subhash inamdar

subhash inamdar

Sunday, February 19, 2012

गोनीदांच्या श्रींची इच्छेने श्रवणसंपुटे तृप्त जाहली


पुण्याच्या पावन विश्रामबाग वाड्यातील भवानी महालात महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या विद्ममाने शिवजयंतीच्या पावन दिवशी गो.नी. दांडेकरांच्या लेखणीतून साकारलेले `हे तो श्रींची इच्छा`च्या कादंबरीच्या अभिवाचनातून उपस्थित शिवप्रमी संतुष्ट जाहले. रविवारची संध्याकाळ. १९ फैब्रुवारी. २०१२. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत गोनदांच्या कन्या आणि साहित्यिक सौ. वीणा देव यांच्या पुढाकाराने शिवराज्याभिषेकावर आधारित असलेले हे लेखन प्रभावीपणे सादर झाले.

राज्याला छत्रपती देणारा सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक त्याची सारी पार्श्वभूमी त्यावेळचे सारे वातावरण आणि त्याकाळाची परिस्थितीचे यथोचित सादरीकरण या अभिवाचनातून श्रोत्यांच्या कानी पडले..एकूणच श्रवणसंपुटे तृप्त झाली.




सासू (डॉ.विणा देव), सासरे (डॉ.विजय देव) जावई (रुचिर कुलकर्णी) आणि नातू (विराजस कुलकर्णी) यांनी आपल्या प्रभावी वाचनातून सारा तो सोहळा..आउसाहेब आणि शिवाजी महाराज यांचे पुत्रप्रेम. गावोगावच्या लोकांना झालेला आनंद. गागाभट्ट आणि कवीभूषण यांच्या उपस्थित झालेल्या राज्याभिषेक सोहळ्याची वर्णने...सारेच ऐकून उपस्थित सारेच शिवाजी महाराजांच्या त्या काळात न्हाऊन निघाले.

गोनि दांडेकरांच्या संवादातील प्रतीभा..नव्हे त्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलेले असावे असे लेखणीतील जीवंतपण ही त्या लेखनाची ताकद होती. ते वाचन करताना सारेच अभिवाचक त्या काळात रमून तुमच्याशी जणू ती गोष्ट सांगताहेत असा भास होत होता.

राजगडावर ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होऊन महाराष्टाराचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांना राज्याभिषेक कसा झाल्या त्याचे वर्णन कानात टिपून घेत श्रोतेही त्याकाळात स्वतःला नेत होते. ती भाषा. ती भावना आणि लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा अतिव आदर सारेच इथे ओतप्रोत दिसत होते.

विश्रामबागवाड्याच्या त्या महालात झुंबरांच्या साक्षिने आणि देखण्या ऐतिहासिक दरबारात बसून ऐकताना जी वातावरण निर्मिती झाली ती शब्दात सांगणे कठीण आहे. त्यासाठी पुन्हा एकदा असा अभिवाचनाचा कर्यक्रम होणे आवश्यक आहे.



सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, February 12, 2012

व्हायोलीन गाऊ लागले..तेंव्हा....youtube वर


स्वर्गीय बाबा आमटे यांनी रुजविवेल्या आणि डॉ. मंदाकिनी आणि प्रकाश आमटे यांनी चालविलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीसाठी रविवारी पुण्यात सौ. चारुशीला गोसावी यांचे व्हायोलीन गाऊ लागले..तेंव्हा.... टाळ्यांतून रसिकांची दाद मिळाली. बालशिक्षण मंदिराचे सभागृह व्हायोलीनच्या सुरावटींनी हेलावून गेला..कधी आनंदाने तर कधी गहि-या पण सुरेल बोलांनी.

यातून उभा राहिलेला निधी अंदाजे रक्कम सुमारे छपन्न हजार रुपये यासाठी जमा झाले..ते या व्हायेलीन गाते तेव्हा...ऐकणा-या रसिक आणि देणगीदारांच्या पाठिंब्यातून .



