगभरातल्या अनेक संगीतज्ञांबरोबर मैफ़िली गाजविल्या आहेत. हॉलिवूड्च्या संगीतकारांबरोबर ही त्यांनी काम केले आहे..

पं.संजीव अभ्यंकर तसेच पूरबन चॅटर्जी यांच्याबरोबर जुगलबंदीचे कार्यक्रमही अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक सीडीज आणि कॅसेट्स रसिकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

गौरी शिकारपुर ,पुणे

 geetgauri@gmail.com

Thursday, March 31, 2011

तीन दशकांची समाधानपूर्ती ..झलक,पुणे


महाविद्यालयामधून बाहेर पडल्यानंतर स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या तीव्र उर्मीतून झलक,पुणे या संस्थेची स्थापना झाली..आता त्याला तीन दशके झाली आहेत.

रसिका तुझ्याचसाठी.. गंगाधर महांबरे यांच्या शिर्षक गीताच्या नावाने संस्थेने पहिला कार्यक्रम झाला..आणि झलकची झलक रसिकांच्या टाळीला पसंत पडली. मौखिक परंपरेतील पारंपारिक गीते आणि अघुनिक गीते सादर करणे हा उद्देश..
झलकला आपल्या मातीतला आणि मनातला हा बहुश्रृततेचा धागा. परंपरेतील समृध्द वारसा या कार्यक्रमातून जपणे हे जास्त मोलाचे वाटले. ते त्यांनी तीन दशके सुरू ठेवले.


इलेक्ट्रॉनिक वाद्ये आणि इंटरनेटच्या युगातही प्रेक्षागृहातले रसिक आणि कलाकार एकमेकांसमोर असताना तालवाद्ये जुळविली जातात. सूर-लय-तालाच्या लडी उलगडल्या जातात. आणि बघता बघता त्या सर्वांचे अद्वैत तयार होते. झलक त्या सांगेतिक अनुभूतीचा परिणाम देण्यासाठी आजही सज्ज असते...पुढेही राहणार आहे.

मागच्या तीन दशकांमध्ये अनेक ज्येष्ठ कलाकारांबरोबरच सुधीर फडके, राम कदम, शांताबाई शेळके, प्रभाकर जोग, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे, प्रशांत दामले, सुधीर गाडगीळ, आशा भोसले, किशोरी आमोणकर यांनी झलकच्या स्वरमंचावर येवून कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.

स्वा. सावरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या प्रचलित व अप्रचलित गीतांचा सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेतून रंगत गेला. आज झलकचे तोच चंद्रमा, सूर तेची छेडिता, मधुघट, इंद्रधनू, गा मेरे मन, सारखे वेगळे कार्यक्रम रसिकांच्या पसंतीला उतरले आहेत. तर पावसाची गाणी आणि मन उधाण वा-याचे सारखे वेगळे कार्यक्रम आजही स्मरतात. २५०० प्रयोगांची या सा-या प्रयोगांची संख्या होईल.


पुण्यात स्थापन झालेली कलाकारांची ही संस्था गेली तीन दशके एकविचाराने, अभंगपणे आमि आपल्या भूमिकेशी ठाम पाहून आजही काम करत आहे....याचे श्रेय झलक परवारात सामिल झालेल्या विविध कलावंतांना तर जातेच पण त्याही पेक्षा अधिक जाते ते... अविनाश वैजापूरकरांच्या संघटनाकौशल्याकडे. यासा-यांना म्हणजे कलाकार आणि रसिक यांना बांधणारा सेतू निवेदनातून साधला तो उपेंद्र खरे यांनी....

झलकची ही तीन दशकांची तपपूर्ती साजरी झाली तीही आगळ्या पध्दतीने...
आता ज्येष्ठ म्हटले पाहिजे.. ते सुधिर गाडगीळ यांच्या साठीच्या निमित्ताने त्यांना मानपत्र देउन...तर प्रमुख उपस्थितीत विक्रम गोखले झलकच्या कलावंतांना अधिक सुरात गा असा सुरात गा हा सल्ला द्यायला विरसले नाहीत.


