subhash inamdar

subhash inamdar

Monday, July 18, 2011

पार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक

कस्तुरी पायगुडे-राणे

कॅलिफोर्नियातला गीतकार, कवी आणि संगीतकार अभिजित कुंभार यांच्या मी प्रेमिका या अल्बममधून २४ जुलैच्या प्रकाशन समारंभानंतर गायिका म्हणून वावरणारी. तसेच सुगम संगीताकडे लक्ष वेधणारी . उद्या पार्श्वगायनाच्या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक असणारी. मूळात शास्त्रीय संगीतात करियर करण्यासाठी तयार असलेल्या कस्तुरी पायगुडे-राणे हिच्या करियरविषयी घेतलेला हा धावता आढावा.



इंग्रजी साहित्य घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केल्यानंतर लहानपणापासून आवड असलेल्या शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवून ललित कला केंद्रात एमए साठी कस्तुरीने नाव दाखल केले. तेव्हापासून विद्यापिठीच्या गुरू म्हणून मार्गदर्शिका लाभल्या सौ. आरती अंकलीकर-टिकेकर हे आपले भाग्य असल्याचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात वारंवार येतो. त्यामुळेच खरा गुरू आणि शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम झाल्याची कबुली त्या देतात.



थिएरीसाठी ललित केंद्राचे दालन मात्र गुरूकूल पध्दतीने त्यांच्या घरी जावून शिक्षण घ्यायचे असल्याने आपल्या गाण्यात सहाजिकच तोच बाज पक्का रुळला. त्यामुळेच त्यांच्या विविध मैफलीत तंबोरा साथ करताना गाणे कसे गावे, काय गावे आणि मैफल कशी रंगवावी याचे प्रत्यक्ष ज्ञान कस्तुरीला झाले. ज्यामुळे आजही नेहमीच गुरू म्हणून त्यांचे नाव आपल्या आयुष्यात कामय जोडले गेल्याचा आनंद कस्तुरीच्या बोलण्यात दिसतो.

पण ज्यांचे शास्त्रीय़ संगीत ऐकून आपणही यात सखोल अभ्यास करावा असे वाटले ते प्रसिध्द गायिका सौ. विणा सहस्त्रबुध्दे यांच्याकडे गेल्यामुळे. कस्तुरी म्हणते, बीएच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी मला त्यांच्या घरी रियाज ऐकायची आणि अनेक विद्यार्थ्यांना शिकविताना बसायची परवानगी दिली. त्यांच्यासमोर मी कधी गायले नाही. पण महाविद्यालयाचे तास संपले की, त्यांच्याकडे जावून ते अध्ययन मी ऐकायची. त्यांच्या या गाण्याने . आवाजातल्या भावाने मी भारावून गेले. आपल्याला असे गाता आले पाहिजे असे मनाने घेतले आणि संगीत विषयात मास्टरी करण्यासाठी ललित कला केंद्रात मी दाखल झाले.

`मी प्रेमिका`च्या निमित्ताने सुगम संगीत गायची संधी मिळाली. त्यामुळे आपल्याला पार्श्वगायनाची नवी संधी अचानक हाती आल्याचे कस्तुरी अभिमानाने सांगते. `मी प्रेमीका`ची पार्श्वभूमि सांगताना ती बोलते, `अभिजित कुंभार हा माझ्या नात्यातला. तो खूप कविता करतो. त्याला संगीतातही गोडी. आपल्या कविता लोकांना माहित व्हाव्या अशी त्याची इच्छा. जाने. २०११ ला त्याने ती माझ्याजवळ व्यक्त केली आणि आठ गाण्यांचा अल्बम पूर्ण करण्यापर्यतचा हा टप्पा यशस्वीपणे आज पूर्ण झाला`.

कस्तुरी पायगुडे-राणे हिला आज जरी शास्त्रीय संगीताची गायिका म्हणून या क्षेत्रात ओळखले जाते तरी त्यामागचा संगीतविषयक प्रवासही तेवढाच ऐकण्यासारखा आहे.

