subhash inamdar

subhash inamdar

Thursday, September 24, 2020

पुरूक्रमा..कलाजीवनाची संगीतमय वारी .

 


पुरुषोत्तम बेर्डे

30 June 2019

मुंबईच्या कामाठीपुराच्या शालेय जीवनापासून ती सुरु होते आणि एकेकाळचा कामाठीपुरातला वर्गमित्र शामाच्या आठवणीपर्यत टिपत रहाणारा हा एका कलावंताच्या आयुष्यातील कालखंड ऐकणे म्हणजे पुरूक्रमा.
पुरुषोत्तम बेर्डे यांच्या लेखक, दिग्दर्शक, निर्माता,संगीतकार, नाटककार ,प्रकाशयोजनाकार ,वेशभूषाकार आणि चित्रकार आशा विविध भूमिकात केलेली सर्जनशील कामगीरी यातून बेर्डे फिरवून आणतात.. तुम्हाला तुमच्या आत डोकवायला भाग पाडतात. कलाकृती सादर करताना होणारी प्रसववेदना आणि त्याच्या परिपूर्णतेतून होणारा मूक आनंद व्यक्त करण्याची पुरूषोत्तम बर्डे यांची ओळख या एकपात्री प्रयोगातून अधिक रसिकांच्या मनात भारून राहते.
आपल्या पंचेचाळीस वर्षाच्या कालखंडाची एकपात्री सफर ऐकताना सहाजिकच आपण अनेक टप्प्यावर मधुमधुन स्थारावतो.. त्यांचा संगीतमय आविष्कार एकतो.. त्यावेळचे कांही किस्से सनात साठवून घेतो..
कधी निलेश पाटील यांच्या निसर्गातील कव्याचा आस्वाद घेतो. तर जाऊबाई जारात नाटकाच्या निमित्ताने सोळा अभिनेत्रींच्या कसरतीतीून तावून निघालेल्या आठवणीत रमतो. आणि निर्माता दिलिप जाधव यांनी जाऊ बाईच्या एकहजाराव्या प्रयोगाच्यावेळी पुरुषोत्तम बेर्डे यांना भेट दिलेल्या फोर्ड आयकॉनच्या अनोख्या भेटीला दाद देतो.



तर दूरदर्शनवर ग्राफिक डिझायनर म्हणून काम करताना बातम्यांच्या मागे चुकून फ्लोअरचे दार उघडे राहािल्याने बेर्डे यांच्या शिट्टीने बातमीपत्रात होणारा गोंधळ लक्षात ठेवतो.






चित्रकाराच्या दुनियेची ओळख करून देणा-या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतल्यानंतर लिहलेल्या आणि त्याची निर्मिती केलेल्या टूरटूर या एकांकिकेपासून बेर्डेंची कला कारकार्द सुरु झाली. आणि रंगभूमिवर व्यावसायिक जबरदस्त यश दिलेल्या याच नाटकाने पुरुषोत्तम बेर्डे यांना नाव दिले. सुधीर जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, प्रशांत दामले, विजय पाटकर ही नावे रंगभूमिवर स्थीरावली . याचे सारे श्रेय बेर्डे यांचेकडे जाते.

