मुलीच्या जाण्याचं दुःख बाजूला सारून पुण्यातल्या मंचावरून स्वरांची बरसात करण्यासाठी आशा भोसले आल्या, त्याला कारणही तसंच होतं. एका रुग्णालयाच्या मदतीसाठी हा कार्यक्रम घेतला होता. वारज्यातलं ते रुग्णालय होतं त्यांच्या आईच्या म्हणजे माई मंगेशकर यांच्या नावाचं. आशा भोसले आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी "गेले द्यायचे राहून...' या नावानं ही मैफल तब्बल पाच तास सजवली. हे दोघं बहीण-भाऊही तब्बल बारा वर्षांनी एका मंचावर गाण्यासाठी आले आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह गच्च भरून गेलं.
केवळ सुरवातीचं संगीत ऐकताच गीताचे बोल मनात रुंजी घालू लागले.
आशाताईंनी ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं आहे, हे मधूनच निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सांगितलं खरं; पण तीनही सप्तकांतून फिरणारा त्यांचा खास आवाज मात्र ते वय आपलं नसल्याचंच दाखवून देत होता. नुसता आवाजच नव्हे; तर उत्साहानं मंचावर वावरताना, नव्हे बागडताना पाहून त्यांचं शरीरही वय विसरलं की काय, असाच प्रश्न पडत होता.
"का रे दुरावा, का हा अबोला...' हा बाबूजींचा स्वरसाज सादर करताना त्यांनी गाडगीळांना सोबत घेऊन त्यांच्याशी लडिवाळ हरकती केल्या. "चांदण्यात फिरताना माझा धरलास हात...' म्हणताना एखाद्या तरुणीचा खरेच कुणी हात धरल्यावर तिची प्रतिक्रिया काय होईल, त्याचा स्वराभिनय त्यांनी केला आणि त्याला दाद मिळाली. "जांभूळ पिकल्या झाडाखाली...' या गीतात "बल्ले बल्ले' अशा पंजाबी ओळी मिसळून त्यांनी ओढणी उडवत भांगडाही केला. "गेले द्यायचे राहून...' हे गीत नूरजहॉं, लता मंगेशकर, गुलाम अली, हृदयनाथ यांच्या शैलीत सादर करून त्यांनी टाळ्या वसूल केल्या. "मागे उभा मंगेश', "मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे', "बुगडी माझी सांडली ग...', "नभ उतरू आलं...', "केव्हा तरी पहाटे...', "रेशमाच्या रेघांनी', "तरुण आहे रात्र अजुनी', "गोमू संगतीनं...', "या रावजी', "उषःकाल होता होता...', अशा रचना एकामागून एक रसिकांना मुग्ध करीत होत्या. त्यात गीत आलं... "नाच नाचुनी अति मी दमले...', त्या गाण्याच्या वेळी आशाताईंचं मन बोलू लागलं...
""माझ्या आयुष्यात त्सुनामी येऊन गेली. संसाराच्या गडबडीत गाणं मी विसरत चालले होते. त्या वेळी बाळनं (हृदयनाथांनी) मला पेटी घेऊन बसवलं आणि म्हटला, "गा...' त्यानं मला सांगितलं, "जगात सगळं होत राहतं... तू स्थितप्रज्ञ हो...' त्याच्याच सांगण्यामुळे मी आज इथं उभी आहे, तुम्हाला बघू शकतेय. तो माझ्यापेक्षा छोटा असला, तरी माझा गुरूच आहे...''
'चांदणे शिंपीत जाशी' हे गाणं अठरा वर्षांच्या हृदयनाथानं "माझं गाणं गाशील का?' असं विचारलं. त्या वेळी मी मोठी होते, त्या गर्वातच मी "ठीक आहे,' म्हटलं; पण प्रत्यक्षात गाणं फारच अवघड होतं, अशी आठवणही आशाताईंनी सांगितली. त्यानंतर हंसध्वनी याच रागात हृदयनाथांनी सादर केलेलं मीराबाईंचं "करम की गति न्यारी संतो...' हे गीत वातावरण गंभीर करीत गेलं. संगीतकार सलिल कुलकर्णी यांनी हृदयनाथांना साथ करीत "त्याची बाई मज सोडवेना ओढ' सादर केले, तर कुलकर्णी यांनी संगीत दिलेलं आणि हृदयनाथांनी गायलेलं "तव नयनांचे दल हलले ग...' हे गीत त्या दोघांनी रंगवलं. सचिन जांभेकर यांनी कार्यक्रमाचे स्वरसंचलन केले.
http://online3.esakal.com/esakal/20130122/5168654307515090508.htm
No comments:
Post a Comment