तीन दिवसांच्या ह्या सोहळ्याला पुणेकरांची दाद ही उपस्थितीने तर मिळालीच. पण ती गीतांना टाळ्यांनी साद घालून.

कितीही जमाना बदलला तरी त्या दिवसांची आठवण देणारे असे कार्यक्रमच संस्कृती टिकवून ठेवते.. गेलेले दिवस परत स्मरणात रहातात... ते पुढच्या पिढीपर्यंत पोचविते हे निश्चित....

( लेखातील सर्व छायाचित्रे शेखर डेरे यांनी काढली आहेत )

सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com
Mob- 9552596276

http://subhashinamdar.blogspot.com/2011/03/blog-post_29.html?spref=fb

Wednesday, March 23, 2011

संजीव अभ्यंकर-रसभरीत गाणं

पुण्यात आयोजित करण्यात आलेली रविवार दि. १३ मार्चची `सुरेल सभा` खर्‍या अर्थाने रसिकांसाठी आनंदाचा ठेवा ठरली. पं. संजीव अभ्यंकर यांनी रात्रीच्या रागांचे स्वरूप त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण शैलीत उलगडून दाखवित केलेल्या सुरांच्या वर्षावात श्रोते चिंब झाले. 


मैफिलीची सुरूवात 'पुराना चंद्रकंस' या रागातील "ए पिया बिन" या बडा ख्यालाने झाली व त्यानंतर मैफिलीत उत्तरोत्तर रंग भरत गेला. पुढे 'बिहागडा' रागातील मध्य लयीतील "आली री अलबेली" ही बंदिश त्यांनी सादर केली. या बंदिशीतील स्थायी व अंतरा हे दोन्ही वेगळ्या तालात बांधलेले होते. स्थायी त्रितालात तर अंतरा एकतालात बद्ध होता. हा वैविध्यपूर्ण अविष्कार श्रोत्यांची मने जिंकून गेला. मध्यंतराआधी नगध्वनी कानडा आणि नायकी कानडा यांच्या सुरेल मिलाफातून त्यांनी या दोन्ही रागांचे अंतरंग स्पष्ट केले.

मध्यंतरानंतर प्रचलित 'चंद्रकंस' रागातील स्वरचित तराणा पंडीतजींनी रसिकांपुढे मांडला व त्यास रसिकांनी उत्स्फुर्त दाद दिली. 'कलावती' रागातील "जा री जा री छिप जा सखी री" या द्रुत बंदिशीनंतर त्यांनी एकनाथ महाराजांची गवळण सादर केली आणि सिंध भैरवीतील अभंगाने सांगता करीत त्यांनी या मैफिलीस कळस चढविला.

रागसादरीकरणासोबतच पंडीतजींनी श्रोत्यांशी केलेला संवाद या मैफिलीत विशेष ठरला. पंडीतजींची रसिकांपर्यंत सदैव काहीतरी नाविन्यपूर्ण पोचवण्याची आस आणि तळमळ त्यांच्या शब्दांतून जाणवत होती. बोलतांना ते म्हणाले, कुठल्याही वैमानिकाला विमान स्वत:च्या बळावर इष्ट स्थळी नेण्याची इच्छा असते. विमानाने वैमानिकास नव्हे तर वैमानिकाने विमानास वश केले पाहिजे. तसेच कधीतरी, गात असता, गळा बुद्धीवर मात करून जातो. पण बुद्धीला जे हवं ते गळ्यातून बाहेर निघणं हे खरं अवघड काम! गाणं अनवट आणि बुद्धीप्रधान असूनही ते लोकांपर्यंत सहजतेने पोचले पाहिजे. त्यातील रस, रंग अबाधित राहीला पाहीजे यातच खरे कसब!

पंडीतजींच्या आवाजातील गोडवा, स्वरांचा लगाव आणि सुरांतील सच्चेपणा, अत्यंत गुंतागुंतीची तानप्रक्रिया पण संगीत अभ्यासकापासून ते सामान्य श्रोत्यापर्यंत ते तितक्याच सुरसतेने कळेल असं रसभरीत गाणं यामुळे ही मैफल श्रोत्यांच्या चिरस्मरणात राहील याबाबत शंका नाही.

