subhash inamdar

subhash inamdar

Friday, November 3, 2023

संगीतभूषण पंडित राम मराठे..स्मरण

 


पंडित राम मराठे जन्मशताब्दी निमित्ताने शुक्रवारी पुण्यात गानवर्धन पुणे, यांनी  आयोजित  केलेली ही अनोखी संगीत मैफल.. राम मराठे यांच्या गायनातील सादरीकरणात असलेल्या भरजरी स्वरांच्या लडा इथे हळुवारणे रसिकांच्या साक्षीने उलगडत गेल्या..


ही अनोखी मैफल  राम मराठे यांच्यातल्या कलाकाराचे सर्व बाजूंनी असलेले महानपण ..त्यांची स्वरावरची हुकूमत..त्यातले तेज..अनेक गुरूंकडून घेतलेली विद्या आणि चतुरस्र बुध्दी साऱ्यांचे दर्शन शुक्रवारी एस एम जोशी सभागृहात घडले.


जबरदस्त अशी तीक्ष्ण प्रतिभा लाभलेले राम मराठे नादब्रह्म स्वरुपात आजही किती रसिकांच्या मना मनात आहेत याची साक्ष कार्यक्रमातून येणारी दाद यातून बाहेर आली.

बैठकीत गाणे आणि नाटकातील गाणे कसे आणि का वेगळे  होते याचे मर्म त्यांच्या मुद्रित माध्यमातून उलगडले.

 त्यांच्या बाबतीतला आठवणींचा खजाना इथे अनेक मान्यवरांच्या प्रतीक्रियेतून कळत गेला. 

राम मराठे यांनी आपल्या मुलाखतीतून सांगितलेल्या गोष्टी आणि गायकांच्या हुबेहूब केलेल्या नकला.. यातून ते गायक कसे होते याचे नेमके मर्म त्यांच्या स्मृतीला अधिक झळाळी देणारे होते.


यात राम मराठे यांच्या चार पिढ्या रसिकांसमोर आल्या..

 यात प्रामुख्याने मुकुंद मराठे , भाग्येश मराठे, स्वरांगी मराठे - काळे ,  आदिश्री पोटे,  मृणाल नाटेकर ,राजेंद्र मणेरिकर या त्यांच्या कुटुंबातील आणि परिवारातील कलावंतांचा सहभाग होता.


माधव मोडक..तबला आणि लीलाधर चक्रदेव यांची हार्मोनियम संगत कार्यक्रमाला अधिक समर्पक अशीच होती. संजय गोगटे हे बाहेरून ऑर्गन साथ करीत होते. 


या खरोखरीच संस्मरणीय कार्यक्रमाचे निवेदन स्वाती मराठे.. थिटे यांनी केले होते.


- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

Friday, April 28, 2023

पर्यटकांचे सुख जपणारे अजित करंदीकर..!




रत्नागिरीचे अमृता ट्रॅव्हल्सची निवड करणारे आम्ही पुणेरी ..पण ती निवड किती उत्तम होती याची पारख आम्ही काश्मीर आणि आसाम, मेघालय अरुणाचल येथे जाऊन आल्यावर कळाले की ती किती उत्तम होती...


याचे एकमेव कारण म्हणजे या कंपनीचे संचालक अजित करंदीकर.. पैश्यापेक्षा आपलेपणाने प्रत्येकाशी नाते जोडताना त्यांच्या सुखात समाधान मानणारे हे व्यक्तिमत्व.


 सहा फुटाची उंची असलेला..सैन्यदलात पंधरा वर्षे काम केल्याने तगडेपणा..भारदस्त देह..आनंदी आणि रुबाबदार चेहरा..सगळ्यांना समजून घेऊन शेवटी ठिक आहे..असे आवर्जून सांगणारा माणूस..सहजपणे इतरांवर प्रभाव पडेल असे व्यक्तिमत्व..अजित करंदीकर.. अमृता ट्रॅव्हल्स यांचे नाव आमच्या मैफल ग्रुपच्या एकांनी सुचविले आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आलो..


गेली २२ वर्षे त्यांनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता यांनी रत्नागिरीत त्या भागातील पर्यटकांसाठी आपलेपण जपणारी कंपनी काढून कोकणातून बाहेर पडण्यासाठीची नजर त्यांनी प्राप्त करून दिली..आणि आलेल्या लोकांच्या मनात आपले स्थान पक्के केले ते त्यांच्या उत्तम नियोजनबध्द आणि नेटक्या शिस्तशीर सहलीच्या माध्यमाने.. 