हमाल दे धमाल मधून त्यांनी चित्रपट रसिकांचे लक्ष वेधले. त्यातली गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्य़ातून त्यांना अनिल कपूर यांची कशी मैत्री झाली. रजनिकांत, दिलिपकुमार यांनीही कसे स्वागत केले . आदरणीय दादामुनी अशोक कुमार यांनी दिग्दर्शक म्हणून कसे स्विकारले.. सारेच क्षण ऐकणे म्हणजे पुरुक्रमा करणे होय.
बालपणाचा काळ कामाठीपूरात कसा गेला..ते ये जीवन है..सांगणारे गाणे दाखवत त्यातून होणारे संस्कार कसे आपल्यातील गुणांना वाव देणारे ठरले ते पहाणे मजशीर आहे. गणीताच्या लोखंडे सरांचा मार टाळण्यासाठी खिडकीतून घेतलेले गाढवाचे दर्शन. हा अवघड विषय टाळण्यासाठी घेतलेला संस्कृत विषय..विविध कलांची लहानपणी झालेली ओळख.. सारेच या पुरुक्रमात ऐकता येते.
आपल्या आयुष्य़ात चुलचभाऊ लक्ष्मीकांत बेर्डे याचा सल्लागार आयुष्यात झालेला उपयोग ते व्यक्त करतात.
मोजक्या लोकांच्या संगतीत आपल्या कारकीर्दीचा हा आलेख अधिक व्यापक होतो. कलेच्या सर्व प्रांतात भ्रमंती करताना पुरूषोत्तम बर्डे यांना कसे अनुभव आले. निर्मिती सावंत पासून मकरंद अनासपुरे यांच्या पर्य़त अनेक नवोदितांना संधी देताना त्याना आलेला अनुभव. आता ते चित्रकाराच्या भुमिकेतून कसे नेमके टिपण करतात तेही कावळयांच्या तिक्ष्म नजरेतून ते आपल्या चित्रातून समाजविदारक गाष्टी मांडतात तेव्हा त्यांची सर्जनशील कलावंताची पारखी नजर स्तिमित करते.
मंगलगाणी दंगलगाणी, झपाटा अशा वाद्यवृंदांनाही आपल्या कलेच्या नजरेचा बहाल करून त्यांनी रंगभूमिवर दिसताना कलेने कलाकाराने कसे देखणे दिसावे याचे उदाहरण समाजासमोर ठेवले.
पारखी नजर. साहित्याची आवड. अभिनयाची जाणीव. संगीताची जाण. दिग्दर्शनाची ताकद. आणि चित्रातून उभी रहाणारी कलाकृती प्रत्यक्ष कशी असावी याचे भान असणारे पुरुषोत्तम बेर्डे यांना पुरुक्रमातून अनुभवणे एक आनंदाचा ठेवा आहे.
हा आनंदाचा ठेवा अनुभवण्यासाठी गेलो असता.. पुरूषोत्तम बैर्डे यांचेसमवेत ..अरूण घाडीगावकर,सुभाष इनामदार



पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुरुक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग पाहताना या आमच्या जुन्या मित्रत्वाची आठवण जागी झाली. पुरुषोत्तम बर्डे यांच्या या आगळ्या आत्मकथेची रसिकांनी सवार्थाने दखल घेऊन त्या कालखंडाची साेनेरी पाने आपल्याही मनात साठवून ठेवावी हेच सांगणे.



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

30 June 2019

तुमचा विसर न झाला..डॉ. विजय देव

 

डॉ. विजय देव



पुण्याच्या श्रद्धांजली सभेत बहुआयामी व्यक्तित्व उलगडले..

24 April 2019

सुख दुःखाच्या प्रसंगी सामोरे जाताना डॉ. विजय देव सरांकडे सकारात्मकतेने पहाण्याचा जो उमदेपणा होता तो फार कमी लोकांच्याकडे असतो. आपल्या अस्तित्वाचा आनंद आपल्या भोवतालच्या लोकांना व्हावा असे त्यांचे जगणे होते. ते गेल्याने आपल्या साऱ्या लोकांचा जगण्याचा एक श्वास कमी झाला. त्यांच्या जाण्याने कुटुंबात, समाजात रिकामी जागा निर्माण झाली आहे ती पुन्हा भरून येणे शक्य नाही. आपण सारे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू असा विश्वास या परिवाराला देऊ..अशी भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढरे यांनी व्यक्त केली.
राज्यशास्त्राचे अभ्यासक, दुर्ग साहित्य संमेलनाचे जनक, उत्तम कथावचक, आणि समाजाला नवे आणि वेगळे काही देण्याची उर्मी असणारे लोकप्रिय प्राध्यापक डॉ. विजय देव यांच्या निधनानंतर रविवारी २१ एप्रिलला पुण्याच्या स. प. महाविद्यालयात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. अरुणा ढेरे बोलत होत्या.

ज्येष्ठ मूर्ती अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत व्यासपीठावर अरुण फिरोदिया, शि. प्र. मंडळींच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एस के जैन, सप महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ आणि अरुणा ढेरे होत्या.डॉ. देगलूरकर म्हणाले, देव सर ज्ञानी होते, विश्वासू होते, सात्विक होते, संवेदनशील होते. ते कुठेही आधार असल्याशिवाय आपले मत मांडीत नसत.

यानिमित्त देव सरांच्या आठवणींचा पट इथे उलगडला गेला.. यातून विजय देव काय होते आणि ते कसे समाजाच्या साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक आणि कुटुंब यातून ते कसे होते ते समोर आले.. आणि आपण नेमके काय गमावले याचे भान आले.

