subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, July 13, 2011

नव्या पिढीची गायिका

कस्तुरी पायगुडे-राणे

काळाबरोबर चालणारी. नव्या विचारसरणीची. संस्कृतिची, संस्कारांची आणि सामाजिक बदलाची जाण असणारी. उद्याच्या संगीताच्या क्षितीजावर आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी पुण्यातली गायिका म्हणजे सौ. कस्तुरी पायगुडे-राणे.

कस्तुरी सुप्रसिध्द गायिका सौ. आरती अंकलीकर-टिकेकर यांची शिष्या. त्यांच्या मार्गदर्शनातून पध्दतशीर रियाज करून गळ्यावर शास्त्रीय संगीताचे झालेले संस्कार कस्तुरीच्या गाण्यातून दिसतात. तालमीतून तयार झालेला आवाज. वेगवेगळ्या रागांची सौंदर्यतत्व सांभाळत केलेली मांडणी. गमक, तान, मींड अशा गायनातल्या विविध प्रकारांवर प्रभुत्व मिळविलेला आवाज .ज्या सहजतेने ती सादर करते तेव्हा रसिकांची मिळालेली दाद तिच्या संगीताच्या सादरीकरणातून मिळते.



शास्त्रीय बरोबरच अशास्त्रीय संगीताचे प्रकारही कस्तुरी तेवढ्याच तयारीने गाते. उदा. दादरा, झुला, गझल, भजन इ.
पुण्यात, पुण्याबाहेर आणि परदेशात असे मिळून दोनशेच्यावर कस्तुरीचे कार्यक्रम झाले असून तिच्या गायकीची प्रशंसा सर्वत्र झाली.

जुलै २०११ मध्ये मी प्रेमिका हा मराठी गाण्यांचा स्वतंत्र अल्बमही प्रकाशित झाला आहे.
पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्रातून कस्तुरीने A ग्रेडसह एम.ए. (संगीत) ची पदवी संपादन केली आहे. विशेष योग्यतेसह अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे विशारद आणि पुणे विद्यापीठातून बी.ए. (इंग्रजी साहित्य) पदवी प्राप्त केली आहे.
कस्तुरीला उच्चशिक्षणासाठी लीला पूनावाला फौंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती मिळाली होती. ती २००५ पासून स्पिक मॅकेची पुणे चॅप्टरची प्रमुख समन्वयक तर २००९ ते २०११ पर्यत या चळवळीची नॅशनल एक्झीक्यूटीव्ह म्हणून काम केले आहे. या काळात तिने मान्यवर कलाकारांचे ५०० हून अधिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
पत्ता-
१२/ अ, श्री विष्णुबाग हौसिंग सासायटी,
गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे,
शिवाजीनगर, पुणे- ४११०१६
फोन- + ९१ (२२०) २५६६११००
+ ९१ (०) ९८८११३६९४६
ई-मेल- paigude.kasturi@gmail.com

पुरस्कार आणि पारितोषिके-
- आकाशवाणी, पुणे. सुगम संगीत कलाकार म्हणून मान्यता.
- सर्वोत्कृष्ट गायिका पुरस्कार फिरोदिया ट्रस्ट- २००१-२००२
- सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन २००६-२००७ (आम्ही मूमविय करंडक)
- पीस ऐम्बेस्डर २००८- लिला पूनावाला फौंडेशन व आशा फौंडेशन
भारतात सादर झालेले कार्यक्रम-
-य़शवंतराव चव्हाण कल्चरल सेंटर, मुंबई
रत्नागिरी
-अहिल्याबाई होळकर चॅरिटेबल ट्रस्ट, इंदौर
-अंबड संगीत महोत्सव, अंबड
-गुरूपौर्णिमा संगीत महोत्सव, अक्कलकोट
-सांगवी संगीत महोत्सव, पुणे
-विद्या प्रतिष्ठान , बारामती
-पीपल फौंडेशन, पुणे
-नंदनंदन प्रतिष्ठान, पुणे
- स्वरवेद, नागपूर

