subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, October 3, 2012

लक्ष्मीकांत बेर्डेच्या नावाने गुणी कलावंतांना संधी






राज्यस्तरीय `स्टार बॅटल्स` स्पर्धेचे आयोजन


 महाराष्ट्राच्या कोप-या कोप-यात दडलेल्या कलाकारांच्या शोधासाठी आणि त्यांना पुरस्कृत करुन त्यांच्या कलेला अधिक मोठ्या प्रमाणात वाव आणि व्यासपिठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने कै.लक्ष्मीकांत बेर्डे फाउंडेशन आणि मास्टर इव्हेंस्ट हे  `स्टार बॅटल` ही राज्यस्तरीय स्पर्धा लवकरच जाहिर करीत आहेत. याची प्राथमिक फेरी पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर अशा शहरांमध्ये १६ ते १८ नोव्हेंबर २०१२ ला होत आहे. यात गायन, वादन आणि नृत्य या संगीत क्षेत्रातल्या कलेतील वय वर्षे ७ च्या पुढील कलावंतांना सहभागी होता येणार आहे.
बुधवारी पुण्यात या संदर्भात आयोजकांच्या वतीने यासाठी काम करणा-या परिक्षकांसाठीचे एक विचारमंथन मेळावा आयोजित केला होता. यात विजय बक्षी( गायन), धनंजय दैठणकर (संतूर वादक),स्वाती दैठणकर (भरत नाट्यम), संजय करंदीकर (तबला) आणि शर्वरी जमेनिस-फाटक(कथ्थक) यांचे मार्गदर्शन लाभले.



आजच्या काळातही यातून अभिरुची जपून सादरीकरणाराचा दर्जा सांभाळण्याचे भान आयोजकांच्या वतीने केले जाईल. योग्य वयाला साजेसे आणि त्यात्या क्षेत्रातल्या संस्काराचे भान ठेऊन स्पर्धक यात सहभागी होतील अशी आशा आहे.
 

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावाने अभिनयाच्या स्पर्धाही घेण्याचे आयोजकांच्या मनी आहे...मात्र आत्ता भारतीय संगीताच्या क्षेत्रातल्या गुणवंतांसाठी  `स्टार बॅटल`च्या वतीने गायन, वादन आणि नृत्यविषयक स्पर्धची घोषणा केली जाणार आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावाने सुरु केलेले हे फाउंडेशन २००५ साली सुरु केले गेले. नवीन कलाकारांना रंगमंच मिळत नाही आणि त्यांना महागड्या अभिनय शाळेत जाणे जमत नाही अशा कलाकारांसाठी काहीतरी करावं हे त्यांचे (लक्ष्मीकांत बेर्डे ) स्वप्न होते. यातूनच या संस्थेचा जन्म झाला..अभिनेत्री प्रिया बेर्डे हे कार्य याद्वारे पुढे नेत आहेत. त्यांच्या सोबत आहेत रिचा शहाही आहेत. 
या संस्थेने आत्तापर्यंत मुंबई, बेळगांव इथे अभिनय आणि नृत्याची प्रशिक्षण शिबीरे यापूर्वी घेतली आहेत
.
कोणत्याही कलेचा प्रचार आणि प्रसार हा नेहमीच लहान मुलं आणि युवकांवर अवलंबून असतो. कलेच्या प्रचाराचे ते शिल्पकार असतात. म्हणूनच त्यांच्याकडे योग्य प्रकारे लक्ष दिले तर कलेच्या क्षेत्रात काहीतरी नक्कीच चांगले घडू शकेल या विश्वासावर कै.लक्ष्मीकांत बेर्डे फाउंडेशन आणि मास्टर इव्हेंस्ट या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन या राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन सुरु केले आहे
....

डिसेंबर १६ ह्या त्यांच्या स्मृतिदीनी दरम्यान याची अंतीम फेरी घेण्याची आय़ोजकांची इच्छा आहे..अवघ्या ५० वर्षांच्या कारकीर्दीत या बहुगुणी आणि बहुरुपी कलावंताने आपल्या अभिनयाने महाराष्ट्राला ..तमाम मराठी प्रेक्षकांना वेड़ावून सोडले होते...या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या गुणांची आरती करून पुढील पुढ्यांना प्रेरणा देण्याचे काय या निमित्ताने होत आहे, ही सर्वात आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल.