उत्तम प्रध्यापक, उत्तम लेखक वक्ते , गडांविषयी उत्तम जण याबरोबरच उत्तम समाजचिंतक म्हणून देव सर आपणाला अधिक भावल्याची भावना मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांनी व्यक्त केली.
संस्थात्मक काम करताना अपमान सोसावे लागतात पण त्यांना बळ देणारे देव सर नाहीत याची उणीव सतत भासणार असल्याचे ते म्हणाले. तरुणांना प्रोत्साहन देणे हा त्यांचा स्थायीभाव होता.
दुर्ग साहित्य संमेलन हा साहित्यामध्ये सुरू झालेला नवा प्रवाह देव यांनी सुरू केला. सरांनी मोजके लिहिलंय पण पुढच्या अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरेल असे लिहिल्याचे मिलिंद जोशी आवर्जून सांगतात.

बाबा अतिषय मनापासून त्यांचे जीवन जगले आणि असं जीवन जागायचे असते हे आम्हा दोघींना त्यांनी शिकविले.. देव यांची कन्या ,अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल देव- कुलकर्णी आपल्या वडीलांविषयी बोलत होत्या.
कायम त्यांनी आम्हाला सांगितले की, अन्न, वस्त्र, निवारा याच्या पलीकडे जाऊन काही काम करा. केवळ स्वतःचा नाही पण इतरांचाही विचार करा. त्यांना तुमच्या प्रत्येक गोष्टीत सामील करून घ्या, हीच त्यांनी दिलेली सगळ्यात मोठी शिकवण आहे, असे त्या म्हणाल्या. आनेक गोष्टीत रस घेणे आणि त्यात रमणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी चिकाटीने, धाडसाने कॅन्सरला तोंड दिले. अतिशय हळव्या भावनेने मृणाल व्यक्त होत होती.

बावन्न वर्षांचा हा सुखी संसार आज संपला या शब्दात आपल्या भावना सांगत विजय देव यांच्या पत्नी डॉ. वीणा देव आपले मन मोकळ्या करत होत्या.
राज्यशास्त्र, मराठी, नाटक, संगीत यांच्या सोबतीनेच आमचा संसार सुरू झाला. कलाप्रेम दोघांकडून जपले गेले. ते स्वतः कलाकार. नव नवे उपक्रम करण्याची त्यांची वृत्ती होती. त्यासाठी सतत मोठी ऊर्जा त्यांच्यापाशी होती. उपजत कलाकाराची वृत्ती, लोकनृत्य, कथाकथन आणि संगीत या सगळ्यांना पोषक वातावरण आम्ही एकमताने, आनंदाचे जिवंत ठवल्याचे त्या सांगत होत्या. वडील कसे असावेत याचा आदर्श माझ्यापाशी आप्पांच्या रूपाने होता. दुसरा आदर्श त्यांनी निर्माण केला .जितक्या आवडीने ते राज्यशास्त्र शिकवायचे तितक्याच आवडीने ते कादंबरीवाचन करायचे. आम्हा सगळ्यांचे मायेचे छत्र गेले पण तुमच्या मनात बाबांच्या विषयीचे प्रेम जिव्हाळा आहे, अतिशय भावुक होउन वीणा देव प्रकट होत होत्या.

इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने मोहन शेट्ये यांनी ,दुर्ग साहित्य संमेलनाची भन्नाट कल्पना त्यांनी तेवढ्याच ताकदीने यशस्वी केली. बहुआयामी व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत.. सदैव प्रसन्न रहाणे . जो वसा वारसा आहे तो पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे म्हटले.

सप महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संज्योत आपटे यांनी.. देव सरांच्या सोबत दोन पुस्तकांच्यासाठी काम करण्याचे भाग्य लाभले. त्यामुळेच त्यांचे राज्यशास्त्राचा व्यासंग, चिंतन आणि मराठी भाषेवरील प्रभुत्व याचे आपणाला जवळून दर्शन झाल्याचे त्यांनी बोलून दाखविले.

अभिरुप न्यायालय, अभिरुप संसद, गडावर जाणे आणि तिथला सगळा इतिहास सरांकडून ऐकणे ही मेजवानी असायची, असेही त्या म्हणाल्या. सर विद्यार्थ्यांत रमायचे. विद्यार्थी हा त्यांचा केंद्रबिदू होता. प्रत्येक विद्यार्थ्यांना काहीतरी गुण असतात ते समजून त्याला प्रोत्साहन देत.

