subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, November 22, 2011

सचिन करंबेळकर... काही आठवणी

सचिन करंबेळकर यांचे दुखःद निधन २, डिसेंबर २०१० ला झाले याला यंदा वर्ष पूर्ण होईल. त्यांची स्मृती जपली जावी यासाठी "अक्षय लावणी " चा विशेष कार्येक्रम २, डिसेंबर २०११ ला संध्या. ५.३० वाजता कलावंतांच्या वतीने पुण्यात भरत नाट्य मंदिरात आयोजित केलाआहे.
एक कलावंत आणि एक माणूस म्हणून त्यांच्या विषयीच्या माझ्या मनात येतात.


तो केवळ एक गायकच नव्ह्ता तर अनेक कला त्याच्या ठाई होत्या. एक उमदा परंतु
तेवढाच हळव्या मनाचा कलाकार होता. एखाद्या कलाकाराची कला फुलण्याचे खर तर त्याचे वय होते.

सचिनला जेंव्हा मी प्रथम बघितले ते मराठी रंगभूमीच्या "शाकुंतल" या नाटकाच्या तालमीच्या वेळेस तेंव्हा तो अगदी लहान म्हणजे फार तर ६-७ वर्षाचा असेल. "भरत" म्हणजे सर्वदमन ही भूमिका तो करायचा.आणि ती ही शेवटच्या अंकात.होती. संगीत नाटक असल्याने कितीही उशीर झाला तरी तो कंटाळायचा नाही.उलट न अडखळता, न भिता, खणखणीत पणे आपले संवाद चोख बोलायचा. गाणी मात्र आवडीने ऐकत बसायचा.

" संगीत शारदा" मधे शारदेच्या छोट्या भावाची जयंताची भूमिका तो अतिशय विनोदी पद्धतीने करायचा आणि भरपूर टाळ्या आणि हंशे मिळवायचा. टाळ्या मिळाल्या की खुशीने ओठातल्या ओठात हसणारा सचिन आजही डोळ्यासमोर येतो. तो एक उत्तम अभिनेता होता. बालकलाकार होता.


त्या नंतर ४-५ वर्षापूर्वी सचिन मला भेटला तो माझ्या "अक्षय लावणी" या लावणी गीत गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, तीस वर्षानंतर आणि आश्चर्य म्हणजे जुन्या आठवणी काढताना नाटकातल्या त्याच्या संवादा बरोबरच बरोबर त्या वेळचे आमचे संवादही त्यांनी इतक्या वर्षांनी चोख म्हणून दाखवले. त्यावेळेच्या तालमीच्या आणि बाहेरगावच्या कार्येक्रमाच्या अनेक गमतीजमती त्याला आजही आठवत होत्या.त्याच्या स्वभावामुळे ४-५ वर्षात तो माझा धाकटा भाऊ कधी झाला ते मला कळलेही नाही. त्याला स्टेज ची भीती कधीच नव्हती.त्याच्याकडे जबर आत्मविश्वास आणि दांडगी स्मरणशक्ती होती.
गातानाही स्टेजवर त्याला कधीही वही समोर ठेवण्याची गरज भासली नाही

बघता बघता कार्यक्रमाचे निवेदनही आयत्या वेळेस तो सहजपणे करे. पुण्यातील अनेक गुणी गायक-वादक कलाकारांना त्याने त्याच्या कार्येक्रमातून स्टेज मिळवून दिल्यामुळे त्यांची नावेही आज मोठी झाली आहेत. आणि ते कलाकारही हे मान्य करतात.
अनेकांना सदैव कुठल्याही मदतीला तत्पर असलेला सचिन सर्वांनाच आपलेसे करायचा.
प्रेमळ स्वभाव आणि मनाचा हळवेपणा असल्यामुळे कोणी तोडून बोलले किंवा विश्स्वासघात केला की मात्र सहन करणे त्याला अवघड जायचे अभिनया बरोबरच एक उत्तम गायक म्हणून तर दूरदर्शन आणि अनेक स्टेज शो केले. सूर-ताल, नक्षत्रांचे देणे, ग.दिमा गीते या मधून त्यांनी महाराष्ट्र भर नावलौकिक मिळवला.
सुधीर फडके यांच्या सारख्या जेष्ठ कलाकारांनीही त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती.अनेक जुनी जुनी अनवट गाणी शोधून काढून ती कार्येक्रमात घेऊन रसिकांची दाद मिळवायचा.

वाचनाच्या आवडीपोटी अनेक पुस्तके तो वाचत असे आणि त्यावर चर्चाही करत असे..शिवाय त्याने अनेक उच्च दर्जाच्या कविता लिहिल्या असे त्यांची बहिण वैशाली सांगते.
त्याच्या हातात तर विलक्षण जादू होती. अनेक प्रकारच्या पगड्या, टोप्या, जिरेटोप , फेटे तो बनवत असे. अनेक ऐतिहासिक नाटकांना, मालिकांना , चित्रपटांना त्या भूमिकेचा अभ्यास करून तो टोप, जिरेटोप बनवून देत असे.

खरोखरीच ! सचिन म्हणजे जमिनीवर पाय असलेला आणि अंगी अनेक गुण आणि कला असलेला एक हरहुन्नरी कलाकार होता.



सौ. धनश्री तुळपुळे (भोगले )
११०३ अ/४ शिवाजीनगर
पुणे -४११०१६
9881128386

No comments:

Post a Comment