काश्मीर हा तसा वेगळा सुरक्षा असणारा अनोखा भाग आणि तर थ्री सिस्टर हा चायना सीमेवरच्या अतिथंडीतला १५ हजार उंचीवरचा भूप्रदेश..पण दोन्ही ठिकाणी अजित करंदीकर यांनी आम्हा साऱ्या पर्यटकांना जे जे नमूद केले त्या त्या ठिकाणी नेण्याची कसरत पूर्ण समाधानाने पार पाडली..आमच्या प्रत्येकाच्या आरोग्यास प्राधान्य देऊन..काय हवे नको ते साध्य करून दिले.. प्रसंगी आपल्या स्वभावातील माणुसकीचे दर्शन घडविले..


ठरलेल्या रकमेच्या व्यतिरिक्त एकाही पैशाची अधिक मागणी न करता जे जे तुमच्या मनात असेल ते सांगा मी ते पुरवितो.. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवे..मी तिथे मिळाले तर नक्कीच देईन..असे सांगत प्रवाशांना आपलेसे करत आपुलकीचे नाते जपले.. 






व्यवसायापेक्षा नाती आणि माणुसकी सांभाळणारी ही अमृता ट्रॅव्हल्सची पताका का इतक्या सहजपणे पर्यटकांच्या पसंतीस उतरली याचे दर्शन आम्हाला अजित करंदीकर यांच्या सहवासात घडले.. यापूर्वी असाच अनुभव अनुभव ट्रॅव्हल्स यांच्याकडून केलेल्या अरुण भट यांच्या सहलीत आला होता..त्यानंतर आम्ही नवीन सहल कंपनी शोधत होतो. जिथे उत्तम लक्ष दिले जाईल आणि आपल्याला समाधानाने फिरता येईल..ते उदाहरण आता नक्की झाले...

अमृता ट्रॅव्हल्स..रत्नागिरी.. 


काश्मिरच्या सहलीत सिंधुदुर्ग, कुडाळ, चिपळूण, रत्नागिरी,मालगुंड येथील कोकणवासीय ओळखीचे झाले..थ्री सिस्टर सहलीत..पुणे, सोलापूर, कोल्हापूर सारख्या शहरातील पर्यटक सहभागी झाले होते. थोडक्यात तुम्ही कुठलेही असलात तरी अजित आणि सौ. अमृता करंदीकर यांच्या बरोबर सामील होऊन तुमच्या फिरण्याचा आनंद सुरक्षित आणि समाधानाने घेऊ शकता असे हे विश्वासपूर्ण नाव आहे..


 उदाहरण द्यायचे तर शिलाँग येथून बांगलादेश सीमेवरील उमेद नदी परीसरात वर जायचे होते..पण शिलाँग सोडले आणि रस्त्यावर मध्येच कळाले की मध्ये रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद आहे..मग सर्वांना बोलावून अजित सरांनी विचारले आपण पर्यायी रस्ता शोधून जाऊ. पण सुमारे १५० कि.मी. प्रवास वाढेल..आणि रात्री मुक्कामास उशीर होईल..असे सांगून आम्ही दुसऱ्या मार्गाने निघालो देखील..पण यामुळे खर्च वाढेल..ह्याची जाणीव होती...आम्ही शेवटच्या दिवशी त्या खर्चात आमची मदत देण्यास सारे तयार होते..पण करंदीकर यांनी ठामपणे सांगितले..तुमचे समाधान हे महत्वाचे आहे..माझा खर्च झाला खरा..तरीही मी फायद्यात आहे.. तुम्ही कुणीही काहीही द्यायची गरज नाही.. आणि त्यांनी तो विषय संपविला..


कुणाही सहभागी मंडळींनी खिशातून एकही पैसा काढायचा नाही..आणि तसा खर्च केला तर मला सांगा आणि ते माझ्याकडुन मागून घ्या..