सपच्या मानसशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. अलका देव यांनी देव यांच्यावर एक कविता करून आपल्या भावना वाचून दाखविल्या.
देवघराची यशोगाथा उजळू दे आंबरी..
मनी ठेवुनी एक आस ही विजयश्री गेले देवाघरी..
विद्यार्थी या नात्याने बबन मिंडे यांनी आपल्याला बाबांनी कसे मार्गदर्शन केले हे सांगून त्यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन आता मिळणार नाही याची हळहळ व्यक्त केली.

योगवर्गातले स्नेही अरुणभाई शहा श्रद्धांजली वाहताना म्हणाले, त्यांचा सोशिक स्वभाव, कोणावर टीका नाही असा होता .
जयप्रकाश सुराणा सांगतात, बारा तेरा वर्षे आम्हाला दर रविवारी सिंहगडावर जाताना चार तास साधूसारखा
त्यांचा सत्संग लाभला. दोन तीन वेळा मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन ती पूर्णही केली. हे वेगळेपण माहीत करून दिले.
ज्ञान मार्गाचे ते साधक होते, त्यातूनच त्यांचा सारा विकास होत गेला असावा असे लेखक भरत सासणे सांगतात. रसिक आणि आनंदी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ते म्हणायचे प्रेम हा पाचवा पुरुषार्थ आहे आणि तो प्रत्यकाने मिळवायला हवा . त्यांनी तो साधला होता आणि ते आपल्या वागण्याबोलण्यातून प्रेम पसरवीत होते.

उमदे व्यक्तिमत्व, प्रसन्न हास्य, प्रभावी अध्यापक, समाजमनस्क मन आणि खेळकर लोकव्यवहार या पाचिचे मिश्रण म्हणजे विजय देव असे न. म. जोशी यांनी देव यांचे वर्णन केले.
उद्योजक आणि स्नेही अरुण फिरोदिया म्हणाले,
अशा काही व्यक्ती असतात त्यांना जाणीव असते आपले पृथ्वीवरचे कार्य संपले आहे. आता आपण दुसरीकडे अनंतात विलीन व्हायचे. असे भाग्यवान असतात त्यातले देव होते.
पंचायतीला आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या पूर्ण अधिकार बहाल करण्याचा कायदा लोकसभेत मंजूर होणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत फिरोदिया यांनी मांडले.

दुर्ग म्हणजे केवळ इतिहास नाही तर ती एक परिसंस्था आहे. त्यात इतिहासाबरोबर,पर्यावरण, निसर्ग आहे, तो समाज आहे. तिथे रहाणारे वस्ती वाड्यातले लोक आहेत. त्यांची वेशभूषा, खाद्यसंस्कृती, इथली गुरे, पिके, शेती, खाली हवा, पाणी हा सर्व त्या दुर्गाचा एक भाग आहे.. अशी संकल्पना देव यांनी मांडली. या संकल्पनेला व्यासपीठ देण्याचे काम गोनिदा दुर्गप्रेमी मंडळाने केले. त्यांची ही संकल्पना तो विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत या मंडळाचे अभिजीत बेल्हे यांनी व्यक्त केले.

दुर्ग साहित्य संमेलन ही एक छान संकल्पना ते महाराष्ट्राला भेट देऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्यात माणसे उभी करण्याची ताकद होती. गड या विषयातले ते विद्यापीठ होते ,असे बेल्हे म्हणाले. त्यांचा वारसा आम्ही पुढे नेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महाविद्यालयात देव सरांनी सुरू केलेले , संकल्पना राबविलेलले उपक्रम पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे वचन सपचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी दिले.

दिलेल्या अभ्यासक्रमा शिवाय विद्यार्थ्याना मनापासून देणारा हा प्राध्यापक होता. शिक्षण प्रसारक मंडळींचे ते वैभव असल्याचा अभिमान शिप्र मंडळींच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एस के जैन यांनी यावेळी व्यक्त केला.

ज्या महाविद्यालयात डॉ. विजय देव यांनी प्राध्यापकी केली आणि प्राचार्य पद भूषविले या ठिकाणी शेकडो सुहृदांच्या साक्षीने झालेल्या श्रद्धांजली सभेचे संचालन स्नेहल दामले यांनी केले .