सांस्कृतिक पुणेचे वतीने हा दिवस नोंदविला गेला तो या एका सुरेल पण समर्थ व्हायोलीन वादकाच्या मराठी- हिंदी गितांच्या बोलांचे ध्वनी रसिकांना मोहवित गेले. अनेक संस्थांचे प्रतिनीधींच्या उपस्थितीत साजरा केला गेला हा स्वरोत्सव. अनेक वर्षांच्या वाद्यावरच्या हुकमतीनंतर चारुशीला गोसावी प्रथमच आपला स्वतंत्र वादनाचा ..तोही लाईट संगीताचा कार्यक्रम `व्हायोलीन गाते तेंव्हा...` प्रथमच सादर करीत होत्या. आणि हा सारा संकल्प लोकबिरादरी प्रकल्पाच्या निधीसाठी.हळुहळु रसिक गर्दी करु लागले.

ख्यातनाम चित्रकार रवि परांजपे. लंडन स्थित रहिवासी किशोर देशमुख. गुरू पं. भालचंद्र देव यांच्या हस्ते शुभारंभानिमित्तचा नारळ वाढविला गेला आणि...व्हायोलीन गाते झाले....


मुळातच कंठसंगीताला जवळचे सूर म्हणून संगीत क्षेत्रात लोकप्रिय असेलेल्या व्हाय़ोलीन या वाद्यावरची हुकूमत सिध्द करीत सौ. चारुशीला गोसावी ...प्रथम तुला वंदितो या स्व. अनिल मोहिले यांनी संगीतबध्द केलेल्या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. टाळ्या पडल्या..अणि एकेका गीतांच्या सुरावटीने ते सारे शब्दच जणू व्हायोलीनच्या वाद्यातून उमटू लागले.... खरचं... व्हायोलीन गाऊ लागले...

विवेक परांजपे यांच्या सिँथसाय़झरने स्वरांचा आणि गीतांच्या मधल्या सुरावटींची हरकत हुकमी ऐकत.अनिल सुखापुरे यांच्या गीटारीवरच्या स्वरांच्या कंपनातून आणि रविराज गोसावी यांच्या तबला बोलातून तालाची लय धरीत व्हयोलीन गात होते.... साथीला राजेंद्र साळुंके , मधुरा गोसावी तालवाद्यातून गाणी बोलत होती..ती रसिकांच्या ह्दयी झिरपत होती.

बाहेर लोकबिरादरीच्या निधीसाठी लोक मधूनच आपली मदत दानपेटीत देण्यासाठी येत होते. ती झोळी धनानी भरत होती. सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, जनता सहकारी बॅंक, सिंडिकंट बॅंक, फौंउंटन म्युझिक यांनी या कार्यक्रमसाठी आर्थिक मदतीचा हात दिल्याने रंगमंचावर त्यांचे नाव झळकत होते. मात्र निवेदिका सौ. विनया देसाईंच्या तोंडून जेव्हा मदतीचे आवाहन झाले तेव्हा...तिकीट काढलेला रसिकही त्या मदतीसाठी उत्सुक होऊन आपले सहाय्य करीत असल्याचे चित्रही विलोभनिय होते. तुम्ही मदत योग्य कारणासाठी मागा लोक भक्कम पाठिंबा देतात...हा अनुभव होता.


`चांदणे शिंपीत जा`, `अशी पाखरे येती`..नंतर बरसलेले `श्रावणात घननीळा`ने वन्समोअरची दाद घेतली. `काहो धरीला मजवरी राग` सारखी बैठकीची लावणीही रंगतच गेली. `जांभुळ पिकल्या झाडाखाली` या जैत रे जैत सारख्या अवघड शब्दांना लिलया व्हायोलीनवर झुलवकत गोसावी ते रंगवत होत्या...तेव्हा श्रोते त्यांच्या वादनातल्या कौशल्याने भारावून जावून दाद देत होते. `बोलो रे पपी`, `बैय्या ना धरो.`.`बाबुजी धीरे चलना` गाण्यांनी ठेका धरायला तर लावलाच पण..त्या सुरांवटींच्या हिंदोळ्यावर असेच तरंगत रहावे असेही वाटू लागले.