 केवळ हा भाग नाही.. तर काश्मीर येथे शक्य नव्हते पण थ्री सिस्टर येथे बरोबर स्वयंपाकी होते.. प्रत्येक ठिकाणी रोज वेगळा मेनू.. चवदार..आणि उत्तम. रोज वेगळे गोड.. ताक शिवाय रोज सकाळी आणि संध्याकाळी चहा..भरपूर..आणि अगत्याचे दर्शन.. इतरांबरोबर स्वतःही या आनंदात सहभागी होऊन मीही तुमच्यातील एक बनून वावरणे हे अजित सरांचे वैशिष्ठ्य.


मालक असल्याचा आविर्भाव न बाळगता..सर्वांना आपलेसे करून उत्तम ते ते दाखविण्यास सतत तयार असलेले अजित सर मनात कायम कोरले गेले..त्यांच्या बरोबर आम्ही सुमारे २० दिवस घालविले . त्या आठवणी आम्ही नेहमीच जवळ ठेऊ आणि त्यांच्याबरोबर सहली करण्यास इतरांना सांगू ..


आता त्यांचा हा पर्यटनाचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्यांचा मुलगा श्रीहरी अजित करंदीकर यात सहभागी झाला आहे, ही उत्तम गोष्ट आहे.


अजित करंदीकर.. तुम्ही आम्हाला आनंद आणि समाधान दिलेत..असेच प्रेम कायम राहो हीच मनोमनी प्रार्थना.. अमृता ट्रॅव्हल्स जेंव्हा २५ वर्षाची होईल तेंव्हा जरूर रत्नागिरीत येऊ.. 





तुमचाच, 


सुभाष विश्वनाथ इनामदार, पुणे

 ९५५२५९६२७६


Thursday, January 5, 2023

व्हायोलिनचा समृध्द वारसा !







 व्हायोलिनचा समृध्द वारसा गुरुवारी रसिकांनी अनुभवला!


ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित भालचंद्र देव यांच्या प्रथम स्मृतदिनानिमित्त त्यांच्या कन्या आणि शिष्या सौ. चारुशीला गोसावी यांनी गुरुवारची संध्याकाळ आपल्या उत्तम वादनाने रसिकांच्या मनात उमटविली.


व्हायोलिन गाते तेंव्हा.. या कार्यक्रमातून.


स्वरबहार आणि सांस्कृतिक पुणे आयोजित कार्यक्रमाची सुरवात भालचंद्र देव यांच्या छोट्या ध्वनिचित्रफीतीने झाली. 

आरंभी चारुकेशी रागातली बंदिश सादर करून..त्यांनी व्हायोलीनवरची आपली हुकूमत सिद्ध करून..रसिकांना आपलेसे केले.

देवाचीये द्वारी पासून अभंग जिवलागा कधी रे येशील तू , वादळ वारं सुटलं ग, का हो धरिला सारखी वेगळ्या बाजाची गीते.बाई माझी करंगळी मोडली.. सारखी खणखणीत लावणी. त्यात वाजलेली ढोलकी...

आणि मग बाजे मुरलीया, ओ सजना, मधुबन सारखी हिंदी गीते अशी काही रंगतदार सादर झाली की रसिकांना वन्समोअरचा आवाज द्यावा लागला.



नीगाहे मिलानेको जी चाहता है आणि लागा चूनरी मे दाग..या गाण्याच्या भैरवीला आवश्यक असा स्वर ,ताल आणि टाळ्यांचा कडकडाट करून व्हायोलीनची आनंदमयी सफर चारुशीला गोसावी यांनी घडवून आणली..


व्हायोलीनच्या सुरावटितून शब्द आणि त्यातला अर्थ रसिकांच्या मनात अलगदपणे आकार घेईल असे तयारीचे वादन इथे चारुशीला गोसावी यांच्याकडून होत होते.. गाण्यातील हरकती आणि सुरावटी सफाईदार आणि सहजपणे वाद्यातून उमटत होत्या.

त्याही आपल्या वडीलांप्रमानेच व्हायोलिन वाद्यातील शिष्य घडविण्याचे कार्य करीत आहेत.. एक आदर्श कलावंत आणि व्हायोलिन गुरू म्हणून त्यांच्याकडे पहाता येईल.


मोहन पारसनीस (तबला), विनीत तिकोनकर (तबला आणि ढोलकी) , अमृता दिवेकर ( सिंथसायझर) राजेंद्र साळुंके( तालवाद्य), प्रसन्न बाम( हार्मोनियम).. यांच्या उत्तम साथीच्या संगतीत व्हायोलिन गीतांचा नजराणा रसिकांनी आनंदाने झेलला..

