शब्दातून व्यक्त होणारे हे आमचे मित्र श्रीकांत आफळे शब्दातून व्यक्त. तशी आधी नोकरी केली CWPRS मध्ये.
पण नंतर सणक आली नोकरीत निवृत्ती स्वीकारली आणि छंदबध्द जीवन जगण्याचा मार्ग निवडला.
नोकरीत असतानाही पत्रिका करणे, भविष्य सांगण्याचा छंद होता. आता मात्र तोच छंद त्यांनी वाढविला. जोपासला.
आता इतरांच्या समस्यांना शब्दाचे माध्यमातून आत्मविश्वास देण्याचे काम करतात.
ते बोलतात जसे गोड तसे. शब्दांशी खेळण्याची कलाही जाणतात. कथाही रचतात.
असे हे मित्र अक्षयतृतियेच्या निमित्ताने तुमच्या भेटीला आणतोय.
तुम्हालाही काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता.
त्यांच्या प्रेमळ वाणीचा स्पर्श तुम्हालाही घडेल..कळलं का?
===================================================
शब्द म्हणजे
भावनांची फुलं
फुलांना गंध असतो
तसा शब्दांना अर्थ असतो
फुल तेच असते
पण ते जेव्हा देवाला वाहतात
तेव्हा त्यात भक्ति आणि भाव असतो
जेव्हा गळ्यात माळतात
तेव्हा शृंगार, प्रेम व्यक्त होते
तेच फुल जेव्हा स्त्री केसात माळते
तेव्हा तिच्या सौंदर्यात भर पडते
शब्दांचे पण तसेच आहे
कवी वा लेखक शब्दांचा आधार घेतो
त्यांचं सौदर्य तेव्हा वेगळं असतं
शब्दांना भावना असतात
भावना जाणणा-यांनाच त्या कळतात
शब्द फक्त डोळ्यांनी पहाणे
म्हणजे जाणणं नव्हे
शब्दांच्या पाठीमागच्या भावनांचा शोध
सगळेच घेतात असे नाही
शब्द भावनेचं अभिव्यक्त रुप
शब्द असतात भावनांचं प्रतिबिंब
ते जेव्हा एकटे असतात
तेव्हा ते अधिक सुंदर वाटत नाहीत
त्यांना अर्थ असेल असे नाही
पण एखादा जेव्हा जवळ करतो
त्याची सुंगर गुंफण करतो
तेव्हा ते सुंदर दिसू लागतात
शब्दांना लय, सूर प्राप्त झाले की,
मग त्याचे गाणे होते
त्यातले सौंदर्य, भावना, अर्थ
कळणारालाच कळतो
समजणा-याच कळतो
केदार केसकर यांची आई याही वयात कथाकथनाचे कार्यक्रम करतात ..त्याच हर्षभरित रितीने . लेखक आणि त्यांचा शब्द त्या अचूक रसिकंपर्यंत पोचवीतात. मी तो अनुभव घेतला आहे . मात्र हे लिहलेले आहे केदार केसकर यानीच ....तेच त्यांच्या भाषेत ... ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
पुराणात सांगितलेल्या ६४ कलांमध्ये आजच्या काळानुसार अनेक नवीन कलांची भर पडत आहे. 'वक्तृत्व' ही त्यातलीच एक कला असे म्हणण्यास हरकत नाही. पण या आपल्यातील वक्तृत्वकौशल्याचा उपयोग समाजाचं देणं परत करण्यासाठी झटणारा माणूस विरळाच. पुण्याच्या सौ. शुभदा केसकर मात्र असेच एक विधायक कार्य अविरत करत आहेत. गेली अनेक वर्षे शुभदा केसकर 'कथाकथनातून समाजसेवा' हा अभिनव उपक्रम राबवितात. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागारिकांपर्यंत सार्यांनाच आपल्या कथाकथनातून भुरळ घालणार्या शुभदाताई म्हणजे मूर्तीमंत आत्मविश्वास, कृतज्ञता, जिद्द आणि उत्साह!
