subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, February 19, 2013

अभंगरचनातून भीमसेनजीच्या स्मृतींना अभिवादन



 ज्यांनी कित्येकांना प्रेरणा दिली आणि जे भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितीजावर अढळ सूर्याप्रमाणे आपल्यात नसूनही तळपत आहे त्या पं. भिमसेन जोशी यांच्या जयंतीची आठवण ठेऊन ( ४ फेब्रुवारी १९२२) त्यांच्या संगतीत गायन शिकलेले आणि स्वतःच्या अभंगवाणीच्या कार्यक्रमातून तो वसा सादर करतात ते पुण्याचे राजेंद्र दिक्षीत. यांनी शनिवारी` नाट्यरंग-अभंग `हा एक वेगळा अनुभव रसिकांसमोर सादर केला. 

 भारतरत्न स्वरभास्कर पं . भीमसेन जोशी यांच्या जन्मतिथी निमित्त श्रीगुरु संगीत प्रसारक मंडळ  आणि  मैत्री  परिवार संस्था, (पुणे शाखा ) यांच्या सहकार्याने   "नाट्यरंग अभंग" हा कार्यक्रम दि. १६ फेब्रु वारी २०१३ ला टिळक स्मारक मंदीर, पुणे  इथे आयोजित करण्यात आला होता.    भक्ती पागे   पं . भीमसेन जोशी यांचे शिष्य राजेंद्र दीक्षित यांनी नाट्य संगीत  पंडीतजींनी अजरामर केलेल्या अभंग  रचनां सादर  करून  पंडितजींच्या स्मृतींना अभिवादन केले.  

   भक्ती पागे  यांनी गायलेल्या' नरवर  कृष्णा समान ...', 'उगवला चंद्र पुनवेचा...',' हे सुरांनो चंद्र व्हा... 'या रचनांना श्रोत्यांच्या पसंतीस उतरल्या.   
अतिशय समर्थपणे व सुरेल स्वरात राजेंद्र दीक्षित यांनी सादर केलेल्या 'रूप पाहता लोचनी...', 'माझे माहेर पंढरी...', 'तुका आकाशा येवढा...', 'कान्होबा तुझी घोंगडी चांगली...' या  रचनांनी  श्रोत्यांना  पंडितजींची आठवण झाली.    

पंडीतजींच्या धाटणीची गायनशैली आत्मसात करुन राजेंद्र दीक्षित यांनी ते स्वर अभंगातून पुढे दाखविण्याचा प्रयत्न केला. तर भक्ति पागे यांनी आपल्या नाट्यसंगीत आणि अभंगातून आवाजाची जादुमयी सुरावट निर्माण करुन श्रोत्यांकडून पसंती मिळविली...
राजेंद्र दीक्षित व भक्ती पागे  यांनी गायलेल्या बाजे मुरलिया ... ऐकून  श्रोते विशेष आनंदित झाले.  शेवटी 'अगा  वैकुन्ठीच्या राया...'  या संत रचनेनंतर पंडितजींची  'जो भजे हरी को सदा....' या भैरवीच्या ध्वनिमुद्रीकेने कार्यक्रमाची सांगता झाली.  
कार्यक्रमास श्रोत्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला. असे कार्यक्रम सतत ऐकण्यास मिळावेत अशी अपेक्षा  श्रोत्यांनी  व्यक्त केली. 

 कार्यक्रम रंगला तो साथीदारांमुळे. पेटीवर होते संजय गोगटे, पांडुरंग मुखडे यांनी तबल्याची साथ केली. तर पखवाजवर नाद धरला तो मनोज भांडवलकर यांनी. व्हायोलीनवर होत्या चारुशीला गोसावी. टाळांचा स्वर कानात साठवून ठेवत श्रोते घरी गेले ते माऊली टाकळकरांच्यामुळे. ..

या संस्थेचा नवीन कलावंतांना व्यासपीठ आणि त्यांना रसिकांसमोर आणणे आणि पं. स्वरज्योत पुढे तेवत ठेवण्याचा मानस आहे.
   