ती सांगते, आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येते की माझी हा आवड निर्माण होण्याचे कारण घरातले वातावरण. माझे वडील शरद पायगुडे यांना संगीत ऐकण्याचे भारी वेड. घरात कित्येक गायकांच्या कॅसेटचा खजिना असायचा आजही आहे. घरात रोज वेगवेगळ्या शास्त्रीय संगीतातील गायकांच्या मैफली कानावर पडत. त्यातले स्वर
,त्याचा मोह कायमचा जडला गेला. सहाजिकच त्याकडे लक्ष देऊन आपणही त्याप्रमाणे गायची खोडी करायला लागले.
पुढे तिच सवय जडली.

पाचवी पासून ज्ञानप्रबोधिनीत दाखल झाल्यावर तर काय माझ्यातल्या कलेला पोषक वातावरण तिथे लाभले. शाळेची प्रार्थना तर कित्येक वर्ष मीच म्हणायचे. समूहगीते,वेगवेगळ्या स्पर्धात माझा सहभाग वाढला. आत्ता संगीत संयोजन करणारे मिलिंद गुणे तेव्हा शाळेत गाण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी शाळेत काही दिवस आल्याचेही आठवतात.

पुढचा प्रवासही सांगताना त्या आठवणीत रमून जावून सांगतात, अकरावी-बारावीसाठी गरवारेमध्ये सायन्सला दाखल झाल्यानंतरही इचलकरंजीत सुगम संगीत गाण्यासाठी महाविद्यालयातर्फे माझी निवड झाली. महाविद्यालयीन स्तरावरच्या स्पर्धांनाही माझी हजेरी गृहित धरलेली असायची.

बारावी नंतर विचारांती गाण्याला प्राधान्य मिळावे यासाठी कला शाखेची निवड केली आणि फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल होऊन विविध कार्यक्रमांच्या आयोजनात कस्तुरीचा सहभाग वाढला गेला. २००१-२००१ च्या फिरोदिया करंडक स्पर्धेत तीला उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कारही प्राप्त झाला. त्यातच तिच्यावर `स्पिक मॅके`च्या व्यवस्थापनाची जबाबदारी आली.त्यामुळे संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांचे गाणे जवळून ऐकता आले.

दरम्यान संगीताचे रितसर शिक्षण सुरू राहिलेच. अलका थिटे, निलम दिक्षित (जोशी), यांच्याकडे मध्यमापर्यंत तर निता भाभे यांच्या मार्गदर्शनाखाली विशारद पूर्ण होईतो महाविद्यालयातील पदवी कस्तुरीला प्राप्त झाली.

पदवीनंतर एमएचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत लिला पूनावाला ट्रस्ट आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रची स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे संगीताच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च घरच्यांना फारसा करावा लागला नाही.


संगीतात एमएची पदवी संपादन केल्यानंतर कस्तुरीने एका खासगी शाळेत संगीत शिक्षकाची नोकरी धरली. पण तिथे गाणे शिकविण्यापेक्षाही मुलांना शांत बसविण्यातच आवाजाचा वापर अधिक करावा लागण्याचा अनुभव आला. स्वतःची साधना करायला वेळ आणि निवांतपणाही मिळेनासा झाला. कस्तुरीने ती नोकरी सोडली. मात्र त्यानंतर संगीताची एक मार्गदर्शक म्हणून कर्नाटक शाळेच्या संगीत विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम त्यांनी पूर्ण केले.

आता मात्र शास्त्रीय संगीताचा रियाज. काही संगीताच्या विद्यार्थीनींना मार्गदर्शन करून, शास्त्रीय संगीताच्या मैफली करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा ध्यास कस्तुरीने घेतला आहे. आजही त्या आरती अंकलीकर-टिकेकर यांच्याबरोबर साथीला असतात. त्यांचे मार्गदर्शन आहेच. तिच ओढ आजही कायम आहे. हे सारे आनंदी दिवस दाखविण्यासाठी ज्यांचे नाव घ्यायचे ते आई-वडिल. त्यांचे प्रोत्साहन कायम आहे. आजही. लिला पूनावाला आणि कस्तुरीचे पती निखील राणे यांचे.

