गळ्यामधल्या सूराने असहकार पुकारला म्हणून हिरमुसून जाऊ नये
पण मनातला सूर मात्र कधी हरवू देऊ नये
आत्तापर्यंत प्रयत्न केली की, रसिकांनी दाद द्यावी
आता अपणही निर्मळ मनाने त्याची परतफेड करावी
आपल्या सूरांच्या हिंदोळ्यावर आपण मस्त झूलत रहावे
ईशवराने दिलेल्या अमूल्य दानाने समाधान मानावे
प्रत्येक गोष्टीला ह्या जगांत शेवट हा असतोच
पण हा सूर अंतिम क्षणाला मांगल्याचे वलय देतो.....
भारत गायन समाजाने आपल्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संगीतभूषण पं.राम मराठे यांच्या २२व्या स्मृतिदीनी त्यांच्या नावाचा २५ हजार रूपयांचा पुरस्कार संगीत रंगभूमीवर आपले स्वतंत्र स्थान निर्माण करून पं. राम मराठे यांच्याबरोबर कामकरणा-या ज्येष्ठ आभिनेत्री सौ. निर्मला गोगटे यांना नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष आणि गायक नट पं. रामदास कामत यांच्या हस्ते सोमवारी संध्याकाळी पुण्यातल्या एस एम जोशी सभागृहात समारंभपूर्वक देण्यात आला. यावेळी आपल्या भावपूर्ण मनोगताबरोबरच निर्मला गोगटे यांनी तयार केलेल्या वरील ओळी बरेच काही सांगून जातात. त्याच तुमच्यापुढे ठेवल्या आहेत.
मा. कृष्णराव फुलंब्रीकर आणि त्यांचे शिष्य पं, राम मराठे दोघांचेही ललितपंचमीचे दिवशी निधन झाले. म्हणून या दोन महान कलावंतांची स्मृती या निमित्ताने भारत गायन समाजाकडून जपली गेली. दोन्ही महान कलावंतांच्या श्रेष्ठत्वाचे गोडवे समाजाचे पदाधिकारी सुहास दातार यांचेकडून सविस्तर सांगितले गेले. पुरस्कार वितरण समारंभानंतर दोन्हीही दिग्गजांनी गाजविलेली नाट्यपदे रसिकांसमोर सादर कली गेली. मुंबईचे शेखर खांबेटे यांनी यानिमित्ताने निवेदनातून आणि आपल्या तबला साथीद्वारे मास्टर कृष्णराव आणि राम मराठे यांच्या नाट्यगीतांचा आस्वाद घडविला. सुरेश बापट, सावनी कुलकर्णी, मेधा गोगटे यांनी सादर केलेल्या पदांना ऑर्गनची साथ मकरंद कुंडले यांची होती.
सो. निर्मला गोगटे २ नोव्हेबर २०११ ला पंचाहत्तरी पूर्ण करतील. एके काळी मा. दत्ताराम, पं. राम मराठे, छोटा गंधर्व, भालचंद्र पेंढारकर, रामदास कामत अशा अनेक दिग्गज कलावंतांबरोबर केल्ल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. आता त्याला ३५ वर्षे लोटली. मात्र आजही त्यांच्या कारकीर्दीचे संदर्भ दिले जातात. त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते. त्यांच्याविषयीचे प्रेम आजही व्यक्त केले जाते. मकरंद कुंडले आणि त्यांची कन्या मेधा गोगटे यांनी छोटेखानी भाषणे करुन त्यांच्याविषयीचा आदर आणि त्यांनी घेतलेले अपार कष्टाची उजळणी केली.
पुरस्कार दिल्यानंतर केलेल्या वक्तव्यात रामदास कामत यांनी निर्मला गोगटे यांच्याबरोबर काम करण्यातला आनंद व्यक्त केला. त्यांच्याविषयी सांगताना ते म्हणाले,` शास्त्रीय संगीता त्यांनी जेवढी उंची गाठली तेवढीच उंची नाट्यसंगीतातही गाठली आहे. श्रेष्ठतम संगीतकाराच्या नावाने त्यांना हा पुरस्कार मिळाला हे उचित झाले. त्यांनी बालगंधर्वांची गायकी शिकली ती बालगंधर्वांबरोबर काम करणा-या कृष्णराव चोणकर यांच्याकडून. त्यांच्या संगीत नाटकातल्या भूमिकाही तेवढ्याच रंगल्या.`
खरे म्हणजे सर्वच समकालिन मोठ्या कलावंतांनी मला समजून घेतले. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी दिली, याबद्दल श्रेय देताना त्याकाळचे आनंदी वातावरण अधिक आनंदी कसे राहिल असे सर्वांनीच पाहिल्याने नाटकात काम करण्याचा आनंद मिळाल्याचे सो. गोगटे सांगतात. १६व्या वर्षी पहिले पाऊल टाकेल. १८ व्या वर्षी मृच्छकटीक या संस्कृत नाटकात काम करून धीटपणा आल्याचे त्या म्हणतात. नाटकतातल्या अगदी पडद्यामागच्या लोकांनीही प्रेम दिले. निष्ठावान कलावंतांबरोबर काम करण्यामुळे खूप शिकायला मिळाले. साधी पण महान माणसे नाट्यक्षेत्रात होती. त्यानी कधीही प्रस्थापित असल्याचे न भासवता माझ्यासारख्या नवख्या कलाकारांना प्रोत्साहन दिल्यानेच माझी कारकीर्द बहरु शकली.
वलयांकित असूनही साधेपणाचे उदाहरण या समारंभाच्या निमित्ताने दिसले. भारत गायन समाजाने या ज्येष्ठ गुणी कलावंताला पुरस्कार देऊन त्यांची आठवण ठेवली याचा आनंद समारंभ पाहताना जाणवत राहिला.
-सुभाष इनामदार ,पुणे
subhashiandmar@gmail.com
Mob- 9552596276
No comments:
Post a Comment