      
-दुर्गा दिक्षित, पुणे

Monday, February 11, 2013

दगडातल्या झ-यातून पाझरणा-या ज्ञानगंगा


"मी ७४ वर्षांनंतर आज या माझ्या विद्यार्थ्य़ांनी मला शाळेत खेचून आणले. खरच मी त्यांचा आभारी आहे. आपल्या शाळेला दगडी शाळा म्हणतात.या दगडातून ज्ञानाच्या कितीतरी गंगा स्वतंत्रपणे समाजात वाहताहेत. या ज्ञानमाउलीला तोड नाही. या माऊलीली जपा. शाळेची परंपरा पुढे चालवा. या शाळेसारखी उत्तुंग उंची गाठा. माझे तुम्हाला भरभरुन आशीर्वाद आहेत.... "

शनिवारी, ८ फेब्रुवारी २०१३ ला सुमारे ४२ वर्षानंतर आम्ही १९७१च्या अकरावीची बॅच माजी शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आजच्या शाळेच्या पदाधिका-यांच्या परवानगीने शाळेतल्या ८ वी व ९ वीतल्या एकेका तुकडीतल्या ९० मुलां-मुलींसमोर हा समारंभ आखला. त्यात आमच्या शाळेतले त्यावेळी संस्कार आणि ज्ञान देणारे आमचे गुरुजनांना शाळेत पाचारण केले..त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आशीर्वाद घेतला. त्यापैकी सर्वात जेष्ठ असे पिंगळे गुरुजी यांनी या प्रसंगी व्यक्त केलेले आरंभी दिलेले मनोगत खूप कांही सांगुन जाते.
गेली १० वर्ष आमच्या वेळचे विद्यार्थी कुठे ना कुठे एकत्र जमतो..शाळेच्या घडणीतून विविध श्रेत्रात स्वतःचे योगदान देणारे सारे मुलं-मुली काही ठोस विचार करतो. एकमेकांची सुखे-दुःखे वाटून घेतो. संस्कार हा शब्दही विसरत चालला असताना..शिक्षण देणा-या संस्थांचे आजचे बाजारी आणि केवळ पैसा हेच धेय्य बाळगणा-या शिक्षण संचालकांच्या वाढत्या काळात कित्येक वर्षांनंतर १९७१च्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत येऊन केलेला हा शिक्षकांचा सन्मान हे विरळे दृष्य काही निवडक मंडळी शनिवारी अनुभवित होती.
दोन दिवसानंतर ह्याचे वर्णन करताना आजही ते सारे डोळ्यासमोर चित्र आणि गुरुजनांचा आशीर्वादपर संदेश मनात कायमचा कोरला गेला आहे. यापुढे शाळेला जेव्हा केव्हा काही मदत लागेल तेव्हा खंबीरपणे उभे राहण्याचे आम्ही सा-यांनी ठरविले आहे.
याप्रसंगी आम्ही न्यू इंग्लिश स्कूल, सातारा या आमच्या शाळेत आम्ही १९७१ च्या अकरावीचे सुमारे ६०-७० विद्यार्थी एकत्र जमून त्या काळातल्या शिक्षकांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेतला. शनिवारी शाळतल्या काही मुलांसमोर शालामाऊलीच्या साक्षिने हे सारे घडले. द्रवीड, कंग्राळकर,यांचेबरोबरच शाळेच्या शाळासमितीचे मुख्य अशोक वाळींबे आणि सध्याचे प्रिन्सीपॉल शिंदे सर यांनी आपले विचार व मत मांडून हा समारंभ म्हणजे संस्काराचा किती मोठा भाग आहे..तोही या मुलांच्या साक्षीने व्हावा याचा आनंद व्यक्त केला.

त्याप्रसंगी आदरणीय कंग्राळकर, द्रवीड, लांडगे, माटे, हलगीकर, केंजळे, भाऊ आपटे, पिंगळे, के. पी. कुलकर्णी, कालगावकर, दामले या शिक्षकांचा सन्मान विद्यार्थ्य़ांकडून करुन एक आगळा आदर्श घालून दिला.
आमच्यापैकी कांचन दोशी, कमलाकर क्षिरसागर, सुधीर देवधर, राजेंद्र देशपांडे आणि सुभाष इनामदार यांनी मनोगतातून शाळेच्या परंपरेचा सार्थ अभिमान व्यक्त केला.