यावर कडी म्हणजे.. नीरजा आपटे यांचे सूचक आणि गाण्यांच्या निवडीला साजेसे अनोखे निवेदन..

भैरवी धून वाजवून गोसावी यांनी ही मैफल संपविली.

कलेचा उत्तम वारसा जपत त्यांनी तो रसिकांच्या मनात व्हायोलीनची गोडी निर्माण केली आहे.असेच कार्यक्रम व्हायोलिन या वाद्यांचे सादर करून वडिलांची समृध्द कला परंपरा कायम पुढे नेतील असा विश्वास यामुळे रसिकांना पुन्हा एकदा आला.








- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar @gmail.com



Monday, January 25, 2021

गा बाळांनो श्रीरामायण..!





कोरोना काळात बंद असलेली गांधर्व महाविद्यालयाचे  विष्णू विनायक स्वरमंदिराचा स्वरमंच दहा महिन्यानंतर उघडला आणि तोही ही वास्तु उभारण्यात ज्यांचा मोलाचा हात होता त्या कै. धोंडू उर्फ डी. जी.मराठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने. 

ते या महाविद्यालयात ४० वर्ष प्राचार्य होते.. मराठे यांच्याकडे संगीताचे धडे घेतलेले वसंतराव आणि सौ.विद्या पेंढरकर यांच्या कुटुंबियांच्या वतीने गीतरामायण गायनाचा कार्यक्रम गुरुवारी २१ जानेवारी २०२१ ला रंगला. विक्रम पेंढरकर यांचा मुलगा वर्धन पेंढरकर आणि भाचा अथर्व बुरसे यादोन युवा गायकांनी हे गदिमा रचित गीतरामायण    सादर केले..

स्वये श्रीरामप्रभु ऐकती पासून गा बाळांनो श्रीरामायण पर्यंत निवडक गीते त्यांनी इथे आपल्या भारदस्त आवाजातून पेलण्याचा प्रयन्त केला.. 

स्वयंवर झाले सीतेचे..जयगंगे जय भागीरथी..बोलले इतुके मज श्रीराम..दैवजात दुःखे भरता..सन्मित्र राघवाचा..भूवरी रावणवध झाला..ही त्यापैकी काही उल्लेखनीय गाणी..


कार्यक्रमात बोलताना या मुलांनी ही  अजरामर गाणी ऐकवण्याचा हा जो घाट मांडला..त्याला गा बाळांनो श्रीरामायण.. असा आशीर्वाद ह्या कार्यक्रमाच्या संकल्पना आणि मार्गदर्शिका विद्या पेंढरकर यांनी दिला..


डॉ. वैशाली जोशी यांचे निवेदन होते..कार्यक्रमाची रंगत आणणारे साथीचे कलावंत होते.. प्रमुख मार्गदर्शक हार्मोनियमची संगत करणारे विक्रम पेंढरकर..प्रसाद वैद्य..तबला. चारुशीला गोसावी.. व्हायोलिन. नरेंद्र काळे..तालवाद्ये. तसेच समूहस्वरात साथ केली ती मैत्रेयी पेंढरकर आणि वैशाली जोशी यांनी.


गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य  आणि जेष्ठ हार्मोनियम कलावंत प्रमोद मराठे यांनी आपल्या वडिलांच्या जन्मशताब्दी निमित्ताने  पेंढरकर कुटुंबियांना धन्यवाद दिले. ह्या संस्थेच्या बिकट वाटचालीत वडिलांनी विनायकबुवा पटवर्धन यांच्यानंतर ही संस्था चालू ठेवली याबद्दल त्यांचा अभिमानपूर्वक उल्लेख केला.



स्वतः विद्याताईंनी  ( सौ. विद्या पेंढरकर) सावळा ग रामचंद्र हे गीत आपल्या तरल आणि भावनांचा उत्कट आविष्कार करत गायले..ते गीत मनात कायमचे भरून राहील असेच होते.


प्रमोद मराठे यांचे जेष्ठ बंधू चंद्रशेखर मराठे यांच्या हस्ते कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांचा सन्मान केला गेला.


