हजारो जणांच्या मनावर राज्य करतो तो खरा कवी. गदिमा तसे होते. त्यांनी कविता आणि गाण्यातील अंतर मिटवले आणि लोकसाहित्याला प्रतिष्ठा मिळवून दिली, हे त्यांचे खरे कार्य आहे. त्यांच्यासारखे लिहिणे कठीण असले, तरी त्यांनी निर्माण केलेल्या पायवाटेवरून मी आणि माझ्यासारखे कवी चालायचा प्रयत्न करीत आहोत,अशा भावना ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी व्यक्त केल्या.
'गदिमा प्रतिष्ठान'तर्फे दिल्या जाणार्या पुरस्कारांचे आज महानोर यांच्या हस्ते वितरण झाले, त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी ज्येष्ठ कलाकार श्रीकांत मोघे यांना गदिमा पुरस्कार देण्यात आला, तर 'गृहिणी -सखी-सचिव पुरस्कार' मधुरा जसराज यांना प्रदान करण्यात आला. कवी आणि लेखक गुरू ठाकूर यांना 'चैत्रबन पुरस्कार', तर गायिका विभावरी आपटे-जोशी हिला 'विद्या-प्रज्ञा पुरस्काराने' गौरवण्यात आले. मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल कवलापूरचा प्रतीक फाळके यालाही गदिमा पारितोषिक देण्यात आले.
महानोर म्हणाले, ''गदिमा जातिवंत शेतकरी, अतिशय प्रतिभावान पण साधा माणूस होते. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत जसे आणि जितके काम केले, तसे करणारे फार कमी असतील. लावणीला खरी प्रतिष्ठा त्यांनी दिली.'' आपली आणि माडगूळकरांची पहिली भेट ६८मध्ये मराठवाडा साहित्य संमेलनात झाली, त्या वेळी आपल्यासारख्या नवोदित कवीला प्रोत्साहन दिल्याच्या आठवणी महानोर यांनी जागवल्या.
No comments:
Post a Comment