संध्याकाळी आमच्याच एका विद्यार्थ्याचे कनिष्क कार्यालयात स्नेहमेळावा झाला. त्यातही शाळेच्या आजच्या परीस्थितीविषयी चर्चा होऊन..शाळेसाठी काही ठोस आर्थाक मदतीचा हात देण्याचे ठरले..काही वर्षापूर्वींच शाळेतल्या विद्यार्थ्य़ांसाठी शुध्द पाण्यासाठीची यंत्रणा बसविली होती.त्याचा सारा भारही आम्हीच उचलला होता.

मनोरंजनाचा भाग म्हणून सातारच्या चार कलावंताचा गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. त्यात या ५८ वर्षे वयाच्या चार आमच्याच मित्रांनी आपापली झलक सादर केली.
रविवारी सकाळी दोन वाहनांनी ठोसेघर, सज्ज्नगड आणि नंतर उरमोडी धरणाच्या परिसरात भटकंती केली.
दोन दिवस सुमारे ८० जण शाळेच्या त्यावेळच्या आठवणीत रमून केलेला दंगा, खाल्लेला मार आणि झालेल्या संस्काराचे गोडवे गात दंग होऊन गेले होते..
यंदाच्या या दहाव्या स्नेहाच्या मेळाव्यातून हा मैत्री पार्क अधिक आनंदाने बहरुन गेला होता. सातारचे संजय बोपर्डीकर, शाम बेगमपुरे आणि जयंत सरवटे यांच्यासह अविनाश कुलकर्णी, मोहनदास देवींसह अनेक आमचेच मित्र तो यशस्वी करण्यासाठी काही महिने झटत होते

यापूर्वी पुणे, बारामती, गारगोटी, अलिबाग, डोंबिवली, वाई, इचलकरंजी अशा विविध ठिकाणी आम्ही मंडळी स्नेहवाटत..त्याचा सुगंध घेत एकत्र जमतात..शाळेच्या दिवसांची आठवण साठवण एकमेकात स्नेह दरवळत ठेवतात .आणि यंदा तर शिक्षकांच्या सन्माच्या निमित्ताने शाळेत येतात..हा सारा हुरहुर लावणारा आणि हुरुप आणणारा काळ..
यासा-यातून मैत्री घट्ट होत जाते..स्नेहाचे धागे अधुन घट्ट गुंफले जातात...आणि पुढच्या पिढीवर संस्कार होतात.
- सुभाष इनामदार ,पुणे
(सदस्य मैत्री पार्क)
subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, January 22, 2013

`सुनो भाई साधो..`पुन्हा पुन्हा अनुभवा



संत कबीर..एक धाडसी संत. आजच्या काळातही त्याचे कवित्व..त्याने लिहलेले दोहे अजरामर आहेत. ते काळाच्या ओघात नव्या संदर्भात सुसंगत वाटताहेत...हेच सारे त्यांनी स्पष्ट तर करुन दिलेच पण त्यांनी कविता खरवंडीकर यांच्या आवाजातून आणि धनंजय खरवंडीकर यांच्या शास्त्रीय संगीताच्या मखमली पोतडीतून निटसपणे अर्थ पोचवत रसिंकांसमोर पुन्हा जेव्हा उलगडले तेव्हा टाळ्यांची दाद मिळत गेली..रंगत जसजशी वाढत गेली तशी उत्सुकताही वाढत गेली....


हा अनुभव पुणेकर रसिकांना मिळाला एस एम जोशी सभागृहात.. रविवारी ( २० जोनेवारी २०१३) संध्याकाळी. तो अधिक मनात रुंजी घालू लागला तो डॉ. अनिल अवचट यांच्या सहज आणि प्रत्ययकारी निरुपणामुळे..त्यांनी या महान संतांच्या रचनांना स्वतःचा स्वतंत्र दृष्टीक्षेप जोडला..कुठल्याही धर्माची पताका न फडकवता त्यांनी माणसातल्या अस्सलतेचे दर्शन घडविणा-या रचना लिहिल्या. त्या १४व्या आणि १५व्या शतकात रचल्या गेल्या असाव्यात..पण त्या वरवर श्रीमंती मिरविणा-या माणसांना त्यांच्या वेदनवांवर आजही घाव घालतात. हेच तर सारे अवचटांनी पटवून दिले. त्यांची भाषा कमालीची लाघवी तर होतीच पण त्यात सहजी मार्मिकतेचे दर्शन घडत होते.