-सुभाष इनामदार, पुणे


subhashinamdar@gmail. com

Saturday, September 26, 2020

चार संगीतकारांची मर्मस्थळे सांगणारा ..चतुरंग




सी रामचंद्र. मदन मोहन. ओ. पी.नय्यर. रोशन..चतुरंग

6 Feb. 2020

सी रामचंद्र. मदन मोहन. ओ. पी.नय्यर. रोशन.. या चार महान संगीतकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या अजरामर गीतांचा आस्वाद देता देता ती गाणी का इतकी वर्षे रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य का गाजवून आहेत याचा साक्षात्कार देणारा चतुरंग हा संगीतमय कार्यक्रम आजही आपले वेगळेपण मनात कायम ठेवून आहे.. रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अनुभवलेले सडेतीनतास लिहिताना डोळ्यात साठवून राहिले याचे प्रमुख कारण मृदुला दाढे- जोशी यांनी चार संगीतकारांच्या गाण्यांची केलेली बुद्धिनिष्ठ विचार मांडणी.. कार्यक्रम संगीताचा ..पण लक्षात रहाते ती मृदुला दाढे यांनी त्याविषयी सांगितलेली मर्मस्थाने आणि संगीतकारांनीही केला नसेल असा त्यामागे ठेवलेला विचार.
शरयू दाते, सई टेंभेकर आणि संदीप उबाळे यांनी त्या गाण्यांना सादर करून जी मौज रसिकांना आपल्या उत्तम गायनातून अनुभवायला दिली त्याबद्दल हमलोगचे सुनील देशपांडे यांना मनापासून दाद देणे हे गरजेचे आहे.. चतुरंग.. खरेच चार संगीतकारांवरचा कार्यक्रम पण तो पेलला तो तीन गायक आणि एक अभ्यासपूर्ण भाष्य केलेल्या मृदुला दाढे-जोशी या चार कलावंतांनी.. तो चोखंदळ आणि विचक्षण वाचक तसेच जाणकार श्रोते असलेल्या पुणेकरांना तिकीट काढून तो मनापासून ऐकवासा वाटला यातच याचे यशस्वीपण सामावलेले आहे.






त्या संगीतकारांच्या सुवर्णकाळात जेंव्हा मेलडी ही अनभिषिक्त सम्राट होती. चाली छान होत्या. गाणं सुरेल होते. शब्दात ताकद होती. हे सारे मान्य केले तरीही त्यात विलक्षण दैवी गुण होता. त्या भारावलेल्या अवस्थेतून बाहेर आलो की त्यातली सौन्दर्यस्थळे नव्याने जाणवायला लागतात..या गाण्यांचा एक संगीत अभ्यासक म्हणून मृदुला दाढे यांनी याविषयी केलेले भाष्य त्या चालीविषयी वेगळी दृष्टी देतात . मग ते गीत रसिकांसमोर गायक गायिका सादर करतात..यातूनच संगीतकारांची त्यामागच्या विचारांची दिशा कळण्यास मदत होते आणि आपण भारावून जातो.
प्रत्येक संगीतकाराचा स्वभाव आणि त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी त्यांच्या चालीतही आढळते असे मृदुला दाढे यांना वाटते आणि ते त्या सोदाहरण मांडतातही.
रोशन यांचा शास्त्रीय संगीतावर विलक्षण प्रेम..त्यांची गाणीही त्यातल्या बंदीशीसारखी ..मन रे तू काहे ना धीर धरे ..संदीप उबाळे यांच्या आवाजात ते दर्द भरे गीत मोहिनी घालते.

काळजात किनारी दुःख आणि रांगडी मस्ती असणारा संगीतकार म्हणून सी. रामचंद्र यांचा उल्लेख होतो.. त्यांचे बलमा बडा नादान हे गीत शरयू दाते तेवढ्याच सुरेलतेने गाऊन रसिकांना मोहित करतात.
मदन मोहन हे नाव उच्चारताना काळजात कळ येते..अक्षय कारुण्याचा झरा म्हणजे मदन मोहन..दुःख आणि तेही भरजरी
अनुभवावे ते या संगीतकाराच्या गाण्यातून.. हम प्यार मे जलनेवलो.. या गण्यातून सईने ते नेमके स्वरातून उलगडून दाखविले.