-सुभाष इनामदार .
subhashinamdar@gmail.com

24 April 2019

Wednesday, September 23, 2020

सैनिकांसाठी जेव्हा..व्हायोलिन गाते तेव्हा...!'



फेब्रुवारी १७ , २०१९...रविवारची संध्याकाळ, 
स्थळः निवारा सभागृह पुणे. 

सियाचीनमधल्या भारतीय सैन्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदतनिधी उभारण्यासाठी कंबर कसलेल्या #SIRF संस्थेला मदत करण्यासाठी चारुशीला गोसावी आणि आम्ही सहकारी यांनी व्हायोलिन गाते तेव्हा...!'' हा कार्यक्रम सादर केला.
#SIRF संस्थेचे संस्थापक प्रमुख योगेश चिथडे, सुमेधा चिथडे यांनी त्यांच्या संस्थेबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. 
संस्थेच्या माध्यमातून अनन्यसाधारण कार्य करणारे हे पती-पत्नी जवानांसाठी काय करता येईल या निस्वार्थी विचारातून गेले अनेक वर्षं काम करत आहेत. योगेश चिथडे हे स्वतः भारतीय हवाई दलातले निवृत्त अधिकारी असून, त्यांचा मुलगा भारतीय सैन्यात 'मेजर' या पदावर कार्यरत आहे. आपल्या झेंड्यामधला पाचवा अदृश्य रंग हा आपल्या सैनिकांच्या रक्ताचा रंग आहे हे विसरून चालणार नाही, हे त्यांचं वाक्य नक्की विचार करायला लावणारे आहे.

कार्यक्रमाची सुरवात 'सूर निरागस हो' या गणेश वंदनेनी झाली

कोहिनूर या यित्रपटातले..मधुबन मे राधिका .हे गीत पुण्याच्या व्हायोलीनवादिका चारुशीला गोसावी यानी असे सादर केले..


आणि त्यानंतर भजन, भावगीत, भक्तीगीत, विरहगीत, प्रेमगीत, युगुलगीत, ठुमरी, लावणी, कव्वाली, देशभक्तीपर गीत अशा अनेक ढंगाची, अनेक बाजाची गाणी एकामागून एक सराईतपणारे व्हायोलिनवर सादर केली गेली. 

टाळ्या, शिट्ट्या, वन्स मोअर चा जल्लोष झाल्यावर शेवटच्या 'ए मेरे वतन के लोगो...' गाण्याच्या सुरवटींनी कवी प्रदीप यांचे शब्द डोळ्यासमोर उभे केले आणि अनेकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. 'भारत माता की जय' च्या नाऱ्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली. नीरजा आपटे यांनी निवेदन केले.

-subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com


१७ फेब्रुवारी, २०१९

समाधानाचा पेला पुरता भरलाय..!




सामान्य कुटुंबातील या मुलाला कितीतरी हातांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदतीचा टेकू दिला..
नादारीतून शिक्षण .. इतरांचे घरात आपलेपणाचा ओलावा लाभला..

आईची कडक शिस्त आणि तेवढीच प्रेमाची छाया.. वडिलांचे सौम्य पण बोलके पाठबळ..





साताऱ्यात बरीच कमी जास्त धडपड करून आपल्यापुरता मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला..
तरुणपणात धाडस केले..तडक पुणे गाठले..तरुण भारत आयुष्यात पहिले पाऊल कसून टाकण्यास उपयोगी पडला..
जिद्द आणि साधना.. दोन्ही होती..
भरत नाट्य मंदिरात नाटकाची नांदी सुरू झाली..भूमिका मिळत गेल्या..





नाटकाची भाषा पचनी पडली..रंगभूमीचे आकर्षण वाढले..रात्री बाबूराव विजापुरे.. 










आणि तिकडे पुलाच्या पलिकडे पीडीएचे भालबा केळकर..यांच्या सोबत रात्री रुंगू लागल्या...

 भालबा केळकर
नाटकावर आपल्या भाषेत समीक्षण सुरू झाले..
कला आणि साहित्याची आवड जोपासली गेली..वि ना देवधर यांच्यामुळे पुण्याचा फेरफटका 
आणि अशा उद्याची..दोन सदरे तरुण भारत मधून लिहली.
साहित्यविशारद झालो..
प्रा.एन डी आपटे सरांमुळे पदवीधर .