गेली १३ वर्षे न थकता, न चुकता कार्यरत असलेल्या शुभदाताईंच्या कार्याची सुरूवात केवळ योगायोगाने झाली. त्या रहात असलेल्या कर्वेनगर येथील नटराज सोसायटीच्या क्रिडांगणावर लहान मुलांना गोष्टी सांगण्याचं आणि त्यांच्या संस्कारवर्गाचं काम त्यांच्या हाती आलं. वाचनाचा छंद लहानपणीच जोपासला गेल्याने हाती जे जे चांगले पडेल ते ते वाचण्याची सवय जडलेली. त्यातूनच काही निवडक कथा त्यांनी लहान मुलांना सांगण्यास सुरूवात केली. मुलांच्या तरल भावविश्वाचे सुप्त कंगोरे डोळसपणानी जपत त्याच बरोबरीने संस्कारक्षम व बोधप्रद कथा सांगत, त्यातील संस्कार मुलांच्या मनावर बिंबवणे आणि एका अर्थाने त्यांच्या निकोप भावी आयुष्याचा पाया घडविणे हे कार्य शुभदाताई आज अनेक वर्षे करीत आहेत.
कथाकथन हे एक कलेसोबतच एक शास्त्र आहे. या शास्त्राला स्वत:चे असे काही नियम आहेत. पुन्हा कथा कथन करायची म्हटली की त्यासाठी नाट्य, अभिनय, देहबोली हे सारं आलच. या सार्यांचा सखोल अभ्यास शुभदाताईंपाशी आहे. अभिनयाचं नैसर्गिक अंग असल्यामुळे पूर्वी त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील प्रवेशांचे एकपात्री प्रयोग अनेक प्रथितयश संस्थातून केलेले आहेत.
पुण्यातील नामवंत शाळा, बालरंजन केंद्र, भारती निवास, पुणे अशा संस्थांतून मुलांसाठी गोष्टींतून संस्कार, युनिवर्सिटी वूमेन्स कौंन्सिल, गोखलेनगर, पुणे अशा समाजसेवी संस्थांसाठी कथाकथन कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. कर्वेनगर, पुणे येथील नटराज महिला कार्यकारिणीत नेहमीच त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. एकांकिका, पथनाट्य, नाट्यप्रवेश , वीरगीत गायन, अभिनय गीत यांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण त्या उत्तम करतात.
साधारण ३ वर्षांपूर्वी माननीय सौ. सुधा मूर्ती यांच्या कथा त्यांच्या वाचनात आल्या आणि त्या भारावून गेल्या. कथा साध्याच असूनही शब्दांची नैसर्गिक गुंफण, गोष्टींमधील सहजता, प्रसंगातील सच्चेपणा, साधी पण प्रभावी लेखनशैली, त्यातून आपोआप साधला जाणारा स्वसंवाद आणि शेवटी हवा तो सकारात्मक परीणाम साधण्याची हातोटी ही सुधाताईंच्या लेखनातील वैशिष्ठ्ये त्यांना प्रकर्षानी जाणवली. या कथा अभिनयातून आणि कथाकथनातून मांडल्यास त्यांचा योग्य तो प्रभाव पडेल असंही वाटलं. समाजसेवेसाठी झटणार्या त्या स्त्रीच्या कथा वाचून त्यांना जाणवलं की लहान मुलांसोबतच महत्वाचे असे इतर असंख्य मुद्दे आहेत.