परदेशातील कार्यक्रम-
-नेहरू सेंटर, लंडन
-महाराष्ट्र मंडळ, लंडन
-तारा आर्टस्, लंडन
-बैठक, बर्मिंगहम
-ऑक्सफर्ड युनिव्हरसिटी, ऑक्सफर्ड



x

विठ्ठल गीती गावी -राजेंद्र दिक्षित

पुण्यात आषाढी एकादशीचा विठ्ठल नामाचा गजर प्रत्यक्ष विठ्ठलवाडीच्या पांडुरंग-रूक्मिणीच्या दर्शनाने तर झालाच.
पण त्याही पेक्षा पांडुरंगाच्या नावाचा स्वरगजर चहुभागात नादावला गेला. आषाढी म्हटली की लक्षात रहाते ती
कै.भारतरत्न पंडीत भीमसेन जोशींनी अजरामर केलेली अभंगवाणी. संतांचे अभंग त्यांच्यामुळे समाजात ऐकले गेले. त्यांच्या ओठी रूळले. आजही त्यांच्याच अभंगवाणीच्या रेकॉर्डनी पुण्यातली विठ्ठल मंदीरे स्वरभास्करमय होऊन गेली होती.



पंडीतजींचे शिष्य राजेंद्र दिक्षित यांनी हाच हरिनामाचा गजर विठ्ठल गीती गावी या नावाने सोमवारी ११ जुलैला आळवला. दिक्षितांकडून अभंगाचा आस्वाद घेताना त्यांच्याच स्वरमेळींचा स्पर्श आणि त्यांच्या शैलीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पंढरी निवासा...माझे माहेर पंढरी आणि तिर्थ विठ्ठल सारख्या अभंगातून ओतप्रोत भक्तिचा मळा फुलविण्यात राजेंद्र दिक्षित भक्तांना नादविण्यात य़शस्वी झाले होते. गाण्यातला भाव आणि शास्त्रीय संगीताच्या नादस्पर्शी बनलेल्या स्वरांनी अभंगांला सुरेलशा नादाचा स्पर्श झालेला आढळला.. या अभंगाच्या प्रवासात कधी जनाबाईंचा ( जनीच्या घरी पांडुरंग आला) तर कधी अवघाची संसार सुखाचा करीन ( संत ज्ञानेश्वर) म्हणत भक्ति पागे यांनी आपल्या आवाजाची तयारी दाखविली. त्यातच अमृताहूनी गोड यातला लडीवाळ स्वर कुरवाळत माणिक वर्मांची आठवण रसिकांच्या मनात जागविली.

रेझोनन्स ऑडिऑ स्टुडीऑच्या वतीने हिमांशू दिक्षित यांनी हा विठ्ठल नामाचा गजर बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात आयोजित करून कोथरूड परिसरातल्या भक्तांना आणि रसिकांना भक्तिचा नजराणा बहाल केला होता. चित्रकार रवी परांजपे, बासरी वादक राजेंद्र तेरेदेसाई, राघवेंद्र भीमसेन जोशी, आशाताई किर्लोस्कर अशा मान्यवरांनी दोन तासांचा हा कार्यक्रम पूर्णपणे अनुभवला, यातूनच हे सिध्द होते.

ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, नामदेव , कान्होपात्रा, एकनाथ अशा संताच्या अभंगाबरोबरच ग.दि.माडगुळकरांच्या इंद्रायणी काठीचा उदोउदो झाला नाही तरच नवल. निरुपणकार रविंद्र खरे यांनी हा सारा प्रवास अध्यात्मापासून ते संसार-परमार्थ या सा-याचे अभ्यासपूर्ण रसग्रहण करून संतांच्या रचनात लपलेला भावार्थ रसाळपणे कथन करून रचनांता सार्थकता आणली.


भाव-भत्किचा हा मळा स्वरांनी जरी नटवला राजेंद्र दिक्षित आणि भक्ती पागे या गायकांनी तरी तो स्वर अधिक नादमय, श्रवणीय बनविला तो संजय गोगटे (हार्मोनियम), चारूशीला गोसावी (व्हायोलिन), प्रसाद भावे (तालवाद्य), अमीत अत्रे (टाळ) आणि विनित तिकोनकर( तबला) अविनाश तिकोनकर( पखवाज) या साथिदार कलावंतांनी.

आरंभी जय जय राम कृष्ण हरी चा गजर करून नंतर किर्तन परंपरेला साजेलसा जय जय कार करून विठ्ठल गीती गातीचा नाद रसिकांच्या नास्मरणात अळवून संतरचनांचा हा स्वरमेळा सुस्वर बनविला.

सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Email- subhashinamdar@gmail.com

Tuesday, July 12, 2011

योग्य गुरूकडून गाणं शिका-सानिया पाटणकर




सानिया, तुझ्या शास्त्रीय संगीताच्या प्रवासाबद्दल


- घरात सगळ्यांनाच संगीताची आवड होती. त्याचप्रमाणे मलाही शास्त्रीय संगीताची आवड होती. आताही मी या क्षेत्रात कार्यरत आहे. खरं तर, वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच मी संगीत शिकतेय. मी संगीताचं प्राथमिक शिक्षण लीलाताई घारपुरे यांच्याकडे घेतले. त्यानंतर मी डॉ. अश्‍विनी भिडे-देशपांडे यांच्याकडे तेरा वर्षं संगीताचे धडे घेतले. मी परदेशात जाऊन शास्त्रीय संगीताच्या अनेक कार्यशाळाही घेतल्या आहेत. सध्या मी डॉ. अरविंद थत्ते यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतेय.

शास्त्रीय संगीतामधल्या अनेक प्रकारांपैकी तू कुठले संगीत प्रकार सादर करतेस?


- मी माझ्या मैफलींमध्ये ठराविक प्रकार सादर न करता, शास्त्रीय संगीताचे विविध प्रकार सादर करते. त्यामध्ये मग ख्याल, ठुमरी, दादरा, गझल, नाट्यगीत, टप्पा, तराणा यांचा समावेश आहे. या प्रकारांबरोबरच मी काही प्रमाणात अभंग, भक्तीगीतं व भावगीतंदेखील गाते. थीमवर आधारित काही कार्यक्रम आम्ही बरेच वेळा सादर करतो. त्यात वर्षाऋतू, कृष्णलीला आदी कल्पनांवर आधारित कार्यक्रमही सादर केले आहेत.

आतापर्यंत तुझे कोणते अल्बम प्रकाशित झाले आहेत? कोणते पुरस्कार मिळाले आहेत?

- शास्त्रीय संगीतावरच आधारीत "अनुभूती' या अल्बमचे दोन भाग, बंदिशींवर आधारीत "रागरसनांजली' आणि नुकताच प्रसिद्ध झालेला "रसिया' असे अनेक अल्बम मी केलेत. पुरस्कारांबाबत सांगायचं झालं, तर मला पं. जसराज ट्रस्टचा "पैंगणकर पुरस्कार', "राजीव गांधी पुरस्कार', "सूरमणी पुरस्कार' आदी पुरस्कार आतापर्यंत मिळालेत.

शास्त्रीय संगीतामध्ये शब्दाला असलेल्या महत्त्वाबद्दल तू काय सांगशील?

- स्वर हा शास्त्रीय संगीताचा पाया आहे; पण त्यामध्ये शब्दांनाही तितकंच महत्त्व असतं. आकार, उकार आणि इकार शब्दांशिवाय येणं शक्‍यच नाही. अर्थ असलेलं काव्यच योग्य प्रकारे फुलू शकतं, असं मला वाटतं. बंदिशींमध्ये तर शब्दाला फार महत्व असतं.

शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यासाठी तू कुठले प्रयत्न करते आहेस?

- वर्कशॉप्स, ऑनलाइन टीचिंग, लेक्‍चर्स आणि डेमॉन्स्ट्रेशन्स यावर मी सगळ्यांत जास्त भर देते. युवा पिढीला आवडत असलेलं हिदी संगीत, त्यामध्ये वापरले गेलेले राग आणि कुठल्या रागावर आधारित हे गाणं आहे, हे मी सांगायचा प्रयत्न मी कायमच करते. फ्युजन आणि नृत्यप्रकारांमध्ये शास्त्रीय संगीताचा कसा उपयोग होतो, हे सांगण्याचाही मी प्रयत्न करते.

या क्षेत्राची आवड असलेल्या युवा पिढीला काय सांगशील?

- खूप मेहनत घ्या. दिग्गजांचे संगीत सतत ऐका. योग्य गुरूकडून गाणं शिका. शास्त्रीय संगीताचा अभ्यास करा. कारण शास्त्रीय संगीत हा संगीताचा पाया आहे.

-स्वप्नील रास्ते
(swapnilraste@gmail.com)
http://72.78.249.107/esakal/20110712/5017117233068200285.htm

Sunday, July 10, 2011

जी ए जागविताना...