आजवर कस्तुरीचे पुण्यात आणि बाहेरही , तसेच परदेशात दोनशेच्यावर गाण्यांचे कार्यक्रम झाले आहेत. आता शास्त्रीय संगीतातच करियर करायचे असे तिने मनोमन ठरविले आहे. आता शास्त्रीय संगीत हेच धेय्य .
त्यातही सुगम संगीत गायची संधी जर मिळाली तर नक्कीच ती सोडायची नाही. त्यातूनच पार्श्वगायनाचा रस्ताही दिसू लागेल, असा विश्वास कस्तुरीला वाटतो.


सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
email. subhashinamdar@gmail.com

`मी प्रमिका`-सीडीचे प्रकाशन २४ जुलैला

पुणे-18, रचनाकार आणि संगीतकार अभिजित कुंभार कॅलिफोर्नियात तर गायिका कस्तुरी पायगुडे-राणे पुण्यात असताना आजच्या काळातल्या अधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाची जोड घेऊन तयार झालेल्या `मी प्रमिका` या ध्वनिफितीचा प्रकाशन समारंभ २४ जुलैला पुण्यात होणार आहे,याबाबतची माहिती सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार आणि शरद पायगुड़े यांनी सोमवारी पत्रकारांना दिली .

आरती अंकलीकर-टिकेकर यांची शिष्या कस्तुरी पायगुडे-राणे यांनी प्रेमगीतांच्या ८ रचनांच्या ध्वनिफितीमधून आपल्या गायनाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे. आकांक्षा क्रिएशन्स निर्मित या सीडीचे प्रकाशन आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या हस्ते होत आहे. एस एम जोशी सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणा-या समारंभाचे प्रमुख पाहुणे संगीतकार आनंद मोडक असणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून लीला पूनावाला व फिरोज पूनावाला उपस्थित राहणार आहेत.

कस्तूरी पायगुड़े यांच्या बाबत सांगताना, शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम करत कस्तुरी पायगुडे-राणे यांनी पुण्यात ,पुण्याबाहेर आणि परदेशात २००च्यावर कार्यक्रम सादर केले आहेत. शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त त्यांनी गायलेला हा मराठी प्रेमगीतांचा हा अल्बम गायनाच्या वेगळ्या क्षेत्रातील आपले स्थान निर्माण करील अशी खात्री असल्याचे शरद पायगुड़े यांनी सांगितले.

`मी प्रमिका`चे संगीत संयोजक मिलिंद गुणे आहेत.ध्वनिमुद्रण शिवरंजनी स्टुडीओत करण्यात आले आहे.
अभिजित कुंभार यांचेही हे पहिलेच पाऊल आहे. आज ते परदेशात असले तरी या निमित्ताने मराठी भाषा जपण्याचा आणि ती टिकविण्याचा प्रयत्न होत आहे.
याकार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक पुणे (सुभाष इनामदार) यांचे मार्फत केले गेले आहे. सर्वासाठी २४ जुलैचा कार्यक्रम विनामुल्य आहे.

Saturday, July 16, 2011

आनंद : रसिका जोशी




गहिवरलो
वाचलं
कॅन्सरने निधन
परवा - परवा पाहिलं तुला टीव्ही वर
आनंदाने बिनधास्त
मुलाखत देत होतीस
बिनधास्त हिंदी डायलॉग टाकत
तुझ्याच हिंदी चित्रपटातला
पुसटशीही कल्पना नव्हती
कॅन्सर तुला छळतोय
कणाकणाने घटवतोया
राजेश खन्नाचा "आनंद"
कॅन्सर पेशंटची भूमिका
फक्त भूमिका
तू ती जगलीस
गेली नऊ वर्षे
आनंदाने
टवटवीतपणे
खट्याळ, दिलखुलास हसू
लोपू न देता
उर्जेची अखंड ज्योत ;
जीवननिष्ठा
जागवित
खरंच ; आज तू
" आनंदला"
पोरकं केलंस
स्वः तास स्वीकारून
दुसर्यांना स्वीकारायला लावणारी
रणरागिणी
'स्व' त्व जपून
"माणूस" मूल्य जपणारी
हिरकणी
तुझ्यातली सृजनशील लेखिका
कोणास कळली ?
जुनाट सिस्टीम
यांत्रिकीकरणाचा रेटा
माणसाचं एकाकीपण, तुटलेपण
अस्थिरता
तुझ्या भेदक सत्यान्वेषी दृष्टीने टिपले
व्हाईट लिली नाईट रायडर
तुझ्या प्रतिभेचा उच्चतर आविष्कार
असा बोल्ड, हरहुन्नरी, कसदार अभिनय
आता कोण करणार ?
झालीस तू तुझ्या चाहत्यांच्या कुटुंबातली
एक सदस्य
असं यश - - - - - - -
तुला मोलाची साथ देणारे
गिरीश जोशीस सलाम
तुला सलाम
आता तुझी परवानगी घेऊन थांबतो
नाही तर म्हणशील :
किती लांबड लावली !