२०१० साली 'निवेदिता प्रतिष्ठान'तर्फे घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत त्यांना श्री. द.मा. मिरासदार यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक मिळाले. तेथून प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे 'मातोश्री' व 'आपलं घर' वृद्धाश्रम येथे कथाकथनाचे व भारूडांचे कार्यक्रम, 'परांजपे विद्यालयात' 'जिजाऊ प्रतिष्ठान'तर्फे बालवाडी शिक्षीकांना कथाकथनाचे प्रात्यक्षिक व प्रायोगिक मार्गदर्शन, एस.एन.डी.टी. पुणे येथे 'शिक्षक-पालक संबंध व त्यांचा पाल्यावर होणारा परिणाम' यावरील मार्गदर्शनपर व्याख्यान केले. बालरंजन, पुणे येथील 'सुजाण पालकत्व' या उपक्रमात त्यांनी सुधाताईंच्या अशाच काही कथा सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली आहे.
मुख्य म्हणजे या कथाकथनाला व्यावसायीक स्वरूप न देता, समाजाला काहीतरी चांगले द्यावे या इच्छेनी त्या हा उपक्रम राबवितात. त्यामुळेच यातून मिळणारे मानधन प्रवासखर्च वजा जाता समाजकार्यासाठी वापरण्यास त्या कटीबद्ध आहेत असे त्या आवर्जून सांगतात.
आज सर्वत्र अस्ताव्यस्त पसरलेली, विस्कटलेली समाजव्यवस्था, एका ठिकाणी मानसिक आणि भावनिक गुंता आणि घुसमट तर दुसर्या ठिकाणी विभक्त जीवनशैली, वाढत चाललेले ताणतणाव, त्यातून हरवत चाललेले नातेसंबंध, वृद्धांच्या समस्या, लहानांवरचे संस्कार या ज्वलंत प्रश्नांवर चपखल बसेल असा तोडगा कुणापासही नाही. पण एक गोष्ट त्यांना मनापासून जाणवते आणि ती म्हणजे, संवेदनशील आणि तितकचं कणखर मन घडवणे ही या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे आणि या दृष्टीने होत असलेल्या असंख्य प्रयत्नांमध्ये त्यांनी हा खारीचा पण महत्वाचा वाटा उचललेला आहे.
सांस्कृतिक पुणे या मराठीत सुरू केलेल्या ब्लॉगसाठी विविध ठिकाणी पुण्यात होणा-या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून त्यावर स्वतंत्र भाष्य करू शकणारे तरूण ब्लॉगर्सनी संपर्क साधावा. हा एक नवा उपक्रम इंटरनेटच्या माध्यमातून सुरु केला आह...े. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट आणि विविध ललीत कलांचे कार्यक्रम सादर करणा-या संस्थाचेही आगामी कार्यक्रम या ब्लॉगवर दिले जातील. इथे कोणतेही मूल्य आकारले जाणार नाही. भारतातले पुणे हे एक सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख स्थान मानले जाते. इथल्या रसिकांची कीर्ति सर्वदूर पसरली आहे. पुण्यात रोज अनेक कार्यक्रम होतात. त्यांच्यासाठी ही स्वतंत्र दखल घेणारी साईट असावी एवढीच माझी इच्छा आहे... त्यासाठीच हे सारे... www.culturalpune.blogspot.com हा ब्लॉग सुरु केला आहे..तो आपल्या सर्वांचे सांस्कृतिक संकेतस्थळ असेल.. ते करणे हा माझा प्रयत्न आहे. खात्री आहे आपण सारे याला मदत कराल. धन्यवाद. सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com www.subhashinamdar@gmail.com www.culturalpune.blogspot.com Mob: 09552596276 See More
आज १४ अप्रैल द.मा . मिरासदार यांचा ८५ व वाढदिवस . त्याना शुभेच्छा देण्यासाठी घरी गेलो असताना नवे संकल्प मिरासदार सांगत होते . विनोदी साहित्य विषयी बोलणे निघाले . हा त्यातलाच कही भाग .....
-आज उत्तम विनोद दुर्मिळ झाला आहे .चिं. वि .जोशी, गडकरी , अत्रे , दत्तु बांदेकर असे उत्तम दर्जाचे विनोदी साहित्य दुर्मिळ झाले आहे .