केदार केसकर

Monday, March 21, 2011

हास्यगंगेची 'मिरासदारी'


आदिमानवापासून ते ' आयटी ' च्या लाटेवर ऐटीत जगणाऱ्या आधुनिक मानवापर्यंत स्वभाववैशिष्ट्ये , गुण - दोषांवर बोट ठेवत केलेले व्यंग कायमच मामिर्क विनोदाचे उगमस्थान ठरते . आणि अशा विनोदामधून निर्माण झालेली हास्यगंगा कधीही आटत नाही ...

... कधी गावाकडच्या चावडीवर , देवळातल्या पारावरच्या गप्पांमधून , तर कधी विडंबन , उपहास , अतिशयोक्ती या अस्त्रांचा वापर करीत पोट धरून हसण्यास लावणारे . मा . मिरासदार ' मटा ' शी संवाद साधत होते .

निमित्त आहे त्यांच्या अठरा पुस्तकांच्या पुनर्प्रकाशनाचे . ' दमां ' च्या गाजलेल्या अठरा पुस्तकांचा संच मेहता प्रकाशनतफेर् आज ( सोमवारी ) रसिकांसमोर आणला जात आहे . वगनाट्यापासून ते विनोदी कथासंग्रहांपर्यंत विविध प्रकारातील पुस्तकांचा इरसाल पात्रांचा ग्रामीण शैलीतून मागोवा घेणाऱ्या ' दमां ' च्या गंमतगोष्टी , गुदगुल्या , चकाट्या , चुटक्याच्या गोष्टी , माझ्या बापाची पेंड , गावरान मेवा , विरंगुळा , नावेतील तीन प्रवासी , माकडमेवा , भोकरवाडीत अशा लोकप्रिय पुस्तकांचा यात समावेश आहे . सर्वच पुस्तके नव्या पद्धतीने प्रकाशित करण्यात आली असून यातील काहींसाठी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि . . फडणीस यांनी मुखपृष्ठेही काढली आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशनातफेर् हा संच प्रकाशित करण्यात येणार आहे .

अजूनही तुमचा विनोद हसवणार का , असे विचारता ' दमा ' उत्तरादाखल खळाळून हसतात आणि सांगतात , ' चांगले साहित्य , विनोदनिमिर्तीला काळाची बंधने नसतात . त्यामधील मामिर्कता जोपर्यंत कायम आहे , तोपर्यंत तो खुलविणारा ठरतो . कॉलेजमध्ये प्राध्यापकी करताना हाच अनुभव घ्यायचो . पिढ्या , त्यांची भाषा बदलली , विनोद व्यक्त करण्याच्या तऱ्हा बदलल्या , तरी मामिर्कता कायम असेल , तर विनोदातील हास्याला पिढ्यांची कुंपणे राहात नाहीत .'

' शब्दनिष्ठतेसह इतर कोणत्याही विनोदाला काही मर्यादा पडते . अत्र्यांसारख्या भन्नाट व्यक्तिमत्त्वाचा झेंडूची फुलेमधील विनोद सध्याच्या पिढीला उमगत नाही . कारण , ते कशाचे विडंबन आहे , हेच त्यांना कळत नाही . याउलट मानवी स्वभाववैशिष्ट्यांवर आधारित विनोद काळाच्या कसोटीपलिकडे जातो . कारण , अगदी आदिमानवापासून अतिप्रगत यंत्रमानवापर्यंत स्वभावविशेष हे कायमच राहतात . माझ्या पुस्तकांमधून हीच स्वभाववैशिष्ट्ये , गुण - दोष टिपण्याचा प्रयत्न केला . त्यामुळे सध्याची पिढीसुद्धा माझ्या विनोदाला तुफान दाद देते ,' असेही ' दमा ' स्पष्ट करतात .

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7750256.cms

Friday, March 18, 2011

पंच्याहत्तरीची सुरेल वाटचाल !