सुरेश टिळेकर


पुणे.

Friday, July 15, 2011

गुरूपौर्णिमेचा भक्तिरंग फुलला

भारत गायन समाजात


गुरूपौर्णिमा आणि बालगंर्धवांचा स्मृतिदिन एकाच दिवशी आल्याने शताब्दि वर्ष साजरा करित असलेल्या पुण्याच्या भारत गायन समाजाने संगीत शिकविणा-या गुरूजनांचा सत्कार शुक्रवारी केला. मास्टर कृष्णरांवांना संगीत दिलेल्या पदांची बहारदार मैफल भक्तिरंग या नावाने समाजात रंगविली.



अतुल खांडेकर या तरूण गायकाला संस्थेचे अध्यक्ष सुधाकर जोशी यांच्या हस्ते मालती पांडे पुरस्कार दिला गेला. त्यांनी गायलेली मजला घडावी ही सेवा, पतित तू पावना ही दोन्ही पदे मास्टर कृष्णरावांची आठवण ताजी करून देण्याइतकी समर्थपणे सादर करून रसिकांची दाद घेतली.

जोहार मायबाप जोहार हे पद शिल्पा पुणतांबेकर (पूर्वाश्रमीची दातार. म्हणजे भास्करबूवा बखले यांची नातसून सौ. शेला दातार यांची कन्या) यांच्या आवाजात ऐकताना त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या तयारीची कल्पना येते. शिवाय स्वर-भाव दोन्ही तालांच्या लयीत इतके चपखल बोलत होते की सहज दाद येते...क्या बात है.त्यांनी गायलेला समर्थ रामदास यांचा अभंग तर इतका रंगत गेला की तो संपूच नये असे वाटत होते ...फारच उत्तम गायला. त्याची वहावा द्यायची
तर ती समर्थपणे साथ केलेल्या साथीदार यांचेकडे श्रेय जाते .


बोलावा विठ्ठल..पहावा विठ्ठलाच्या गजरात रसिकांना तृप्त करणा-या सौ. सावनी कुलकर्णी यांच्या भक्तिपूर्ण रचनेने सारी सभा नादवून गेली होती.

समीर पुणतांबेकर (तबला), डॉ. राजेंद्र दूरकर (पखवाज), राहूल गोळे ( ऑर्गन), आणि नितिन जाधव(तालवाद्ये) यासाथीदारांची साथ ज्या ताकदीचा झाली त्यामुळे गायकांच्या स्वराला वाद्यांचा हा ताल सही सही मैफल कानात साठवत राहिला.

शंकर तुकाराम शिंदे (तबला), भालचंद्र दामोदर देव (व्हायोलिन), सुहास दातार , मधुकर जोगळेकर,सौ. मैत्रेयी बापट आणि सुधिर दातार यांना गुरूपौर्णमेनिमित्त समाजाचे अध्यक्षांच्या हस्ते गौरविण्यात आले.

काळ बदलला... तरी संस्कृतिच्या पाऊलखुणा आजही कायम आहेत. पुण्यात आता आजपासून विविध कलावंतांच्या शिष्यांकडून गुरूपौर्णिमा साजरी होईल . कुणी जाहिर तर कुणी खासगीत गुरूंना वंदन करेल.
आपण कुणाचे तरी फॉलोअर आहोत. हे समजून स्वतंत्र पायवाट निर्माण करणारे शिष्य हे गुरूंचे भाग्य.

सुभाष इनामदार, पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com

Wednesday, July 13, 2011

नव्या पिढीची गायिका

कस्तुरी पायगुडे-राणे

काळाबरोबर चालणारी. नव्या विचारसरणीची. संस्कृतिची, संस्कारांची आणि सामाजिक बदलाची जाण असणारी. उद्याच्या संगीताच्या क्षितीजावर आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी पुण्यातली गायिका म्हणजे सौ. कस्तुरी पायगुडे-राणे.