विनोदी साहित्य लिहले जाते ..दिवाळी अंकातून हे लेखन होते पण ते वाचले तेर समाधान होत नाही .
उत्तम विनोदी लेखन करायला निरिक्षण शक्ति हवी. अवलोकन हवे आणि वाचन भरपूर असणे आवश्यक आहे .
अश्लीलतेकड़े विनोदी साहित्य झुकलेले दिसते .त्यातली चित्रही अश्लील असतात . आजचा तरुण वर्ग याकडे लगेच अक्रुष्ट होतो . हा विनोदाचा पराभव आहे असे माला वाटते .
चांगले विनोद निर्माण करता येत नाहीत असे त्याचा अर्थ होतो .
-अनेक उत्तम कथाकार . उदाहरण म्हणजे चिं. वि .जोशी , दी . बा . मोकाशी
उत्तम विनोदी कथा लिहायचे ..पण ते कथाकथन करू सकत नव्हते ..
कथाकाथनाला थोडेफार वक्तृत्व अंगी असले पाहिजे ..शब्दात नाट्य हवे ..
शाब्दिक अभिनय यायला हवा आहे .
-८४ संपून आज मी ८५ वर्षात पदार्पण केले . प्रकृति अद्याप चांगली आहे .
त्याचे श्रेय आई वडिलांना जाते .अजुन आवाज ठनठणित आहे .
माइक नसला तरी आवाज सर्वांपर्यंत पोचतो .
-एक उत्तम विनोदी नाटक लिहायचे आहे .
आणि मराठीत उत्तम विनोदी कादंबरी नाही ..
ती लिहावी असा संकल्प आहे .
सुभाष इनामदार , पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
www.culturalpune.blogspot.com
www.subhashinamdar.blogspot.com
सुप्रसिध्द साहित्यिक,शिक्षणतज्ञ आणि विद्यार्थीप्रिय शिक्षकडॉ. न.म.जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम केले गेले होते.यात एक विषेश उपक्रम त्यांच्या विद्यार्थ्यांनी-चाहत्यांनी केला..ते म्हणजे....स्वाक्षरी संदेश...
काय आहे हा उपक्रम..
डॉ. न.म.जोशी यांच्यासारख्या लोकप्रिय साहित्यिकाची स्वाक्षरी घेण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमानंतर विद्यार्थी, रसिक चाहते गर्दी करीत असतात. मग कुणी वही पुढे करतात. तर कुणी एखादा चिठो-यासारख्या कागदावर सही घेतो. कुणी तर बस तिकिटाच्या मागेही स्वाक्षरी मागतो. देणारा स्वक्षरी देतो. घेणारा हौसेने घेतो. पण त्या स्वक्ष-या वा-यावर उडून जातात.
मग सुहास जोशी, प्रकाश जोशी, प्रकाश भोंडे, राहूल सोलापूरकर या विद्यार्थ्यांनी ठरवले की, जोशी सरांची स्वाक्षरी ही जीनवसंदेश देणारी स्वाक्षरी असली पाहिजे.
डॉ. न.म.जोशी सर म्हणजे बोधकथाकार ! कादंबरीकार , नाट्यलेखक ! त्यांच्या साहित्यातील अनेक सुविचार त्यांचेच विद्यार्थी डॉ. दिलीप गरूड यांनी संकलित केले.
आणि स्वाक्षरी-संदेश नावाची स्वाक्षरी पुस्तिकाच तयार केली गेली. मुखपृष्ठावर डॉ. जोशी यांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी. आत छोटी-छोटी सुंदर पाने. तळाशी डॉ. न.म.जोशी यांच्या साहित्यातला सुविचार !
स्वाक्षरी साठी इतर पान कोरे..तिथेस्वाक्षरी घ्यावी...खाली छापलेला संदेशही तयार !