अनिल अवचट यांनी या निमित्ताने रसिकांना संत कबीर आणि त्यांच्या रचनांमागचे सार समजावून दिले. त्यांच्या दृष्टीने ते संत तुकारामांचे त्या अर्थाने पूर्वज मानावे लागेल. आजच्या काळात अनेक सांस्कृतिक अधःपतन होत असताना त्यांचे विचार आजही लागू पडत असल्याचा पुरावा त्यांना आपल्या सूत्रातून सांगितला. कदाचित आजच्या समाजाला ते वाट दाखवीत आहेत असेच जणू यातून दर्शन घडले.

त्यांच्या एका अभंगात सबूरी हा शब्द आहे..सबुरी म्हणजे संयम. पण जिथे हा शब्द वापरला जातो तिथे संयमाचा पूर्ण अभाव असल्याचे दिसते..त्यांनी सबुरी तून सारे साधेल असे म्हटले आहे.
जीवनात साधेपणा महत्वाचा आहे. केवळ मोठेपणाचे दर्शन न घडता..मन मोठे करुन आहे तसे रहा असा सल्लाही दिला. सगळी माणसे सारखी आहेत. सगळ्यांचा उगम एकाच मार्गातून झाला आहे..मग जातीचे वेगळेपण कशासाठी. कबीराच्या दृष्टीने परमेश्वरापेक्षाही गुरु मोठा कारण तो परमेश्वरापाशी जाण्याचा मार्ग दाखवितो.

अहंकार सोडून इतरांमध्ये विरघळून जगायला शिका असा संदेशही कबीराच्या रचनेत असल्याचे मर्म डॉ. अनिल अवचट सांगतात.
एक अभंग ऐकविला की कविता खरवंडीकर तोच अभंग आपल्या सुरेल आणि विविध सप्तकात फिरणारा सूर आळवत शब्दांना नेमक्या मुशीत फिरवून पुन्हा समेवर आणायच्या...शब्द स्वर आणि ताल यांची ही रंगलेली मैफल प्रत्येक अभंगादरम्यान अधिक हवीहवीशी वाटू लागली..

हमन है इश्क मस्तना. ए दिल गाफिल गफलत मतकर. मन लागो मेरे यार फकिरी मे. मत करो मोह तू हरिभजन को मान रे. हम बिगडे तो बिगडे भाई, तुम बिगडे तो राम दुहाई.
किंवा
आई गवना की सारी. नैना झंकार झनकारे, झीनी झीनी बीनी चदरीया. प्रितम घर आये, रहेना नही देस बिराना है आणि शेवटी ये संसार कारे की बाही- उलझ पुलझ मर जाना है...
( कदाचित रचना मला जी ऐकू आली...त्यात बदल असू शकेल..क्षमस्व)

अनेक रचनांचा पोत त्याला धनंजय खरवंडीकर यांनी दिलेली स्वरचाल फारच मोहकपणे कविता खरवंडीकर यांनी सादर केली..त्यातला भाव..त्यातली आर्तता आणि त्याची परिणीती ती भावना नेमकी स्पष्ट सांगणारी होती.
म्हणूनच `सुनो भाई साधो..` हा एक अतिशय सुंदर कार्य़क्रम देऊन  त्यांना आपली उत्तम छाप रसिकांवर टाकली यात कोणतेही अतिशयोक्ति विधान नाही. धनंजय खरवंडीकर यांची तबला संगत आणि राजीव परांजपे यांनी तेवढीच ऑर्गनवर केलेली साथ यातून कबीररचना समजण्यास आणि त्यारचना मनापर्य़ंत पोचण्यास कार्यभूत  झाली..