कस्तुरी सुप्रसिध्द गायिका सौ. आरती अंकलीकर-टिकेकर यांची शिष्या. त्यांच्या मार्गदर्शनातून पध्दतशीर रियाज करून गळ्यावर शास्त्रीय संगीताचे झालेले संस्कार कस्तुरीच्या गाण्यातून दिसतात. तालमीतून तयार झालेला आवाज. वेगवेगळ्या रागांची सौंदर्यतत्व सांभाळत केलेली मांडणी. गमक, तान, मींड अशा गायनातल्या विविध प्रकारांवर प्रभुत्व मिळविलेला आवाज .ज्या सहजतेने ती सादर करते तेव्हा रसिकांची मिळालेली दाद तिच्या संगीताच्या सादरीकरणातून मिळते.



शास्त्रीय बरोबरच अशास्त्रीय संगीताचे प्रकारही कस्तुरी तेवढ्याच तयारीने गाते. उदा. दादरा, झुला, गझल, भजन इ.
पुण्यात, पुण्याबाहेर आणि परदेशात असे मिळून दोनशेच्यावर कस्तुरीचे कार्यक्रम झाले असून तिच्या गायकीची प्रशंसा सर्वत्र झाली.

जुलै २०११ मध्ये मी प्रेमिका हा मराठी गाण्यांचा स्वतंत्र अल्बमही प्रकाशित झाला आहे.
पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्रातून कस्तुरीने A ग्रेडसह एम.ए. (संगीत) ची पदवी संपादन केली आहे. विशेष योग्यतेसह अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे विशारद आणि पुणे विद्यापीठातून बी.ए. (इंग्रजी साहित्य) पदवी प्राप्त केली आहे.
कस्तुरीला उच्चशिक्षणासाठी लीला पूनावाला फौंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती मिळाली होती. ती २००५ पासून स्पिक मॅकेची पुणे चॅप्टरची प्रमुख समन्वयक तर २००९ ते २०११ पर्यत या चळवळीची नॅशनल एक्झीक्यूटीव्ह म्हणून काम केले आहे. या काळात तिने मान्यवर कलाकारांचे ५०० हून अधिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
पत्ता-
१२/ अ, श्री विष्णुबाग हौसिंग सासायटी,
गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे,
शिवाजीनगर, पुणे- ४११०१६
फोन- + ९१ (२२०) २५६६११००
+ ९१ (०) ९८८११३६९४६
ई-मेल- paigude.kasturi@gmail.com

पुरस्कार आणि पारितोषिके-
- आकाशवाणी, पुणे. सुगम संगीत कलाकार म्हणून मान्यता.
- सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार फिरोदिया ट्रस्ट- २००१-२००२
- सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन २००६-२००७ (आम्ही मूमविय करंडक)
- पीस ऐम्बेस्डर २००८- लिला पूनावाला फौंडेशन व आशा फौंडेशन
भारतात सादर झालेले कार्यक्रम-
-य़शवंतराव चव्हाण कल्चरल सेंटर, मुंबई
रत्नागिरी
-अहिल्याबाई होळकर चॅरिटेबल ट्रस्ट, इंदौर
-अंबड संगीत महोत्सव, अंबड
-गुरूपौर्णिमा संगीत महोत्सव, अक्कलकोट
-सांगवी संगीत महोत्सव, पुणे
-विद्या प्रतिष्ठान , बारामती
-पीपल फौंडेशन, पुणे
-नंदनंदन प्रतिष्ठान, पुणे
- स्वरवेद, नागपूर