या शिवाय ही स्वाक्षरी पुस्तिका तयार करण्यामागची व्यापक कल्पना म्हणजे..
आपण लेखक, कवालंत, खेळाडू यांच्या स्वाक्ष-या घेतो. पण आपल्या घरातल्या रक्ताच्या नात्याच्या माणसांच्या स्वाक्ष-या तरी आपल्याजवळ कुठे असतात ?
आजी-आजोबांची स्वाक्षरी
काका-काकुंची स्वाक्षरी
मित्र-मैत्रीणींची स्वाक्षरी
परिचित-अपरिचितची स्वाक्षरी
सहप्रवाशांची-सहका-याची स्वाक्षरी
शिक्षक-मार्गदर्शकाची स्वाक्षरी
अशा स्वाक्ष-या लोकांनी गोळा कराव्यात. तो एक अमूल्य ठेवा असेल. तो एक ऐतिहासिक दस्तऐवज होईल. त्याला भावनिक ओलावा तर आहेच पण व्यावहारिक किंमतही आहे. कधी काळी सबळ पुरावा म्हणू हा हस्ताक्षत्राचा नमुना म्हणून या स्वाक्षरी-संदेश पुस्तिकेतील या स्वाक्षरीचा उपयोग होऊ शकेल.
अशी ही स्वाक्षरी-संदेश पुस्तिका !
त्या पुस्तिकेची किंमत आहे फक्त बारा रूपये.
डॉ. न.म.जोशी यांना ही आगळी-वेगळी गुरूदक्षिणा दिल्याबद्दल प्राख्यात समीक्षक डॉ. द.भि. कुलकर्णी यांनी डॉ.जोशी यांच्या अमृतमहोत्सवी सदस्यांचे भरभरून कोतूक केले आहे.
मुंबईच्या धकाधकीपासून दूर कोकणातल्या एका सुंदर पण दुर्गम खेड्यामध्ये एक कुटुंब मोठ्या मजेत राहतं आहे.
श्रीधर सुर्वे हा ग्रामपंचायतीत सेवक आहे आणि बायको, दोन मुलं आणि आईसोबत तो आपल्या छोट्याशा घरात मोठ्या आनंदाने राहत आहे. मुलगा ‘ओंकार’ हा व्रात्य, अभ्यास न करणारा तर मुलगी मीरा हुशार आणि समजूतदार, आणि सुखा समाधानात संसार करणारी पत्नी इंदू असे हे सुखी कुटुंब आहे. गावातल्या गणपतीवर त्याची श्रद्धा आहे, दोस्तीचे नाते आहे.
लेले साहेब हे ग्रामसुधार मोहिमेवर आलेले सरकारी अधिकारी. त्यांच्या कामासाठी श्रीधरला अलीकडे सारखे मुंबईला जावे लागते.अशाच एका वारीला तो कुटुंबियांना आपल्याबरोबर मुंबईला नेण्याचा प्रस्ताव ठेवतो. मंडळी हरखून जातात. ओंकार मुंबईतल्या मौजेच्या स्वप्नांमध्ये रमून जातो.
पण मुंबईमध्ये ओंकारच्या पदरी निराशाच पडते कारण मुंबईच्या ह्या लखलखत्या जगातल्या बहुतेक गोष्टी त्याच्या वडिलांना न परवडणाऱ्या असतात.अशातच ओंकारला एक टोलेजंग इमारत दिसते,आजीच्या गोष्टीतल्या राजमहालाची आठवण करून देणारी. ते एक फाइव्ह स्टार हॉटेल आहे. ओंकारची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो वडलांना हॉटेलमध्ये जाण्याचा आग्रह धरतो. असह्य होऊन इंदू हात उगारते. मंडळी गावी परततात.
ओंकारच्या वर्तनावर नाराज झालेला श्रीधर “तू वर्गात पहिला येउन दाखव, मी तुला फाईव्हस्टार मधे राहायला घेऊन जाइन” अशी लेकाबरोबर पैज लावतो.