पं. भीमसेन जोशी ( माझे माहेर पंढरी) या भारतरत्नांच्या तोंडून गायल्या अभंगाला पेलण्याची ताकद गोसावी यांच्या वादनातून प्रकटपणे दिसत होती.

अखेरच्या टप्प्यावर या `चिमण्यांनो परत फिरा` हे अतिशय स्वरमेळांचे विविध आविष्कार घडविणारे गीत समर्थपणे सादर करून त्यांनी कमालीची घेतलेली मेहनत कारणी लागल्याचे जाणविले. `लागा चुनरीमे दाग` या लयकारींने आणि सुरावटींची मोहकता दाखविणारे गीत सादर करुन जेव्हा कार्यक्रम संपविला तेव्हा रसिकांनी ऊठून टाळ्यांचा कडकडात करून त्यांच्या व्हायोलीन कलेला दाद दिली.

असे कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध शहरात आणि हेमलकसाच्या अदिवासी मुलांसमोर सांस्कृतिक पुणेला करायचे आहेत. त्याचे हे आरंभीचे पाऊल आश्वासक आहे. त्यांच्या कार्याला आणि सौ. चारुशीला गोसावी यांच्या वादनाला आमच्या मनापासून शुभेच्छा.


व्हायोनीन गाते तेव्हा...
टाळ्यातून प्रतिसाद उमटतो ..
लोक डोलू लागतात..
भारावलेल्या मनातून सहजपणे दाद येते..
कलावंताचे कौतूक होते..
शब्दांचे सूर बनून ते बोलू लागतात.
ताल आणि लयींचा एकजीव होतो..
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते...




सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, February 7, 2012

`व्हायोलिन गाते तेंव्हा......`

रविवार, १२ फेब्रुवारी.२०१२ –सकाळी १० वाजता. बालशिक्षण संस्थेचे सभागृह (मयूर कॉलनी, कोथरुड)

डॉ.मंदा व प्रकाश आमटे यांच्या `लोकबिरादरी प्रकल्पाच्या` मदतीसाठी
आणि संगीतकार कै. अनिल मोहिले यांच्या स्मृतीला समर्पित

सांस्कृतिक पुणे आयोजित(www.culturalpune.blogspot.com)

शुभारंभाचा कार्यक्रम

`व्हायोलिन गाते तेंव्हा......`




व्हायोलीन वरील मराठी-हिंदी गीतांचा सुरेल आविष्कार
सौ. चारुशीला गोसावी

सहभागी कलाकार- विवेक परांजपे( सिंथेसायझर), रविराज गोसावी(तबला),
अनिल सुखापुरे( गिटार), राजेंद्र साळुंके आणि मधुरा गोसावी(तालवाद्ये)
सूत्रसंचालन- सौ. विनया देसाई

ति.दर रु. १०० व ५०.

शुक्रवारपर्यंत उपलब्ध- नावडीकर म्य़ुझिकल्स ( कोथरुड-२५३८८७९० व ग्राहक पेठ-२४४७४२००)
आणि शिरीष ट्रेडर्स(९४२२३०६६७०)
शिल्लक ति.वि. सभागृहावर शनिवार स.१० ते १ संध्या.५ ते ८.रविवारी तासभर आधी


संपर्क- सुभाष इनामदार( ९५५२५९६२७६) चारुशीला गोसावी (९४२१०१९४९९)

Sunday, February 5, 2012

When Violin sings..for the aid of lok biradari of Hemalkasa

पुण्यातील प्रसिध्द व्हायोलीनवादक सौ. चारुशीला गोसावी आपल्या व्हायोलीनवरील हिंदी-मराठी गीतांचा आविष्कार करणारा `व्हायोलिन गाते तेंव्हा...` हा शुभारंभाचा कार्यक्रम रविवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात (मयूर कॉलनी, कोथरुड) सादर करणार आहेत. ज्येष्ठ व्हायोलीन वादक, संगीत संयोजक आणि संगीतकार स्व. अनिल मोहिले यांच्या स्मृतीला समर्पित केला जाणार असून तो सांस्कृतिक पुणेच्या (www.culturalpune.blogspot.com) वतीने आयोजित केला आहे.