स्त्रीच्या विविध रूपांना जागविताना जीएंचे साहित्य आजही वेगळेपणाचे वाटते. स्त्रीच्या असाह्यतेचा. त्यांच्या सहनशक्तिचा सभोवतालच्या परिस्थतीचा आणि त्यांच्यातल्या भावनांचा खोलवर घेतलेला मागोवा वस्त्र या कथेच्या नाट्यवाचनाच्या माध्यमातून त्यांच्या ८९व्या जयंतीनिमित्त पुण्यात घेतला गेला. अनुराधा जोशी, उत्तरा बावकर आणि गजानन परांजपे यांनी केल्ल्या अभिनाचनातून त्यांची व्यक्तिरेखा मांडण्याची रित आणि त्यातली वीण रसिकांसमोर उलगडली गेली.


आपल्या भावाच्या कौटुंबिक आठवणीतून नंदा पैठणकरांची जीएंचे खासगी रूप उलगडताना त्यांना अवडणा-या दडपे पोहे-खूप खोबरे घातलेले..पुरणपोळी कटाची आमटी...सारेच .

जीएंच्या कथेतल्या स्त्री व्यक्तिरेखांबाबत बोलताना डॉ.विणा देव यांनी त्यांच्यात असलेल्या विलक्षण निरीक्षण शक्तिचे आणि संवेदनाशिल मनाचे दर्शन कथेतल्या स्त्री पात्रांतून कसे पाझरत रहाते याचा उदाहारणासह खास उल्लेख करताना कथांचे दाखलेही दिले. समाज, परंपरेने स्त्रीच्या ठायी अनंक बंधने लादल्याचे आणि तिच्या वाट्याला आलेल्या भोगाचे कथेत केलेले वर्णन करताना वाचताना डोळ्यात अश्रु येतात..आपण त्या व्यक्तिरेखेबरोबर गुंतत जातो. तिच्या वेदनेत..भोगाचा एक भाग बनतो. त्यांच्या दुःखात सहजपणे विरघळून जातो.



आज त्यांच्या कथेत जी दुःखे स्त्री भोगत आहे त्याचे चित्रण आजच्या काळात थोडे परंपरावादी वाटते पण तिच्या कौटुंबिक बंधनात आजही फारसा फरक झाला नसल्याचे डॉ. विणा देव सांगतात.

कधीही समाजाला प्रत्यक्ष न दिसलेला पण आपल्या साहित्याने घरात आणि मनात पोचलेल्या
जीएंच्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम नंदा पैठणकर गेला काही वर्षे सातत्याने करीत आहेत.
यंदा त्याच्या सोबत पुण्याची साहित्य परिषद सहभागी झाली. या निमित्ताने जीएंच्या साहित्याविषयीची चर्चा घडते . त्यावर विचार होतो. या सांस्कृतिक भूमित त्यांची आठवण होते.
जीएंच्या लेखणीचे मोठेपण ( जे अनेकांना ठाऊकही नाही) ठसविले जाते. हेच महत्वाचे .

सुभाष इनामदार, पुणे
Mob. 9552596276
Mail- subhashinamdar@gmail.com

Wednesday, July 6, 2011

बेळगावचा नवा चेहरा सई लोकूर

प्लॅटफॉर्म

करियर संपवून निघालेल्या तरूणीला एका प्लॅटफॉर्मवर दोन मुलींना गाडीत सोडून निघालेले आई-वडिल दिसतात. मुली झाल्या म्हणून सोडलेल्या या दोघींचे पालकत्व स्विकारण्याचा निर्णय ती घेते. घरचा विरोध..म्हणून घरही सोडते...स्वतःचा स्वतंत्र प्रवास सुरू ठेऊन..त्यांचे आयुष्य घडविण्यासाठी स्वतःचे करियर जिवन वेगळ्या मार्गाने नेणा-या या धेय्यवादी नायिकेने एका वेगळ्याच बाबीकडे चित्त वेधून घेतलेला हा चित्रपट.

एका अर्थाने मुलगी झाली म्हणून नाके मुरडणा-या..मुलींना फुटपाथवर, रस्त्यावर सोडणा-या या मुलींच्या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधणारा हा धाडसी चित्रपट घेऊन बेळगावच्या मराठी भाषिक विणा लोकूर यांनी या चित्रपटातून आपल्या मुलीला या चित्रपटात नायिका बनवून प्लॅटफॉर्म...मध्ये आणून सोडले आहे. आता तिचा पुढचा कलेचा प्रवास तिचा तिने करायचा असा संदेशही न सांगता दिला आहे.