जेव्हा केव्हा तो कार्यक्रम जिथे असेल..तिथे मात्र डॉ. अनिल अवचट यांची निरुपणाची साथ हवी..त्यातूनच कबीर तर समजण्यास मदत होईलच . पण आजच्या काळातही या रचना किती समर्पक आहेत याचे दर्शन होईल. पुन्हा हा कार्यक्रम व्हावा हिच अपेक्षा..आणि त्यासाठीच हा लेखन प्रपंच.


सुभाष इनामदार,पुणे
9552596276

subhashinamdar@gmail.com

पुन्हा एकदा आशा भोसले..चिंब स्वरांनी भिजवत

केवळ चारच महिन्यांपूर्वी पोटची मुलगी स्वतःच्या पायांनी या जगातून बाहेर गेल्याचं दुःख या आवाजाच्या उराशी होतं.. "ती त्सुनामी होती आणि त्यामुळे हृदयातनं शेवटपर्यंत रक्त ठिबकत राहणार आहे,'' असं एका बाजूनं म्हणणारी ही आई दुसरीकडे, "मी खंबीरपणे लढणार आहे... तुम्हीही खंबीरपणे आयुष्याचा सामना करा,' असं सांगत आपल्या चिरतरुण आवाजानं सर्वसामान्यांच्या जगण्यातील आशा जागवत होती... याचं कारण तीच "आशा' होती...

मुलीच्या जाण्याचं दुःख बाजूला सारून पुण्यातल्या मंचावरून स्वरांची बरसात करण्यासाठी आशा भोसले आल्या, त्याला कारणही तसंच होतं. एका रुग्णालयाच्या मदतीसाठी हा कार्यक्रम घेतला होता. वारज्यातलं ते रुग्णालय होतं त्यांच्या आईच्या म्हणजे माई मंगेशकर यांच्या नावाचं. आशा भोसले आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी "गेले द्यायचे राहून...' या नावानं ही मैफल तब्बल पाच तास सजवली. हे दोघं बहीण-भाऊही तब्बल बारा वर्षांनी एका मंचावर गाण्यासाठी आले आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह गच्च भरून गेलं.

केवळ सुरवातीचं संगीत ऐकताच गीताचे बोल मनात रुंजी घालू लागले.
आशाताईंनी ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं आहे, हे मधूनच निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सांगितलं खरं; पण तीनही सप्तकांतून फिरणारा त्यांचा खास आवाज मात्र ते वय आपलं नसल्याचंच दाखवून देत होता. नुसता आवाजच नव्हे; तर उत्साहानं मंचावर वावरताना, नव्हे बागडताना पाहून त्यांचं शरीरही वय विसरलं की काय, असाच प्रश्‍न पडत होता.

"का रे दुरावा, का हा अबोला...' हा बाबूजींचा स्वरसाज सादर करताना त्यांनी गाडगीळांना सोबत घेऊन त्यांच्याशी लडिवाळ हरकती केल्या. "चांदण्यात फिरताना माझा धरलास हात...' म्हणताना एखाद्या तरुणीचा खरेच कुणी हात धरल्यावर तिची प्रतिक्रिया काय होईल, त्याचा स्वराभिनय त्यांनी केला आणि त्याला दाद मिळाली. "जांभूळ पिकल्या झाडाखाली...' या गीतात "बल्ले बल्ले' अशा पंजाबी ओळी मिसळून त्यांनी ओढणी उडवत भांगडाही केला. "गेले द्यायचे राहून...' हे गीत नूरजहॉं, लता मंगेशकर, गुलाम अली, हृदयनाथ यांच्या शैलीत सादर करून त्यांनी टाळ्या वसूल केल्या. "मागे उभा मंगेश', "मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे', "बुगडी माझी सांडली ग...', "नभ उतरू आलं...', "केव्हा तरी पहाटे...', "रेशमाच्या रेघांनी', "तरुण आहे रात्र अजुनी', "गोमू संगतीनं...', "या रावजी', "उषःकाल होता होता...', अशा रचना एकामागून एक रसिकांना मुग्ध करीत होत्या. त्यात गीत आलं... "नाच नाचुनी अति मी दमले...', त्या गाण्याच्या वेळी आशाताईंचं मन बोलू लागलं...