सौ. गोसावी ह्या पं. भालचंद्र देव यांच्या कन्या व शिष्या असून गेली ३२ वर्ष त्यांचे अनेक व्हायोलिनवादनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर झाले आहेत. सुगम व्हायोलिनवादनाच्या क्षेत्रातही एक उत्तम साथीदार म्हणून त्या सुपरिचित आहेत. या कार्यक्रमात विवेके परांजपे, रविराज गोसावी, अनिल सुखापुरे, राजेंद्र साळुंखे, मधूरा गोसावी हे सहकलाकार साथीला आहेत. सौ. विनया देसाई यांचे निवेदन आहे.

हेमलकसाच्या लोकबीरादरी प्रकल्पाच्या (खर्च वजा जाता सारा निधी) मदतीसाठी दिला जाणार आहे. कार्यक्रमास प्रवेश मूल्य असून कार्यक्रमस्थळीही निधी रक्कम स्विकारली जाणार आहे.

Friday, February 3, 2012

व्हायोलिन गाते तेव्हा...चा शुभारंभ लोकबीरादरीच्या मदतनीधीसाठी



हेमलकसा इथल्या डॉ. मंदा व प्रकाश आमटे यांनी चालविलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीसाठी पुण्यातील प्रसिध्द व्हायोलिन वादक सौ. चारुशीला गोसावी आपला शुभारंभाचा कार्यक्रम रविवार,१२ फेब्रुवारी २०१२ रोजी बालशिक्षण सभागृहात सकाळी १० वाजता सादर करणार असून तो सांस्कृतिक पुणे यांच्यावतीने आयोजित केला आहे. यात मराठी व हिंदी लोकप्रिय गाणी सादर केला जाणार आहेत.हा कार्यक्रम त्या ज्येष्ठ व्हायोलिनवादक, संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले यांना श्रध्दांजली म्हणून सादर करतील .सांस्कतिक पुणेच्या वतीने महाराष्ट्रात अशा प्रकारचे विविध शहरात करण्यात येणार आहेत.

हेमलकसा इथल्या आदिवासी भागात आरोग्य आणि त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ. मंदा व प्रकाश आमटे यांनी चालविलेल्या कार्याला आपण कलेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावावा या हेतूने सो. चारुशीला गोसावी यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.



व्हायोलिन वादन क्षेत्रात सौ. गोसावी गेली ३२ वर्षे विविध कार्यक्रमातून त्यांनी आपली कला पोचविली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनइल) मध्ये त्या कार्यरत असून त्यांना खात्या अंतर्गत होणा-या अ.भा. स्तरावरील शास्त्रीय संगीताच्या व्हायोलीन वादनाच्या स्पर्धेत सलग २२ सुवर्णपदके प्राप्त झाली आहेत.

त्यांनी आत्तापर्यंत २५०० कार्यक्रमामधून व्हायोलीनचा साथ केली असून १०० चे वर स्वतंत्र व्हायोलीनवादनाचे कार्यक्रमही केले आहेत. आपले वडील व गुरू पं. भालचंद्र देव यांचेकडून त्यांनी हा कलेचा वारसा घेतला आसून भारभतभर विविध कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे.

कार्यक्रमात अभंग, नाट्य़गीत, लावणी इत्यादी प्रकारही त्या व्हायोलीनमधून सादर करणार आहेत.



