subhash inamdar

subhash inamdar

Friday, March 8, 2013

स्मरण गुरुंचे..पं.गजाननबुवा जोशी यांचे


 
सातत्याने दहा वर्ष आपल्या गुरुंचे स्मरण करणारा कलावंत म्हणजे..ज्येष्ठ व्हायोलीन वादक पं. भालचंद्र देव. नित्य वसा घतल्यासारखे ते एकट्याने आपल्याला झेपेल, पटेल आणि परवडेल अशा पध्दतीने त्यांचे गुरु पं. गजाननबूवा जोशी यांची जयंती ते फेब्रुवारीत साजरी करुन त्यांच्यास्मृतींना आपला कलेतून वंदन करीत असतात. त्यांच्या जीवनात गुरुंचे स्थान महान आहे.

रविवारी २४ फेब्रुवारी २०१३ला यंदाही त्यांना पुण्यात ही मैफल आयोजित केली. केवळ तेच नव्हे तर त्यांची कन्या आणि शिष्या सौ. चारुशीला गोसावी यांचेसह ते व्हायोलीन वादन सादर करतात.
आपल्या शिवाय दोन वर्षापूर्वी पं. रत्नाकर गोखले आणि यंदा सौ.निलिमा राडकर या व्हायोलीन वादकांना त्यांनी या सेवेत रुजू करुन घेऊन आपला परिवार वाढता केला आहे.

यंदाची मैफल त्यांना निलिमा राडकर यांच्या वादनाने केली. राग पुरिया कल्याण सादर करुन व्हायोलीनचे सूर सांधत एक सुरेल सेतू त्यांना रसिकांच्या मनात झुलता ठेवला..

पं. भालचंद्र देव आणि सौ. चारुशीला गोसावी यांनी जुगलबंदीच्या स्वरुपात राग जनसंमोहिनी सादर करुन रसिकांना आपल्या वादनाने संमोहित केले, असे म्हटले तर ती अतिशयोक्ति होणार नाही.

पुन्हा एकदा मंचावर येऊन प्रथम पिलू रागातली धून आणि नंतर भाग्यदा लक्ष्मी बारम्मा हे कानडी भजन आणि जयोस्तुते उषा देवते ही वेगळ्या शैलीतले गीत हळूवार हातांतल्या नजाकतीने व्हायोलीनच्या सूरावटीतून निलिमा राडकर यांनी पेश केले.

यावेळी शास्त्रीय संगीताच्या जोडीला नव्हे तर त्यापेक्षा अधिक संख्येने भजन, नाट्यगीत आणि भावगीतांना या कार्यक्रमात स्थान लाभले.

लावली थंड उटी हे नाट्यपद, हे सुरांनो चंद्र व्हा हे भावगीत आणि तीर्थ विठ्ठल हा अभंग अशा तीन रुपात चारुशीला गोसावी यांनी आपल्या बहारदार वादनातून रसिकांना मोहवून टाकले.

पं. देव यांनीही ऋणानुबंधाच्या, काटा रुते कुणाला आणि निजरूप दाखवा हो हा अभंग सादर करुन स्वरबहारने आयोजिलेल्या मैफलीत रसिकांची वाहवा मिळविली.





सा-या कार्यक्रमाचे निवेदन राजय गोसावी यांनी केले तर तबल्याची साथ लाभली ती रविराज गोसावी या बुध्दीनिष्ठ कलावंताची..

पं. गजाननबुवा जोशी हे नाव शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात झळकले ते तेजःपुंज ता-या प्रमाणे.. त्यांचे शिष्यही हा वसा आपल्या परिने पेलण्याचा प्रयत्न करत त्यांचे नावही पुढच्या पिढापर्यंत नेताहेत हेच विशेष...




-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments:

Post a Comment