आयुष्याला स्थिरता आली..विद्याधर गोखले यांचा आशीर्वाद मिळाला..पुणेरी रंगमंच, पुणे तिथे काय उणे..  लोकसत्ता, चतुरंग, सांज लोकसत्ता इथे सदरे, लेखन सुरू झाले..जेष्ठ पत्रकार प्रकाश कर्दळे यांच्या प्रोत्साहनामुळे बातमीदारी आणि लेखन सुधारले..






मात्र कारकुनी वृत्ती सोडून संपादन क्षेत्रात फ्लॅश पब्लिसिटीच्या चारुदत्त गोखले यांच्या दूरदर्शीपणाने  pune flash. com साप्ताहिक  आणि फ्लॅश  म्युझिक.. मध्ये कारकीर्द बनविली..

एका बाजूला नोकरी आणि दुसरीकडे सांस्कृतिक क्षेत्रातली मुशाफिरी केली..कलावंत जवळ आले..अंतरंग समजू आले..



वयाच्या ४५ व्या वर्षी सकाळ सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्राची इ आवृत्ती सुरू करण्याची संधी आली.. त्याचा वृत्त संपादक झालो..बातमी, सदर लेखन आणि चलत चित्रणाचा अनुभव गाठीशी पडला..अखेरीस त्यांना नकोसा झालो.. राजीनामा देवून बाहेर पडलो..

मंदार जोगळेकर, अरुण खोरे, सुनील मेहता..यांच्याकडे काही लुडबुड केली. 






www.subhashinamdar.blogspot.com यातून लेखन सुरू ठेवले..  
काही सांस्कृतिक  कार्यक्रमाना यातून प्रसिध्दी दिली गेली..

यातून सातत्याने घटनांची नोंद सुरू ठेवली..





सोशल मीडिया मधून सतत नोंद करीत गेलो..





आयुष्य सोपे झाले..संसार स्थिरावला.. मुले ,सून आपापल्या कामात व्यग्र आहेत.. सौभाग्यवतीची साथ खंबीर आहे..तिची चाकरी आजही सुरू आहे..नात मनाला उभारी देत आहे..





संगीत, साहित्य आणि नाटकाने भरभरून समाधान दिले..माणसे पहायला ओळखायला शिकविले..













जमेल तशी मदत करावी..मित्र जोडावेत.त्यांचा सहवास घ्यावा.. फिरण्याचा छंद जपून ठेवलाय.. मनात बेचैनीचा विचार आला तर मागचे सारे आठवून त्यातून हुरूप आणतो..






आपल्या क्षमतेपेक्षाही खूप काही मिळाले.. आता हेच समाधान टिकवायला हवं!
रक्ताची आणि जोडलेली नाती टिकवून ठेवायला हवीत..









समाजाने भरभरून दिले..ते समाजाला परत करायला हवे..तेवढी शक्ती आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावे एवढीच प्रार्थना!
तुमचा आशीर्वाद आणि सहवास लाभावा हीच मनोकामना!



आपलाच,







सुभाष विश्वनाथ इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

Tuesday, September 22, 2020

तेरा व्हायोलिन वादकांची गजाननबुवांना स्वरांजली

 


स्वरबहार प्रस्तुत आणि सांस्कृतिक पुणेआयोजित

3 Feb. 2019

पं. गजाननबुवा जोशी यांच्या १०८व्या जयंती निमित्ताने रविवारी ३ फेब्रुवारीला एस. एम. जोशी सभागृहात तेरा व्हायोलिन वादकांनी आपल्या कलेद्वारे स्वरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाची सुरवात वैष्णवी काळे, पूर्वा ओक, अपूर्वा जोशी, अभिजित काणे, वसंत देव, पराग खुरसवार या सहा वादकांनी मालकंस रागातल्या गती सादर केल्या.
नंतर देवेंद्र जोशी आणि डॉ.नीलिमा राडकर यांनी दुर्गा रागातला आविष्कार अतिशय तयारीने सहवादनातून साकार केला.



संजय चांदेकर यांनी देस रागातील ठुमरी आणि मिश्रखमाज रागातील रचना आपल्या स्वतंत्र वादनातून रसिकांना ऐकविल्या .



पं .भालचंद्र देव याची कन्या आणि वयाच्या ९व्या वर्षांपासून व्हायोलिनमध्ये तयार झालेल्या चारुशीला गोसावी आणि देव यांचा वारसा जपणारे कलाकार
रजत नंदनवाडकर यांनी श्यामकल्याण रागातील मसीतखानी गत सादर करून रसिकांची मने जिंकली.
अभय आगाशे यांनी मारुबिहाग नटविला.