पुण्यातला शुभारंभाचा कार्यक्रम पुण्यात रविवार, दि. १२ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी. १० वाजता बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात( मयूर कॉलनी,कोथरूड) पुणे होणार असून त्याची तिकीटे रूपये. १०० , व ५० अशी असून ती रविवारपासून नावडीकर म्यूझिकल्स (कोथरुड व ग्राहक पेठे शेजारी),आणि कमला नेहरू उद्याना समोर शिरीष ट्रेडर्स यांचेकडे उपलब्ध होणार असून शिल्लक तिकीटे सभागृहास्थळी मिळतील.

कार्यक्रमाला आर्थिक मदत करणारे आश्रयदाते लाभले असून खर्च वजा जात सर्व रक्कम लोकबीरादरी प्रकल्पासाठी दिली जाणार आहे. ज्यांना धनादेशाद्वारे मदत करायची आहे त्यांनी तो महारोगी सेवा समिती, वरोरा (Maharogi Sewa Samiti, Warora) या नावावर काढला तर तो स्विकारण्याची सोय सभागृहात खास करण्यात आली आहे.


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, January 29, 2012

मर्मबंधातली व्हायोलीन वादनाची सुरेल संध्याकाळ..

व्हायोलीन वादनातले तीन तरबेज शिलेदार एकत्र आले. त्यांनी शास्त्रीय वादनातून आणि नाट्यगीतातून तसेच विविध धून वाजवून मन मोहित करुन तर सोडलेच..पण एक सुरेल वादनाची मंद धुंद आळवत रसिकांना मोहवून टाकले.

पुण्यातल्या भारत गायन समाजात रविवार संध्याकाळ पं. भालचंद्र देव यांनी आपल्या गुरूंच्या १०१ व्या जयंतीनिमित्त व्हायोलिन वादनाची मैफल मोठ्या श्रध्दापूर्वक आयोजिली होती. वादन आणि गायनाच्या क्षेत्रातले ते मोठे नाव म्हणजे..पं. गजाननबूवा जोशी.


दरवर्षी ते आपल्या गुरुंच्या स्मृती या माध्यमातून जपतात आणि स्वतः बरोबरच काही व्हायोलीन वादकांना खास आमंत्रित करतात.. याशिवाय आपली कन्या व शिष्या सौ. चारुशीला गोसावी हिच्यासोबत जुगलबंदीची मैफलीही रंगवतात.

सो. निलीमा राडकर या मधुकर गोडसे आणि रमाकांत परांपजे यांच्या शिष्येला आमंत्रित केले होते. त्यांनी आरंभी `चंद्रकंस` वाजविला आणि नंतर `पांडुनृपती जनकजया` हे नाट्यपद वाजवून आपली तयारी रसिकांना सादर केली. व्हायोलीन तर सुरेल होतेच..पण त्यातली खासीयत म्हणजे आपल्या नाजूक स्वरातून त्यांनी वेगळाच स्वरनाद घडविला.


जुगलबंदीच्या बैठकीवरुन पं. भालचंद्र देव आणि सौ. चारुशीला देव यांनी राग `जोग` रंगविला. त्यातली विविध आवर्तने मोहक आणि दाद मिळवून घेणारी होती. अनेक विविध कार्यक्रमातून साथ करणारे हे दोन पिता-कन्या जेव्हा स्वतंत्रपणे व्हायोलीन वादन करतात, तेव्हा त्यांच्या कसदार लयकारीची आणि स्वतंत्र बैठकीची रसिक सहजपणे दाद देताना दिसतात.

श्रीधर पार्सेकर आणि पं. गजाननबूवा जोशी यांच्या गती वाजवून त्यांनी आनंदाचे उधाण आणले. स्वतः तयार केलेली धून पं,. देव यांनी `जनसंमोहिनी` रागातली वाजविली...आपली स्वतंत्र शेली त्यांनी तयार करुन आपला वेगळा ठसा या क्षेत्रावर उमटविल्याचे चित्र स्पष्ट दिसतें.