ओ. पी.नय्यर यांच्या गाण्यात तुम्हाला ते भावनेला थेट भिडवतात. तीव्र भाव, जिद्द, रांगडेपणा सारे त्यांनी आणि आशा भोसले यांनी त्या गाण्यात जपले..त्यांचेच एलो मै हारी पिया.. हे गीता दत्त यांच्या अवजातले गाणे सईने सादर करीत ते दर्शन घडविले..
असे चार संगीतकांचे सांगेतीक दर्शन चतुरंगच्या मंचावर सतत उलगडत जात होते.. कधी स्वरातून तर कधी शब्दातून ते सारे संगीतकार वेगवेगळ्या भावनातून इथे सिद्ध होतात.. मग ती गाणी कधी बंदीशींवर आधारित तर कधी उत्तम रचनेतून कानी येतात..

लग जा गले.. इशारो इशारोमे..अकेली हूँ मै...तुम आगर मुझको ना चाहो..असेल नाहीतर.. तुम क्या जानो..आप के हसीन रुख पे..ओ चांद जहाँ.. चैन से हमको कभी..
सारीच हिंदी चित्रपटसृष्टीला आपले चार चांद लावणारे हे चार संगीतकार ऐकताना आपण स्वतःला भाग्यवान समजतो..
ये जिंदगी उसिकी है. जो किसिका हो गया..या गाण्यातून जेंव्हा मृदला दाढे-जोशी समारोपाचे गीत सादर करतात तेंव्हा वतावरणही भारून जाते.. आण्णा म्हणजे सी. रामचंद्र यांच्या या विलक्षण गाण्याने चतुरंगने अलविदा केले..

हम लोग प्रस्तुत या कार्यक्रमाची सारी भिस्त संगीत संयोजक आणि सिंथवर आपले प्रभुत्व असलेला कलावंत केदार परांजपे यांचेकडे जाते.. प्रसाद गोंदकर-सतार..निलेश देशपांडे-बासरी.. विशाल थेलकर..गीटार..
अजय अत्रे..विक्रम भट..दोघेही रिदम मशीन आणि तबला..यांच्या उत्तम संगीत साथीने हा प्रवास आनंददायी ठरला.. चालीला योग्य असा स्वरांचा भरणा ..गाण्यातील शब्दांच्या अवकाशात संगीत संयोजकाने आकाराला आणलेली वाद्यांची सुरावट आणि तालातून बहरत गेलेली आनंददायी साथ..सारेच या वादकांनी आपल्या साथीतून रसिकांसमोर पेश केले.

असा कार्यक्रम करणे हे धाडस आहे ते सुनील देशपांडे यांनी ह्या हमलोग संस्थेने केले याबद्दल त्यांचेही आभार मानले पाहिजेत. रंग चार सांगितकारांचे हा या कार्यक्रमाचा भाग पहिला आहे. म्हणून पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.



-सुभाष इनामदार...पुणे.
Subhashinamdar@gmail. com
6 Feb. 2020

अक्षरधाराचे अनमोल कार्य

 

अक्षरधाराचे रमेश आणि रसिका राठीवडेकर


6 march 2020

पुस्तकांना वाचकापर्यंत नेणारे दाम्पत्य म्हणजे अक्षरधाराचे रमेश आणि रसिका राठीवडेकर ..



पुण्याच्या बाजीराव रस्त्यावर सुमारे दोनहजार क्षेत्रफळावर वाचकांना आपले वाटावे अशी रचना केलेले पुस्तकांचे दालन सजवून ते पुस्तकांच्या विविध दालनातून नाटविले आहे.






एकदा परीक्षा सुरू झाल्या की पुस्तकांच्या दुकानाकडे वाचक फारसे फिरकत नाहीत..मग काही नवी आकर्षण आणि सवलत देण्याची तयारी देऊन संचालक दुकानात येण्याचे आमंत्रण देत असतात..



दुकानात हरतऱ्हेचे साहित्य उपलब्ध असते.. एखादे पुस्तक नसले तर ते मागवून देतात..वाचकाचा फोन घेऊन त्यांना त्याविषयी माहितीही देतात..आणि त्यांना पोचही करतात..






मुलांना सुट्टी लागली की खास पुस्तके मुलांना घरी नेण्याची सवलत देतात.. रोज साहित्यिक बोलावून मुलांना त्यांची भेट घडून आणतात.. .कुणी घरी वाचायला नेलेली पुस्तके परतही देत नाहीत..तर कुणी प्रतच देत नाहीत..पण हे सारे सहन करून उपक्रम दरवर्षी राबवितातच..