 ""माझ्या आयुष्यात त्सुनामी येऊन गेली. संसाराच्या गडबडीत गाणं मी विसरत चालले होते. त्या वेळी बाळनं (हृदयनाथांनी) मला पेटी घेऊन बसवलं आणि म्हटला, "गा...' त्यानं मला सांगितलं, "जगात सगळं होत राहतं... तू स्थितप्रज्ञ हो...' त्याच्याच सांगण्यामुळे मी आज इथं उभी आहे, तुम्हाला बघू शकतेय. तो माझ्यापेक्षा छोटा असला, तरी माझा गुरूच आहे...''

'चांदणे शिंपीत जाशी' हे गाणं अठरा वर्षांच्या हृदयनाथानं "माझं गाणं गाशील का?' असं विचारलं. त्या वेळी मी मोठी होते, त्या गर्वातच मी "ठीक आहे,' म्हटलं; पण प्रत्यक्षात गाणं फारच अवघड होतं, अशी आठवणही आशाताईंनी सांगितली. त्यानंतर हंसध्वनी याच रागात हृदयनाथांनी सादर केलेलं मीराबाईंचं "करम की गति न्यारी संतो...' हे गीत वातावरण गंभीर करीत गेलं. संगीतकार सलिल कुलकर्णी यांनी हृदयनाथांना साथ करीत "त्याची बाई मज सोडवेना ओढ' सादर केले, तर कुलकर्णी यांनी संगीत दिलेलं आणि हृदयनाथांनी गायलेलं "तव नयनांचे दल हलले ग...' हे गीत त्या दोघांनी रंगवलं. सचिन जांभेकर यांनी कार्यक्रमाचे स्वरसंचलन केले.

http://online3.esakal.com/esakal/20130122/5168654307515090508.htm

(सकाळ,पुणेच्या सौजन्याने)

Wednesday, January 9, 2013

काळाप्रमाणे बदलायला हवे हे सांगणारा..मंत्राग्नी



ज्येष्ठ अभिनेते रघुवीर यादव यांना लिफ्टमन बनवून त्यांच्याकडून मराठीतले संवाद घटवून घेऊन समाजातल्या अनेक जुन्या आणि पारंपरागत चालींना `मंत्राग्नी` देण्यासाठी वेगळा विषय घेऊन दिग्दर्शक, कथा-पटकथा लेखक आणि अभिनेते अभिराम भडकमकर काही बालगंधर्व चित्रपटानंतर पुन्हा कार्यरत झाले आहेत. अजित वाईकर व डॉ. वृषाली भोसले "मिडीयाजेनिक' या आपल्या नव्या निर्मिती संस्थेतर्फे निर्माण करीत असलेल्या "मंत्राग्नी' या चित्रपटाची घोषणा नुकतीच पुण्यात केली गेली.

 बाप व मुलगा यांच्या नात्यातील एक वेगळाच पदर उलगडणारी ही कथा असून, चित्रीकरणाला लवकरच सुरवात होणार असल्याचे चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी सांगितले.

'मुंगेरीलाल के हसिन सपने' ही मालिका चिरस्मरणीय केलेल्या रघुवीर यादव यांच्या "लगान' व अलीकडच्याच "पिपली लाइव्ह'मधल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिका चोखंदळ रसिकांच्या लक्षात राहणा-या आहेत. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्यशाळेतून प्रशिक्षित यादव यांनी हिंदी रंगभूमीवरही उल्लेखनीय योगदान दिले आहे. प्रादेशिक भाषेतल्या सोळा चित्रपटांतून काम केलेल्या यादवांनी "मेसीसाब' या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. याआधी दोन दशकांपूर्वी जब्बार पटेल यांच्या "एक होता विदूषक'मधल्या प्रमुख भूमिकेसाठी रघुवीर यादव यांचे नाव चर्चेत होते. त्यानंतर जवळपास पंचवीस वर्षांनी मराठीतल्या त्यांच्या पदार्पणाचा हा योग आला आहे.
नाटक आणि चित्रपट ह्या दोन्ही माध्यमातून अभिराम भडकमकर यांची भरारी असते. कथेवरील आणि पटकथा आणि संवादातील सहजचा अधिक लेखनात खुलून येते..
काळाप्रमाणे बदलायला हवे हे सांगणारा एक सामाजिक आशय घेऊन ते या चित्रपटाव्दारे येत आहेत..स्वागत आहे...