सुभाष इनामदार,पुणे


subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, September 24, 2012

सतार आणि जलतरंग वादनाची जुगलबंदी



श्री गणेशोत्सव मंडळातर्फे सतारवादक समीप कुलकर्णी आणि जलतरंगवादक मिलिंद तुळणकर यांची जुगलबंधी युनायटेड वेस्टर्न सभागृहामध्ये जोरदार रंगली. पाण्यावर उमटणारे सुरांचे तरंग आणि २० तारांमधून उमटणारे सतारीचे सूर यांची सांगड भारतीय शास्त्रीय संगीतातून घालण्याची वेगळ्या प्रकारच्या कार्याक्रमाची संकल्पना समीप कुलकर्णी यांची होती. 

 

कार्यक्रमाची सुरुवात जलतरंगवर राग किरवाणी मधील एका रचनेने झाली. त्यानंतर नुकताच जपान दौरा गाजवून आलेल्या समीप कुलकर्णी यांनी राग यमन मध्ये शांत व मनमोहक आलापीने रसिकांच्या मनाच्या तारा छेडल्या. त्यानंतर सतार व जलतरंग या दोन्ही वाद्यांवर जोड आणि झाला दोघांनी एकत्र वाजवला. त्यानंतर दोघांनी ताल रूपक, मध्य तीनताल, द्रुत तीन ताल आणि अति द्रुत तीनताल मध्ये चार बंदिशी सादर केल्या.  

सूर आणि तालावरील कमालीच्या प्रभुत्वाची रसिकांना अनुभूती आली. कुलकर्णी यांची ही ६३२ वी मैफिल होती, भारताबरोबर या आधी अमेरिका, युरोप, जपान, सिंगापूर, थायलंड, जपान अशा अनेक देशात त्यांनी मैफली गाजवल्या आहेत. 
व्यवसायाने आयटी इजीनियर असलेल्या कुलकर्णी यांनी हॉलीवूडच्या दोन चित्रपटात वादन पण केले आहे. 
तुळणकर यांनी भारत, कॅनडा, अमेरिका, दुबई अशा अनेक देशात सतार व जलतरंगच्या जुगलबंधीचे कार्यक्रम गाजवले आहेत. 
राग यमनमध्ये सतारीवर 'जब दीप चले आना', 'आज जाने कि जिद ना करो', 'जिंदगी के सफर रंग लाते है' अशा हिंदी गीतांनी कार्यक्रमामध्ये रंगत आणली. 
कार्यक्रमाचा शेवट समीप कुलकर्णी यांनी राग दरबारी मध्ये फ्युजन सादर करून केला. 

कार्यक्रमाला तबल्याची साथ गणेश तानवडे आणि ड्रम्सची साथ योगेश वाघ यांनी केली.

Monday, September 17, 2012

गुरुची नक्कल टाळा- सईदुद्दीन डागर




शनिवारी झालेल्या डॉ. प्रभा अत्रे यांच्या ८१ व्या सत्कार सोहळ्याच्या पाठोपाठ 'गानवर्धन' आणि 'तात्यासाहेब नातू फाउंडेशन'च्या वतीने दिला जाणारा 'स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार'  तरुण आणि शास्त्रीय संगीत पुढे नेणारा तडफदार गायकाला दिला जाणारा पुरस्कार सोहळाही रविवारी टिळक स्मारक मंदिरात असाच रंगला..यंदा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा शिष्य आणि बालगंधर्व चित्रपटाने बहुचर्चीत झालेला गायक आनंद भाटे यांला तो सन्मानपूर्वक डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या हस्ते दिला गेला.
पुरस्कार सोहळ्यानंतर आनंद भाटे यांनी सादर केलेला राग पूरिया कल्याण आणि त्यानंतरची विलंबित बंदिश ऐकून श्रोत्यांना काही काळ पंडितचींच्या गाण्य़ाचा या कलावंतात स्पर्श असल्याची जाणीव झाली.. आनंद भाटे यांची शास्त्रीय संगीतातील तयारी आणि त्याची स्वरांची बैठक तेवढीच बोलकी असल्याचे रसिकांना मनोमन पटले...किराणा घराण्याच्या अभ्यासू ..विचक्षण अशा गायनाने संपन्न असा डॉ. प्रभा अत्रे यांनीही आनंद भाटेच्या गायनाला तन्मयतेने दाद दिल्याचे रसिक अनुभवित होता..