आजकाल पुस्तके वाचनाचे प्रमाण कमी होत आहे हे मान्य करत आता आमची अक्षरसेवा कायमस्वरूपी रहावी असाच आमचा सारा प्रयत्न असल्याचे रमेश राठीवडेकर सांगत होते..


हा अक्षरधाराच्या पुस्तक संसारात त्यांची सौभाग्यवती रसिकाताई अनमोल काम करतात..प्रसंगी कार्यक्रमाचे सारे नियोजन..अगदी निवेदनापासून आभारपर्यंत त्या उत्तम रित्या हाताळतात..





आता हे पुस्तक दालन सुरू केल्यावर रमेशजी इतर भागात पुस्तक प्रदर्शने भरविण्याचे बंद करून याच पुण्यातल्या दुकानात अधिक वैविध्य कसे आणता येईल असा प्रयत्न करीत असतात..


रमेश आणि रसिका राठीवडेकर यांचा हा अक्षरप्रवास शब्दबद्ध करणे ही खरेतर काळाची गरज आहे.



अशा पुस्तकात आपले सारे आयुष्य वेचणाऱ्या राठीवडेकर पती पत्नीच्या कार्याला आमच्यासारख्या अनेक पुस्तकप्रेमींचा सलाम..त्यांना अक्षरधारामध्ये भेटून नवी ऊर्जा मला मिळाली.. ती तुमच्या मनात बिंबविण्याचा हा प्रयत्न..




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail. com

 6 march 2020

Friday, September 25, 2020

चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन




 17 March 2020

मराठी चित्रपटसृष्टी जेंव्हा सचिन पिळगांवकर, लक्षा बेर्डे.. आणि अशोक सराफ यांच्या नावावर धुमडक्यात ..आत्मविश्वासपूर्ण मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवीत होती.. तेंव्हा त्यांच्यासोबत असलेले आणि आपल्याला लाभलेल्या सहज अभिनयाची देणगीतून सदैव अनेकविध भूमिकेतून चमकणारे नाव जयराम कुलकर्णी..

आज मंगळवारी १७ मार्च २०२० सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी या इहलोकातून निघून गेले आणि ते सारे दिवस पुन्हा आठवणीत साठले गेले..




वयाच्या ८७ व्या वर्षी अनेक दुःख पचवत आपल्या हसऱ्या व्यक्तीत्वाने ते सारे सहन करत होते..
आज ते सारे संपले..
व्यंकटेश माडगूळकर यांच्याबरोबर पुणे आकाशवाणीच्या ग्रामीण विभागात जयराम कुलकर्णी हे आपल्या खर्जातील आवाजाने श्रोत्यांना आपलेसे वाटत गेले.. पी डी ए तुन भालबा केळकर यांच्यासोबत काही नाटकात ते रमले देखील होते..
पण सचिन पिळगावकरांच्या हाकेसारशी चित्रपटसृष्टीचा भाग बनून ते तिकडे वळाले..आणि मागचे सारे मागे पडून या सोनेरी दुनियेत विसावले. बहरलेही..



एक माणूस म्हणून ते अनेकांच्या मनात स्थापित झाले होते.. कलाकार म्हणून अनेक चित्रपटांचे पुरस्कार मिळाले देखील..पण गेली काही वर्षे त्यापासून दूर राहून ते सारे आपल्या घरातून तपस्वीपणे अनुभवत होते..
आज विराजस हा नातू माझा होशील ना ..यातून आपल्या आजोबांचा वारसा पुढे नेत आहे.. सून मृणाल कुलकर्णी हिने आपले स्थान अभिनेत्री, दिग्दर्शन यातून सिध्द केलेच आहे..

रुचिर आणि रूपक हे दोघे आपल्या क्षेत्रात नावारूपाला आले आहेत.. मात्र जयराम कुलकर्णी या साऱ्यातुन अनंताच्या प्रवासास निघून गेले आहेत..त्यांच्या मागे डॉक्टर पत्नी हेमाताई जयराम कुलकर्णी..ताकदीने उभ्या होत्या आणि आहेत..
जयराम कुलकर्णी आपले नाव कायम ठेवून निघून गेलेत..त्यांच्या स्मृतीला हीच आदरांजली..



- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
 17 March 2020