पं. भालचंद्र दामोदर देव
`व्हायोलिन` या वाद्याला `आंधळं वाद्य` असे म्हणतात, कारण त्यावर स्वरांची बोटे बरोबर पडण्यासाठी पडदे किंवा पट्ट्या काहीच नसते. केवळ वादनातल्या कौशल्यामुळेच अचूक स्वर साधता येतात. अशा या अवघड वाद्याबरोबरचा  सुरेल प्रवास करणारे ज्येष्ठ व्हायोलिन वादक ,माझे वडील आणि गुरूही.
 श्री. भालचंद्र देव. परिचितांचे `नाना` २ एप्रिल २०११ रोजी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करीत आहेत. त्यांच्या आयुष्याचा हा थोडक्यात घेतलेला धावता आढावा.....


नानांचा जन्म मुंबईचा. माझे आजोबा दामोदर चिंतामण देव, हे नोकरीनिमित्त मुंबईत आले होते. ते म्युनसिपाल्टीच्या शाळेत संगीत शिकवित असत. ते गाण्याबरोबरच हार्मोनियमही वाजवित असत. प्रसिध्द व्हायोलिनवादक पं. गजाननबुवा जोशी यांचे वडील पं. अनंत मनोहर जोशी यांचे ते शिष्य. आजोबांना थोडे व्हायोलिनही वाजवता येत होते. त्यामुळे घरातील संगीताच्या वातावरणामुळे नानांनाही संगीताची गोडी लागली. यामुळेच वयाच्या ११ व्या वर्षी तेही आजोबांकडे व्हायोलिन शिकू लागले.
आजोबांची नोकरी संपल्यावर नाना पुन्हा चिंचवडला  आले. (तसे हे देव कुटुंब चिंचवडच्या मोरया गोसावीच्या कुळातले. कामानामित्त मुंबईला जरी गेले तरी पुन्हा परतोनी माघारी म्हणजे चिंचवडला स्थिरावले) शालेय शिक्षण पूर्ण झाल्य़ावर आजोंबांकडे व्हायोलिनचे धडे घेणे सुरूच होते. वाणिज्य शाखेचे पदवी घेतल्यावर आजोबांनी नानांना पं. गजाननबुवांकडे व्हायोलिन शिकण्यासाठी पाठविले.
रोज दहा तास, असे जवळजवळ तीन वर्षे डोंबिवलीत बुवांकडे व्हायोलिनचे धडे गिरविले. बुवांची शिस्त अतिशय कडक. कोणत्याही बंदिशी किंवा स्वररचना लिहून घ्यायच्या नाहीत. हा दंडक. घरी गेल्यावर त्या आठवून त्याचा रियाज करायचा... हे विद्येचे तंत्र. बुवांच्या या धाकामुळे व्हायोलिनशी जवळीक अधिक झाली.. बुवांच्या सहवासामुळे त्यांचे खास गायकी अंगाने व्हायोलिन वादनाची कला अवगत झाली. त्यात ते माहिर . तबल्याच्या बोलाचेही तिथे शास्त्रोक्त शिक्षण मिळाले... एकूणच गायकी अंगाने वादन आणि तेही तबल्याच्या लयीत वाजविण्याची कारागिरी सहजी प्राप्त झाली.
पुण्यात टेलिफोन खात्यात नोकरीचा कॉल आला..आणि नाना खुद्द पुण्यात दाखल झाले. पुण्यात नोकरी आणि व्हायोलिन दोन्ही गाष्टी एकत्रच सुरू झाल्या. पुण्यात पं. नागेश खळीकर, बबनराव कुलकर्णी, धुंडिराज मराठे यांचेकडेही नानांनी संगीताचे शिक्षण घेतले. पं. गजाननबुवांनी शिकविलेल्या व्हायोलिनच्या विद्येत पुरते प्राविण्य आल्यावर मग नानांनी रेडीओची परिक्षाही यशस्वीपणे पास केली. पुण्यात आलेल्या ६२च्या पुराने राहते घर कोलमडून गेले. गोखलेनगरला संसाराचा पुन्हा मांड मांडला. लग्नानंतर आईलाही गाण्याची आवड लक्षात आली. आईने नानांच्या कार्यक्रमांना तंबो-याची साथ केली. आई (सौ. निला भालचंद्र देव) भक्तिगीत आणि अभंग छान म्हणत असे.
