- निर्मला गोगटे
आपल्या वयाला २ नोव्हेंबर २०११ ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मराठी संगीत रंगभूमिवर स्वतःची स्वतंत्र छाप पाडणा-या.. संस्कृत नाटकापासून वयाच्या १६ व्या वर्षी `मृच्छकटिक` नाटकात काम करुन सुमारे ३५ वर्षे अनेक संगीत नाटकात भूमिका केलेल्या सौ. निर्मला गोगटे आपल्या कारकीर्दीविषयी भरभरुन बोलत होत्या..
“आजच्यासारखी परिस्थिती असती तर माझ्यातली कलाकार स्त्री कुठच्याकुठे पोचली असती...ज्या काळात मी काम करायला लागले तो काळ स्त्रीयांना मानसिक दडपणात ठेवणारा आणि समाजाचा दबाव असेलला होता. तरीही मला जेवढे शक्य झाले तेवढ्या प्रामाणिक पणाने मी संगीत रंगभूमिवर अपार मेहनत घेऊन भूमिका केल्या. आज मी त्याबद्दल काही अंशी का होईना समाधानी आहे.. मात्र नवी पीढी शास्त्रीय संगीतात आपला ठसा उमटविणारी आहे. हुशारही आहे. काळाप्रमाणे स्वतःला घडविणारी मेहनती आहे.”...
सी. आर. व्यास, व्ही. आर. आठवले, बी.आर. देवधर, जी.डी. अग्नी, जगन्नाथबुवा पुरोहित, कृष्णराव चोणकर, राम मराठे अशा गुरुंकडून तालीम घेऊन स्वयंवर, सौभद्र, मानापमान, सत्याग्रही, संशयकल्लोळ, शारदा, विद्याहरण, एकच प्याला, मृच्छकटिक, सुंदरा मनामध्ये भरली आशा अनेक संगीत नाटकात नायिकेच्या रुबाबात दिसणा-या आणि तेवढ्याच जिद्दीने नाट्यसंगीताचा खजाना संगीत रसिकांसमोर सादर करणा-या या कलावंत... आजही तेवढ्यात डौलाने वावरताहेत. उत्तम कांती, तजेलदार आणि आनंदी चेहरा, स्वरांशी नाते कायम ठेवत रंगभूमिवरच्या नाटकांबाबतच्या साक्षीदार असलेल्या निर्मला ताई बोलत होत्या.
शास्त्रीय संगीताची बैठक पक्की करुन नाट्यसंगीतात स्वतःचे नाव कमावले. आणि आज स्वरांशी नाते घट्ट पकडून ठेवत सुमारे दहाएक शिष्यांना ही कला शिकविण्यासाठी तत्परतेने उभ्या असलेल्या सौ. निर्मलाताई गोगटे यांच्याशी बोलताना त्यांनी पाहिलेल्या संगीत रंगभूमीवरच्या अनुभवांचे नमुने ऐकत मीही त्यात रंगून गेलो.
वसंतराव देशपांडे, राम मराठे, सुरेश पळदणकर, छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर, नारायण बोडस, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, भालचंद्र पेंढारकर, मास्टर दामले, सरस्वतीबाई राणे, नानासाहेब फाटक, मा. द्त्ताराम, परशुराम सामंत अशी कित्येक दिग्गजांची नावे बोलण्याच्या ओघात ओठी येतात.
नानासाहेब फाटकांसारखा नट होणे नाही...सांगताना त्या म्हणतात `त्यांचे गद्य संवाद हे पद्यासारखे लयदार असत. काय त्यांचे वावरणे. संवादातली ताकद तर औरच`.
आजवर शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफली केल्या. अगदी पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या दर्दी श्रोत्यांची दाद मिळविली. नाट्यसंगीत गायले. मात्र नाव मिळाले ते संगीत रंगभूमिवरच्या कामामुळे. माहेरी वडील डो. बापट यांच्या पाठिंब्यामुळे आणि इकडे म.ना. गोगटे यांच्या संमतीमुळे.
सुमारे ६३ वर्षे मुंबईत वावरल्यानंतर गोगटे पती-पत्नींनी पुण्यात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. नबी पेठेतल्या भारतरत्न कै. भीमसेन जोशी यांच्या घरामागच्या परिसरात ते आज दोघेही शांततामय सहजीवनाचा आनंद घेताहेत. एक मुलगी अमेरिकेत तर दुसरी मुंबईत संसारात रमली आहे. आता संगीत दान हेच धेय्य मनाशी ठरवून ठराविक निवडक साधकांना शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचे शिक्षण देत आहेत. त्यांच्याकडे शिकणा-यांना अट एकच स्वर तंबो-यावर लावायचा. सुगम जरी गायचे तरी सूर तंबो-यावर जुळला पाहिजे. आजही कुणी नाटकात काम करायला सांगितले तरी सगळी संगीत नाटके पाठ असल्यामुळे तयारी आहे... सहजच त्या उद्गारतात..
पती इंजीनियर. आता रिटायर्ड जीवन जगताहेत. मराठी विज्ञान परिषदेचे काम करत कार्यरत आहे.
निर्मला ताई...कधी कधी काही कविता, लेख लिहितात. त्यातल्या कांहींचा लाभही तुम्हाला कधी मी देणार आहे. आज मात्र त्यांच्या या ओळींनी या लेखाची सांगता करु या.... आणि त्यांच्या यापुढल्या जीवनात त्यांच्यातल्या जिद्दीला दाद आणि मनात ठरविलेल्या कार्याची महत्वाकांक्षा कायम रहावी अशी नटेश्वरापाशी प्रार्थना....
गळ्यामधल्या सूराने असहकार पुकारला म्हणून हिरमुसून जाऊ नये
पण मनातला सूर मात्र कधी हरवू देऊ नये
आत्तापर्यंत प्रयत्न केली की, रसिकांनी दाद द्यावी
आता अपणही निर्मळ मनाने त्याची परतफेड करावी
आपल्या सूरांच्या हिंदोळ्यावर आपण मस्त झूलत रहावे
ईशवराने दिलेल्या अमूल्य दानाने समाधान मानावे
प्रत्येक गोष्टीला ह्या जगांत शेवट हा असतोच
पण हा सूर अंतिम क्षणाला मांगल्याचे वलय देतो.....
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
Mob- 9552596276
No comments:
Post a Comment