पं. भालचंद्र देव आणि रजत नंदनवाडकर यांनी केदार रागात सहवादान करून रसिकांना सांगेतीक मेजवानी दिली.
शब्दावाचूनी कळले सारे.. हे पुलंनी संगीत दिलेले गीत पुलंच्या जन्मशताब्दी निमित्ताने मुद्दाम देव यांनी सादर करून त्यांची स्मृती जागविली. कार्यक्रमाचा अखेर देव आणि नंदनवाडकर यांच्या भैरवीतुन झाला.
या तीन तासांच्या संपूर्ण मैफलीला अतिशय उत्तम तबला साथ केली ती रविराज गोसावी यांनी.



गेली कित्येक वर्षे गजाननबुवा जोशी यांचे पुण्यातले शिष्य पं. भालचंद्र देव बुवांची जयंती पुण्यात साजरी करून विविध व्हायोलिन वादकांना ह्या कार्यक्रमात निमंत्रित करतात. यातून सर्व मान्यवर गुरूंना वंदन केले जाते.
या सर्व कार्यक्रमाची बांधणी आपल्या निवेदनातून सुभाष इनामदार यांनी केली.





सलग तीन तास केवळ शास्त्रीय व्हायोलिन वादन ऐकण्यासाठी पुणेकर रसिकही तेव्हढ्याच आत्मीयतेने उपस्थित रहातात.
-subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmial.com

3 Feb. 2019

शास्त्रीय संगीत गाणारा गायक म्हणून आळखले जावे




राहूल देशपांडे

२० जानेवारी २०१९


मी नाट्यसंगीत गातो. चित्रपटातली गाणी म्हणतो. कट्यारमधली पदे असतील. कानडा राजा पंढरीचे असो. त्यात तुमची दाद मिळते. पण मला एक शास्त्रीय गवई म्हणून ओळखले जावे. कारण माझ्या आजोबांचे एक स्वप्न होते. माझ्या आजोबांचे गुरू मास्टर दिनानाथ मंगेशकर . त्यांच्यावर एक ठप्पा पडला. एक नाट्यसंगीत गायक. जो त्याना आवडायचा नाही. जो माझ्या आजोबांच्या बाबतीत तंतोतंत तसाच पडला.

ते अतिशय उत्तम अभिजात संगीत गात होते ते. त्यांच्यासरखेच मला ठुमरी, गझल गायची आवड आहे. नाट्यसंगीत गायची आवड आहे. बाकी सगळ्या गोष्टी गातो. पण या मंचावर तुम्हाला एक सांगू एच्छितो की, पुढे माझा ओळख जर काही करायची असेल तर चांगल्यापैकी शास्त्रीय संगीत गायचा बुवा अशी झाली तरी मला असं वाटते की माझ्या आजोबांचे स्वप्न पुरे झाल्यासारखे वाटेल.

जेव्हा आपल्याला सुरांची मजा कळते. ते सूर आपल्याला आतमध्ये ओढतात. जितके तुम्ही त्याच्या आतमध्ये जाल. जेवढा सुरांचा सहवास घ्याल. जितके तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल. तितके ते सूर तमुच्या जवळ येतात.
मला आठवतय उषाताई मला सांगायच्या सूरांवर प्रेम करा. मी म्हटलं, मी लावतोय ना सूर. नाही .त्यावर प्रेम करायला शिक.

मला वाटते सूरांवर प्रेम करा म्हणजे काय हे जसे तुम्हाला कळते. आता जिथे मला वाटतय की मला सूरांवर प्रेम करण्याचा प्रवास आता सुरू झालाय. ते सूर तुम्हाला रोज नवा आनंद देतात. रोज रियाज करताना मला नवा आनंद मिळतो.

जितके आपण आत जातो तितके आपणाला जाणवते अरे बापरे आपल्याला अजुन किती चालायचे आहे. त्या प्रवासासाठी लागणारी जी उर्जा आहे ती तम्हाला ते सूरच देत असतात. गुरू जवळची आणि सोपी वाट दाखविण्यासाठी असतो. ती वाट तुम्हाला शोधायची असते..हे कट्यारमधील ती वाक्ये खरी वाटायला लागतात.