ओंकार पेटून उठतो आणि दिवस रात्र अभ्यास करू लागतो आणि प्रकरण मजेदार होऊन जाते. मुलाच्या वर्तनाने सुरवातीला आश्चर्यचकित झालेला श्रीधर नंतर ओंकारच्या ध्यासाने पुरता घाबरून जातो. खरोखरीच मुलगा पैज जिंकला तर? अस्वस्थ श्रीधर गणपतीला मुलाला परीक्षेत दुसरे आणण्याचे साकडेसुद्धा घालतो.
फक्त एका रात्रीसाठीसुध्दा झगमगणारे ते पाच तारे ह्या छोट्या कुटुंबाला परवडणारे नाहीत.
एक बाप मुलाला दिलेला शब्द पाळण्यासाठी अहोरात्र धडपडू करू लागतो, नाना मार्ग शोधू पाहतो आणि मजेदार प्रसंगाची मालिकाच आकार घेउ लागते.
दूर लखलखणाऱ्या मुंबई बेटाच्या स्वप्नानी आपल्या छोट्या विश्वात सुख मानणाऱ्या त्या कुटुंबात मोठी खळबळ माजते.
.....आता थोडे चित्रपटाविषयी
पंचतंत्रात जसा बोध देण्यासाठी किंवा कसे वागावे याचे धडे गिरविण्यासाठी कथेतून पात्रे बोलत रहातात. आणि त्यासा-यांचा शेवट एक उपदेश ठळकपणे पसरविला जातो. तसाच काहीसा प्रकार ह्या सत्त्याप्रयोगात ता-यांचे बेट मध्ये अनुभवायला मिळतो. मुंलांसाठी बाप म्हणून आजकालचे पालक किती खुजेपण अनुभवतात याचा प्रत्ययही या चित्रपटात प्रतिबिंबीत झाला आहे. आजीने नातीला सांगितलेल्या गोष्टीतूनच कोकणाच्या पार्श्वभूमिवर चित्रपट तुमच्याशी आणि त्या गणपती बाप्पाशी गुजगोष्टी करतो. सचोटिने जगणा-या श्रीधर सुर्वे दारूच्या आहारी जातो. मुलाला दिलेल्या शब्दाला पूर्ण करण्यासाठीलबाडीने पैसे कमवत रहातो. हे सारे मात्र त्या गणपतीच्या साक्षीने..कदाचित गणपती हे एका मनाचे प्रतिक असावे..कष्टाचे..जिद्दीचे फळ नक्की मिळते..ते यश भक्ताच्या झोळीत तो गजानन.. नक्कीच घालतो.
किरण यज्ञोपवित यांच्या दिग्दर्शनातून हे ता-यांचे बेट चमकले आहे. सचिन खेडेकर यांच्यासारखा सामान्यवर्गातला सत्शील माणूस कथेचा भार तोलून धरतो. त्याच्या भूमिकेत तो सहजपणे विरघळून जाताना पहाणे हे आनंदाचे काम रसिकांना करावे लागेल. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मुळे सामान्यांचा असामान्य प्रतिनिधी इथेही ही कथा सचिन घडवितो. कोकणाच्या निसर्गाने... त्यातल्या वस्तुंनी.. वातावरणातून...हे बेट सतत खुणावत रहाते.
त्याला माया आणि प्रसंगी कठोर धार देणारी इंदू ...अर्थात अश्विनी गिरी..
बोटीचे जीवन...मुंबापुरीतली चकाकणारी दुनिया..
मिळेल त्यात समाधान मानणारे कुटुंब.. मुलाशी लावलेल्या पैजेतून हादरून जाते... मग पैशाची दुनिया...भावनेला दुरावते..
सारेच चित्रपटात घडत रहाते.