सौ. चारुशीला गोसावी यांची वादनातली किमया...त्य़ाच तोडीची किंबहुना `बापसे बेटी अधिक`स्वतंत्र आणि शैलीचे विविध कंगोरे सादर करताना...टाळ्याही घेत होती.

दोन नाट्यपदांची झलक या दोन्ही कलावंतांनी दाखवून भैरवीने जुगलबंदीची सांगता केली. या व्हायोलीन वादनाची मोहकता आणि रंजकता वाढली ती रविराज गोसावी यांच्या तबला साथीने... सूत्रसंचालन स्वरबहारचे राजय गोसावी यांनी केले होते.



सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com

Wednesday, January 25, 2012

स्वकुलतारक सुता...



जयमाला शिलेदार.. हे नाव नुसतं उच्चारलं तरी लगेच डोळ्यासमोर त्यांचा सदा प्रसन्न हसरा चेहरा उभा राहातो. अशी काही मोजकी व्यक्तिमत्व असतात की ज्यांच्या उपस्थितीनचं सगळं वातावरणा प्रसन्न होऊन जातं.... जयमालाबाई त्यातल्याच....

नुकताच त्यांना संगीत नाटक अकादमीचा रविंद्रनाथ टोगोर पुरस्कार जाहिर झाला. त्यांच्या गायनावर प्रेम करणा-या सर्वांनाच खूप आनंद झाला. आत्तापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, पण राष्ट्रपातळीवरच्या या पुरस्कारानं आणखी एक मानंचं पान खोवलं गेलं. त्यांची आजपर्यंतची वाटचाल पाहिली की, त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वापुढं नतमस्तक व्हावसं वाटतं...



वडिलांच्या इच्छा पूर्ण करणरी लाडकी लेक. समानधर्मी कलावंताची पत्नी. गुणी कन्यांची माता. मोठा गोतावळा असलेल्या घरातली कर्तव्यदक्ष गृहिणी. संगीत रंगभूमीवर सतत २५ वर्षे नायिका रंगविणारी गानसम्राज्ञी.....अगणित शिष्यांना नाट्यसंगीताचं शिक्षण देणा-या आदर्श गुरु....किती म्हणून सांगू.......श्री एकवीरादेवीची, श्री स्वामी समर्थ यांच्या निस्सीम भक्त अशी जयमालाबईंची विविध रुपं आहेत...

महत्वाची गोष्ट म्हणजे या विविध रुपांची सरमिसळ कधीही झाली नाही. प्रत्येक रुपात त्या समर्थपणे, सहजपणे वावारल्या. रंगमंचावर रुक्मिणी, भामिनी, सिंधू साकारताना किंवा एखादी मैफल रंगवताना घरातली कोणतीही चिंता त्यांना स्पर्श करीत नाही. घरातल्या पाहुण्यांच्या आदरसत्कार करताना, त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनविताना, रंगभूमिवरची ही महाराणी साधीसुधी गृहिणी असते. लाडक्या लेकीचे मऊ पंचांनी केस पुसून देणारी ही आई.... पेटी काढून समोर शिकवायला बसली की काटेकोर गुरू होते.. मग मुलगी म्हणून सवलत नाही.

प्रत्येक काम करायचं ते मनःपूर्वक, नीटनेटकं...कशातच चालढकल नाही....असाच जयमालाबाईंचा स्वभाव !
म्हणूनच घरसंसार आणि नाट्यसंसार समर्थपणे सांभाळला गेला. अर्थातच याचं मोठं श्रेय जयराम शिलेदारांनीही तेवढचं जातं...कारण पत्नीच्या कलागुणांना प्रोत्साहन देणा-या दिलदार पतिचा पाठिंबा जयमालाबाईंवर नेहमीच होता.
मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपत असताना शिलेदारांनी `मराठी रंगभूभी` ही संस्था स्थापन केली आणि कितीही संकटं आली तरीही न डगमगता संगीत नाटकांचे प्रयोग केले. आजच्या तरुण पिढीला जयमालाबाईंच्या रंगमंचावरच्या अदभूत कामगिरीची कल्पनाच नाही.