नानांचा पहिला कार्यक्रम १९६३साली रेडिओवर प्रथम झाला . त्यानंतर घरी रेडिओ विकत आणला गेला. आईने घरातली सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळली. सर्व जबाबदा-या तिने आनंदाने, समाधानाने पार पाडल्य़ा. नाना घरात व्हायोलिनच्या शिकवण्या घेत असत. कार्यक्रमांना साथ करण्यासाठी बाहेर जात असत. घराची सारी मदार आईवर असायची.. तीही तेवढीच ..कलाप्रेमी आणि मोठ्या मनाची.
घरातल्या संगीताच्या या वातावरणामुळे वयाच्या नवव्या वर्षी मी व्हायोलिन शिकू लागले. तेही नानांच्या कडक शिस्तीत.. मला आठवते.. माझ्या शेजारी रहाणारी मैत्रीण संगीता आणि मी दोघीही क्लासला बसायचो.. आधी शिकविलेल्या रागांच्या आलाप, ताना जर पाठ नसल्या तर नाना मला क्लासला बसू देत नसत..इतकेच नाही तर वाजविताना काही चूक झाली तर हातातल्या बो ने एक जोराचा फटका मारीत....मात्र या मुळेच माझे व्हायोलिन वादन तयार झाले..आज ते सारे मागे वळून पाहताना डोळे पाणावतात.
आज वयाच्या पंच्याहत्तरीतही नानांचा वक्तशिरपणा आणि शिस्त तशीच कायम आहे. पण जेवढे ते कठोर शिक्षक तेवढेच समोरच्याचे कौतुकही ते मनापासून करतात.. मी ते प्रत्यक्ष अनुभवले आहे.
आपल्या इतक्या वर्षांच्या सुरेल प्रवासात त्यांनी कधीही प्रसिध्दीची किंवा कुठल्य़ाही पुरस्काराची अपेक्षा कधीच धरली नाही. आठ ते सत्तर वयोगटातल्या कितीतरी जणांनी नानांकडे शिक्षण घेतले आहे. आजही घेत आहेत.
पण व्हायोलिन हे फार अवघड वाद्य असल्यामुळे शिकायला येणारे फार चिकाटीने ते शिकत नाहीत..अर्धवट सोडून जातात ही त्यांची खंत आहे.
मितभाषी आणि तेवढेच मिश्किल ही त्यांची स्वभाववैशिष्ठ्ये सांगता येतील. ते तसे मितहारीपण असल्यामुळे मोजकाच आहार घेऊन सतत उत्साही असणारे आमचे नाना अजुनही बसने प्रवास करून घरोघऱी शिकवण्या घेण्यासाठी तर जातातच पण गेली ४० वर्षे शनिपारच्या भारत गायन समाजात संगीत शिक्षक म्हणून आजही कार्यरत आहेत. अजूनही कोणत्याही कार्यक्रमालाच काय पण तालमिंनाही वेळेवर हजर असतात. त्यांनी हिच शिस्त आम्हा बहीण-भावांना लावली. त्याचा उपयोग आम्हाला आमच्या आयुष्य़ात खूप झाला.
त्यांचा हा संगीताचा वसा मी (व्हायोलिन) आणि माझा मुलगा रविराज( तबला) आणि मुलगी मधुरा(हार्मांनियम) यांनी पुढे न्यायचा प्रयत्न केला आहे.
निर्मळ मनाचे.. कोणत्याही कलेच्या राजकारणापासून अलिप्त असलेले.. व्हायोलिनवरची निष्ठा कायम ठेवणारे... ते वादनाचे धडे पुढच्या पिढीला शिकविणारे...पं. भालचंद्र देव...
तुम्हाला आयुष्याची स्वर-संगत अशीच अखंड लाभत राहो.. कला आणि कलावंत दोघांनाही याचा लाभ होवो...हिच अपेक्षा...
दिर्घायुष्याचे वरदान लाभो
तुमच्या आयुष्या
हिच विनंती करतो आम्ही
परमेशाच्या देशा...
आपलीच,
सौ. चारूशीला गोसावी ( देव )
मयुरेश, बी-५५, राजर्षी शाहू सोसायटी,
सातारा-पुणे रस्ता, पुणे- ३७
फोन. ०२०- २४२३ ००६० मोबा.९४२१०१९४९९