चित्रिकरणात कोकणाचे वैभवशाली चित्रीकरण तर दिसतेच पण दिसते ...आजही जपून ठेवलेल्या त्या अस्सल परंपरेचे सालंकृत दर्शन. गावात नसेल पेशाची श्रीमंती. पण आहे वारसांनी कमावलेली संमृध्द परंपरा.चित्ररूपाने दृष्यातून ते कोकण डोकावत रहाते.. ता-यांचे बेट..म्हणतानाच कोकणचे आणि मुंबईचे सांस्कृतीक नातेही कुठे तुटत चालल्याचे स्पष्ट दिसते.
कोकणातली माणसे आता कोकणीच बोलत नाहीत..तर ती बोलतात पुणेरी मराठीत..क्वचित आजीच्या आणि बायकोच्या हेलात कोकणी सूरावट आढळते. पण माणूसकीची नाळ मात्र आजही तुटलेली नाही याची प्रचिती आणि तिही....आजच्या परिस्थितीची जाणीव या चित्रपटात ...नव्हे... विमा एजंट बनलेल्या किशोर कदम.. सुपारी घेणारा व्यापारी.. भजनाला ढोलकी वाजविणारा..परिस्थितीने गायही विकायची परिस्थिती येणारा...गावचे..घराचे वैभवी अवशेष विकणारा..शशांक शेंड्ये.. सारेच..
उलट मुंबापुरीत हापिसातला शिपाईदेखील फाईल पुढे रेटण्यासाठी घेत असलेली लाच..शेअरच्या पैशात भावनेला न थारा देणारा विनय आपटे. सारखा..व्यावसायिक...पंचतारांकित हॉटेलात चकाचक शोभिवंत मखमली मूर्ती..आणि इखाद्या इसमाची पैशाची पिशवी परत देण्याची भावनेतून माणूसपणाची..चांगूलपणाची जाणीव.. सारेच.
कोकणातले प्रेम गणपतीवर भारी..त्यातच चित्रपटातला नायक त्या गणपतीच्या मूर्तीशी मनातला संवाद करतो..आपली व्यथा त्याच्यासमोर प्रकट करतो..आणि आपल्या मुलाला दुसरा क्रमांक मिळावा यासाठी गणपतीलाच साकडे घालतो...
सारेच..द्ष्य..अदृष्यात व्यक्त होणारे, किरण यज्ञोपवित या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने हा संस्कार जपणारा..जुन्या परंपरेत काहीसा नवे रसायन गुंफून बनविवेला एक भाबडा पण प्रामाणिक आविष्कार घडविला आहे. इथे चित्राची फ्रेमही बोलते आणि माणसेही. वातावरणही...
ऑल्ट एंटरटेनमेंट आणि नीरज पांडे प्रस्तुत फ्रायडे फिल्मवर्क्स निर्मित हा चित्रपट म्हणजे या सुट्टीत मुलांसह पालकांनी आवर्जून पहावा असा आहे...त्यात तशी करमणूक नसली तरी तुम्ही सहजी या कथेत स्वतःली गुंफत जाता..आणि पुढे त्यातलेच एक तुम्ही बनत रहाता.
सचिन खेडेकर, अश्विनी गीरी यांच्या अभिनयातून साकारले गेलेले.. मध्यमवर्गीयांचे प्रतिनीधी बनून...चित्र तुम्हाला भावत रहाते... कधी बोचते..तर कधी दाद देण्यास भाग पाडते.
इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर या मुलांनी यात खरंच धमाल केली आहे... ते हसवतात तसे थोडे नाचवतातही.
विनय आपटे, शशांक शेंड्ये, किशोर कदम, शुंभांगी जोशी यांच्या भूमिका थोड्या हटके झाल्या आहेत. क्रेडिट गोज टू अर्थात किरण ..