बसंत रागातल्या काही बंदिशी सादर करुन तर आनंद भाटे यांनी प्रेक्षागृहातून वारंवार टाळ्यांचे कौतूक ऐकले. डॉ. प्रभा अत्रे यांनी रचलेली आणि नुकतीच त्याला शिकविवेली रचना `देवा लंबोदर गिरीजा नंदना`, त्यांच्यासमोर सादर करतानाही तिच मोहकता आणि स्वरांचा लगाव कायम ठेवला..
शेवटी पं.भीमसेन जोशी या गुरुचे अजरामर भजन ..जो भजे हरि को सदा...त्यांच्या आठवणींना उजाळा देत कमालीच्या तडफदारपणे आणि रंगतदार गाऊन तन्मयता आणि स्वरांवरची फिरत आणि सादरीकरणातली आर्तता सारेच दाखवून दिले.. त्यांना तबला साथ केली ती भरत कामत यांनी तर संवादिनीवर संगत केली ती सुयोग कुंडलकर यांनी तेवढीच मोहक.

आरंभी पुरस्कार सोहळ्यात `गुरूंना खूप शिष्य मिळतात आणि शिष्यांनाही खूप गुरू मिळतात. पण ज्या गुरूंमध्ये कलेची ताकद असते, त्यांचे शिष्यच गायक बनतात. गुरूंच्या कलेची ताकद शिष्याच्या कलेतून समोर येते. तुम्ही ज्या गुरूंकडून संगीताचे धडे घेतले, त्यांची कला पुढे नेणे ही शिष्याची जबाबदारी आहे; पण गुरूची नक्कल मात्र करू नका,` असा कानमंत्र उस्ताद सईदुद्दीन डागर यांनी दिला.
डॉ. अत्रे म्हणाल्या, 'या क्षेत्रातील ही पिढी कर्तबगार आहे. नवीन मुले आव्हानांना सामोरे जातात. स्वत:चा वेगळा व्यवसाय आणि संगीतकलेची जोपासना अशा दोन्ही गोष्टी ही पिढी सर्मथपणे करते आहे..'


पुरस्कारानिमित्त बोलताना भाटे म्हणाले, 'मी या क्षेत्रात अगदी नवखा असताना गानवर्धन संस्थेने मला प्रोत्साहन दिले. नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य या संस्थेकडून केले जाते. त्या संस्थेकडून मला मिळालेला पुरस्कार मौल्यवान आहे.' याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कृ.गो.धर्माधिकारी यांनी संस्थेचा उद्देश स्पष्ट केला..तर राजेंद्र कंदलगावकर यांनी आनंद भाटेच्या कारकीर्दीविषयी आपले निरिक्षण नोंदविले.

तात्यासाबेह नातू फौंडेशनच्या वतीने बोलताना शारंग नातू यांनी यापुढे आम्ही हा पुरस्कार सुरु ठेवणार असून यापुढे कथ्थक नृत्यातील कलावंतासाठी स्वतंत्र पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी केली. अपरिचित कलावंतांचे कार्यक्रम करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे उद्दीष्ट स्पष्ट केले.

दोन दिवसांच्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला सोहळा आणि त्यानंतरचे कलावंताचे गायन यातूनच संस्थेची काटेकोर शिस्तही नजरेतून सुटली नाही..खरं तर यामुळेच हा यशस्वी झाला म्हटले तरच ते योग्य ठरेल.




सुभाष इनामदार,पुणे


subhashinamdar@gmail.com


9552596276





(यातील सारी छाय़ाचित्रे आहेत नव्यानेच छायाचित्रांच्या व्यवसायात आलेल्या नचिकेत सुरेश जोग यांची..)