गेली तिस वर्षे बेळगावात नाट्यक्षेत्रात कार्य करणा-या विणा लोकूर यांनी मिशन चॅम्पियन नंतर हा आणखी एक चित्रपट कानडी प्रांतातून मराठी भाषिकांसाठी तयार केला आहे. या चित्रपटातून त्या कथा, संवाद आणि दिग्दर्शनाच्या तिनही मुख्य गोष्टी स्वतः करून ह्या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. (यात त्यांच्या जोडीला अरिफ वडगामाही आहेत) हिंदीत जसे नट, दिग्दर्शक आपल्या मुलांना संधी देतात त्याप्रमाणे मुलगी सई लोकूर हिच्या साठी यातून लॉन्च केले .
सई आता झीवर निवेदनही करते. शिवाय पारंबी आणि आम्ही तुमचे बाजीराव या चित्रपटात भूमिका करून अभिनयाच्या क्षेत्रात आपली कारकीर्द करण्यासाठी आता सिध्द झाली आहे. प्लॅटफॉर्म ही त्याची सुरवात आहे..नव्हे हे पहिले पाऊल आहे...आईनेच धाडसाने पुढे हाउन टाकायला लावलेले.
शिवानी देशमुखच्या आयुष्यातल्या या खडतर प्रवासाचे साक्षिदार आहेत..नायक तथा खलनायक अस्ताद काळे, सोबत आहेत मोहन जोशी, शरद पोंक्षे, प्रशांत पाटील, वीणा लाकूर आणि अक्षता आळतेकर, रविना पाटील हे दोन बालकलाकार.
छायाचित्रण सुरेश देशमाने यांचे असून..अश्विनी शेंडेयांच्या गीतांना निलेश मोहरीर यांनी संगीत दिले आहे.
१५ जुलैपासून तो पुण्यात आणि मुंबईत एकाच वेळी प्रदर्शीत होत आहे...
पाहू या तो नक्की प्लॅटफॉर्म..वर आलाय की ट्रॅकच्या बाहेर जावून ऑफबिट बनलाय...



सुभाष इनामदार, पुणे

Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com

Tuesday, July 5, 2011

'गुरु वंदना'

पुणे मराठी ग्रंथालयाच्या शताब्दी निमित्त श्री संत दर्शन मंडळ निर्मित 'गुरु वंदना' कार्यक्रमाचं आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आलं होतं. स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या तसंच स्वरबद्ध केलेल्या रचना या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या.
प्रारंभी सुधीर मोघे यांची राम फाटक यांनी स्वरबद्ध केलेली 'हे नायका जगदीश्वरा'-पुणे आकाशवाणी साठी ध्वनिमुद्रित रचना श्रीपाद भावे यांनी सादर केली.
गोपालकृष्ण भोबे यांच्या 'धन्य ते गायनी कळा' या नाटकाचं संगीत दिग्दर्शन भीमसेनजींनी केले आहे, या नाटकातील 'दान करी रे गुरुधन' आणि कलाश्री रागातील 'धन धन भाग सुहाग' या रचना संपदा थिटे यांनी तर 'हे करुणाकरा' हे गीत श्रीपाद भावे यांनी सादर केले.
श्री राजेश दातार यांनी 'आरंभी वंदिन अयोध्येचा राजा (समर्थ रामदास),'रम्य ही स्वर्गाहून लंका' जयश्री कुलकर्णी यांनी 'नामाचा गजर'(संत नामदेव महाराज) आणि श्रीपाद भावे यांच्या सह 'बाजे रे मुरलिया बाजे' (पंडित नरेंद्र शर्मा), अविनाश लेले यांनी 'रसिका गाऊ कोणते गीत'(पतिव्रता), 'काया नही तेरी'(संत कबीर), भीमसेनजींचे सुपुत्र श्री. आनंद भीमसेन जोशी यांनी 'श्रीनिकेतना'( जगन्नाथ दास यांची कन्नड रचना), 'सून सून जाओ जी' (संत कबीर),
तर श्री संत दर्शन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीराम साठे यांनी 'मन हे राम रंगी रंगले' (नाटक तुलसीदास ) या रचना सादर केल्या. विजय दास्ताने (तबला), जयंत साने (हार्मोनियम),

राजीव माचीकर आणि प्रसाद भावे (ताल वाद्ये), चारुशीला गोसावी (व्हायोलीन) यांनी साथसंगत केली. निवेदन मंगेश वाघमारे यांनी केलं.

Sunday, July 3, 2011

अस्सं सासर सुरेख बाई...

महिन्याभरात श्रावण येईल. मुली, महिला आणि नव्याने लग्न झालेल्या नवरीकडे मंगळागौर पूजली जाईल. आणि त्यातल्या भोंडल्यात हे नक्की म्हटले जाईल..


अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोंनी मारीतं....
ऐकायला या भोंडल्याच्या ओळी चांगल्या वाटतात. भोंडला म्हणणा-या मुली हासून वेळ मारून नेतात.. पण मला मात्र सासरचा अनुभव अतिशय चांगला मिळाला . म्हणूनच तो शब्दात मांडायचा हा प्रयत्न केला आहे.
मुलगी सासरी आली की, ती सतत ताणतणावाखाली. घरातल्या मोठ्या माणसांच्या दबावाखाली . मान खाली घालून वावरत असे..पण मला मात्र सासरी आल्यानंतर माहेरची आठवणही होऊ नये इतके प्रेमळ सासू-सास-यांकडून लाभले. आणि मी सतत अस्सं सासर सुरेख बाई ..म्हणत त्या घरात रममाण झाले. माहेरून व्हायोलिन वादनाच्या कलेचे रोप घेऊन आले आणि सासरी त्याचा वटवृक्षात रुपांतर झाले असे म्हटले तर ते वावगे ठरू नये..
मुलगी सासरी आली की, त्या घरातल्या रीतीभाती समजून घेऊन, घरातल्या माणसांचे स्वभाव ओळखून त्या घराला समजून घेत हळूहळू त्या घरात रुळते. मी माझी कला घेऊन त्या घरात आले. आणि सर्वांना कलाकार सून मिळाली म्हणून खूप आनंद झाला.
तुम्हाला सागते..माझ्या यजमानांनी तर मला दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहूनच पसंत केले. मग काय कलाकार बायको मिळल्याच्या त्यांना केवढा अभिमान. तो आजही आहे. ते तर सतत माझ्या पाठीमागे खंबीर उभे असतात. माझे दीर, जाऊ, नणंदा या सर्वांनाही माझ्या कलेचे काय कौतूक केले . ते सारेच माझ्या कलेला नेहमीच देतात आजही...
आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजावून घेऊन, सर्वांच्या आवडी-निवडी जपून सगळे सण, समारंभ, वाढदिवस खूप छान त-हेने साजरे करतो. सासू-सासरे जुन्या वळणाचे असल्यामुळे सुरवातीला थोडे मतभेद झाले. वादही झडले. पण आम्ही आणि त्यांनी दोघांनीही काही गोष्टींशी तडजोड करून त्यातून सुवर्णमध्य काढून पुढे गेलो. कोणत्याही गोष्टी जास्त विकोपाला जाणार नाहीत याची खबरदादारी घेतली. माझी थोरली जाऊ आणि मी तशा एकाच कार्यालयात . म्हणून का म्हणाना आमचे नाते बहिणीसारखे बनले. टिकले. वाढले. कायम राहिले.
माझा कुठेही कार्यक्रम असला तर ही सारी सासरची माणसे कौतूकाने आवर्जून हजर राहतात. दाद देतात. सारी मदत करतात.
आम्हा दोघी सुनांना सासूबाईंनी मुलाप्रमाणेच वागवले. आमच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. आमच्या मुलांनाही त्यांनी अतिशय प्रेमाने सांभाळले. त्यामुळेच तर आम्हाला नोकरीसाठी बाहेर पडताना कधीच मुलांची काळजी करावी लागली नाही. मुलांनाही आजी- आजोबांचे प्रेम भरपूर मिळाले. सहवास मिळाला. त्यांच्यावर चांगले संस्कार झाले.
आजकाल ब-याच मुलींना एकत्र कुटुंब नको असते पण एकत्र कुटुंबाचे अनेक फायदे मुलींनी नक्कीच पाहिले पाहेजेत.
अशा माझ्या प्रेमळ हौशी, संगीतप्रेमी सास-यांना नुकतीच ११ जूनला देवाज्ञा झाली..पण त्यांचे आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी असतील याची खात्री आहे.
असचं सासर सगळ्या मुलींना मिळावे. त्यांनी ते जपावे. वाढवावे. संस्कार हेच धन पुढच्या पुढीपर्यंत द्यावे यासाठी कसोशिने प्रयत्न करावा...
अखेरीस मी म्हणेन...अस्सं सासर सुरेख बाई...सर्वांना मिळावे.....




सौ. चारूशिला गोसावी,
व्हायोलिनवादक, पुणे
मोबा..९४२१०१९२९९
ई.मेल-chrusheelagosavi@gmail.com