मराठीत मालगुडी डेज सारखा चित्रातून संस्कृती आणि परंपरेचे बीज सांगणारा ता-यांचे बेट....मला तरी वाटते...अवश्य पहा...पण मुलांना घेऊन...
टी.व्ही मालिका, सिनेमे, क्रिकेट आणि अधुनिक विचारांच्या हवेत जगणा-या नवीन पिढीची कानेटकरांच्या कलाकृतींशी क्वचितच भेट झाली असेल.. आणि टी व्ही संस्कृती रूजण्यापूर्वी ज्यांनी कानेटकरांची नाटके आवडीने बघीतली असतील,,अशा सा-यांना वसंत नाट्यवैभव.....ही दुर्मिळ पुर्नभेटच ..सुखद अनुभव देउन गेली.
सुप्रसिध्द लेखक. नाटककार. वसंत कानेटकर..त्यांच्या कारकीर्दीची मागोवा घेणारा कार्यक्रम पुणे, मुंबई आणि नाशिकातवसंत नाट्यवैभव.. स्वरानंद या पुण्याच्या संस्थेमार्फत नुकताच सादर झाला. कानेटकरांच्या काही नाटकातील प्रवेश, काही परिचित. स्वतः कानेटकर व काही मान्यवरांच्या मुलाखतींच्या ध्वनिचित्रफितीतून ..नाट्यगीतांचे सादरीकरण आणि हे सर्व जोडणारे निवेदन..अशा स्वरूपाचा हा प्रयोगच..सादर झाला. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला.
प्रेमा तुझा रंग कसा, मत्स्यगंधा आणि अखेरचा सवाल या नाटकातील प्रवेश..दिलिप वेंगुर्लेकर, रविंद्र खरे, अमृता सातभाई, राधिका देशपांडे, नेहा परांजपे, लिना गोगटे या कलाकारांनी ताकदीने सादर केले
आणि त्यातून रसिकांना कानेटकरांच्या लेखणीची ताकद पुरपुर अनुभवता आली. इथे ओशाळला मृत्यू, आणि अश्रुंची झाली फुले या नाटकातले प्रभाकर पणशीकरांनी रंगविलेला आविष्कार ध्वनिचित्रफितीतून पाहिला. कानेटकर..पणशीकर..आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ऋणानुबंध लक्षात घेता, रघुनंदन पणशीकर यांचे प्रत्यक्ष नाट्यगीत गायन आणि शौनक अभिषेकी यांचे ध्वनिचित्रफीतून सादर झालेले नाट्यगीत गायन..हा ही एक सुंदर सुरेल योग इथे जुळून आला.
कानेटकरांच्या एकाहून एक सरस नाट्यकलाकृती, टीव्ही मालिकेसाठी लेखन, संगीत नाटके या प्रचंड लेखनाची आढावा तीन तासात आणि एका कार्यक्रमातून घेणे हे अवघड काम स्वरानंदने कौशल्याने केले. उत्तम संकलन व सादरीकरण यातून कार्यक्रमाला नेटकेपणा प्राप्त झाला.
संजीव मेहेंदळे आणि समृध्दी पानसे यांनी नटी-सूत्रधाराच्या रूपातून सूत्रे सांभाळली. हा सारा नाट्य-संगीताचा प्रवास वाहता ठेवण्यात या दोघांचे मोलाचे सहकार्य लाभले. संहिता लेखन शैला मुंकुद यांचे तर दिग्दर्शन अजित सातभाई यांचे होते. सर्वांच्या प्रयत्नातून एक वेगळ्या पध्दतीचा कार्यक्रम धावता का होईना सादर झाला...यातून कानेटकरांच्या आचाट बुध्दीसामर्थ्याचे दर्शन घडले.. उद्याच्या पिढीला...वसंत कानेटकर..एक यशस्वी नाटककार आणि शब्दांचा खेळ करणारे अचाट व्यक्तिमत्वाचा प्रत्यय आला.. हे ही नसे थोडके.