सुडौल बांधा, बोलके डोळे, चापूनचोपून नेसलेली नऊवारी साडी, प्रसन्न चेहरा आणि मधुमधुर अशी गायकी...त्यामुळं जयमालाबाईंना उदंड लोकप्रियता लाभली. अमाप यश मिळूनसुध्दा त्या नेहमीच विनम्रच राहिल्या. आजही गुरूजनांबद्दल तेवढाच आदर त्यांच्या मनात आहे.

त्यांच्या मैफली आणि नाटके रंगतात..याचं मर्म म्हणजे... शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया. तालासुरावर प्रचंड हुकूमत. कोणताही अभिनिवेश नसलेलं निर्मळ गाणं. ह्दयातून उमटलेले सूर .. आणि ते रसिकांच्या ह्दयापर्यंत पोचविण्याचा अनंद सोहळा म्हणजे..जयमालाबाईंचं गाणं...!

नाट्यसंगीताचा ख्याल न करता त्यातल्या अर्थाकडे, भावनेकडे लक्ष देऊन मर्यादित वेळेत ते कसं रंगवावं ही मोलाचा शिकवण त्यांच्या शिष्यवर्गाला मिळते.

आज या पदापर्यंत पोचताना त्यांनी केलेल्या कष्टाचं महत्व तेवढेच आहे. वेगवेगळ्या गुरुंकडून तालीम घेऊन. भरपूर मेहनत करुन स्वतंत्र गायकी निर्माण केली आहे.

संगीत नाटक अकादमीचा पुरस्काराच्या निमित्ताने पुन्हा सगळ्या गतस्मृतींना ..झालेल्या अडचणींचा पाढा डळ्यासमोर येतो...मन हेलावते...
.
जयराम शिलेदारांसारखाय गंधर्वभक्त पतीच्या साथीने संगीत रंगभूमीची कीर्ती-लता वाढविणा-या या स्वकुलतारकसुतेला शतशः दंडवत....


वर्षा जोगळेकर, पुणे

email-varsha.joglekar3@gmail.com


जयमाला शिलेदार यांना अभिष्टचिंतन

आज शुभदिनी जमलो आपण सारे सुहृदजन
करावया अपुल्या जयमालाबाईंचे अभिष्टचिंतन.
एके काळी गंधर्वांच्या नंतर कोण ? असा प्रश्न पडला रसिकमनाला.
जणू तो सोडविला जयरामानी घालून वधूमाला जयमालेला.
लता - कीर्तीच्या रूपाने रंगभूमीची पूजा बांधिली या आठ हातानी.
सुगीचे दिवस पुनश्‍च आले रंगभूमी बहरली अभिनय गायनानी.
मृदु मितभाषी बाईनी विद्यादानही केले सढळ हातानी
त्याचेही स्वागत केले तरुण दमदार कलाकारानी.
सर्वांतर्फे देते शुभेच्छा माझे निर्मल मन
शिलेदार कुटुंबियांच्या सेवेचा पुणेकरांना सार्थ अभिमान.


-- निर्मला गोगटे ( पुणे, २६ जानेवारी २०१२ समारंभात)

राज्यामध्ये आपल्या कलेने मराठीपण जपणाऱ्याच नाट्यक्षेत्राला निश्चिषत प्रोत्साहन देऊ असे आश्वा्सन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृत्यर्थ आयोजित केलेल्या पारितोषिक वितरण सोहळा व जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. गोपिनाथ सावकार व जयमाला शिलेदार यांना जीवन गौरव पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी नाट्‌य संमेलनाध्यक्ष राम जाधव, नाट्‌य परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले, सांस्कृतिक कार्य विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान, विधान परिषदेचे उपाध्यक्ष वसंत डावखरे, डॉ. मोहन आगाशे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.