सुभाष इनामदार, पुणे

Monday, January 7, 2013

उत्सुकता वाढविणारा सस्पेन्स ...पुणे ५२

मराठीमधला पहिला आंतरराष्ट्रीय म्हणावा असा थ्रिलर ड्रामा...पुणे ५२..या नावाने १८ जानेवारीला प्रदर्शीत होत आहे.
भारताने नवे आर्थिक धोरण १९९२ साली स्वीकारल्यामुळे मध्यम वर्गियांची मानसिकता बदलत गेली.माणसांच्या आयुष्यात या धोरणामुळे सामाजिकदृष्य़ा काय बदल होत गेले यावर भाष्य कराणारा थोडा गंभिर वाटावा असा..पण तरीही गुप्तहेर पध्दतीने सतत पुढे काय़..
आणि कुठल्याही गोष्टीत तुम्हाला काहीतरी म्हणावेसे वाटते अगदी नाही म्हणावेसे वाटते...पण ते तुम्ही म्हणू शकत नाही....

नायकाच्या रुपातल्या गिरीश कुलकर्णी आणि त्यांची पत्नी दाखविलेल्या सोनाली कुलकर्णी  याच्यात गुप्तहेराच्या व्यवसायामुळे काय वादंग माजतो . सई ताम्हणकर  त्याच्या आयुष्यात काय येते...याचे सारे व्यक्तिगत पापुद्रे उलगडून दाखविणारा सस्पेन्स चित्रपट निखिल महाजन यां सिडनीत दिग्दर्शनाची पदवी घेईन परतलेल्या तरुण दिग्दर्शकाने मराठीत पडद्यावर साकारलेली ही कथा.... लेखनही त्यांनीच केले आहे.

आर्थिक धोरणे आणि त्यातच नावेसंबंधाची घुसळण दोन्हीही गिरीश कुलकर्णी यांच्या संवादातून एकेका व्यक्तिरेखेतून सारा चित्रपट पुढे सरकत जातो...




तीन वर्षे याविषयावर विचारमंथन करुन ह्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. वेगळा विषय आणि विषयाची वेगळी हाताळणी यामुळे तो प्रेक्षकांना आवडेल..अर्थात...सेन्सॉर बोर्डाने याला केवळ प्रौढांसाठीचा असा शिक्का मारला असला तरी नव्या दिशेने मराठी चित्रपटाचे पाउल टाकणारा हा विषय रसिक नक्की पाहतील याची चित्रपटापाठीमागे असणा-या सा-यांनाचा खात्री आहे.


तसे कलाकारही थोडेच पण लोकांना सुपरिचित गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर यांचे शिवाय खास भूमिकेत दिसणार आहे. नाटककार गो.पु. देशपांडे...आणि स्वानंद किरकिरे...

एकुणच विषय आणि मांडणी  पाहता चित्रपटाबाबत उत्सुकता राहिल.


सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276


Wednesday, October 31, 2012

संगीतदान करणारे पं. ना वा दिवाण गेले



वय वर्षे. ८५. डॉ. नारायण वामन दिवाण. संगीत क्षेत्रात त्यांना पं. ना.वा. दिवाण म्हणून ओळखळे जाते. आज (बुधवारी) सकाळीही याही वयात त्यांनी दोन विद्यार्थ्य़ांना संगीत शिक्षण दिले. त्यानंतर अचानक त्यांना अस्वश्थ वाटले. आणि पहाता पहाता त्यांचे त्यातच दुःखद निधन झाले.  