परदेशातील कार्यक्रम-
-नेहरू सेंटर, लंडन
-महाराष्ट्र मंडळ, लंडन
-तारा आर्टस्, लंडन
-बैठक, बर्मिंगहम
-ऑक्सफर्ड युनिव्हरसिटी, ऑक्सफर्ड



x

विठ्ठल गीती गावी -राजेंद्र दिक्षित

पुण्यात आषाढी एकादशीचा विठ्ठल नामाचा गजर प्रत्यक्ष विठ्ठलवाडीच्या पांडुरंग-रूक्मिणीच्या दर्शनाने तर झालाच.
पण त्याही पेक्षा पांडुरंगाच्या नावाचा स्वरगजर चहुभागात नादावला गेला. आषाढी म्हटली की लक्षात रहाते ती
कै.भारतरत्न पंडीत भीमसेन जोशींनी अजरामर केलेली अभंगवाणी. संतांचे अभंग त्यांच्यामुळे समाजात ऐकले गेले. त्यांच्या ओठी रूळले. आजही त्यांच्याच अभंगवाणीच्या रेकॉर्डनी पुण्यातली विठ्ठल मंदीरे स्वरभास्करमय होऊन गेली होती.



पंडीतजींचे शिष्य राजेंद्र दिक्षित यांनी हाच हरिनामाचा गजर विठ्ठल गीती गावी या नावाने सोमवारी ११ जुलैला आळवला. दिक्षितांकडून अभंगाचा आस्वाद घेताना त्यांच्याच स्वरमेळींचा स्पर्श आणि त्यांच्या शैलीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पंढरी निवासा...माझे माहेर पंढरी आणि तिर्थ विठ्ठल सारख्या अभंगातून ओतप्रोत भक्तिचा मळा फुलविण्यात राजेंद्र दिक्षित भक्तांना नादविण्यात य़शस्वी झाले होते. गाण्यातला भाव आणि शास्त्रीय संगीताच्या नादस्पर्शी बनलेल्या स्वरांनी अभंगांला सुरेलशा नादाचा स्पर्श झालेला आढळला.. या अभंगाच्या प्रवासात कधी जनाबाईंचा ( जनीच्या घरी पांडुरंग आला) तर कधी अवघाची संसार सुखाचा करीन ( संत ज्ञानेश्वर) म्हणत भक्ति पागे यांनी आपल्या आवाजाची तयारी दाखविली. त्यातच अमृताहूनी गोड यातला लडीवाळ स्वर कुरवाळत माणिक वर्मांची आठवण रसिकांच्या मनात जागविली.

रेझोनन्स ऑडिऑ स्टुडीऑच्या वतीने हिमांशू दिक्षित यांनी हा विठ्ठल नामाचा गजर बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात आयोजित करून कोथरूड परिसरातल्या भक्तांना आणि रसिकांना भक्तिचा नजराणा बहाल केला होता. चित्रकार रवी परांजपे, बासरी वादक राजेंद्र तेरेदेसाई, राघवेंद्र भीमसेन जोशी, आशाताई किर्लोस्कर अशा मान्यवरांनी दोन तासांचा हा कार्यक्रम पूर्णपणे अनुभवला, यातूनच हे सिध्द होते.

ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, नामदेव , कान्होपात्रा, एकनाथ अशा संताच्या अभंगाबरोबरच ग.दि.माडगुळकरांच्या इंद्रायणी काठीचा उदोउदो झाला नाही तरच नवल. निरुपणकार रविंद्र खरे यांनी हा सारा प्रवास अध्यात्मापासून ते संसार-परमार्थ या सा-याचे अभ्यासपूर्ण रसग्रहण करून संतांच्या रचनात लपलेला भावार्थ रसाळपणे कथन करून रचनांता सार्थकता आणली.


भाव-भत्किचा हा मळा स्वरांनी जरी नटवला राजेंद्र दिक्षित आणि भक्ती पागे या गायकांनी तरी तो स्वर अधिक नादमय, श्रवणीय बनविला तो संजय गोगटे (हार्मोनियम), चारूशीला गोसावी (व्हायोलिन), प्रसाद भावे (तालवाद्य), अमीत अत्रे (टाळ) आणि विनित तिकोनकर( तबला) अविनाश तिकोनकर( पखवाज) या साथिदार कलावंतांनी.

आरंभी जय जय राम कृष्ण हरी चा गजर करून नंतर किर्तन परंपरेला साजेलसा जय जय कार करून विठ्ठल गीती गातीचा नाद रसिकांच्या नास्मरणात अळवून संतरचनांचा हा स्वरमेळा सुस्वर बनविला.

सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Email- subhashinamdar@gmail.com

Tuesday, July 12, 2011

योग्य गुरूकडून गाणं शिका-सानिया पाटणकर




सानिया, तुझ्या शास्त्रीय संगीताच्या प्रवासाबद्दल


- घरात सगळ्यांनाच संगीताची आवड होती. त्याचप्रमाणे मलाही शास्त्रीय संगीताची आवड होती. आताही मी या क्षेत्रात कार्यरत आहे. खरं तर, वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच मी संगीत शिकतेय. मी संगीताचं प्राथमिक शिक्षण लीलाताई घारपुरे यांच्याकडे घेतले. त्यानंतर मी डॉ. अश्‍विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे तेरा वर्षं संगीताचे धडे घेतले. मी परदेशात जाऊन शास्त्रीय संगीताच्या अनेक कार्यशाळाही घेतल्या आहेत. सध्या मी डॉ. अरविंद थत्ते यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतेय.

शास्त्रीय संगीतामधल्या अनेक प्रकारांपैकी तू कुठले संगीत प्रकार सादर करतेस?


- मी माझ्या मैफलींमध्ये ठराविक प्रकार सादर न करता, शास्त्रीय संगीताचे विविध प्रकार सादर करते. त्यामध्ये मग ख्याल, ठुमरी, दादरा, गझल, नाट्यगीत, टप्पा, तराणा यांचा समावेश आहे. या प्रकारांबरोबरच मी काही प्रमाणात अभंग, भक्तीगीतं व भावगीतंदेखील गाते. थीमवर आधारित काही कार्यक्रम आम्ही बरेच वेळा सादर करतो. त्यात वर्षाऋतू, कृष्णलीला आदी कल्पनांवर आधारित कार्यक्रमही सादर केले आहेत.

आतापर्यंत तुझे कोणते अल्बम प्रकाशित झाले आहेत? कोणते पुरस्कार मिळाले आहेत?

- शास्त्रीय संगीतावरच आधारीत "अनुभूती' या अल्बमचे दोन भाग, बंदिशींवर आधारीत "रागरसनांजली' आणि नुकताच प्रसिद्ध झालेला "रसिया' असे अनेक अल्बम मी केलेत. पुरस्कारांबाबत सांगायचं झालं, तर मला पं. जसराज ट्रस्टचा "पैंगणकर पुरस्कार', "राजीव गांधी पुरस्कार', "सूरमणी पुरस्कार' आदी पुरस्कार आतापर्यंत मिळालेत.

शास्त्रीय संगीतामध्ये शब्दाला असलेल्या महत्त्वाबद्दल तू काय सांगशील?

- स्वर हा शास्त्रीय संगीताचा पाया आहे; पण त्यामध्ये शब्दांनाही तितकंच महत्त्व असतं. आकार, उकार आणि इकार शब्दांशिवाय येणं शक्‍यच नाही. अर्थ असलेलं काव्यच योग्य प्रकारे फुलू शकतं, असं मला वाटतं. बंदिशींमध्ये तर शब्दाला फार महत्व असतं.

शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यासाठी तू कुठले प्रयत्न करते आहेस?

- वर्कशॉप्स, ऑनलाइन टीचिंग, लेक्‍चर्स आणि डेमॉन्स्ट्रेशन्स यावर मी सगळ्यांत जास्त भर देते. युवा पिढीला आवडत असलेलं हिदी संगीत, त्यामध्ये वापरले गेलेले राग आणि कुठल्या रागावर आधारित हे गाणं आहे, हे मी सांगायचा प्रयत्न मी कायमच करते. फ्युजन आणि नृत्यप्रकारांमध्ये शास्त्रीय संगीताचा कसा उपयोग होतो, हे सांगण्याचाही मी प्रयत्न करते.

या क्षेत्राची आवड असलेल्या युवा पिढीला काय सांगशील?

- खूप मेहनत घ्या. दिग्गजांचे संगीत सतत ऐका. योग्य गुरूकडून गाणं शिका. शास्त्रीय संगीताचा अभ्यास करा. कारण शास्त्रीय संगीत हा संगीताचा पाया आहे.

-स्वप्नील रास्ते
(swapnilraste@gmail.com)
http://72.78.249.107/esakal/20110712/5017117233068200285.htm