subhash inamdar

subhash inamdar

Monday, April 7, 2014

नाट्यपदांची रंगत वाढत गेली..

 विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान निर्मित कार्य़क्रम



नाट्यसंगीत गाणारे तीस चेहरे जेव्हा एकापाठोपाठ पुण्यातल्या गांधर्व महाविद्यालयातल्या  पं. विष्णू दिगंबर पलुस्कर मंचावर सलग सोळा पदं सादर करतात तेव्हा नक्कीच मराटी संगीत नाटक अजुनही पुढच्या पिढीपर्यत नाट्यसंगीताच्या माध्यमातून का होईना पोहोचले आहे याचे समाधान होऊन मन पुन्हा एकदा त्या जुन्या धुप आणि नादीनं सुरु होणा-या  संगीत नाटकांकडे धाव घेते.


रविवारी, ६ एप्रिल १४ ला विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानच्या वतीने  पुण्यात नाट्यसंगीत पदविका अभ्यासक्रमाच्या कलाकारांनी आपला नाट्यसंगीताचा कार्यक्रम सादर केला..शुभदा दादरकर, श्रीकांत दादरकर आणि मधुवंती दांडेकर यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते..त्यांच्या नाटयसंगीतातल्या तयारीने पुणेकर रसिक भरावला गेला नाही तरच नवल. 
विद्याधर गोखले यांनी १४ संगीत नाटके लिहून त्यातून मराठी संगीत नाटकांची परंपरा पुढे झेपावत नेली..

आता संगीत नाटके फारशी होत नाहीत. मात्र नाट्यसंगीताला रसिकांच्या मनात अजुनही अढळ आणि अतूट  स्थान आहे...हे जाणून या प्रतिष्टानमार्फत नाट्य संगीताचे दोन वर्षाचे पदविका शिक्षण दादर (मुंबई), ठाणे आणि  पुण्यात दिले जाते..ठाणे वगळता इतर ठिकाणी  येणा-या कलावंतांत पुरुषांचा सहभाग जेमतेम असतो अशी खंत श्रीकांत दादरकर व्यक्त करतात..इथेही महिलांचा अधिक ओढा आणि चिकाटी दिसते.

विद्याधर गोखले यांची कन्या आणि  संगीत नाटकातून भूमिका केलेल्या उतम संगीत कलाकार शुभदा दादरकर, पं. रामदास कामत, आर्चना कान्हेरे, ज्ञानेश पेंढारकर यांनी नाट्यसंगीताचा हा ठेवा पुढल्या पिढीपर्यंत नेण्यात मोठीच मजल मारली आहे.





रविवारच्या या नाट्यसंगीताच्या मैफलीची रंगत आणणा-या राधाधर मधु मिलिंद, फुलला मनी वसंत बहार, एकला नयनाला, नयने लाजवीत..किंवा गौरी मनहारी, येतील कधी परतून, सुरसुख खनी किंवा श्रीरंगा कमलाकांता सारख्या पदांना आमच्या मनात पुन्हा एकदा त्या गीतांची मोहिनी गंधीत करण्यासाठी विदुला जोशी, डॉ. जयश्री बहुलीकर, हर्षदा कारेकर, धनश्री लोणकर, संहिता देशपांडे, स्वरुपा करंदीकर, शरयू कुलकर्णी, किशोरी तांबोळी, राधिका ठुसे, नम्रता महाबळ, अपर्णा कुलकर्णी, देवेंद्र पटवर्धन, नीला किल्लेदार आणि स्वाती गणपुले या कलावंतांची पदे समोर कानावर पडत गेली..आणि एकूणच नाट्यसंगीताचा प्रवास सुरु राहिला..निवेदनातून माधवी केळकर यांनी ती पदे एकमेकात गुंफली.

दोन वर्ष पुर्ण झालेल्या कलावंतांचे स्वतंत्र पद तर ज्यांना एक वर्षच झाले आहे त्यांनाही नांदी ते भैरवी अशी मोहक पण वातावरण निर्मिती करणा-या पदांत समाविष्ट करुन एकुणात सुमारे तीस कलावंतांची हजेरी या व्यासपीठावर लागली.
आता नवीन कलावंतांची रितसर नोंदणी करण्यासाठी त्यांची तयारी २० एप्रिलला पुण्यात होऊन त्यातल्या कांहीना पुढच्या वर्षी या प्रतिष्टानच्या अभ्याक्रमात सहभागी होता येणार आहे.. यात अगदी तरुण आणि साठीच्या महिला कलावंताचा सहभाग आहे.

एकूणातच पुण्यातल्य़ा कार्य़क्रमात मला भावलेली काही नावे म्हणजे..हर्षदा कारेकर, स्वरुपा करंदीकर, किशोरी तांबोळी, राधिका ठुसे आणि नम्रता महाबळ  अशी सांगावी लागतील.
एकूणच या पारंपारिक पदांना झुलवीत प्रसंगी पुढचा सूर देणारा तरुण ऑर्गनवादक हिमाशू जोशी आणि हार्मानियमवर केदार तळणीकर तर तबल्यावर विद्यानंद देशपांडे आणि संतोष अत्रे यांची संगत मेहनत नाट्यपदांना आकार देत होती.
आपल्या गायकीने संगीत नाटकांत भुमिका करणारे ज्येष्ठ  गायक नट नारायण बोडस या कार्यक्रमाला अखेरपर्य़त. हजर होते. तर मुकुंदराज गोडबोले, संगीतकार गिरीश जोशी , गायिका कविता टिकेकर असे कलावंतही  क्रिकेट विश्वातली महत्वाची लढत सोडून खास उपस्थित होते.

विद्याधर गोखले यांच्या `बावनखणी `नाटकातल्या -प्रेमरंगामध्ये रंगलेल्या होळीच्या गीताने वेगळीच धुंदी आणत कार्यक्रमाची समाप्ती झाली.
कमीत कमी वेळात नाट्यसंगीताचा हा नजराणा देण्यासाठी घेण्यात महनतीला खरा रंग इथे आला..तेच नाटकाचे सूर आता रंगमंचावर नाटकातून प्रत्यक्ष  कधी पहायला मिळतील याची ओढ यामुळेच तर निर्माण झाली.  


-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276





No comments:

Post a Comment