आय़ुष्यभर संगीतदान हेच आपले काम. ते त्यांनी अतिशय तळमळीने केले. पुण्य़ात या तोडीचे आनेक गुरु आहेत. जे दान अनेक वर्ष करताहेत. मात्र पं. पिंपळखरे गावात आणि बिबवेवाडीत पं. दिवाण.
आज त्यांच्या अचानक जाण्याने संगीत क्षेत्रात आपलेपणानी अनेकांना सल्ला देणारा गुरु हरपल्याची भावना आहे. पुण्याच्या संगीत क्षेत्रातील अनेक गुरू, मार्गदर्शक त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी उपस्थित होते. पं. मुकुंद मराठे. विजय दास्ताने. संजय करंदीकर. पांडुरंग मुखडे. माजी आमदार विश्वास गांगुंर्डे ही त्यातलीच काही प्रमुख नावे. कितीतरी संगीत श्रेत्रातील विद्यार्थी यावेळी अश्रुपूर्ण नेत्रांना त्यांचे अखेरचे दर्शन घेत होते. 
तसा पं. दिवाण यांच्या कारकीर्दीचा धावता आढावा घेतला तर सारे आयुष्यच त्यांनी संगीताची सेवादान करण्यात घालविले. त्यांचेकडे संगीत विशारद झालेल्यांची संख्य़ा १००० आहे. तर संगीत अलंकार झालेले ८०० आहेत. तर ३ जण संगीताचार्य म्हणून उत्तीर्ण झाले आहेत. ते. स्वतः संगीताचार्य आहेत. नुकत्याच होत असलेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या परिक्षा केंद्रात त्यांचेही एक महत्वाचे केंद्र होते..त्यांच्या सरस्वती संगीत विद्यालयामार्फत पुणे, सासवड, बारामती, भोर, पिंपरी-चिंचवड या केंद्रावरुन २००० विद्यार्थी परिक्षेला बसत असत. १९५७ सालापासून अ.भा.गांधर्व मंडळाशी संलग्न मंडळाचे पेट्रन म्हणून ते काम पहात होते.


स्पर्धेच्या घोषणेच्या दरम्यान मधोमध पं. दिवाणही प्रिया बेर्डे यांच्या बाजुला हरॉजर होते.यात संगीत क्षेत्रातील मंडळीही आणि आयोजकही दिसत आहेत.


मास्टर इव्हेंटस् आणि कै. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनच्या वतीने होत असलेल्या राज्यस्तरीय गायन, वादन आणि नृत्य स्पर्धेचे ते प्रमुख सल्लागारही होते.



१९५७ ते १९७५ या काळात पुण्याच्या एस एन डी डी कन्याशाळेत ते संगीत शिक्षक म्हणून सेवाही केली आहे.
डिसेंबर १३, १९२७ ला बुवाचं वाठार (कोल्हापूर) इथे किर्तनकारांच्या घराण्यात दत्तजयंतीला त्यांचा जन्म झाला. १९४० ते १९५० या कालावधीत इचलकरंजी इथे दरबारगवई पं, केशवबुवा इंगळे यांचेकडे त्यांनी गुरुकुल पध्दतीने शिक्षण घेतले. १९५१ पासून ते पुण्यात आले. माधव संगीत विद्यालयात संगीत शिक्षक म्हणू आपला पहिला परिचय त्यांनी पुणेकरांना करुन दिला.
१९५२ पासून आपले स्वतःचे सरस्वती संगीत विद्यालय संचलित केले..ते आजतागायत..पहिल्यांदा ते नारायणपेठेत होते आता ते बिबवेवाडीत आहे.
आर्य संगीत प्रसारक मंडळ, गांधर्व महाविद्यालय, भारत गायन समाज या संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.
आपले स्वतःचे स्वतंत्र कलाकार म्हणून नाव करण्यापेक्षा त्यांनी संगीतसाधक घडविण्याचे केलेले काम हेच त्यांच्या त्यागाचे प्रतिक मानावे लागेल. आज असे गुरु आणि गुरुकुल परंपरा जपणारे संगीत मार्गदर्शक दोनही विरळा. त्यांच्या कामाचे मोल अनमोल आहे. त्यांचे मोल त्यांचे संगीतसाधकच आपल्या कृतितून दाखवतील. त्यांच्या जाण्याने अखंड चाललेल्या संगीत सेवेला खिळ बसली आहे हे नक्की.



सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596726