प्रत्येकाने आपली वाट शोधत त्या काट्याकुट्यांमधुनच जायचे असते. ते काटे लागले तरच त्या प्रवासाची मजा येते.

वसंतोत्सव ..या महोत्सवाच्या दुसरा दिवस. १९ जानेवारी. १९..डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू रंगमंचावर येतात..एक मालकंस गातात.. आणि बसंत आणि सोहोनी राग गाताना मधुनच रसिकांशी मनमोकळा असा संवाद करतात.. तेव्हा लक्षात येते की त्यांचा प्रवास शास्त्रीय संगीत गाणारे गायक म्हणून सुरू झाला आहे..त्यात त्यांची मुशाफिरी सूरांचा आनंद घेत जगणे सूरू झाले आहे.

- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

२० जानेवारी २०१९

पुरस्कार दिल्याने आपण श्रीमंत - आशालता वाबगावकर



२९ नोव्हेंबर २०१९

स्वरानंदच्या या सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत क्षेत्रातल्या ता-यांना माझ्या हस्ते पुरस्कार दिला गेल्याने मी आज खूप श्रीमंत झाल्याचा अनुभव घेत असल्याचे मत मराठी रंगभूमिवर विविध नाटकातून गेली एकसष्ट वर्षे काम करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री - गायिका आशालता वाबगावकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते संगीत क्षेत्रातील चार कलावंतांना शुक्रवारी २९ नोव्हेंबरला गौरविण्यात आले. यावेळी पुरस्कार विजेत्यांसोबत संस्थेचे प्रमुख विश्वस्त प्रा.प्रकाश भोंडे आणि वंदना खांडेकर रंगमंचावर होत्या. आपले गुरू गोपिनाथ सावकार यांनी रंगमंचावर उभे कसे रहायचे या पासून बोलायचे कसे हे शिकविले..म्हणून मी रंगमंचावर ६१ वर्षे आपण उभे राहू शकले..मात्र ते सोपे नव्हते..त्यासाठी खूप मेहनत घेतली..आपणही आपल्या क्षेत्रात टिकून रहाण्यासाठी खूप मेहनत घ्या ,असे पुरस्कार विजेत्यांनाआशालता वाबगावकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.




यावेळी केशवराव भोळे पुरस्कार- संगीतकार उदय चितळे, माणिक वर्मा पुरस्कार- गायक पुष्कर लेले, उषा अत्रे-वाघ पुरस्कार मृदुला दाढे- जोशी यांना तर विजया गदगकर पुरस्कार गिटारवादक मुकेश देढिया यांना दिला गेला.










याशिवाय सनबीम साउंडचे संजय बेंंद्रे यांना त्यांच्या ध्वनिसिस्ठिम व्यवस्थापनाविषयी खास सन्मान आशालता वाबगावकर यांच्या हस्ते यावेळी करण्य़ात आला.


पुणेकर कलावंताकडे बारकाईने पहात असतात. दाद द्यायची घाई करीत नाहीत. पण उत्तम काम केल्यावर पहिली शावासकी द्यायला ते कधीही मागेपुढे पहात नाही ते पुणेकर..असे मनोगत आजच्या पुरस्कार विजेत्या कलाकारांच्या वतीने मूळच्या पुणेकर आणि सध्या डोंबिवली येथे स्थायिक असलेल्या मृदुला दाढे- जोशी यांनी व्यक्त केले.



पुरस्कार वितरण समारंभानंतर त्या चारही कलावंतांनी आपली कला रसिकांसमोर सादर करून त्यांची शाबासकी मिळविली. यांत रंजना पेठे आणि विनायक जोशी यागायकांचा खास सहभाग होता.










या सर्वच संगीताच्या कार्यक्रमाला साथ केली ती राजेंद्र हसबनिस, आनंद घोगरे, सौमित्र क्षीरसागर आणि सुभाष देशपांडे या तयार वादकांनी. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वरांनदच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरूण नूलकर यांनी तर आभार शैला मुकुंद यांनी मानले. आशालता वाबगावकर यांची ओळख वंदना खांडेकर यांनी करून दिली. भावगीताच्या वाटचालीवरचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आसून. स्वरांनदचा इतिहास आपण लिहित असल्याचे प्रकाश भोंडे यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. - Subhash Inamdar, Pune subhashinamdar@gmail.com

२९ नोव्हेंबर २०१९